Quick Reads

बो बर्न्हम: ‘इनसाइड’: मिलेनियल्सच्या मनातील कोलाहलाचे दस्तऐवजीकरण करणारे बिटरस्वीट सेल्फ-पोर्ट्रेट

स्पॉटलाईट सदर

Credit : Indie Journal

स्टँड अप कॉमेडी स्पेशल्सचा विचार करता बहुतांशी वेळा त्यात दिग्दर्शक, संकलक आणि इतरही तंत्रज्ञ हे अस्तित्वहीन असतात. याचा अर्थ ते बिनमहत्त्वाचे ठरतात असे नाही. मात्र, कॉमेडियनच्या परफॉर्मन्सला, त्याच्या शैलीला, त्याच्या विनोदांना अधिक महत्त्व असते. शेवटी अशा कार्यक्रमाचे यशापयश हे प्रत्यक्ष कॉमेडियनचं लेखन आणि सादरीकरणावर अवलंबून असतो. अंतिम महत्त्व असते ते माइकसमोर उभ्या असलेल्या व्यक्तीला, त्याने तयार केलेल्या त्याच्या प्रतिमेला आणि त्याच्या विनोदांना. त्यामुळे स्टँड अप कॉमेडी स्पेशल्सबाबत बोलताना त्यातील तांत्रिक बाबी किंवा तंत्रज्ञांबाबत कुणीच बोलत नसते. अर्थात हे झालं बहुतांशी शोजबाबत, कारण याला अपवाद आहेत आणि बो बर्न्हमचे स्पेशल्स अशाच अपवादांमध्ये मोडतात.

‘इनसाइड’ या बो बर्न्हमच्या नव्या कोऱ्या स्टँड अप कॉमेडी स्पेशलकडे वळण्यापूर्वी तो अशा अपवादांमध्ये स्थान कसे मिळवतो, हे पाहूयात.

पहिला मुद्दा म्हणजे बर्न्हमच्या कॉमेडी क्षेत्रातील कारकीर्दीत तो म्युजिकल कॉमेडी या प्रकारासाठी लोकप्रिय आहे. या प्रकाराच्या क्लिष्ट स्वरूपामुळे, तसेच कलाकाराला लेखनासोबत संगीताची जबाबदारी देखील पार पाडायची असल्याने म्युजिकल कॉमेडी प्रकारात काम करणाऱ्या कलाकारांची एकूण स्टँड अप कॉमेडियन्सच्या तुलनेत कमी आहे. या प्रकाराचं नाव सुचवतं त्यानुसार सादरीकरणात विनोद आणि संगीताचे मिश्रण असते. थोडक्यात सांगायचे झाल्यास, लोकप्रिय गाणी आणि संगीतप्रकारांच्या विडंबनापासून ते सर्वस्वी नव्या गाण्यांपर्यंत बऱ्याचशा गीतांचा आणि सांगीतिक करामतींचा समावेश यात असतो.

उदाहरणार्थ, ‘कंट्री सॉंग’ या लोकप्रिय गीतप्रकाराचे विडंबन असलेले त्याच नावाचे गाणे बर्न्हमच्या ‘मेक हॅपी’ (२०१६) या स्पेशलमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. हे गाणं सांगीतिक स्तरावर कंट्री सॉंगची सगळी वैशिष्ट्ये वापरतं, पण प्रत्यक्षात कंट्री सॉंग या प्रकाराची खिल्ली उडवतं अशी विरोधाभास असणारी, विसंगतीपूर्ण मांडणी त्यात आहे. हे झालं बर्न्हम ज्या विधेत विनोद सादर करतो त्याबाबत. या अंतर्गत बर्न्हम ज्या प्रकारचे विनोद सादर करतो त्या विनोदाच्या स्वरूपाला स्पर्श करायच्या झाल्यास तो व्यंग, विडंबन, डार्क कॉमेडी, निरीक्षणात्मक विनोद, तिरसट दृष्टिकोनातून आणि लोकांचा अपमान करण्याचा उद्देशाने रचलेल्या विनोदांसाठी प्रसिद्ध आहे. (यात आणखीही काही प्रकार व उपप्रकार समाविष्ट होऊ शकतील, पण हे त्याच्या कामात आढळणारे मुख्य प्रकार.) त्याच्या तिरसट आणि डार्क विनोदबुद्धीचे उदाहरण हवे असल्यास ‘मेक हॅपी’मधील ‘किल युअरसेल्फ’ हे गाणं पाहा.

 

बर्न्हम ज्या प्रकारचे विनोद सादर करतो त्या विनोदाच्या स्वरूपाला स्पर्श करायच्या झाल्यास तो व्यंग, विडंबन, डार्क कॉमेडी, निरीक्षणात्मक विनोद, तिरसट दृष्टिकोनातून आणि लोकांचा अपमान करण्याचा उद्देशाने रचलेल्या विनोदांसाठी प्रसिद्ध आहे.

 

दुसरा आणि सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बर्न्हमच्या स्पेशल्समध्ये दृक्-श्राव्य चमत्कृतींना प्रचंड महत्त्व असते. त्यात छायांकन, ध्वनी, प्रकाशयोजना, संकलन, दिग्दर्शन अशा सर्व विभागांमध्ये एक विशिष्ट परस्परसंबंध असतो. या सर्व गोष्टींच्या साहाय्याने तो सादरीकरण करीत असतो. प्रत्येक क्षणाचा विचार करून ठरवण्यात आलेली अचूक लयबद्धता त्यात असते. भूतपूर्व किंवा अगदी समकालीन कॉमेडियन्सच्या स्पेशल्समध्ये सहसा असे घडल्याचे किंवा घडताना दिसत नाही. म्हणजे वर उल्लेखलेल्या साऱ्या विभागांचा बर्न्हमच्या विनोदाच्या यशात मोठा वाटा असतो. कारण, अमुक प्रसंगी अमुक इतकाच प्रकाश स्टेजवर पडायला हवा किंवा त्याने आधीच रेकॉर्ड केलेला विशिष्ट आवाज अमुक वेळी यायलाच हवा, हे गरजेचे असते. त्यामुळे प्रत्यक्ष विनोदासोबत या बाह्य घटकांनाही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. इतर कॉमेडियन्सच्या बाबतीत मात्र हे घटक दुय्यम असतात. उदाहरणार्थ, ‘व्हॉट.’ (२०१३) या स्पेशलमधील व्हिडिओ एडिटर्सबाबतचा हा तुकडा पाहा. किंवा बो त्याच्या याआधीच्या तिन्ही स्पेशल्समध्ये तो ध्वनी आणि प्रकाशयोजनेचा, तसेच स्टेजवरील प्रॉप्सचा वापर कसा करतो, हे पाहा. सांगायचा उद्देश हा की, बो बर्न्हमच्या स्टँड अप कॉमेडी स्पेशल्समध्ये दृक्-श्राव्य माध्यम त्याच्या सर्व ताकदीनिशी वापरल्याचे पाहायला मिळते.

 

‘इनसाइड’: आत्मशोध आणि कॅथार्सिस 

बर्न्हमने २०१६ मधील ‘मेक हॅपी’ या स्पेशलनंतर लाइव्ह कॉमेडी शोज करणे काही काळासाठी थांबवले होते. ज्यामागे त्याला येणारे पॅनिक ॲटॅक्स आणि अँक्झायटी ही कारणे होती. त्यानंतर त्याने अभिनय आणि दिग्दर्शक म्हणून काम करण्यावर लक्ष केंद्रित केलं. मधल्या काळात ‘एट्थ ग्रेड’ (२०१८) नावाचा गंभीर आशय-विषय असलेला सिनेमा दिग्दर्शित केला, बऱ्याचशा चित्रपटांमध्ये अभिनय केला. आणि आता २०२१ मध्ये ‘नेटफ्लिक्स’वर रिलीज झालेला ‘इनसाइड’ हा ‘मेक हॅपी’नंतर पाच वर्षांनी आलेला त्याचा स्पेशल शो आहे. मात्र, ‘इनसाइड’ केवळ बर्न्हमचा पाच वर्षांतील पहिला शो म्हणून महत्त्वाचा ठरत नाही, तर या स्पेशलच्या महत्त्वपूर्ण असण्यामागे इतरही काही कारणं आहेत. हा स्पेशल त्याने पॅन्डेमिकमध्ये घरात अडकून पडल्यानंतर काही महिन्यांच्या कालावधीत प्रेक्षकांच्या आणि इतर तंत्रज्ञांच्या अनुपस्थितीत बनवला आहे. त्यामुळेच श्रेयनामावलीत संगीत, लेखन आणि दिग्दर्शनासोबत छायांकन, प्रकाशयोजना, संकलन, ध्वनीमुद्रण, इत्यादी विभागातही बर्न्हमचे एकट्याचे नाव दिसते. त्यामुळे एकाहून अधिक स्तरांवर बर्न्हमचे कसब तर दिसते.

बर्न्हमच्या विनोदाच्या क्षेत्रातील कारकिर्दीत त्याने निवडलेला फॉर्म हा सांगीतिक विनोदाचा असला तरी त्याच्या स्पेशल्समध्ये कायमच आत्मशोधाचा अंतःप्रवाह दिसून येतो. या आत्मशोधाचे स्वरूप जसे — तो ज्या पिढ्यांचे प्रतिनिधित्व करतो त्या-मिलेनियल आणि जनरेशन झी पिढ्यांच्या मानसिक स्वास्थ्याशी संबंधित आहे, तसेच कलेचे मानवी जीवनातील महत्त्व आणि कलेच्या बदलत्या स्वरूपाचा आढावा घेण्यातदेखील दडलेले आहे. त्यामुळे त्याच्या स्पेशल्समध्ये ॲब्सर्ड विनोद, विडंबन आणि व्यंगाखेरीज आत्मपरीक्षण करणाऱ्या चिंतनपर जागाही आढळतात. ज्यात — अमेरिकेसारख्या राष्ट्रात राहणारा श्वेतवर्णीय पुरुष असणं म्हणजे काय असतं, त्यासोबत कुठल्या प्रकारचे प्रिव्हिलेज त्याला मिळतात यांसारख्या गोष्टींचा अंतर्भाव जवळपास सर्व स्पेशल्समध्ये केलेला आहे. त्यातून तो वर्गवाद, लैंगिक भेदभाव, भांडवलवादी अर्थव्यवस्था यासारख्या मुद्द्यांवर बोलतो, पण सोबत बर्न्हमसारखा एक श्वेतवर्णीय पुरुष या मुद्द्यांवर बोलतोय, हे अधोरेखित करून विरोधाभास निर्माण करतो. त्यातून अमेरिकेसारख्या राष्ट्रातील श्वेतवर्णीय नागरिकांच्या आत्मप्रौढी वागण्यावर टीका करतो. त्याच्या कलाकृतींमध्ये हमखास आढळून येणारी ही बऱ्याच लेयर्स असलेली आत्मपरीक्षण-वजा-टीका या शोमध्येही आहे.

 

 

बर्न्हमला प्रेक्षकांच्या मनात अपेक्षा निर्माण करून लगेचच त्या अपेक्षांना सुरुंग लावण्यातून आनंद मिळतो. त्याने सतत प्रेक्षकांच्या दोन पावलं पुढे राहून, त्यांच्या अपेक्षा उलथून स्वतःच्या चतुराईचे केलेले प्रदर्शन त्याच्या याआधीच्या सर्व स्पेशल्समध्ये आढळते. तसं पाहिल्यास ‘इनसाइड’मध्येही तो हे साध्य करतो. कारण, नुसत्या सांगीतिक कौशल्याच्या नि विनोदाच्या पलीकडे जाणाऱ्या अनेक बाबी इथे अस्तित्त्वात आहेत. यात विनोद, बर्न्हमचे सांगीतिक कौशल्य, दृक्-श्राव्य चमत्कृती असं सगळं आहे. पण, सांगीतिक विनोद हा इथल्या काही घटकांपैकी एक आहे. ज्यासोबत धीरगंभीर जागा, विमनस्क अवस्थेचे चित्रण, कलाकृतीच्या निर्मितीमागे जाणाऱ्या प्रयत्नांचे दस्तऐवजीकरण, पॅन्डेमिकमध्ये घरात अडकून पडलेल्या तरुण (हा शब्द मी इथे मिलेनियल आणि जनरेशन झी या दोन्हींकरिता काहीशा ढोबळ स्वरुपात वापरतो आहे, तरी मुख्यत्वे मिलेनियल्सकडे रोख आहे.) पिढीच्या मनोवस्थेचे चित्रण असे इतरही बरेच (आणि अधिक महत्त्वाचे) कंगोरे या कलाकृतीला आहेत.

‘इनसाइड’च्या सादरीकरणाच्या पद्धतीमुळे, चित्रीकरण आणि निर्मितीतील मर्यादांमुळे त्याच्या दृश्यचमत्कृतीपूर्ण ठरण्यासोबतच नानाविध भावनांचे चित्रीकरण करणे शक्य होते. या भावना आणि मनोवस्थांपैकी पुढील अवस्था ठळकपणे आणि वारंवार दिसतात — भविष्याच्या अनिश्चित आणि धूसर चित्रामुळे बहुतांशी लोकांच्या (विशेषतः तरुणांच्या) मनात निर्माण झालेला गोंधळ; डिजिटल जगात वावरत असताना मनात निर्माण होणाऱ्या आनंद, दुःख यापासून ते द्वेष आणि तिरस्काराच्या भावना; नैराश्य, उदासीनता, विमनस्कता अशा अवस्थांचे  चित्रण; काहीच करता न येण्यातून निर्माण होणारी हतबलता आणि काहीच न करण्याची गरज वाटून निर्माण होणारी निश्चलता. गेल्या दोन वर्षांच्या काळात प्रत्येकाने अनुभवलेल्या भावभावनांचा विस्तृत पटल समोर मांडला जातो. यातून निर्माण होणाऱ्या संमिश्र भावनांचे वर्णन एका शब्दात करायचे झाल्यास तो शब्द असेल — बिटरस्वीट.

बर्न्हमच्या इतर स्पेशल्सप्रमाणे इथले अनेक विनोद देखील विशिष्ट संदर्भ घेऊन येणारे आहेत. ‘इनसाइड’मधील गाण्यांतील दृश्य/श्राव्य संदर्भ हे बहुतांशी वेळा डिजिटल जगताशी निगडीत आहेत. ज्यात एकीकडे ‘व्हाईट वुमन्स इन्स्टाग्राम’ किंवा ‘सेक्स्टिंग’ किंवा ‘वेलकम टू दि इंटरनेट’ आणि इतरही गाण्यांमधून दृश्य आणि सांगीतिक स्तरावर विनोदाची निर्मिती केली जाते. तर दुसरीकडे, ‘३०’सारखी गाणी काही अंशी कारुण्यपूर्ण आहेत. या दोन्ही प्रकारच्या गाण्यांमधील सत्याचा अंश त्यांना (आणि त्यांतील विचित्रपणाला) अधिक प्रभावी बनवणारा आहे. आणि अशी वीस गाणी या स्पेशलमध्ये आहेत.

 

 

स्वतंत्र गाण्यांसोबतच या गाण्यांदरम्यानच्या अवकाशात बर्न्हम जे साध्य करतो, ते या स्पेशलला अधिक महत्त्व प्राप्त करून देते. ‘इनसाइड’चा आकृतिबंध हा कॉमेडी स्पेशल, चित्रपटीय नाट्य, माहितीपट अशा अनेक प्रकारांची सरमिसळ करणारा आहे. त्यात एकीकडे कॉमेडी स्पेशल या कलाप्रकाराची, त्याच्या स्वरुपाची समीक्षा होते, तर दुसरीकडे हा स्पेशल रेकॉर्ड करत असतानाच्या बर्न्हमच्या आयुष्याचे, निर्मिती प्रक्रियेचे चित्रीकरण देखील केले जाते. या साऱ्याचा परिणाम असा की, ‘इनसाइड’कडे (जवळपास दीड तासांची) परिपूर्ण चित्रपटीय अनुभूती प्राप्त करून देणारी कलाकृती म्हणून पाहता येणे शक्य होते.

वर उल्लेख केल्याप्रमाणे, बो बर्न्हम हा अपेक्षा उलथून टाकत प्रेक्षकांना चकवा देण्याच्या प्रकारातील मास्टर आहे. याही वेळी त्याने अनपेक्षितपणे हा स्पेशल रिलीज करून एक सुखद धक्का दिला आहे. आणि गुणवत्तेच्या स्तरावर त्याच्या या इन्टिमेट सेल्फ-पोट्रेटला मागे टाकण्याचे मोठे आव्हान इतर स्टँड अप कॉमेडियन्सपुढे ठेवले आहे, ते वेगळेच!