Quick Reads
‘आमिस’ : अभौतिक प्रेमातली विलक्षण उत्कटता
स्पॉटलाईट सदर
सुमन (अर्गदीप बरुआ) आणि निर्माली (लिमा दास) हे दोघेही वय, वर्ग, सामाजिक स्थान अशा अनेक घटकांच्या दृष्टीने एकमेकांहून भिन्न आहेत. ती एक विवाहित डॉक्टर आहे, तर तो तिच्याहून बराच लहान पीएचडीचा विद्यार्थी आहे. मात्र, अगदी पहिल्याच भेटीत त्या दोघांमध्ये काहीतरी स्पार्क जाणवते. पहिल्यांदा ते दोघे भेटतात तेव्हा सुमन केवळ त्याच्या आजारी असलेल्या मित्रावर उपचार करण्यासाठी डॉक्टरच्या शोधात असतो. इतका की, तो बालरोग तज्ञ असलेल्या निर्मालीला त्याच्यावर उपचार करण्याची विनंती करतो. काहीशा ‘बिफोर सनराइज’च्या (१९९५), मम्बलकोर सिनेमाच्या थाटात त्यांच्यात संवाद सुरु असताना तिच्याभोवती घुटमळणाऱ्या त्याच्या नजरेत त्याचं तिच्याकडे आकर्षित होणं जाणवतं. मांसाहारापासून सुरु झालेल्या त्यांच्या चर्चेचा शेवट ‘मीट क्लब’चा सहसंस्थापक असलेल्या सुमनने फी म्हणून तिला मांस खाऊ घालण्याच्या आश्वासनाने होतो.
पहिल्यांदा तो तिच्यासाठी मांस घेऊन येतो तेव्हा ते तिच्यासाठी अनपेक्षित असतं. पण, हळूहळू त्यांच्यात होणारी ही देवाणघेवाण दोघांच्याही दृष्टीने महत्त्वाची ठरते. मांसभक्षण करणं ही गोष्ट त्या दोघांना जोडणारा धागा ठरते. त्या दोघांमधील नातं तसं अस्पष्ट असतं. मुख्यत्वे तिच्या मनात द्वंद्व सुरु असतं. पण, ही गोष्ट त्यांच्या खाण्याच्या निमित्ताने वारंवार होणाऱ्या भेटींमध्ये अडथळा ठरत नाही. झालंच तर त्यामागील प्रोत्साहन ठरते. दोघेही कुठेतरी अस्पष्ट नात्याचा मागोवा घेत असतात. मात्र, सामाजिक चौकटीत त्यांचं निव्वळ भेटणंदेखील अनैतिक असतं. वास्तविक पाहता त्यांनी अजून एकमेकांना स्पर्शही केलेला नाही, एकमेकांकडे आपल्या भावनाही व्यक्त केलेल्या नाहीत. अर्थात त्यांच्या परिपूर्ण अशा अस्वस्थतेतून निर्माण होणाऱ्या शारीरिक हालचालींत, आणि एव्हाना अव्यक्त भावना पुरेपूर व्यक्त करणाऱ्या डोळ्यांद्वारे त्यांच्या मनातील भावना पुरेशा स्पष्टपणे लक्षात येत असतात. तरीही सुमनच्या पशुवैद्य असलेल्या मित्राचं, इलियासचं (सागर सुभाष) त्याच्याशी घडणारं संभाषण, किंवा मग निर्मालीच्या ड्रायव्हरने, मोलकरणीने ते दोघे सोबत असताना त्यांच्याकडे टाकलेले कटाक्ष हे सामाजिक परिप्रेक्ष्यात त्यांच्या नात्याकडे कुठल्या नजरेनं पाहिलं जातं (किंवा जाईल) हे दर्शवतात. समाजाच्या दृष्टीने ती एका मुलाची आई असलेली विवाहित स्त्री असते, आणि तो तिचा प्रियकर.
एका दृश्यात सुमन गुगलवर ‘प्लेटोनिक लव्ह’ ही सर्च करताना दिसतो. त्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे, कारण त्या दोघांनी एकमेकांना स्पर्शही केलेला नाही. ते दोघेही परस्परांकडे आकर्षित होत असल्याचं दिसत राहतं. मात्र, त्यांच्यातील नात्याला पारंपारिक चौकटीत बसवणं गरजेचं वाटत नाही. जणू काही त्यांनी एकमेकांना स्पर्श करण्यामुळेदेखील त्यांच्यातील तरल, अलवार नात्याला, त्या भावनेला तडा जाईल. निर्मालीचा पती तिच्यापासून भौतिक आणि भावनिक अशा दोन्ही अर्थांनी दूर असतो. त्याच्या अनुपस्थितीत तिला गरजेची असलेली आपल्यावरही कुणीतरी उत्कटतेने प्रेम करू शकतं, भलेही ते भौतिक स्तरावर नसेना का, ही जाणीव तिच्या दृष्टीने महत्त्वाची असते. लिमाच्या डोळ्यांतून व्यक्त होण्यात एक सूक्ष्मता आणि सूचकता आहे. दिग्दर्शक भास्कर हजारिका आणि छायाचित्रकार रिजू दास हे या दोघांमधील जणू चोरटे वाटावेसे क्षण बऱ्याचवेळा हॅन्ड-हेल्ड कॅमेऱ्यानं चित्रित करतात. त्यातली अस्थिरता एका अर्थी त्यांच्या नात्यातील आंदोलनं आणि अस्थिरता टिपते.
‘तोंडीमुथलम द्रिक्साक्षीयम’ (२०१७) या मल्याळम चित्रपटात एक संवाद आहे. तो म्हणजे ‘इझन्ट हंगर द रीजन फॉर एव्हरीथिंग?’ हे वाक्य एका अर्थी इथे घडणाऱ्या घटनांनाही लागू पडतं. इथे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, काहीशी रूपकात्मक अशा दोन्ही तऱ्हेची क्षुधा सुमन आणि निर्मालीच्या कृत्यांना कारणीभूत ठरते. सामाजिक संरचनेमुळे त्यांनी स्वतःवर काही नैतिक बंधनं लादून घेतलेली असतात. ही बंधनं आणि त्यांच्या अस्तित्त्वातही एकमेकांप्रती असलेली प्रबळ अशारीर, अभौतिक ओढ त्यांना काही अनपेक्षित वळणांवर आणून सोडते. एका संभाव्य अनैतिक कृत्यापासून वाचण्याच्या खटाटोपात केवळ सामाजिकदृष्ट्या अनैतिकच नव्हे, तर कायदेशीररीत्या शिक्षापात्र कृत्य करण्याकडे त्यांचा प्रवास होतो.
एका दृश्यात तिच्या घरी आमंत्रित केला गेलेला सुमन बाथरूममध्ये असलेल्या तिच्या ब्लाऊजचा वास घेताना दिसतो. त्यांच्यातील अभौतिक नात्याची कमतरता तिच्या सभोवताली असण्याच्या खुणांनी भरून काढली जाते. आणखी एका दृश्यात तो तिच्या फोटोकडे पाहत असताना तो मुबलक पिक्सलेट होईल इतपत झूम करताना दिसतो. इथे ते दोघेही एकेकटे असताना प्रबळ सेक्शुअल ताण जाणवत राहतो. मात्र, एकत्र असताना असं घडत नाही. तेव्हा ते केवळ एकमेकांसोबत असण्याच्या कल्पनेने रोमांचित (आणि रोमँटिक) झालेले असतात, असं मानता येईल. एरवी केवळ लैंगिक संबंधांतून येण्याची अपेक्षा असलेली समागमाची भावना इथे दोन विशिष्ट क्षणांनंतर येते. अशावेळी या भावनेचं तितकंच उत्कट आणि मनोभावी ग्राफिकल रिप्रेझेन्टेशन पहावं.
दोघांनीही एकमेकांना स्पर्श न करता त्यांच्या मनातील परस्परांविषयीच्या भावनांचं इथलं चित्रीकरण वॉंग कार-वाईच्या ‘इन द मूड फॉर लव्ह’ (२०००) या चित्रपटाच्या जवळ जाणारं आहे. अगदी इथल्या सांगीतिक दृश्यरचनेतही ‘इन द मूड फॉर लव्ह’च्या मायकल गलासो आणि शिगेरू उमेबायाशी या दोन संगीतकारांच्या कामगिरीची छाप दिसते. क्वान बे या संगीतकार जोडीचं इथलं संगीत म्हणजे चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग आहे. इथल्या अव्यक्त भावनांना स्वर फुटतात ते इथल्या संगीतातून.
‘आमिस’ ही सर्व अर्थांनी एक प्रभावी इंडिपेंडंट फिल्म आहे. आर्थिक मर्यादांमुळे आलेल्या अडचणींपेक्षा इथली हाताळणी आणि पात्रांशी प्रबळ भावनिक नातं जोडणं अधिक लक्षवेधक ठरतं. चित्रपट इथल्या सूक्ष्मतेच्या दृष्टीने अधिकच महत्त्वाकांक्षी आहे. इथे घडणाऱ्या घडामोडी अस्वस्थ करणाऱ्या असतानाही त्या विलक्षणरीत्या प्रभावी, उत्कट आणि रोमँटिक वाटतील ही भावना कायम राखण्यात दिग्दर्शक हजारिकाचं खरं यश आणि कसब दडलेलं आहे.