Quick Reads
स्पॉटलाईट: जाऊँ कहाँ बता ऐ दिल
‘जाऊँ कहाँ बता ऐ दिल’ हा कमालीचा सेल्फ-अवेअर चित्रपट आहे.
मोजकीच पात्रं कथानकाच्या केंद्रस्थानी ठेवत, त्यांच्यामधील विस्तृत संभाषणांवर जेव्हा संपूर्ण चित्रपटाची भिस्त बाळगली जाते, तेव्हा ते चित्रपट ‘मंबलकोर’ प्रकारात मोडतात. वुडी अॅलन, रिचर्ड लिंकलेटरपासून ते नोआ बॉमबापर्यंत अनेक लेखक-दिग्दर्शक, चित्रपटकर्त्यांनी या चित्रपट प्रकारावर आपलं करियर उभारलं आहे. आपल्याकडे, हिंदीमध्ये सई परांजपेच्या काही चित्रपटांमध्येही अशा तऱ्हेची मांडणी दिसून आलेली आहे. आदिश केळुसकर लिखित-दिग्दर्शित ‘जाऊँ कहाँ बता ऐ दिल’ हा इंडी सिनेमा मंबलकोर जान्रची वैशिष्ट्ये बाळगून असला तरी तो त्याही पलीकडे जाणारा आहे. तो समकालीन वास्तवाची जाण असलेला आहे. तो अनेक पातळ्यांवर रॉ आणि इंटेन्स आहे. मुख्य म्हणजे समकालीन भारतीय चित्रपटसृष्टीतील चित्रपटांचा विचार करता तो कमालीचा महत्त्वाकांक्षी आहे. ज्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळायला हवा असं मनोमन वाटतं.
इथे चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे एक जोडपं (खुशबू-रोहित कोकाटे). ‘तिच्या’पासून कथानकाला सुरुवात होते. आपण तिची ‘त्याला’ भेटायला जाण्याची दगदग पाहतो. प्रवासात रोमँटिक गाणी ऐकणं, ती ऐकताना मेक-अप करणं पाहतो. ती पारंपरिक हिंदी चित्रपटांवर वाढलेली भारतीय स्त्री आहे. एकुणातच ती काहीशी रोमँटिक आहे. ‘तो’? ‘तो’ बरंच काही आहे. तो स्पष्टवक्ता आहे, निराशावादी आहे. शिव्या देत बोलतो, जगाला शिव्या घालतो. तरी जगाशी तडजोड करत जगतो. तिला भेटतो तेव्हा काहीच क्षणांत सिगारेट शिलगावतो. आधी तिच्या मैत्रिणीला, मग जगाला शिव्या घालतो. सगळं काही ब्लॅक अँड व्हाईट अशा दोन छटांमध्ये, नि गटांमध्ये विभागता येणं शक्य नाही याची त्याला जाण असल्याचं दिसतं. याउलट तिला गोष्टींचं सुलभीकरण करणं आवडतं. परिणामी ‘अपोझिट्स अट्रॅक्ट’ या तत्त्वावर त्यांचं नातं उभं आहे, याची जाणीव व्हायला फारसा काळ लागत नाही.
चित्रपटाच्या केंद्रस्थानी हे प्रेमी युगुल असलं तरी ही काही घिस्यापिट्या प्रकारातील प्रेमकथा नाही. ती वास्तवात नखशिखांत बुडालेली आहे. इथे वुडी अॅलन-रिचर्ड लिंकलेटर वगैरेंप्रमाणे किंवा गेलाबाजार भारतीय प्रेमकथांप्रमाणे नितांतसुंदर प्रतिमा, जोडप्यातील गोग्गोड संवाद दिसत नाहीत. अमेय चव्हाणचा कॅमेरा या पात्रांच्या सभोवतालाला आणि एकूणच मुंबईला एका उपजत ओबडधोबड, रुक्ष आणि रॉ रूपात चित्रित करतो. शिशिर चौसळकरचं ध्वनी आरेखन सभोवतालातील गोंगाट, गोंधळ अन् एकूण एक आवाज टिपतं. अनेकदा कॅमेरा पात्रांच्या अवतीभोवती रेंगाळत असताना मधेच त्यांच्या चेहऱ्यावरील अगदी बारीकसारीक हालचालही दिसेल असे क्लोजअप्स घेतो. यांतून अशा काही दृकश्राव्य परिणामाची निर्मिती होते की ती पात्रं आधी होती त्याहून अस्सल भासतात.
तर आदिश केळुसकरचं लेखन-दिग्दर्शन म्हणजे चित्रपटाच्या याच रुक्ष, तरीही अस्सल अशा अनुभवात महत्त्वाची ठरणारी तितकीच महत्त्वाची अशी बाजू. अगदी दहा-पंधरा मिनिटांहून अधिक काळ चालणाऱ्या प्रदीर्घ दृश्यांमध्येही या पात्रांमध्ये घडणारी, कंटाळा न आणणारी संभाषणं या चित्रपटाचा आकर्षणबिंदू मानता येतील. या अनाम जोडप्याचे परस्परविरोधी विचार चित्रपटामध्ये अगदी निरनिराळ्या तऱ्हेचे विषय आणतात. ज्यातून केवळ समकालीन राजकीय, सामाजिक, धार्मिक परिस्थितीवर भाष्य करण्याच्या पलीकडे जात आपल्याला खुद्द त्या पात्रांविषयीही अधिक माहिती मिळते. या दोघांचे विचार इतके विभिन्न असूनही त्यांचं नातं का टिकून आहे, हे चित्रपटाच्या ओघात उलगडत जातं. तो अधिक उदारमतवादी, व्यक्तिस्वातंत्र्यवादाचा पुरस्कर्ता आहे. मात्र, त्याचे प्रेम, संभोग ते राजकारण, समाजकारण अशा सर्वच स्तरांवरील अपारंपरिक विचार त्यांच्या या नात्यामध्ये कितपत प्रतिबिंबित होतात (किंवा होत नाहीत) हे इथं महत्त्वाचं ठरतं.
ती त्याच्या अगदी उलट, अधिक पारंपरिक विचारसरणी बाळगून असलेली आहे. पण, हे नातं म्हणजे केवळ ‘परस्परविरोधी विचारांच्या व्यक्तींमधील आकर्षण’ अशा स्वरूपाचं नाही. त्याला या संज्ञेचं स्वरूप असलं तरी तिचं त्याला सहन करणं म्हणजे तिचं स्वतःच्या मनातील विचारांशी लढा देणं असल्याचं मी मानतो. तिला त्याच्यामध्ये ती जे कधीच बनू शकत नाही, असं कुणीतरी जाणवत असावं. हे ‘वाटणं’ जितकं मानसिक आहे, तितकंच सामाजिकही. म्हणजे तिचे तसे विचार आहेत, पण ते ‘तसे’ का आहेत, याचा विचार करणं इथे गरजेचं आहे. तिला आपण वयाच्या तिशीत असताना लग्न करावं असं वाटतं, कारण ती समाजाने घालून दिलेल्या नियमांना अनुसरून वागत आहे. कारण, अमुक गोष्ट न केल्याने हीन ठरवलं जाणं तिला मान्य असूच शकत नाही. पण, हा आत्मसन्मान त्याच्यासोबत असताना आड येत नाही. ती त्याच्यासोबत असताना कळत-नकळत प्रतिकार न करणाऱ्या, एकप्रकारच्या सबमिसिव्ह (submissive) अवस्थेमध्ये जाते असं दिसतं. तिचं हे मानसिक द्वंद्व ‘जाऊँ कहाँ बता ऐ दिल’ या शीर्षकात समर्पकरीत्या प्रतिबिंबित झाल्याचं दिसतं. तर या दोघांमधील हेच नातं चित्रपटाच्या इंग्रजी शीर्षकात, ‘लव्हफक्ड’मध्ये समर्पकरीत्या मांडलं गेलं आहे.
आदिश केळुसकर एकूण चित्रपटाची हाताळणी कशा प्रकारे करतो, यामध्ये चित्रपटाचा परिणाम दडलेला आहे. मरिन ड्राइव्ह, सिंगल स्क्रीन थिएटरपासून ते लॉजपर्यंत गर्दीने गजबजलेल्या शहरात प्रेमी युगुलांना आसरा देणाऱ्या अनेक जागांना तो जिवंत करतो. ज्यात अमेय चव्हाणचा कॅमेरा त्याला पुरेपूर साथ देतो. या जागा, त्यांचा अर्क या चित्रपटात कसा एकवटला जातो, आणि रितेश बत्राच्या ‘फोटोग्राफ’सारख्या चित्रपटांमध्ये कसा प्रतिबिंबित होतो, यांमध्ये खूप अंतर आहे. त्यामुळेच आधी उल्लेख करताना सदर चित्रपट मंबलकोर प्रेमकथांहून अधिक गडद, वास्तववादी आणि एक विशिष्ट अशा तीव्रतेत बरबटलेला असल्याचं म्हटलं होतं.
‘जाऊँ कहाँ बता ऐ दिल’ हा कमालीचा सेल्फ-अवेअर चित्रपट आहे. तो जागोजागी (मुख्य प्रवाहातील चित्रपटांचं वर्चस्व असलेल्या जगात) त्याच्या एक प्रायोगिक चित्रपट असण्याबाबत सजग असल्याचं जाणवतं. ज्यात केळुसकरची चतुराई दडलेली आहे. तो संवादांमध्ये राजकीय-सामाजिक संदर्भांसोबतच चित्रपट जगताचे संदर्भ जोडतो. थिएटरमधील एका विस्तृत दृश्यात जणू चित्रपटकर्ता केळुसकर स्वतःच बोलत असल्याचा भास निर्माण होतो. त्याच्या पात्रांद्वारे तो सलमान, वगैरे ‘स्टार्स’ ते काँग्रेस, बीजेपी, वगैरे राजकीय पक्षांना आणि चित्रपटाला वास्तवापासून दूर, ‘युटोपिया’मध्ये नेऊ पाहणाऱ्या सेन्सॉर बोर्डालाही शिव्या घालतो. मुख्य म्हणजे हे सगळं कुठे अनैसर्गिक वाटत नाही. आपल्या सभोवताली पाहिल्यास जोगिंदरसारखे टॅक्सी चालक आढळतात, राजकारण-चित्रपटांवर चर्चा करणारे लोकही आढळतात. सदर चित्रपट या सर्व सामाजिक घटकांना, निरनिराळ्या छटांना कवटाळतो, त्यांच्याशी एकरूप होऊन जातो. त्यानिमित्ताने केळुसकर परस्परविरोधी विचारांचा एक नमुना आपल्यासमोर मांडताना दिसतो.
‘जाऊँ कहाँ बता ऐ दिल’चा शेवट त्याच्या सकारात्मक असण्या-नसण्याबाबत मतांचं ध्रुवीकरण करणारा असला तरी मला स्वतःला तो समर्पक वाटतो. तो ‘तिच्या’पासून सुरु होतो, नि ‘तिच्या’ व्यक्तिमत्त्वाशी प्रामाणिक राहतो. मधल्या काळात त्यांचं नातं सविस्तरपणे समोर मांडतो. तो एक प्रेमकथा नको तितक्या गडद, वास्तववादी रूपात रेखाटतो. जे त्याला समकालीन चित्रपटांहून निराळं, वैशिष्ट्यपूर्ण नि आवर्जून पहावासा बनवण्यासाठी पुरेसं ठरतं.