Quick Reads
नव्या पिढीसाठी एकांत ही विशेष नवी गोष्ट नाही, परिचित आनंद आहे
स्पॉटलाईट सदर
‘वुई आर अ जनरेशन ऑफ ब्रोकन हार्ट्स अँड ब्रोकन पीपल’. झाकिर खान या कमेडियनच्या ‘हक से सिंगल’ या स्टॅण्ड अप कॉमेडी स्पेशलमधील हे एक वाक्य. अलीकडील काळातील माध्यमांतील पॉप्युलर कंटेंटकडे पाहिल्यास आपण हल्ली एकटेपणाला अंतर्भूत करत तो साजरा करायला शिकलो आहोत. याचं कारण मिलेनियल्स म्हणवल्या जाणाऱ्या, १९८० चं दशक आणि १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धादरम्यान जन्मलेल्या पिढीच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात दडलेलं आहे. या पिढीतील अनेक लोक आधीच्या पिढ्यांच्या दृष्टिकोनाच्या अधिक विरुद्ध, अलिप्त आणि एका अर्थी आत्मकेंद्री दृष्टिकोन बाळगून असतात. त्यांना एकांत खटकत नाही. जगण्यासाठी कुणाची साथ गरजेची असते असंही वाटत नाही. अर्थात हे सरसकटीकरण आणि सुलभीकरण असलं तरी मिलेनियल्स, त्यांची आर्थिक, सामाजिक परिस्थिती आणि मतं या विषयावर झालेल्या निरनिराळ्या संशोधनांकडे पाहिल्यास त्यात हेच प्रतिबिंबित झाल्याचं दिसतं.
यातील बहुतांश विचार हा पाश्चिमात्य दृष्टिकोनातून झालेला असला तरी हा जगण्याचा दृष्टिकोन आकडेवारीतील काहीएक फरकासह भारतीय परिप्रेक्ष्यातही दिसून येतो. लग्नसंस्थेकडून दूर जाणाऱ्या, कुटुंब आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या गुंतागुंतीच्या नातेसंबंधांपेक्षा आपल्या व्यावसायिक आयुष्याकडे अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. याखेरीज पारंपारिक भौतिकवादी विचारांपासून दूर जाणाऱ्या व्यक्तींची मोठी संख्याही यात आहे. विविध राष्ट्रांमधील लोकसंख्येचा एक मोठा भाग या पिढीने व्यापलेला आहे. त्यामुळे ही पिढी समाजमाध्यमं आणि माध्यमांमध्ये एक प्रबळ मतप्रवाह बाळगून आहे. माध्यमं निर्माण करत असलेल्या कंटेंटच्या उपभोक्त्यांमध्ये या पिढीची टक्केवारीदेखील मोठी आहे.
साहजिकच गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण होत असलेल्या कंटेंटकडे पाहिल्यास या पिढीची जीवनशैली आणि आचार विचार ज्यात प्रतिबिंबित होतात असा कंटेंट मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागलेला आहे. डाइस मीडियाच्या ‘लिटल थिंग्ज’सारख्या मालिका नातेसंबंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन दाखवते. झाकिर खानचं ‘हक से सिंगल’, एआयबीने दिलेला ‘प्यार एक धोखा हैं’ हा नारादेखील याकडेच बोट करतो. सांगायचा मुद्दा असा की, मिलेनियल्सना डोळ्यासमोर ठेवून केल्या जात असलेल्या कंटेंटनिर्मितीमध्ये अलीकडील काळात वाढ झालेली आहे. आणि मिलेनियल्सना टार्गेट करण्याच्या दृष्टीने ‘सॉलिट्युड’ अर्थात एकांतवास हा सर्वाधिक महत्त्वाचा कीवर्ड आहे.
टॉड फिलीप्स दिग्दर्शित ‘जोकर’ला जगभरात आणि भारतातही मिळालेल्या प्रतिसादामागे त्यातील नायकाचं एकाकी जीवन आणि तीव्र औदासिन्य ही दोन महत्त्वाची कारणं होती. बिली इलिश या गायिकेनं सर्वाधिक लोकप्रिय पॉप स्टार्सच्या रांगेत मिळवलेलं स्थानही या पिढीच्या एकाकी जीवनशैलीत दडलेलं आहे. या मुद्द्याला अनुसरून असलेली उदाहरणं अनेक देता येतील. पण, इथला मुद्दा मिलेनियल्स आणि एकाकीपणा किंवा त्यांचं औदासिन्य हा नसून कोविड-१९ अर्थात करोनाच्या उद्रेकाला त्यांनी दिलेला प्रतिसाद हा आहे.
करोनाच्या उद्रेकानंतर क्वारन्टिनची गरज अधोरेखित झाल्यानंतर एका अर्थी आत्मघृणा नि आत्मधिक्काराचा समावेश असलेले विनोद करण्याच्या (सेल्फ-डेप्रिकेटिंग ह्युमर) या पिढीच्या आणखी एका वैशिष्टाला जागणाऱ्या मीम्सचाही उद्रेक झाला. ‘दिवसभर घरात बसून राहणं तर आम्ही नेहमीच करत आलोय’ अशा अर्थाचे विनोद आणि मीम्स लागलीच मोठ्या संख्येने दिसू लागले. दुसरीकडे याहून अधिक डार्क असा ‘द ऑफिस’ या अमेरिकन सिटकॉममधील एका पात्राच्या तोंडी असलेला, ‘देअर्स टू मेनी पीपल ऑन धिस अर्थ. वुई नीड अ न्यू प्लेग’ हा संवादही समाज माध्यमांवर पुन्हा एकदा प्रसिद्ध होऊ लागला. चांगल्या वाईट कुठल्याही परिस्थिती असा विनोद शोधणं आणि निर्माण करणं हे या पिढीचं आणखी एक वैशिष्ट्य. त्याला जगाच्या विनाशासारख्या विषयाची साथ मिळाली की अधिकच स्फुरण मिळतं.
तर, दुसऱ्या प्रकारचा प्रतिसाद हा जरा अधिक गंभीर होता. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडिओ, हॉटस्टारसारख्या स्ट्रीमिंग साइट्समुळे चित्रपट आणि मालिका सहज उपलब्ध होतात. परिणामी बऱ्याचशा संकेतस्थळांनी सेल्फ-क्वारन्टिनदरम्यान पहाव्यात अशा चित्रपटांच्या याद्या प्रसिद्ध केल्या. एडगर राईट, जेम्स गनसारख्या चित्रपट दिग्दर्शकांनीही स्वतः चित्रपटाच्या शिफारशी केल्या. लॉस अँजेलिस टाइम्स आणि इतरही संकेतस्थळांनी एकांतात ऐकाव्यात अशा गाण्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या. या काळात पुस्तकं वाचत, चित्रपट पाहत, गाणी ऐकत वेळ सकारणी लावण्याच्या शिफारशी दिसू लागल्या.
याखेरीज या गेल्या महिन्याभरात ‘कन्टेजन’ (२०११) या कोविड-१९ शी साधर्म्य असणाऱ्या काल्पनिक रोगावरील चित्रपटाला मिळालेली पुनःप्रसिद्धीदेखील एखाद्या आपत्तीविषयी अधिक जाणून घेण्याच्या मानवी भावनेकडे बोट करणारी आहे. सोबतच या चित्रपटासारख्या ‘आऊटब्रेक’ (१९९५) आणि इतर चित्रपटांच्या याद्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.
या शिफारशी आणि विनोद हे आपत्तीकडे पाहण्याचे दोन वेगळे, पण तितकेच इंटरेस्टिंग दृष्टिकोन आहेत. एकांताची सवय असलेल्या एका सबंध पिढीने एका भयावह आपत्तीला दिलेला हा एक इंटरेस्टिंग प्रतिसाद आहे. ज्याची कारणं या पिढीच्या वैयक्तिक-सामाजिक जडणघडणीत आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनात दडलेली आहेत. पैकी विनोदाची उत्पत्ती ही साहजिकच मृत्यूची खिल्ली उडवण्याच्या मानसिकतेतून झालेली आहे. मात्र, संगीत, चित्रपट आणि मालिकांच्या शिफारशीमागील कारणं या पिढीच्या भूतकाळात दडलेली आहेत. चित्रपट पाहणं या कृतीकडे जगभरात आणि अगदी आपल्याकडेही बराच विस्तृत काळ एक सामाजिक कृती म्हणून पाहिलं गेलेलं आहे. चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी एकतर मित्र किंवा कुटुंबाची किंवा मग प्रियकर/प्रेयसीची साथ असणं आपल्याला गरजेचं वाटत होतं. किंबहुना अजूनही बुकमायशोवर बुकिंग करायला गेल्यास सीट्सची डिफॉल्ट संख्या दोन इतकी असते. साहजिकच चित्रपट पाहणं ही एक सामूहिक कामगिरी असल्याचे संस्कार आपल्यावर झालेले आहेत. एकुणातच कुटुंब आणि मित्रवर्यांना व्यक्तीस्वातंत्र्याहून अधिक महत्त्व देण्याची प्रथादेखील आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली असल्याने यात नवल ते नाहीच.
त्यात हे सगळं अनुभवत मोठ्या झालेल्या सबंध पिढीचा संबंध जेव्हा व्यक्तीस्वातंत्र्याचं छोटेखानी रूप म्हणाव्याशा ‘नेटफ्लिक्स अँड चिल’शी आला, तेव्हा त्या पिढीला असलेली एकांताची तृष्णा अधिकच ठळकपणे अधोरेखित झाली असावी. वयाच्या विशीत आणि तिशीत असलेल्या भारतीय तरुणांचा एकटेपणा आणि तीव्र नैराश्य हा गेल्या काही वर्षात मानसिक आरोग्याशी निगडीत समस्येचा महत्त्वाचा विषय बनलेला आहे. आपल्या एकाकी जीवनशैलीला कवटाळून असलेल्या व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे करोनाच्या उद्रेकाला विनोद आणि घरबसल्या चित्रपट, मालिका पाहण्याच्या योजना चर्चिल्या गेल्या असल्या तरी शेवटी त्यानिमित्ताने काही झालंच असेल तर आपली एकल जीवनशैली अधोरेखित ‘झाली आहे.
बाकी भारतीय तरुण, त्याची जीवनशैली आणि नैराश्याचं वाढतं प्रमाण हा अधिक गंभीर आणि सविस्तर लेखाचा विषय आहे. तूर्तास तरी क्वारन्टिनदरम्यान आपलं नैराश्य ट्रिगर न होता यादरम्यान बहुतेकांकडून काहीतरी चांगलं वाचून, पाहून, लिहून किंवा ऐकून होईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.
हॅपी बिंज रीडिंग/वॉचिंग/लिसनिंग!
सजेस्टेड रीडिंग्ज:
Times, 2020. What to Watch, Read and Listen to During Your Coronavirus Self-Quarantine.
Roberts, 2020. Coronavirus tips: Why you should listen to music in this way—Los Angeles Times.
Vasudeva, 2019. How loneliness is affecting the Indian youth.