Quick Reads

जोकर: अस्वस्थ करणाऱ्या क्रौर्य आणि खिन्नतेतील सिनेमॅटिक सौंदर्य

स्पॉटलाईट सदर

Credit : Warner Brothers

बॅटमॅन आणि त्याचा मुख्य शत्रू, जोकर या दोन पात्रांचा विचार करता त्यांना पॉप कल्चरमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. ब्रूस वेन हा अब्जाधीश आणि बॅटमॅन हे त्याचं सुपरहिरो व्यक्तित्व इंग्रजी सिनेमा पाहणाऱ्या बहुतांशी लोकांच्या परिचयाचं असणार. ‘जोकर’ म्हणजे बॅटमॅनच्या याच मुख्य वैऱ्याची मूळ कथा आहे, ज्यात आर्थर फ्लेक ही व्यक्ती ‘जोकर’ कशी बनली हे दिसतं. आता या चित्रपटाचा आणि ‘डीसी’च्या चित्रपट विश्वाचा तसा प्रत्यक्ष संबंध नाही. त्यामुळे ‘जोकर’ पाहण्यासाठी बॅटमॅनबाबत किंवा इतर चित्रपटांबाबत इत्तंभूत माहिती असणं गरजेचं नाही, अर्थात ती असेल तर चांगलं आहेच. सध्या कॉमिक बुक्सवर आधारित चित्रपटांना पाश्चिमात्य आणि एकूणच जागतिक पातळीवर अगण्य महत्त्व प्राप्त झालेलं असताना ऐंशीच्या दशकातील ‘गॉथम’ या काल्पनिक महानगराच्या निमित्ताने आपल्या समकालीन विश्वातील हिंसक घडामोडींवर केलेलं भाष्य नि त्यातील गंभीर आशय यामुळे सदर चित्रपटाकडे गंभीरपणे पहायला हवा. 

‘जोकर’चा विचार करत असताना त्याच्याकडे दोन स्तरांवर पहावं लागेल. पहिलं म्हणजे संकल्पनात्मक पातळीवर, आणि दुसरं म्हणजे दृकश्राव्य मांडणीच्या पातळीवर. इथे चित्रपटाला संकल्पनात्मक पातळीवर सामाजिक, आर्थिक आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मानसशास्त्रीय कंगोरे प्राप्त होतात ते त्याच्या लेखनाच्या माध्यमातून. तर, दिग्दर्शक टॉड फिलिप्स आणि छायाचित्रकार लॉरेन्स शेर मिळून समोर आणत असलेली दृश्यं चित्रपटाला गरजेचा असा एक गडद दृष्टिकोन प्राप्त करून देतात. सोबतच त्यांना मिळत असलेली पार्श्वसंगीताची किंवा काही वेळा नीरव शांततेची, अचूक निवड म्हणता येईलशा गाण्यांची जोड यातून एक नितांतसुंदर अशी सिनेमॅटिक सिंफनी तयार होते. 

आर्थर फ्लेक (वाकीन फिनिक्स) ही गॉथममध्ये जोकर म्हणून काम करून उदरनिर्वाह करणारी एक व्यक्ती आहे. आता इथे गॉथम या काल्पनिक शहराचं चित्र डोळ्यासमोर उभं राहणं गरजेचं आहे. गॉथम हे शहर इथल्या आणि एकूणच बॅटमॅन या सुपरहिरोच्या कथेचा विचार करता एका तऱ्हेचं पात्रच आहे. अमेरिकेतील न्यू यॉर्क/मॅनहॅटन किंवा तत्सम महानगरासारखं हे शहर. कुठल्याही इतर शहराप्रमाणे याही शहरात सामाजिक-आर्थिक निकषांनुसार निरनिराळे वर्ग निर्माण झालेले आहेत. आर्थर हा आर्थिक-सामाजिक दृष्टीने मागास वर्गात मोडणारा आहे. सुरुवातीच्याच दृश्यांमध्ये त्याच्या कामाचं, सभोवतालाचं चित्र समोर उभं राहतं. त्याची आई, पेनी फ्लेक (फ्रान्सिस कॉनरॉय) थॉमस वेन (ब्रेट कलन) या आपल्या पूर्वाश्रमीच्या मालकाला आपल्या हलाखीच्या परिस्थितीविषयी कळवताना दिसते. वेन हा उद्योगपती आर्थिक-सामजिकदृष्ट्या प्रबळ आणि धनाढ्य वर्गात मोडणारा आहे. वर्ग संघर्ष या मुलभूत संकल्पनेतून इथे आर्थिक-सामाजिक गटांतील विषमता आणि परिणामी समाजातील वाढता असंतोष, त्यानिमित्ताने येणारी हिंसा यासारख्या संकल्पनांची व्युत्पत्ती होते. 

सुरुवातीलाच आर्थरच्या मानसिक स्थितीबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्या जातात. शहराच्या समाज सेवा पुरवणाऱ्या संस्थेकरवी त्याच्या मानसिक स्थैर्याच्या देखरेखीकरिता थेरपिस्ट नियुक्त केलेली असते. मानसिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी म्हणून आर्थर साताठ निरनिराळ्या गोळ्या घेत असतो. त्याला असलेल्या कुठल्याशा आजारामुळे तो परिस्थितीचं भान न राखता, विनाकारण हसत सुटतो हेही दिसतं. चित्रपटात वापरलेल्या ‘स्माइल दो युवर हार्ट इज ब्रोकन’ या गाण्यातील ओळी त्याच्या अवस्थेवर भाष्य करण्यासाठी शब्दशः अचूक आहेत. सुरुवातीच्याच दृश्यांत त्याचा जगाकडे पाहण्याचा नीरस आणि काहीसा निराशावादी दृष्टिकोन, शून्यतावाद या संकल्पनेवरील त्याचा विश्वास या गोष्टीही दिसून येतात. जोकरचं एकाकी, एकसुरी आयुष्य आणि त्याच्या भोवतालात घडत असणाऱ्या अस्वस्थ करणाऱ्या घटना यातून निर्माण होणारा निराशावाद ही इथली एक महत्त्वाची संकल्पना आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचा आणि जोकरच्या मूळकथेचा डोलारा उभा राहू लागतो. 

joaqin

वेन कुटुंब इथे महत्त्वाच्या रुपात समोर येतं. बॅटमॅन बनायला अजून खूप अवकाश असलेला लहानगा ब्रूसही इथे दिसतो. तर, आर्थर हा स्टॅन्ड-अप कॉमेडी क्षेत्रात काम करू पाहतो आहे, या पार्श्वभूमीच्या निमित्ताने आर्थरचा आणि चित्रपटाचा संबंध मरी फ्रँकलिन (रॉबर्ट डी निरो) या प्रसिद्ध टॉक शो होस्टशी येतो. मरीकडे आर्थर ज्या आत्मीयतेने पाहताना दिसतो, त्याचा शो टीव्हीवर पाहताना त्याच्या चेहऱ्यावर जे भाव उमटत त्यातून त्याचा आणि मरीचा प्रत्यक्ष संबंध नसतानाही तो त्याच्याकडे विलक्षण आत्मीयतेने, एक आदर्शवत व्यक्तिमत्त्व म्हणून पाहत असल्याचं स्पष्टपणे दिसतं. थॉमस वेन आणि मरी फ्रँकलिन या दोन्हींचा आर्थरशी येणारा संबंध चित्रपटातील पुढील घटनांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा आहे. ज्यातून या सर्व पात्रांची भावनिक-मानसिक गुंतागुंत चित्रपटात उत्तरोत्तर वाढत जाते. 

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर हे जग आपण जगावं अशा लायकीचं राहिलेलं नाही, ही भावना आर्थरच्या मनात उत्तरोत्तर वाढत जात असते. काही महत्त्वाच्या दृश्यांमध्ये तुडुंब भरलेल्या कचऱ्याच्या पेट्या, त्यासमोर पळणारे मोठमोठे उंदीर दिसतात. त्याआधी कानावर पडत असलेल्या कचरा कामगारांच्या संपाच्या बातम्यांचा थेट परिणाम इथे दिसत राहतो. बंद पडत असलेले व्यवसाय इथे पदोपदी दिसतात. शहराची बिघडती अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या त्याच्या आयुष्यावर प्रभाव टाकत असते. शहरातील वाढता हिंसाचार हे त्यातील एक अंग मानता येईल. उदाहरणार्थ, तो कुठल्याशा कामावर असताना काही मुलं त्याला मारहाण करतात. किंवा रेल्वेनं प्रवास करत असताना त्याला केली जाणारी मारहाणही याच प्रकारात मोडते. या सगळ्या प्रकारांतून त्याचा मानसिक तोल कधी ना कधी ढासळणार असतो. इथे त्याचं तात्कालिक कारण हिंसा आणि मानसिक तणाव, भावनिक-मानसिक अस्थैर्य यांतून उद्भवते. 

‘द वॉकिंग डेड’ नावाच्या कॉमिक बुकवर आधारित असलेल्या ‘एएमसी’च्या ‘द वॉकिंग डेड’ या झॉम्बी अपॉकलिप्सवर आधारित मालिकेमधील नीगन नामक खलपात्र विशेष लोकप्रिय आहे. मालिकेत त्याची मूळकथा, आता तो आहे तसा सायकोपाथ बनण्यापूर्वी काय आणि कोण होता वगैरेचा समावेश नसला तरी ‘हिअर्स नीगन’ या विशेष आवृत्तीमध्ये त्याच्या भूतकाळाची गोष्ट सांगण्यात आलेली होती. नीगन हा कुठल्याही इतर साधारण अमेरिकन नागरिकासारखा असताना झॉम्बी अपॉकलिप्सची सुरुवात झाल्यानंतर घडणाऱ्या घटना पाहून अस्वस्थ होताना दिसतो. मात्र, काळाच्या ओघात त्याचा बांध फुटून तोही मृत व्यक्तींसोबतच जिवंत व्यक्तींचे खून पाडायला मागेपुढे पाहत नाही, अशा काहीशा अर्थाची ती कथा होती. ‘जोकर’मधील ओरिजिन स्टोरीदेखील याहून वेगळी अशी नाही. आपलं काम करत आयुष्य जगू पाहणारा आर्थर ते जग जळतानाही विकृतपणे हसू शकेल असा जोकर यादरम्यानचा त्याचा प्रवास इथे दिसून येतो. कुठल्याही व्यक्तीमध्ये हा राग, व्यवस्था किंवा कुणा विशिष्ट व्यक्तीप्रतीची चीड अस्तित्त्वात असतेच. फरक इतकाच की बहुतांशी लोक त्या भावना आणि परिस्थितीशी जुळवून घेत आपलं आयुष्य जगत असतात. तर काही लोकांबाबत या भावनांचा स्फोट होतो. संकल्पनात्मक आणि अगदी दृश्य पातळीवरही ‘जोकर’वर ज्यांचा भरपूर प्रभाव टाकणारे मार्टिन स्कॉर्सेसी दिग्दर्शित ‘टॅक्सी ड्रायव्हर’ आणि ‘किंग ऑफ कॉमेडी’ हे चित्रपटही याहून वेगळे असे नाहीतच. 

joker

आर्थर किंवा पुढे जाऊन जोकरने नृत्य करण्याची दृश्यं त्या-त्या वेळी त्याच्या व्यक्त होण्याचं, त्याच्या मुक्त असण्याचं चित्र म्हणून स्पष्टपणे दिसतात. त्याच्या औषधांचा डोस कमी (किंवा खरंतर बंद) होत जाणं, आणि त्याचं अधिकाधिक मुक्त होत जाणं, एक प्रकारे फुलत जाणं या दोन गोष्टींतील परस्परसंबंधाबाबत खुद्द आर्थरही बोलून दाखवतो. तो म्हणतो “इन माय व्होल लाईफ, आय डिडन्ट नो इफ आय इव्हन रिअली एक्झिस्टेड. बट आय डू, अँड पीपल आर स्टार्टिंग टू नोटिस मी.” आता लोकांनी त्याची दखल घेणं हे त्याच्या ‘जोकर’मध्ये रूपांतरित होण्यादरम्यानच्या प्रवासातील महत्त्वाचा भाग आहे. 

तो घरी जात असताना दिसणाऱ्या पायऱ्या या दृश्य पातळीवर सूचक आहेत. खांदे पाडून पायऱ्या चढू पाहणारा आर्थर ते त्याचा विजय झाल्याचं सूचक मानावंसं पार्श्वसंगीत वाजत असताना मोठ्या ऐटीत पायऱ्यांवरून उतरत त्यांवर नाचणारा जोकर हे जे रुपांतर आहे, ते इथे दृश्यपातळीवरही तितक्याच रंजकतेनं मांडलं जातं. गॉथम या शहराचं एक विशिष्ट असं रूप समोर उभं करण्यात टॉड फिलिप्स आणि छायाचित्रकार लॉरेन्स शेर यांनी अक्षरशः कमाल केली आहे. खासकरून गॉथमला एक प्रकारचं डिस्टोपियन महानगर म्हणून कसं उभं केलं जातं हे पहावंसं आहे. जे पुन्हा आर्थर ते जोकर या प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरणारं आहे. कलात्मक आणि अगदी तांत्रिकदृष्ट्या विचार करता ‘जोकर’ हा सर्व स्तरांवर जमून आलेला एक चित्रपट आहे हे वेगळं सांगण्याची गरज नसावी. वाकीन फिनिक्सने तो हॉलिवुडमधील दखलपात्र अभिनेता का आहे हे वेळोवेळी सिद्ध केलेलं आहेच. इथल्या कामगिरीने त्याच्या फिल्मोग्राफीत आणखी एका उत्कृष्ट अशा कामाची नोंद केली आहे. केवळ मानसिक, भावनिक आणि शारीरिक अशा सर्व पातळ्यांवर खरं उतरत एखादं पात्र साकारणं किंबहुना जगणं काय असतं याच्या काही उदाहरणांमध्ये त्याच्या या भूमिकेतील कामगिरीचं नाव घ्यायला हरकत नाही. 

अर्थात या सर्व लोकांच्या कामाइतकंच हिल्डर् ग्वानाडॉटीर् या इथल्या संगीत दिग्दर्शिकेचं काम इथे महत्त्वाचं आहे. तिच्या चेलोनं ‘जोकर’मधील जय-पराजयाची सर्वच दृश्यं तितकीच परिणामकारक बनवली आहेत. काही विशिष्ट अशा सांगीतिक तुकड्यांच्या निरनिराळ्या आवृत्त्या वापरत ती किती भिन्न तऱ्हेच्या भावनांचा आलेख मनात निर्माण करते हे थेट अनुभवावं असं आहे. 

हिंसा, क्रौर्य आणि विकृती हे घटक इथे महत्त्वाचे आहे. इथे अस्तित्त्वात असलेली हिंसा अंगावर येणारी आणि अस्वस्थ करणारी आहे. पण, त्यापाठोपाठ येणारे विनोद त्या हिंसेला अधिक क्रूर बनवणारे आहेत. हे विनोद ब्लॅक कॉमेडी प्रकारात मोडणारे अधिक आहेत. सुरुवातीला खुद्द आर्थरच्या नि प्रेक्षक म्हणून आपल्याही दृष्टीने अनपेक्षितपणे आणि/किंवा अनभिज्ञपणे घडलेल्या घटना ते पुढे जाऊन जोकरने हेतुपुरस्सररीत्या उचललेली पावलं यादरम्यान त्यात वाढत जाणारे क्रौर्य जितकं अस्वस्थ करणारं आहे, तितकंच एक पात्र म्हणून त्याला अधिक क्लिष्ट बनवणारं आहे. क्लिष्ट यासाठी की त्याला आपण सहजासहजी खल ठरवू शकत नाही, किंवा त्याच्याशी पूर्णतः सहमतही असू शकत नाही. आपण त्याचा प्रवास पाहतो, त्याच्या भावनाही समजून घेतो. त्याच्यासोबत हसतो, त्याच्यासोबत रडतो. कधी त्याच्यासोबत दचकतो, तर पुढे जाऊन त्याच्यामुळे (कृत्यांमुळे) दचकतो. पण, व्यवस्थेच्या विरुद्ध उभ्या ठाकणाऱ्या त्याला ना ठामपणे अँटी-हिरो म्हणू शकतो, ना खलनायक. जे त्याला अधिक क्लिष्ट, आणि त्याहून अधिक रंजक बनवतं. 

‘जोकर’ हा ‘मेलंकली ब्युटिफल’ आहे. अर्थात उदासीनता, खिन्नता आणि सौंदर्य यांचं एक अफाट मिश्रण आहे. तो भावभावनांचा एक क्रिसेन्डो तयार करणारा आहे. एकाचवेळी हसायला भाग पाडणारा, नि अस्वस्थ करणारा आहे. शेवटी जोकर म्हणूनच गेला आहे, ‘देअर्स नो पंचलाइन’. त्याचा विनोद म्हणजेच त्याचं वास्तव आहे. त्याला कुणीतरी विनोद समजत आहे, हे त्याच्या समाजाच्या (नि अगदी आपल्याही) इतरांकडे दुर्लक्ष करण्याच्या असंवेदनशील प्रवृत्तीचं द्योतक आहे. जोकर म्हणतो, ‘आय युज्ड टू माय लाईफ वॉज अ ट्रॅजेडी. बट नाऊ आय रिअलाइज, इट्स अ कॉमेडी.’ वास्तव (त्याचं म्हणा किंवा आपलं म्हणा, काय फरक पडतोय!) म्हणजे एक प्रकारचा विनोद आहे, हे तर त्याला म्हणायचं नसेल ना?