Quick Reads
‘कुंबलंगी नाईट्स’ : भारतीय कुटुंबव्यवस्था आणि पौरुषत्वाचं प्रभावी विच्छेदन
'स्पॉटलाईट' सदर
बराच विस्तृत काळ मुख्य प्रवाहातील (सर्वभाषिक) भारतीय सिनेमा आणि त्यातली कुटुंबं, कौटुंबिक नाट्य सोज्वळ, सभ्यतेचा बुरखा पांघरलेलं राहिलेलं आहे. म्हणजे अशा चित्रपटांमधील कुटुंबांतील समस्या या सासू-सुनेतील वाद, भावंडांतील प्रॉपर्टीवरून होणारे वाद अशा ठराविक आणि मर्यादित स्वरूपाच्या असायच्या. अर्थात यापलीकडे जाणारी कथानकं समांतर आणि प्रायोगिक चित्रपटांमध्ये वेळोवेळी दिसून येत असली तरी मुख्य प्रवाहातील चित्रपटांमधील कौटुंबिक नाट्य मात्र अपवादानेच या रटाळ चौकटींतून बाहेर पडलं. अलीकडील काळात मात्र मराठी, हिंदी ते तमिळ, मल्याळम अशा सर्वच प्रादेशिक भाषांमधील चित्रपट या पारंपरिक चौकटींतून बाहेर पडत, अकार्यक्षम कुटुंबांचं (डिसफंक्शनल फॅमिली) कथन समोर मांडताना दिसू लागले आहेत. ‘कुंबलंगी नाईट्स’ हा मल्याळम चित्रपट याच बदलाचं एक अधिक थेट आणि प्रभावी स्वरूप आहे.
‘कुंबलंगी नाईट्स’मध्ये एकीकडे साजी (सौबीन शाहीर), बॉनी (श्रीनाथ भासी), बॉबी (शेन निगम) आणि फ्रँकी (मॅथ्यू थॉमस) ही चार नेपोलियन भावंडं, आणि दुसरीकडे शम्मीचं (फहाद फाझिल) कुटुंब अशा दोन्ही कुटुंबांच्या कथा समांतरपणे समोर मांडल्या जातात. साजी, बॉबी आणि फ्रँकी कुंबलंगी गावातील पडीक जमिनीवरील एका पडीक घरात राहतात. यातील मोठे दोघे, साजी आणि बॉनी, म्हणजे एकमेकांचे सावत्र भाऊ; तर इतर दोघे, बॉबी आणि फ्रँकी एकमेकांचे सख्खे भाऊ. जैविकदृष्ट्या विचार केला तर (बॉबी-फ्रॅंकीचा अपवाद सोडता) एकप्रकारे ही एकमेकांची सावत्र भावंडंच. वडिलांच्या मृत्यूनंतर आई या चौघांना सोडून गेलेली असते. त्यानंतर हे चौघे बराच काळ एकत्र राहिल्याचे संकेत दिसत असले, तरी आता मात्र परिस्थिती बदलली आहे. साजी आणि बॉबीमधील तंट्यांना कंटाळून बॉनी या उतरती कळा लागलेल्या घरातून पूर्वीच बाहेर पडलेला आहे. फ्रँकी या सगळ्यांमध्ये लहान आहे. तोही या दोघांच्या भांडणांना कंटाळला आहे. त्याला या दोघांची, आपल्या खुराड्यावजा घराची लाज वाटते. याउलट बॉनीशी मात्र त्याचे चांगले संबंध आहेत. साजी स्वतः काही काम करताना दिसत नाही, मात्र आपल्याला किमान उदरनिर्वाहापुरतं उत्पन्न-कम-उधारी मिळेल इतपत व्यवस्था त्याने केलेली असावी. त्यामुळेच सगळ्यांपेक्षा वयस्कर असलेला साजी बेरोजगार भासत असूनही शांत, निवांत किंबहुना बेजवाबदार असल्याचं दिसतं. एकमेकांशी न पटणाऱ्या, तरीही खोलवर कुठेतरी एकमेकांवर प्रेम करणाऱ्या ‘अकार्यक्षम कुटुंब’ या व्याख्येत बसेल असं हे कुटुंब आहे. खरंतर याला कुटुंब म्हणावं की नाही हा प्रश्न आहेच. या पात्रांनाही खोलवर कुठेतरी हा प्रश्न सतावत असणारच.
या कुटुंबाहून अगदी उलट असं शम्मीचं कुटुंब आहे. शम्मी, त्याची पत्नी सिम्मी (ग्रेस अँटनी), तिची धाकटी बहीण बेबी (अॅना बेन) आणि शम्मीची सासू (अंबिका राव) हे एका मोठ्या बंगल्यात राहणारं चौकोनी कुटुंब आहे. विधुर सासू आणि तिच्या दोन मुलींना आधार म्हणून घरजावई बनून राहणारा शम्मी ‘रेमंड’च्या टॅगलाइन असलेले ‘द कम्प्लिट मॅन’ हे शब्द आपलं समर्पक विश्लेषण करतात असं मानतो. तीन स्त्रियांच्या या घरात त्यांची काळजी घेणारा, त्यांना आर्थिक, सामाजिक, मानसिक पातळीवर आधार देणारा असा हा पुरुष आहे. अर्थात ही झाली त्याच्या स्वतःच्या मनातील त्याची प्रतिमा. कारण, खरंतर या विशेषणांच्या पलीकडे तो पारंपरिक विचारांमध्ये श्रद्धा बाळगणारा, आपल्या बायकोने आपल्यापुढे चकार शब्दही काढू नये अशी अपेक्षा ठेवणारा माणूस आहे. तथाकथित ‘पुरुष’ या संकल्पनेचा तो मूर्तिमंत नमुना आहे.
या दोन्ही कुटुंबांतील विरोधाभास तसा पावलापावलावर जाणवणारा आहे. एकीकडे नेपोलियन कुटुंबात गेल्या कित्येक वर्षांत त्यांच्या घराच्या उंबरठ्याला कुणा बाईचं पाऊल लागलं असण्याची शक्यता नाही, तर दुसरीकडे शम्मी तीन तीन स्त्रियांनी वेढला गेलेला आहे. अगदीच टिपीकल शब्दांत बोलायचं झाल्यास नेपोलियन कुटुंबाबाबत आईने घराचा उंबरा ओलांडल्यापासून ते आजतागायत त्यांच्या घरात ना कुणी स्त्री आली, ना समृद्धी. तर दुसरीकडे (शम्मीच्या) घरात स्त्रिया आणि आर्थिक स्थैर्य-सामाजिक प्रतिष्ठा सगळं असूनही घरातील व्यक्ती दडपणाखाली आहेत. जात, वर्ग, धर्म अशा सर्वच पातळीवर ही कुटुंबं विरुद्ध टोकाला आहेत. दोषपूर्ण अशा पात्रांनी (लिखाणाच्या दृष्टीने नव्हे!) बनलेली कुटुंबं काय असतात याची ही दोन टोकाची उदाहरणं मानता येतील. दोन्हीकडील समस्या सर्वस्वी वेगळ्या आहेत.
या दोन्ही कुटुंबांचा संबंध केव्हा येतो, तर जेव्हा बॉबी आणि बेबी एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा. खरंतर त्यांच्या प्रेमप्रकरणानंतरच चित्रपटातील बहुतांशी पात्रांचे काहीसे स्वतंत्र, पुरोगामी ते इतर काहींचे जुनाट, अप्रगतिशील अशा निरनिराळ्या प्रकारचे विचार अधिक स्पष्ट रूप घेऊ लागतात. कारण, इथे ख्रिश्चन मुलगा हिंदू मुलीच्या प्रेमात पडलेला आहे. चित्रपटाला पारंपरिक प्रेमकथेतील संघर्षाचं स्वरूप लाभत नाही, मात्र इथे वर्गसंघर्ष जरूर आहे. सोबतच ‘पुरुष’ या संकल्पनेचा पुरेपूर आढावा इथे घेतला जातो. चित्रपटाला पुढारलेल्या विचारांचा पुरस्कार करायचा असला तरी तो करायचा म्हणून करायचा अशा स्वरूपाचा नाही. इथे पुरुषसत्ताक, वर्चस्ववादी प्रवृत्तीचं अगदी खोलवर विश्लेषण आणि समर्पक असं चित्रण केलं जातं. ज्यानंतर त्यांचं तितक्याच परिणामकारक स्वरूपात खंडन केलं जातं. अर्थात संदेश देण्याचं उसनं अवसान यात आणलेलं नाही. सोबतच चित्रपट पुरुषसत्ताक संस्कृती आणि वर्चस्ववादी प्रवृत्तीचं खंडन करायचं म्हणून कुटुंबव्यवस्थेवर ताशेरे ओढताना दिसत नाही. उलट कुटुंबाची एक सर्वसमावेशक अशी व्याख्या इथे पडद्यावर मांडल्याचं दिसून येतं.
चित्रपटातील संकल्पना पाहता सामाजिक पातळीवर त्यात जे अनेकविध कंगोरे उलगडले जातात, त्यांच्या प्रभावी आणि परखड मांडणीमध्ये लेखक स्याम पुष्करनचा महत्त्वाचा आहे. सोबतच दिग्दर्शक मधू सी. नारायणनने शायजू खालिदच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून केलेल्या चित्रपटाच्या संयत मांडणीलाही तितकंच महत्त्व आहे. ज्यात समर्पक अशा रूपकांतून आणि दृश्यचौकटींच्या रचनेतून चित्रपटाला सांगू पहायचे मुद्दे कमीत कमी शब्दांत मांडले जातात.
‘कुंबलंगी नाईट्स’ हा भारतीय कुटुंबव्यवस्था आणि समाजव्यवस्थेच्या अंतरंगात जात त्यातील जुनाट विचारसरणीवर मार्मिक आणि परखड स्वरूपात भाष्य करणारा अलीकडील काळातील एक महत्त्वाचा चित्रपट आहे.