Quick Reads

टॅरेंटिनोमय: क्वेंटिन टॅरेंटिनो आणि सिनेमा

क्वेंटीन टॅरेंटिनो लेखमालेतील पहिला लेख

Credit : Ciné Version Courte YouTube Channel

tarantinoसत्ताव्वीस वर्षांपूर्वी ‘रेझर्व्हॉयर डॉग्स’ हा चित्रपट ‘सनडान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये पहिल्यांदा स्क्रीन झाला होता. त्याचं नॉन-लिनीअर स्ट्रक्चर, अजूनही लक्षात असलेली पात्रं, त्यांचे लक्षात राहणारे संवाद, काही तितकेच आयकॉनिक सीन्स आणि अमेरिकन चित्रपटसृष्टीतील मोनोपॉलीला ‘मिरामॅक्स’च्या सहाय्याने एक यशस्वी इंडिपेंडंट चित्रपट बनवून दिलेला धक्का - या सर्व गोष्टींमुळे बरीच बडबड करणारा, काहीसा वेंधळा वाटणारा एक एकोणतीस वर्षांचा मुलगा अचानक अमेरिकन सिनेजगताच्या चर्चेचं केंद्र बनला. नाही म्हणायला त्याच्या नावावर ‘माय बेस्ट फ्रेंड्स बर्थडे’ (१९८७) नामक एक फिल्म असली तरी चित्रपट जगताला हा चेहरा नवीन होता. तो म्हणजे क्वेंटिन टॅरेंटिनो. 

क्वेंटिन टॅरेंटिनोनं अमेरिकन सिनेमात अगदी आपल्या पदार्पणापासूनच सदर क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलं. शिवाय, त्यात स्वतःचं असं एक अढळ स्थान प्राप्त केलं. त्याचं व्यक्तिमत्त्व एकाच वेळी लोकांचं सगळ्यात जास्त प्रेम असलेलं, आणि त्याच वेळी अनेकांच्या द्वेषाचं कारण ठरलेलं आहे. त्याला वादाच्या भोवऱ्यात राहण्याची एव्हाना सवय झालेली आहे. त्याला समकालीन प्रेक्षक-समीक्षकांनी एकाच वेळी डोक्यावर घेतलं, आणि अनेकांनी तोंड फाटेस्तोवर टीकाही केलेली आहे. मात्र, तरीही त्याचे चाहते आणि द्वेषकर्ते असे दोघेही वेगवेगळ्या कारणांमुळे त्याच्या नवीन कलाकृतीची वाट पाहून असतात, हे त्याचं खरं यश, ही त्याची खरी मिळकत. 

एव्हाना त्याचा नववा चित्रपट, ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवुड’ जगभर प्रदर्शित झालेला आहेच. त्याचे चाहते आणि द्वेषकर्ते दोन्हीही प्रकारचे लोक तो पाहत असतील, किंबहुना आहेत. त्यावर भरभरून प्रेम, त्यावर टीका करत असतील, आहेत. भारत, इंग्लड, इत्यादी मोजक्या राष्ट्रांमध्ये त्याचं प्रदर्शित होणं बाकी आहे. या आठवड्यामध्ये टॅरेंटिनोचा हा चित्रपट भारतात प्रदर्शित होईल. आता त्याला काय आणि कसा प्रतिसाद मिळेल, किंवा आपलं स्वयंघोषित संस्कृतीरक्षक सेन्सॉर बोर्ड त्याची किती वाट लावेल, हा भाग वेगळा. पण, एक गोष्ट नक्की असेल, ती म्हणजे टॅरेंटिनो त्याच्या मनात असलेली दृश्यं पडद्यावर आणत, ७० एमएमचा भव्य पडदा व्यापून टाकेल. तो ज्या गोष्टींकरिता प्रसिद्ध आहे त्या - हिंसा, छुप्या रुपात विखारी हास्य दडवून असलेले मृत्यू, लक्षात राहतील असे संवाद, प्रभावी पात्रं, एक विशिष्ट अशी दिग्दर्शकीय शैली आणि एकुणातच एक परिपूर्ण अशी सिनेमॅटिक अनुभूती, इत्यादी सगळ्या गोष्टी त्यात असतील. आणि तो तिकिटाचे पैसे वसूल करून देईल. ज्याकरिता इथे खुद्द त्यालाच उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही. तो म्हणतो, “It‘s very important that every movie I do makes money because I want the people that had the faith in me to get their money back.” हा माणूस एक अजब रसायन आहे. आणि याच अजब आणि तितक्याच अफाट रसायन असलेल्या या क्वेंटिन टॅरेंटिनोला प्रेमपत्र म्हणून लिहिलेली ही लेखमाला, नि त्यातील हा पहिला लेख. 

क्वेंटिन म्हणजे कॉनी आणि टोनी टॅरेंटिनो या दांपत्याचं एकमेव अपत्य. क्वेंटिनच्या जन्मानंतर लवकरच ते वेगळे झाले, नि पुढे जाऊन त्याच्या आईने कर्टिस झास्टोपिल या संगीतकाराशी विवाह केला. तिचा कर्टिसशी झालेला विवाह क्वेंटिनसाठी अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरला. कारण, कर्टिस क्वेंटिनच्या चित्रपटप्रेमाला प्रोत्साहन देत, वेळोवेळी त्याला स्वतः चित्रपट दाखवायला नेत असे. त्यामुळे टॅरेंटिनोच्या पूर्वायुष्याचा विचार केला तर त्यातही टॅरेंटिनो आणि सिनेमा या दोन्ही गोष्टी अगदी सुरुवातीपासूनच एकमेकांशी संबंधित होत्या. म्हणजे कर्टिस आणि त्याच्या आईकडून त्याच्यावर चित्रपट संस्कार होत होते. (त्याचं संगीतप्रेमही कर्टिसकडून आलं असावं.) तो सुरुवातीपासूनच बी-ग्रेड चित्रपटांवर पोसला जात होता. डबल फीचर्समध्ये बी-ग्रेड, पॉर्नो नि हिंसक दृश्यांनी नटलेले चित्रपट पाहणं म्हणजे त्याच्या आयुष्याचा अविभाज्य घटक होता. 

तर पुढे जाऊन एका पॉर्नो चित्रपटगृहात नोकरी करणं ते ‘व्हिडीओ अर्काइव्ह्ज’ नामक व्हिडीओ लायब्ररीत कारकून म्हणून काम करणं, अशा या ना त्या कारणानं त्याचा आणि चित्रपटांचा संबंध येत होता. आणि मुख्य म्हणजे त्याच्या भविष्यातील कामावर प्रभाव टाकण्यापलीकडची कामगिरी करणाऱ्या, उत्कृष्ट दर्जाच्या जागतिक चित्रपटांशी त्याचा संबंध येत होता. ठराविक शब्दांत बोलायचं झाल्यास, त्याच्या या जडणघडणीच्या काळात त्याच्यावर पडणारा चित्रपटांचा प्रभाव त्याच्या नजीकच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा असा होता. त्यातूनच ऐंशीच्या दशकात अभिनय करण्याचे धडे गिरवत, चित्रविचित्र नोकऱ्या करत त्याने १९८७ मध्ये ‘माय बेस्ट फ्रेंड्स बर्थडे’ नामक चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन केलं. मात्र, संकलन होत असतानाच आग लागून चित्रपटाची रीळ नष्ट झाली. (आता तिचा साधारण अर्धा भाग अस्तित्त्वात आहे.) अर्थात नेमक्या याच चित्रपटावर पुढे जाऊन त्याने लिहिलेल्या आणि टोनी स्कॉटने दिग्दर्शित केलेल्या ‘ट्रू रोमान्स’च्या (१९९३) मूलभूत कथानकाचा पाया रचला गेला. 

टॅरेंटिनोच्या आयुष्यातील हा विस्तृत कालावधी, म्हणजे मुख्यत्वे १९९२ मध्ये ‘रिझर्व्हॉयर डॉग्ज’ प्रदर्शित होण्यापूर्वीच्या त्याच्या आयुष्याचा विचार केल्यास त्याच्या चित्रपटांचे विषय, त्याच्या लेखन-दिग्दर्शनाची एक विशिष्ट अशी शैली आणि त्याच्या कामावरील निरनिराळ्या चित्रपटकर्त्यांचे, चित्रपटांचे प्रभाव यांचं मूळ लक्षात येऊ शकतं. अगदी त्याच्या कारकिर्दीचं विश्लेषण करायचं झाल्यास त्याची सगळी जडणघडण याच काळात झाल्याचं दिसून येतं. म्हणजे हिंसक आणि पॉर्नोग्राफिक एक्स्प्लॉयटेशन चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘ग्राइंडहाऊस’ चित्रपटगृहांवर, आणि त्यात दाखवल्या जाणाऱ्या निराळ्याच चित्रपट प्रकारांवर असलेलं त्याचं प्रेम त्याच्या या पूर्वायुष्यातून उपजलेलं आहे. शिवाय, त्याच्या चित्रपटांच्या केंद्रस्थानी असणारे हिंसा, गुन्हेगारी जगत, वैशिष्ट्यपूर्ण अॅक्शन, कलात्मक-सांस्कृतिक वारसा या संकल्पनांची व्युत्पत्तीदेखील त्याच्या या भूतकाळात आहे. 

पण तुम्ही म्हणाल, हे विषय आणि या संकल्पना हाताळणारे इतर अनेक लेखक-दिग्दर्शक आहेतच की. मग टॅरेंटिनोचं इतकं कौतुक ते का, तर याचं उत्तर तो या संकल्पनांना बहाल करत असलेले वैश्विक संदर्भ, आणि या मूलभूत संकल्पनांना वैशिष्ट्यपूर्ण आणि रंजक स्वरूपात समोर आणण्याची त्याची विशिष्ट अशी शैली यांत दडलेलं आहे. उदाहरणार्थ, त्याचा दिग्दर्शकीय पदार्पण असलेला चित्रपट विचारात घेऊयात. ‘रिझर्व्हॉयर डॉग्ज’चं कथानक - बँकेत दरोडा घालण्याची एका गटाची योजना असफल होते - या एका ओळीवर आधारलेलं आहे. मात्र, तो या मूलभूत कल्पनेला हाताशी घेत कथानकाची (पुढे जाऊन त्याची ट्रेडमार्क स्टाइल बनलेल्या) नॉन-लिनीअर प्रकारे मांडणी करतो. योजनेची आखणी करत असल्यापासून ते मूळ दरोड्याची घटना आणि त्यानंतर कथेत येणाऱ्या वळणांपर्यंत सगळा घटनाक्रम तो उलटसुलट पद्धतीने समोर मांडतो. दरोडा फसला, पण तो का आणि कुणा गद्दारामुळे फसला याविषयीच्या तर्क-वितर्कांना या रंजक आणि तितक्याच कल्पक मांडणीमुळे अधिक महत्त्व प्राप्त होतं. शिवाय, चित्रपटाच्या शेवटी ही गुंतागुंतीची मांडणी गोंधळात टाकणारी न ठरता झालंच तर लेखकाच्या कल्पकतेची नि हुशारीची चुणूक दाखवणारी ठरते. 

reservoir dogs
‘रिझर्व्हॉयर डॉग्ज’च्या सेटवर Credit : Miramax Films

त्याचे त्यानंतरचे चित्रपट पाहिले तर त्यांतही घटनांची मांडणी उलटसुलट पद्धतीने केलेली आढळते. असं असलं तरी ते सहसा प्रेक्षकाला कोड्यात टाकणारे नसतात हे दिसतं. कालक्रमानुसार त्यांची मांडणी केल्यास एक साधी-सोपी कथा आपल्याला दिसून येऊ शकते. मात्र, ती कथा नॉन-लिनीअर स्वरूपात सादर करत तिला अधिक रंजक बनवणं, नि सिनेमा या माध्यमाशी यशस्वीपणे खेळणं हा टॅरेंटिनोचा मूलभाव मानता येईल. त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘जॅकी ब्राऊन’चा (१९९६) अपवाद वगळता त्याच्या इतर सर्व चित्रपटांमध्ये कथनाची ही शैली एक समांतर धागा आहे. अगदी ‘ट्रू रोमान्स’देखील त्याने मुळात नॉन-लिनीअर प्रकारेच लिहिला होता. (मात्र, दिग्दर्शक स्कॉटच्या म्हणण्यामुळे चित्रपटाला अधिक पारंपरिक रूपात समोर मांडण्याचं त्यानं मान्य केलं.) अर्थात कथनाची ही शैली त्याने स्वतः निर्माण केली अशातला भाग नाही. जागतिक आणि खुद्द अमेरिकन चित्रपटांकडे पाहिल्यास त्यापूर्वीही अनेक चित्रपटांनी ही शैली वापरली आहेच. मग टॅरेंटिनोचं यातील श्रेय काय, तर त्याने या प्रकाराला कलात्मक चित्रपटांमधून उचलत मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये आणलं. त्यामुळे त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘रिझर्व्हॉयर डॉग्ज’ आणि ‘पल्प फिक्शन’ या दोन्ही नॉन-लिनीअर स्वरूपाची मांडणी असलेल्या चित्रपटांच्या केवळ ‘सनडान्स’, ‘कान’ चित्रपट महोत्सवच नव्हे, तर बॉक्स ऑफिसवरील यशाने या मांडणीला अधिक लोकप्रियता मिळवून दिली. त्यामुळे नव्वदोत्तर कालखंडामध्ये चित्रपटसृष्टीमध्ये या प्रकारच्या मांडणीचं प्रमाण उत्तरोत्तर वाढत गेल्याचं दिसून येतं. 

जे आपल्याला आणतं क्वेंटिन टॅरेंटिनो आणि ‘इंडिपेंडंट’ ऊर्फ ‘इंडी सिनेमा’ या महत्त्वाच्या प्रकरणाकडे. अमेरिकन इंडी सिनेमाने वेगवेगळ्या कालखंडातून वेगवेगळ्या बदलांमधून जात निरनिराळे दिग्दर्शक-चित्रपटकर्ते समोर आणण्याचं काम केलं होतं. अमेरिकन चित्रपट व्यवसायाकडे पाहिल्यास स्टीव्हन स्पीलबर्ग, मार्टिन स्कॉर्सेसी, फ्रान्सिस फोर्ड कपोला, जॉर्ज लुकस, रिडली स्कॉट, इत्यादी एकेकाळचे प्रसिद्ध इंडी चित्रपटकर्ते-दिग्दर्शक नाही म्हटलं तरी ऐंशीच्या दशकाच्या शेवटापर्यंत प्रस्थापित बनले होते. आणि मधल्या काळात व्यावसायिक कारणांमुळे ऐंशीचं दशक इंडी चित्रपटांच्या दृष्टीनं निराशाजनक ठरलं होतं. स्वतंत्र चित्रपट चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरण्याची अपेक्षा असलेला ‘उटाह/यूएस फिल्म फेस्टिव्हल’ १९७८ मधील स्थापनेपासूनच संक्रमणांतून जात होता. त्याचं व्यवस्थापन वेळोवेळी बदलत होतं. ज्यामुळे त्यानं इंडी चित्रपटांना प्रोत्साहन देण्याचं काम जरा मागेच पडत होतं. 

त्यामानाने नव्वदचं दशक हे अमेरिकन चित्रपटसृष्टीतील इतिहासाच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचं आणि क्रांतिकारी दशक आहे. आणि या दशकाच्या सुरुवातीला इंडिपेंडंट फिल्म्सच्या निर्मितीच्या क्षेत्रात कमालीची उलाढाल होत होती. वाइन्स्टिन ब्रदर्सचा ‘मिरामॅक्स’ स्टुडिओ यात सर्वात पुढे होता. मिरामॅक्स फिल्म्स, बॉब आणि हार्वी वाइन्स्टिन, क्वेंटिन टॅरेंटिनो या नावांनी हे दशक केवळ गाजवलंच नाही, तर स्टुडिओजमुळे निर्माण झालेली (किंबहुना केली गेलेली) मोनोपॉली तोडून इंडी फिल्म चळवळीला नवीन आयाम प्राप्त करून दिले. १९८० च्या दशकापासून न्यूनतम पातळीवर सुरु असलेल्या इंडिपेंडंट फिल्म चळवळीला जवळपास दशकभराच्या अथक परिश्रमानंतर मोठ्या पातळीवर प्रसिद्धी मिळाली. दशकाच्या सुरुवातीला, १९९१ मध्येच ‘उटाह/यूएस फिल्म फेस्टिव्हल’ पुढे जाऊन नावाजला जाईल असा ‘सनडान्स फिल्म फेस्टिव्हल’ बनला. १९९२ मध्ये याच फेस्टिव्हलमध्ये ‘रिझर्व्हॉयर डॉग्ज’ गाजला. तर, १९९४ मधील ‘पल्प फिक्शन’च्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘पाम डि’ऑर’ मिळवण्याने इंडी चळवळीत नवचैतन्य निर्माण झालं. योगायोगाने १९९४ लाच ‘बिग सिक्स’ म्हटल्या जाणाऱ्या मेजर फिल्म स्टुडिओजपैकी एक असलेल्या ‘फॉक्स एंटरटेनमेंट ग्रुप’च्या ‘फॉक्स सर्चलाईट पिक्चर्स’ या सर्वस्वी इंडी फिल्म्सच्या वितरणाकरिता वाहिलेल्या प्रॉडक्शन कंपनीची स्थापना झाली. 

सांगायचा मुद्दा असा की, इंडी फिल्म चळवळीने पॉल थॉमस अँडरसन, रॉबर्ट रॉड्रिग्ज, स्टीव्हन सोडरबर्गसारख्या दिग्दर्शकांना गरजेचा प्लॅटफॉर्म मिळवून दिला. आणि या यशात मिरामॅक्स फिल्म्स आणि क्वेंटिन टॅरेंटिनो या दोन नावांचा महत्त्वाचा वाटा होता. (यातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेला रॉबर्ट रॉड्रिग्ज हा टॅरेंटिनोचा प्रिय मित्र आणि फ्रिक्वेंट कोलॅबरेटर आहे, तर अँडरसन आणि टॅरेंटिनो दोघेही एकमेकांचे मोठे प्रशंसक आहेत.) यांनी सिनेमाच्या दरवेळीच्या साचेबद्ध रुपापेक्षा अधिक वेगळे, रंजक कथन समोर आणले. ज्यातून समोर आलेलं टॅरेंटिनो हे नाव एखाद्या वृत्तपत्रामधील एका समीक्षेमधील कौतुकास पात्र ठरलेल्या, आणि पुढे जाऊन अपयशी ठरलेल्या दिग्दर्शकांच्या नावापैकी केवळ एक सामान्य नाव न बनता गेल्या तीनेक पिढ्यांमध्ये आपली लोकप्रियता टिकवून ठेवणारं एक फिनॉमेनन बनलं. 

robert rodriguez
टॅरेंटिनो आणि रॉबर्ट रॉड्रिग्ज   Credit-Twitter

त्यामुळे टॅरेंटिनो आणि नव्व्दच्या दशकातील इंडी फिल्म चळवळ यांचा प्रवास हातात हात घालून झाल्याचं म्हणता येतं. शिवाय, यापुढेही टॅरेंटिनो आणि इंडी सिनेमा यांचं कायमच जिव्हाळ्याचं नातं राहिलेलं आहे. टॅरेंटिनोने चित्रपटकर्ता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी काही काळ चित्रपट समीक्षक म्हणूनही कार्य केलेलं आहे. त्यामुळे त्याचा मूळ पिंड चित्रपट प्रशंसक-समीक्षकाचा आहे. ‘व्हिडीओ अर्काइव्ह्ज’मध्ये तो काम करत असताना त्याने तिथे येणाऱ्या ग्राहकांची नवनवीन आणि उत्तमोत्तम चित्रपटांशी ओळख करून देण्याबाबतचे किस्से प्रसिद्ध आहेतच. अगदी त्या काळी त्याच्यासोबत तिथे काम करणारे रॉजर अॅव्हरीसारखे (पुढे जाऊन त्याच्यासोबत ‘रिझर्व्हॉयर डॉग्ज’ आणि ‘पल्प फिक्शन’चं सहलेखन करणारा) लेखक-निर्मातेही वेळोवेळी याबाबत बोललेले आहेत. 

त्यामुळे टॅरेंटिनोचं सिनेमा या माध्यमावर असलेलं प्रेम तो वेळोवेळी व्यक्त करताना दिसतो. जे केवळ सर्जिओ लिओनी, फेड्रिको फेलिनी, मार्टिन स्कॉर्सेसी, स्टीव्हन स्पीलबर्ग, ब्रायन डे पाल्मा, इत्यादींपासून ते सिरिओ सॅंटियागो, एडी रोमिरोसारख्या निरनिराळ्या अभिजात चित्रपट दिग्दर्शकांपर्यंत मर्यादित नाही. तो पॉल थॉमस अँडरसन, रिचर्ड लिंकलेटर, किंजी फुकासाकू, एम. नाईट श्यामलन, इत्यादी समकालीन चित्रपटकर्त्यांचाही प्रशंसक आहे. त्याचं त्यांच्या चित्रपटांवर आणि शैलीवर असलेलं प्रेम त्याने वेळोवेळी बोलून दाखवलेलं आहे. यापुढे जात तो पुढच्या पिढीच्या इंडी चित्रपटांकडे आणि इंडी चित्रपटकर्त्यांकडे मोठ्या आस्थेनं पाहतो. (जे सहसा वैयक्तिक-व्यावसायिक हेव्यादाव्यांनी ठासून भरलेल्या या व्यवसायात घडत नाही.) बॉंग जून-हो, पार्क चॅन-वुक यांसारख्या, आता जागतिक चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने महत्त्वाच्या बनलेल्या चित्रपटकर्त्यांचं तो अगदी सुरुवातीपासून कौतुक करत असल्याचं दिसून आलेलं आहे. २००४ मध्ये कान चित्रपट महोत्सवातील मुख्य स्पर्धेच्या ज्युरीवर असताना त्याने पार्क चॅन-वुकच्या ‘ओल्डबॉय’चं (२००४) भरभरून कौतुक केलं होतं. तर त्याआधी आणि त्यानंतरही ‘क्वेंटिन टॅरेंटिनो प्रेसेंट्स’ या बॅनरखाली त्याने ‘हिरो’ (२००२), ‘हॉस्टेल’ चित्रपटद्वयी (२००५-०७), ‘हेल राइड’सारखे (२००८) इंडी चित्रपटही समोर आणलेले आहेत. अजूनही तो या आणि अशाच इतर चित्रपटांबाबत बोलत असतो, चित्रपटकर्त्यांनी प्रशंसा करत असतो. (अगदी अलीकडेच त्याने सर्जिओ लिओनी आणि वेस्टर्न जान्रतील चित्रपटांवर ‘स्पेक्टॅटर’मध्ये एक अप्रतिम लेख लिहिला आहे.

image3
द ब्लडी चेअर,‘जँगो अनचेन्ड’ सेटवर Cr-A Band Apart 

टॅरेंटिनोचं या माध्यमावरील प्रेम त्याच्या चित्रपटांतून वारंवार दिसून आलेलं आहे. म्हणजे त्याच्या चित्रपटांतील पात्रं अनेकदा संगीत, सिनेमा, मालिकांवर बोलतात. त्यांचं असं संभाषण त्यांना अधिक मानवी, अधिक अस्सल छटा प्रदान करतं. ‘रिझर्व्हॉयर डॉग्ज’पासून ते ‘इन्ग्लोरियस बास्टर्ड्स’पर्यंत (२००९) त्याच्या बहुतांशी चित्रपटांमध्ये सिनेमा हा एक महत्त्वाचा घटक राहिलेला आहे. ‘ग्राइंडहाऊस’ चित्रपटगृहांना मानवंदना देणाऱ्या ‘ग्राइंडहाऊस’ डबल फीचरमधील त्याच्या ‘डेथ प्रूफ’ची (२००७) संकल्पना चित्रपटांमध्ये स्टंटमॅन म्हणून काम करणाऱ्या एका कलाकाराच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करणारी होती. तर, ‘इन्ग्लोरियस बास्टर्ड्स’चा एक तृतीयांश भाग चित्रपट, चित्रपटगृहं यांभोवती फिरणारा होता. 

अर्थात हे तर झालं केवळ संकल्पनात्मक पातळीवर. टॅरेंटिनोचे चित्रपट इतर अनेक चित्रपटांना, चित्रपटकर्त्यांना दृश्यपातळीवर दिलेल्या मानवंदनांनी गजबजलेले असतात. ‘जँगो अनचेन्ड’ (२०१२), ‘द हेटफुल एट’वर (२०१५) ‘स्पेगेटी वेस्टर्न’ जान्रच्या चित्रपटांचा, नि त्यातही पुन्हा अकिरा कुरोसावा, सर्जिओ लिओनी, सर्जिओ कर्बुचीसारख्या दिग्दर्शकांच्या कामाचा मोठा प्रभाव होता. तर ‘किल बिल’ (२००३-०४) चित्रपटद्वयीवर जपानी चित्रपट, जपानी संस्कृतीचा विलक्षण प्रभाव आहे. शिवाय, याच चित्रपटातील एका अॅनिमेटेड दृश्याचा समावेश कमल हसनच्या ‘आलवंदन’पासून (२००१) प्रेरित असल्याचं टॅरेंटिनोनं स्पष्ट केलं आहे. या संदर्भ आणि मानवंदनांबाबत बोलण्यासाठी त्याचे शब्दही पुरेसे आहेत. तो म्हणतो, “I steal from every single movie ever made. If people don't like that, then tough tills, don't go and see it, all right? I steal from everything. Great artists steal, they don't do homages.” त्यामुळे इंटरनेटवर ‘टॅरेंटिनो इतर चित्रपटकर्त्यांपासून कसा चोरतो?’ अशा शीर्षकाचे लेख आणि व्हिडीओज पाहताना मला तरी मोठी गंमत वाटते. त्यानं आपल्या प्रेरणा, आपल्याला प्रभावित करणारे चित्रपटकर्ते आणि चित्रपटांची यादी देऊनही शेरलॉक होम्स असण्याचा आव आणत (थोडंफार मानधन सोडता) असे लेख लिहून काय मिळतं, हे त्या लेखकांनाच माहीत. 

अगदी आता येऊ घातलेल्या ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवुड’मध्येही ‘स्पेगेटी वेस्टर्न’ चित्रपट प्रकार, शॅरन टेट आणि इतर अनेक कलाकारांचे चित्रपट, इत्यादी संदर्भ आहेत. खुद्द चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पनादेखील एक (काल्पनिक) चित्रपट अभिनेता रिक डाल्टन (लिओनार्डो डि’कॅप्रिओ) आणि त्याचा स्टंटमॅन क्लिफ बूथ (ब्रॅड पिट) यांच्याभोवती, तसेच चार्ल्स मॅन्सन या कुप्रसिद्ध सिरीयल किलरच्या आदेशानुसार शॅरन टेट या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या करण्यात आलेल्या खुनाच्या घटनेवर आधारलेलं आहे. सदर चित्रपटाच्या नावाला सर्जिओ लिओनीच्या ‘वन्स अपॉन अ टाइम इन द वेस्ट’ (१९६८) आणि ‘वन्स अपॉन अ टाइम इन अमेरिका’ (१९८४) या दोन्ही चित्रपटांचा असलेला अप्रत्यक्ष संदर्भ तसा स्पष्टच आहे. 

image4
‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवुड’च्या सेटवर Cr-Sony

टॅरेंटिनोबाबत आणि त्याच्या चित्रपटांबाबत बोलताना संगीत हा भाग वगळून चालत नाही. कारण, मुळातच त्याचे चित्रपट आणि संगीत या दोन्ही गोष्टी हातात हात घालून जातात. ज्यामागे त्याचे सावत्र वडील, संगीतकार झास्टोपिलकडून मिळालेला सांगीतिक वारसा हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं. टॅरेंटिनोसाठी लिखाण, चित्रपट आणि संगीत या गोष्टी परस्परांशी घनिष्ठ संबंध बाळगून असणाऱ्या आहेत. त्यामुळे त्याच्या चित्रपटाच्या प्रत्यक्ष लेखनापासूनच त्या विशिष्ट दृश्याच्या पार्श्वभूमीवर वाजणं अपेक्षित असलेल्या विशिष्ट सांगीतिक तुकड्याचा त्याचा शोध सुरु असतो. अगदी त्याच्या घरीही तो लेखन प्रक्रियेदरम्यान त्याच्याकडे असलेल्या नव्या-जुन्या गाण्यांच्या ध्वनिफिती असतो. त्या त्या दृश्याला पूरक ठरणाऱ्या संगीताचा शोध घेत असतो. याखेरीज यापलीकडे जात एरवीही निरनिराळ्या बाजाचं संगीत शोधत नि ऐकत असतो. तो म्हणतो, “To me, movies and music go hand in hand. When I’m writing a script, one of the first things I do is find the music I’m going to play for the opening sequence.” 

त्याला ‘जँगो अनचेन्ड’ या चित्रपटाचं कथानक सुचलं तेही अशाच रीतीने जपानी संगीताचा शोधत घेत असताना. म्हणजे ‘इन्ग्लोरियस बास्टर्ड्स’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने तो जपानच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी तिथलं संगीत ऐकत असताना आणि सर्जिओ कर्बुची या जापानी चित्रपट दिग्दर्शकाच्या कामावर पुस्तक लिहिण्याची तयारी करत असताना त्याला सदर चित्रपटाचं सुरुवातीचं दृश्य सुचलं. अगदी चित्रपटाचं आणि त्यातील नायकाचं नाव, ‘जँगो’देखील कर्बुचीच्या ‘जँगो’ (१९६६) या चित्रपटाला दिलेली मानवंदना आहे. 

सांगायचा उद्देश इतकाच की, त्याच्या चित्रपटाच्या साऊंडट्रॅकमधील गाणी चित्रपटाला आणि पात्रांना, त्यांच्या सभोवतालाला पूरक ठरण्यामागील कारण या पडद्यामागील प्रक्रियेमध्ये दडलेलं आहे. “I’ve always thought my soundtracks do pretty good, because they’re basically professional equivalents of a mix tape I’d make for you at home.” हे त्याचं वाक्य त्याच्या चित्रपटातील साऊंडट्रॅक्सच्या प्रभावी ठरण्यामागील समर्पक निरीक्षण आहे. आताही ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवुड’चा ट्रेलर आल्यापासूनच त्याच्या गाण्यांची चर्चा सुरु झाली होती. 

image5
Credit : Diego Patiño, Variety

त्याचे चित्रपट डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं नव्हे, तर पारंपरिक पद्धतीने ‘सेल्युलॉइड’वर चित्रित करण्याचा त्याचा अट्टाहास म्हणजे त्याच्या याच प्रेमाचं आणखी एक रूप आहे. ज्याचं कारणही पुन्हा त्याच्या पूर्वायुष्यात आहे. तो चित्रपटांकडे खूप भावनिक दृष्टिकोनातून पाहतो. त्याचा चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मोठ्या पडद्यावर चित्रपट अनुभवणं या गोष्टी केवळ नॉस्टॅल्जियाशी संबंधित नाहीत. तशा त्या कधीच नव्हत्या. पण, मुळातच चित्रपटाची त्याच्या मनातील व्याख्या म्हणजे ‘बिग स्क्रीन एक्सपीरियन्स’ आणि एक प्रकारचा उत्सव अशी असावी. म्हणजे त्याने पॉर्नो चित्रपटगृहांत काम केलंय, त्याने सुरुवातीपासूनच फिल्म्स मोठ्या पडद्यावर पाहिल्या आहेत. त्याच्या मते चित्रपटाच्या रीळवरील ग्रेन्स, ३५ एमएम किंवा मग ७० एमएमचे पडदे म्हणजे ‘सिनेमा’ आहे. 

‘सेल्युलॉइड’ म्हणजे पारंपरिक पद्धतीने ‘फिल्म रीळ’वर चित्रीकरण करण्याचा प्रकार. ज्यात ‘फिल्म स्टॉक’वर भौतिक स्वरूपाच्या रीळचा साठा करणं, वगैरेचा समावेश होतो. आता बहुतांशी चित्रपटकर्ते वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करतात. याउलट टॅरेंटिनोसोबत क्रिस्टोफर नोलन, पॉल थॉमस अँडरसन, वेस अँडरसन, स्टीव्हन स्पीलबर्ग, इत्यादी लोकसुद्धा त्यांचे चित्रपट सेल्युलॉइडवर चित्रित करण्यावर भर देतात. टॅरेंटिनोचा ‘द हेटफुल एट’ आला तेव्हा तर तो स्वतः अमेरिकेत रोड शो करत सदर सिनेमा फक्त ७० एमएमवर दाखवण्यावर भर देत होता. आता हे लोक चूक की बरोबर हा मुद्दा काही काळ बाजूला ठेवू. इथे त्यांची या माध्यमाप्रतीची आस्था आणि पॅशन लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. 

आताही टॅरेंटिनोनं ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवुड’करिता सेल्युलॉइड वापरण्यावर भर दिला. यापलीकडे जात अपवाद वगळता व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स) टाळत पारंपरिक पद्धतीने प्रत्यक्ष फिल्म सेट्स आणि स्टंटमॅन वापरले. सदर चित्रपटाचा नुसता ट्रेलर पाहिला तरी त्या दृश्यचौकटींमध्ये असलेली एक प्रकारची अंगभूत समृद्धता आणि सौंदर्य दिसून येतं. त्यामुळे तो चूक नाही असं नाहीच ना. तो सेल्युलॉइड वापरतोय, कारण त्याच्याकडे तसे स्रोत उपलब्ध आहेत. त्याच्याकडे ती महत्त्वाकांक्षा, ती दृष्टी आहे. शिवाय, तो म्हणतोय त्याप्रमाणे जवळपास प्रत्येक सिनेमात त्याने आपल्याला त्याच्या मनातील सिनेमा दाखवत सिनेमाची, मोठ्या पडद्याची, त्या भव्यतेची, त्याच्या प्रभावाची अनुभूती मिळवून दिली आहेच की. हेच नोलन, स्पीलबर्ग, अँडरसन, इत्यादींबाबतही आहे. त्यामुळे त्यांच्या ‘डिजिटल म्हणजे डेथ ऑफ सिनेमा’ या विधानाकडे अतिशयोक्तीपूर्ण समजून कानाडोळा करूयात हवं तर. तसंही तो डिजिटलवर चित्रीकरण करणाऱ्या कित्येक लोकांचं कौतुक करत असतोच की. अशावेळी त्याचा मुद्दा - स्त्रोत उपलब्ध असतील, तर प्रेक्षकाला शक्य तितका भव्य प्रकारचा अनुभव मिळवून द्यावा, अशा अर्थाने लक्षात घेऊयात हवं तर. 

तो जे काही बोलतोय ते त्याच्या या माध्यमावरील प्रेमातून येत आहे, हे इथे लक्षात घ्यायला हवं. त्याचा भूतकाळ नि त्याचा वर्तमान लक्षात घ्यायला हवा. त्याचा आणि सिनेमाचा परस्परसंबंध लक्षात घ्यायला हवा. आपल्याकडे जसं मधेच एखादं ‘सिंगल स्क्रीन’ थिएटर बंद पडल्याची बातमी आल्यावर, किंवा ते पाडून मोठा मॉल किंवा मल्टिप्लेक्स बांधत आहेत म्हटल्यावर आपल्याला हळहळ वाटते, तेच त्याला आणि त्याच्याशी सहमत असलेल्या इतरांना वाटत आहे, हे लक्षात घ्यायला हवं. 

काहीही झालं तरी टॅरेंटिनो हा एका अभूतपूर्व एराचा साक्षीदार आहे. त्याने जागतिकीकरणाच्या उंबरठ्यावर आपल्या कारकिर्दीला सुरुवात करत या क्षेत्रात आणि एकूणच जगात घडणारे बदल अनुभवलेले आहेत. त्यामुळे त्याची विचारप्रक्रिया, सिनेमाची त्याने अनुभवलेली, त्याच्या मनात असलेली व्याख्या ओल्ड-स्कूल असणं साहजिक आहे. शिवाय, चित्रपट लेखनासोबतच मुळातच चित्रपटनिर्मितीची, नि चित्रपटाच्या सेटवर प्रत्यक्ष काम करत जुन्या तऱ्हेनं सेल्युलॉइडवर चित्रीकरण करण्याची प्रक्रिया त्याला त्याच्या कामाचा आनंद मिळवून देते. त्याला चित्रपट बनवायचे आहेत, ते पाहून प्रेक्षकांना आनंद मिळेल नि ते आपली प्रशंसा करतील, असं कामही करायचं आहे. पण सोबतच ही जी निर्मितीची प्रक्रिया आहे, ती अनुभवायची आहे. सेल्युलॉइड किंवा डिजिटल ही केवळ आपलं काम जगापुढे मांडण्याची माध्यमं आहेत, तर टॅरेंटिनोचं मुळातच एकूणच ‘सिनेमा’ या माध्यमावर, त्यातील निरनिराळ्या अंगांवर प्रेम आहे. आता आपण अशा विश्वात जगतोय जिथे हे काही मोजके चित्रपटकर्ते आणि कलाकार सोडल्यास पुन्हा एकदा फिल्म स्टुडिओ आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सचं वर्चस्व निर्माण होऊ लागलं आहे. त्यामुळे या लोकांचं ‘फिल्म’प्रती असलेलं प्रेम त्यांच्या कलाकृती आणि विचारांतून व्यक्त होतंय. टॅरेंटिनो आणि सिनेमा या दोन वेगळ्या, तरीही एक म्हणाव्याशा संस्थांचा विचार करता यात विशेष खटकेल असं काही नाही. 

image6
‘द हेटफुल एट’च्या सेटवर   Cr-The Weinstein Co. 

टॅरेंटिनोची माझी ओळख खरंतर चार-पाच वर्षं जुनी. २०१३-१४ दरम्यान कधीतरी मी जागतिक, किंवा खरंतर अमेरिकन-ब्रिटिश सिनेमा अधिक रसाने एक्स्प्लोर करायला सुरुवात केली असेल. त्यामुळे, २०१५ मध्ये आठवा, ‘द हेटफुल एट’ हा चित्रपट येण्याच्या सुमारास कधीतरी जेव्हा माझी त्याच्याशी ओळख झाली, तोवर क्वेंटिन टॅरेंटिनोचे सात चित्रपट येऊन गेले होते. तोवर त्याने वयाची पन्नाशीपार केली होती. मात्र, वय हा तसाही गुणवत्तेचा निकष कधी नव्हताच, पुढेही नसेल. कारण, मार्टिन स्कॉर्सेसी, क्लिंट इस्टवुड, स्टीव्हन स्पीलबर्ग, वुडी अॅलन, इत्यादी लोक आजही तितक्याच धडाक्यानं काम करत आपल्याला फॅसिनेट करत असतातच की. मात्र, क्वेंटिनबाबत गोष्ट जरा निराळीच. पहिलं कारण, या इतर लोकांची लोकप्रियता आणि त्यांच्या चित्रपटांचा दर्जा यांत नेहमी झपाट्याचा बदल होत राहिलेला आहे. तर, दुसरं म्हणजे या इतरांची कारकीर्द बहरायला, आणि त्यांना चित्रपटजगतातील काही सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून एक अढळ स्थान प्राप्त करायला जितके चित्रपट बनवावे लागले, ते सारं क्वेंटिननं हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या चित्रपटांद्वारे साध्य केलं. अल्पावधीत ‘नवीन स्कॉर्सेसी’ ही उपाधी मिळवली, नि लवकरच तिच्याही पलीकडे जात स्वतःचं असं एक निराळं प्रस्थ निर्माण केलं. त्यामुळे सिनेमाचा, आणि त्यातही पुन्हा इंडी सिनेमाचा विचार करता एका नव्या युगाच्या, चळवळीच्या प्रणेत्यांपैकी एक म्हणून त्याविषयी जरा आदरयुक्त प्रेम आहे. तो माझ्यासारख्या चित्रपटप्रेमींना फॅसिनेट करत आलाय. आम्हाला वेळोवेळी, वारंवार ‘सिनेमा’ या माध्यमाच्या प्रेमात पाडत आलाय. 

कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मी केवळ दहा चित्रपट दिग्दर्शित करून निवृत्त होणार म्हणत आलाय. रिटायर झाल्यावर काय करणार असं विचारल्यावर तो त्याच्या स्वभावाला जागत ‘मी काहीही करू शकतो’, असं उत्तर देतो. त्यात पुढे जोडतो, “मी चित्रपट लेखक-दिग्दर्शक यासोबतच मूलतः चित्रपटप्रेमी आहे. त्यामुळे पूर्वी फिल्म रिव्ह्यू करायचो तसे आता फिल्म एसे लिहू शकतो. किंवा तुम्हाला माझ्या शैलीत जिच्या छटा आढळतात तशी कादंबरी किंवा एखादं नाटकही लिहू शकतो. किंवा करायचं झाल्यास माझ्याच चित्रपटांचं रंगभूमीवर अडाप्टेशनदेखील करू शकतो.” आता त्याने चित्रपट बनवणं बंद करण्याचं दुःख असलं, तरी त्याने वर सांगितल्याप्रमाणे काहीही केलं तरी ते सुखद आणि चांगलं असेल याची अपेक्षा-कम-खात्री असल्याने त्याने काहीही करावं नि आपण ते पाहत, वाचत, अनुभवत रहावं असं वाटतं. आता ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवुड’ प्रदर्शित झालाय म्हटल्यावर त्याच्या निवृत्तीच्या दिशेनं आणखी एक पाऊल पडलं आहे. आणि लगेचच त्याच्या पुढच्या चित्रपटाविषयी चर्चाही सुरु झाल्यात. तो नवीन ‘स्टार ट्रेक’ चित्रपट लिहितोय. ‘जँगो/झोरो क्रॉसओव्हर’ चित्रपटावर काम करतोय. आता या चित्रपटांतील एखाद्याचं दिग्दर्शन तो करेल की, निवृत्तीसाठी स्वतःची अशी वेगळी फिल्म लिहील असे प्रश्न आहेतच. (अगदी हा लेख लिहीत असतानाही त्याने, “मला भयपट दिग्दर्शित कार्याला आवडेल”, असं म्हटलं आहे.) अर्थात त्याने काय फरक पडतो म्हणा! कारण, त्याने काहीही करू देत, ते आपण पाहणार आहोतच. 

अर्थात या प्रेमाला केवळ दृश्यपातळीवरील भव्यता कारणीभूत नाही. त्यापलीकडे जात त्याच्या चित्रपटांची प्रेक्षकाला भुरळ घालावी अशी मांडणी, दृकश्राव्य शैली, कुणाही लेखकाला हेवा वाटेल असं लेखन-संवादलेखन, आयकॉनिक ठरणाऱ्या पात्रांची निर्मिती, ती पात्रं साकारणाऱ्या अभिनेत्यांकडून तितकंच अफाट काम करवून घेणं अशा एक अन् अनेक गोष्टी त्याच्यावर प्रेम करण्यास कारणीभूत आहेत. आणि हे सगळं करणारा टॅरेंटिनो कुठल्याही फिल्म स्कूलमध्ये गेला नाही, चित्रपट बनवण्याचं कुठलंही प्रशिक्षण घेतलं नाही, हे त्याला आणखी महत्त्व प्राप्त करून देतं. तो म्हणतो, “When people ask me if I went to film school I tell them, ‘no, I went to films.’” 

आणि आता याच फिल्म स्कूलमध्ये न जाता थेट तिथे शिकवला जाणारा एक स्वतंत्र विषय बनलेल्या टॅरेंटिनोचा नववा चित्रपट, ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवुड’ आलाय. भारतातील त्याच्या चाहत्यांना त्याच्याच प्रदर्शनाचे वेध लागले आहेत. नि त्यामुळेच तर त्याला सेलिब्रेट करणारी, त्याला प्रेमपत्र म्हणून लिहिलेली ही लेखमाला तुमच्यापुढे आणत आहोत.