Quick Reads

यस्टर्डे: अ वर्ल्ड विदाऊट द बीटल्स इज अ वर्ल्ड दॅट्स इन्फानाइटली वर्स

स्पॉटलाईट सदर

Credit : Universal Pictures

‘यस्टर्डे’च्या निमित्ताने डॅनी बॉयल आणि रिचर्ड कर्टिस ही ब्रिटिश चित्रपटसृष्टीतील दोन कल्पक व्यक्तिमत्त्वं एकत्र येतात. बॉयल हा निरनिराळ्या विधेत, निरनिराळ्या विषयांवर काम करत स्वतःची अशी एक शैली निर्माण करण्यासाठी, तर कर्टिस हा मुख्यत्वे प्रेमकथा केंद्रस्थानी असलेल्या चित्रपटांच्या लेखनाकरिता ओळखला जातो. बॉयलचं दिग्दर्शन असलेल्या ‘ट्रेनस्पॉटिंग’ (१९९६), ‘अ लाईफ लेस ऑर्डिनरी’ (१९९७), ‘२८ डेज लेटर’पासून (२००२) ते ‘१२७ अवर्स’ (२०१०), ‘स्टीव्ह जॉब्ज’पर्यंत (२०१५) त्याचं वैविध्य दिसून येतं. दरम्यानच्या काळात आपल्या सांस्कृतिक, सामाजिक परिघाच्या बाहेर पडत ‘स्लमडॉग मिलेनियर’ नामक चित्रपटही त्याने करून दाखवला. तर, कर्टिसदेखील ‘फोर वेडिंग्ज अंड अ फ्युनरल’ (१९९४), ‘नॉटिंग हिल’चं (१९९९) लेखन, ‘लव्ह अॅक्च्युअली’ (२००३), ‘अबाऊट टाइम’च्या (२०१३) लेखन दिग्दर्शनापासून ते ‘मि. बीन’चं लेखन अशा निरनिराळ्या प्रांतात स्वैर वावर करताना दिसतो. त्यामुळे हे दोघे एकत्र येतात तेव्हा एक कल्पक नि रंजक अशी दृकश्राव्य कलाकृती समोर येणं स्वाभाविक आहे. 

‘यस्टर्डे’च्या केंद्रस्थानी असलेली संकल्पना अगदीच कल्पक नि रंजक आहे. ती अशी की चित्रपटाचा नायक वगळता जवळपास सगळं जग ‘बीटल्स’ या म्युजिक बँडचं अस्तित्त्व विसरून जातं. मग नायकाआसपासच्या कुणालाच या बँडची गाणी न आठवणं, नि नायकाने त्यांची गाणी स्वतःची म्हणून खपवणं सुरु होतं. मुळातच रिचर्ड कर्टिस हे नाव अशा रंजक संकल्पनांच्या मुळाशी राहिलेलं आहे. कर्टिस अशा संकल्पना समोर मांडताना त्यांचं तार्किक स्पष्टीकरण देण्याच्या वगैरे भानगडीत पडत नाही. मात्र, अशा संकल्पनेच्या उपयोजनातून जे काही घडेल, त्यात प्रेक्षक भावनिक, मानसिक पातळीवर गुंतून राहील याची काळजी तो नक्कीच घेतो. उदाहरणार्थ, त्याच्या ‘अबाऊट टाइम’मध्ये तो ‘टाइम ट्रव्हल’ या संकल्पनेकडे एका निराळ्या मात्र प्रभावी नजरेतून पाहतो. तिथेही तार्किक स्पष्टीकरणं, कारणं न देता तो त्या कथेला भावनिक किनार प्राप्त करून देतो. सांगायचा मुद्दा असा की‘यस्टर्डे’मध्ये ही संकल्पना कर्टिसच्या शैलीत समोर येत कथानक पुढे सरकतं, तर बॉयल तिला दृश्यपातळीवर रंजक बनवतो. परिणामी सदर चित्रपट जितका बॉयलचा आहे, तितकाच कर्टिसचाही ठरतो. 

yesterday

जॅक मलिक (हिमेश पटेल) हा लोव्हस्टॉफ्ट या ब्रिटनमधील त्यामानाने लहानशा असलेल्या गावात राहणारा संगीतकार आहे. बराच काळ गीतलेखन करूनही त्याला या क्षेत्रात यश काही मिळालेलं नाही. त्यामुळे तो पुन्हा एकदा शिक्षकाची नोकरी स्वीकारून आर्थिक, सामाजिक (नि झाल्यास मानसिक) स्थैर्य मिळवण्याचा विचार करतो आहे. त्याला त्याच्या या विचारांपासून परावृत्त करण्यात, नि त्याला वेळोवेळी प्रोत्साहन देण्यात त्याच्या लहानपणापासूनच्या मैत्रीण-कम-मॅनेजर एलीचा (लिली जेम्स) मोठा वाटा आहे. तिच्या प्रयत्नांनंतर त्याला एका म्युजिक फेस्टिव्हलमध्ये आपली गीतं गाण्याची संधी मिळालेली असते, मात्र तिथेही अपयश आल्याने संगीतक्षेत्रात काही करू पाहण्याची आपली स्वप्नं बासनात गुंडाळून ठेवण्याच्या त्याच्या विचाराला पुन्हा उभारी मिळालेली असते. यावेळी एलीदेखील त्याला परावृत्त करण्यात अपयशी होते. मात्र, त्याच रात्री ‘तो’ अपघात घडून ‘द बीटल्स’च्या अस्तित्त्वाच्या आठवणी सर्वांच्या मनातून पुसल्या जातात. 

इस्पितळातून बाहेर पडल्यानंतर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तो जेव्हा बीटल्सचं ‘यस्टर्डे’ हे गीत गातो तेव्हा कुणालाच त्याची पुसटही आठवण नसते, नि सगळेच ते ऐकून भावनाविवश होतात. साहजिकच जॅकचा त्यावर विश्वास बसत नाही. पुढेही असे एक दोन प्रसंग घडल्यावर मात्र सगळा प्रकार त्याच्या लक्षात येतो, नि तो झाल्यास प्रकरणाचा शोध घेण्याचा अपयशी प्रयत्न करतो. लागलीच तो बीटल्सची आठवतील तितकी गाणी लिहून ठेवण्याचा सपाटा लावतो. ती गाणी स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रकारही सुरु होतो. मात्र, यातही एक गोम आहे. ती म्हणजे सुरुवातीचा बराच काळ थेट बीटल्सची गाणी गाऊनही त्याला अपयशच मिळते असं दिसून येतं. खास कर्टिसच्या शैलीच्या विनोदाचं अस्तित्त्वही इथे दिसून येत राहतं. म्हणजे जग तर बाजूलाच राहिलं, जॅकचे पालकही त्याची गाणी ऐकताना इतरच खटाटोप करताना दिसतात. पुढे जाऊन त्याच्या (म्हणजे खरंतर बीटल्सच्या) गाण्याने प्रभावित होऊन खुद्द एड शीरान हा प्रसिद्ध संगीतकार-पॉप स्टार जेव्हा त्याच्या घरी येतो तेव्हा त्याचे आई-वडील त्याकडे जॅकचा कुणीतरी भुक्कड मित्र म्हणून दुर्लक्ष करतात. वडील जेड मलिक (संजीव भास्कर) तर शीरानभोवती किचनमध्ये फिरत लोणच्याची बरणी शोधत असतात. हेही कमी म्हणून की काय शीरानलाच ‘तू एड शीरानसारखा दिसतोस’ असंही सुनावून जातात. यापुढे जाऊन चित्रपटाच्या उत्तरार्धातील बराचसा विनोदी भाग हा केट मॅकिनन या अभिनेत्रीच्या संवादफेकीतून आणि शारीर अभिनयातून येणारा आहे. 

लवकरच शीरानच्या मॉस्कोमधील कार्यक्रमाची सुरुवात जॅकच्या गाण्याने होण्यासारखे प्रकार घडतात. बीटल्सची गाणी, शीरान आणि त्याच्या मॅनेजरशी आलेला संपर्क यांमुळे जॅक मलिक हे नाव संगीत क्षेत्रात गाजू लागतं. एव्हाना सुरु असलेली छोटेखानी वैयक्तिक कथा आता संगीत क्षेत्रात घडत असलेले बदल, संगीताचं व्यापारीकरण अशा संकल्पना हाताळायला लागते. ‘यस्टर्डे’ला बीटल्स नसते तर काय घडले असते, किंवा काय घडले नसते याभोवती कथानक फिरतं ठेवायला वाव होता, मात्र चित्रपट वर उल्लेखल्याप्रमाणे संगीत क्षेत्राचं व्यापारीकरण आणि जॅकची प्रेमकथा या मर्यादित गोष्टींभोवती फिरत राहतो. ‘अ वर्ल्ड विदाऊट ‘द बीटल्स’ इज अ वर्ल्ड दॅट्स इन्फानाइटली वर्स’ या वाक्यात बीटल्सचं जागतिक संगीताच्या दृष्टीने असलेलं महत्त्व स्पष्टपणे उतरलेलं आहे. 

चित्रपटाचा बराचसा भाग हा जॅक-एलीमधील नात्याच्या शक्यतांचा मागोवा घेण्यानं व्यापलेला आहे. लहानपणापासून सोबत असलेल्या एलीला, तिच्या अस्तित्त्वाला गृहीत धरण्यात त्याचं अर्धंअधिक आयुष्य व्यतीत झालेलं असतं. तर एली कधी ना कधी हा आपलं त्यावर असलेलं प्रेम उमजून घेईल या आशेनं जगत असते. जॅक एके ठिकाणी जरा वेगळ्या संदर्भात तिला म्हणतो त्याप्रमाणे ती खरोखर ‘क्रेझी, स्लाईटली मड वुमन’ आहे. सगळ्या आर्थिक गणितांच्या, प्रसिद्धीच्या गदारोळात जेव्हा तो तिच्यापासून दूर जातो, त्यानंतर त्याला तिची उणीव भासायला सुरुवात होते. तसं पाहता पारंपारिक स्वरूपाच्या या प्रकरणानंतर त्याच्या मनातील द्वंद्व दिसून येत राहतं. पुढे काय होणार हे साहजिक असतं. 

yesterday २

असा सगळा मामला असताना कर्टिस-बॉयल ही जोडी काही उत्तम दृश्यं इथं जमवून आणतात. उदाहरणार्थ, एली आणि जॅक एका स्थानिक संगीत निर्मात्याच्या मदतीने त्याचा पहिला डेमो रेकॉर्ड करतात त्या रात्रीची रेकॉर्डिंग स्टुडिओमधील दृश्यं आणि त्यांचं संगीताच्या चालीवर केलेलं संकलन खास बॉयल शैलीचं द्योतक आहे. तर, खऱ्या इतिहासात ‘द बीटल्स’चा महत्त्वाचा भाग असलेला जॉन लेनन हा अकाली मृत्यू पावलेला संगीतकार इथल्या विश्वात अजूनही जिवंत आहे, आणि अज्ञातवासात जगतो आहे असं एक छोटेखानी उपकथानक इथे येतं. हे प्रसंग म्हणजे कर्टिसच्या अतर्क्य सुंदरतेचं लक्षण आहेत. तो एक प्रकारे समांतर इतिहास आणि इंटरनेटवर प्रसिद्ध असलेल्या मिथकाची गुंफण करत ही जोड कथानकाला देतो. 

एकुणात द बीटल्स, डॅनी बॉयल आणि रिचर्ड कर्टिस अशा तिन्ही नावांच्या चाहत्यांचं समाधान करेल असा हा एक सुंदर चित्रपट आहे. नि संगीताच्या, चित्रपटांच्या चाहत्यांनी तर तो आवर्जून पहावासा आहे.