Quick Reads

‘अनपॉज्ड: नया सफर’: ‘वॉर रूम’ आणि ‘वैकुंठ’

स्पॉटलाईट सदर

Credit : Indie Journal

अलीकडील काळात ॲमेझाॅन प्राइम, नेटफ्लिक्स, इ. स्ट्रीमिंग सर्व्हिसेसने अँथाॅलॉजी चित्रपट आणि मालिकांची निर्मिती करण्याचे काम सातत्याने सुरु ठेवले आहे. मुळात निर्मितीच्या दृष्टीने पूर्ण लांबीच्या चित्रपटांहून (वेळ आणि पैसा या दोन्ही अर्थांनी) सोयीस्कर असलेला हा प्रकार बहुतेकांचा अटेंशन स्पॅन कमी झालेल्या या काळात खपून जातो. अशा अँथाॅलॉजीच्या गर्दीत खरोखर उत्तम लघुपट सापडणे काहीसे अवघडच असते. अशात ‘अनपॉज्ड: नया सफर’ या ॲमेझाॅन प्राइमवरील अँथाॅलॉजी सिरीजमधील अय्यप्पा केएम. दिग्दर्शित ‘वॉर रूम’ आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘वैकुंठ’ हे दोन अतिशय उत्तम लघुपट पाहण्यात आले. कोविड-१९ पँडेमिकच्या काळात घडणाऱ्या या दोन्ही लघुपटांची ही शिफारस…

 

कोविड-१९ पँडेमिकच्या काळात घडणाऱ्या या दोन्ही लघुपटांची ही शिफारस

 

अय्यप्पा के.एम. दिग्दर्शित ‘वॉर रूम’ या लघुपटाच्या शीर्षकाला दोन कंगोरे आहेत. हे दोन्ही कंगोरे हा लघुपट पाहिल्यानंतर सहज लक्षात येतील असे आहेत. कोविड वॉरियर्स जिथे कार्यरत आहेत, अशी प्रत्यक्ष अर्थाची वॉर रूम हा एक उघड अर्थ. पण सोबत गीतांजली कुलकर्णीने साकारलेल्या संगीता वाघमारे या मुख्य पात्राच्या मनात सुरु होणारे द्वंद्व असाही एक अर्थ इथे आहे. संगीता कोविड वॉर रूममध्ये आपले कर्तव्य पार पाडत असताना आलेल्या एका फोन कॉलमुळे तिच्या मनात सुरु होणारे द्वंद्व, या द्वंद्वामागील कारण असणारी तिच्या पूर्वायुष्यातील घटना – यांद्वारे मानवी स्वभाव आणि नैतिकता याविषयीची एक अर्थपूर्ण, आशयघन कथा पाहायला मिळते. याखेरीज या कथेला एक विशिष्ट असे सामाजिक-राजकीय अस्तर आहे. ज्यात गीतांजलीच्या पात्राच्या बॅकस्टोरीतील काही अंश हा सत्य घटनांपासून प्रेरित आहे. (ती घटना कोणती हे मी स्पॉइलर्स टाळण्याच्या हेतूने सांगू इच्छित नाही. मात्र, त्याला जातिभेदाचा कोन आहे, एवढे मात्र सांगता येईल.) 

 

 

‘वॉर रूम’ लिहिणाऱ्या शुभम या लेखकाने यापूर्वी ‘ईब आले ऊ’ (२०२०) या चित्रपटाचे लेखन केलेले आहे. आणि दोन्ही ठिकाणी वास्तवातील घटनांचे संदर्भ वापरत कथानक उभारले आहे. ‘वॉर रूम’मधील प्रेरणादेखील सहज लक्षात येणारी आहे. मात्र, प्रत्यक्षात घडलेल्या घटनांचे संदर्भ वापरुन त्यातील मुद्दयाला अधिक वरच्या पातळीवर नेले आहे. विशेषतः हा भाग कोविड वॉर रुममध्ये घडवून त्यातून मृत्यू संदर्भातील नाट्य उभारणे हे मला फारच इंटरेस्टिंग वाटले. त्यात पुन्हा मध्यवर्ती पात्राची मनःस्थिती, त्या पात्राच्या आयुष्यात भूतकाळात घडलेली घटना आणि ती व्यक्ती वर्तमानात करु इच्छित असलेली कृती यांतील नैतिकतेसंदर्भातील विरोधाभासी विचार – हे सर्व अगदीच उत्तमरीत्या जमून आलेले आहे. 

नागराज मंजुळेच्या ‘वैकुंठ’ या लघुपटाची मध्यवर्ती संकल्पना फारच मूलभूत स्वरूपाची आहे. विकास चव्हाण (नागराज मंजुळे) या स्मशानभूमीत काम करणाऱ्या पात्राच्या घरात कोविड पेशंट सापडल्याने त्याला त्याचे घर रिकामे करावे लागते आणि आपल्या लहान मुलासह स्मशान भूमीत राहण्याचा प्रसंग त्यावर येतो – अशी ही संकल्पना. मात्र, एक्झिक्युशनच्या दृष्टीने ‘वैकुंठ’ फारच उत्कृष्ट आहे. मंजुळेच्या सर्व चित्रपटांमध्ये मध्यवर्ती पात्रांच्या जीवनानुभावाच्या दृष्टीने जो खरेपणा आढळतो, तो इथेही अस्तित्त्वात आहे. ‘वॉर रूम’ आणि ‘वैकुंठ’ या दोन्ही शॉर्ट्समध्ये कथाविश्व उभारत असताना केलेला विचार, असे करीत असताना दृश्य स्तरावर उपयोजिलेले तपशील, अभिनेत्यांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म हालचाली या बाबींचा महत्त्वाचा वाटा आहे. या सगळ्यातून या दोन्ही कथानकांना, त्यातील पात्रांना, त्यांच्या भावनांना हा अस्सलपणा प्राप्त होतो. 

 

 

जिथे भाड्याच्या जागेत राहत असणाऱ्या डॉक्टर्सना त्यांची घरे रिकामी करण्यास सांगण्यात आल्याच्या घटना घडल्या, तिथे विकाससारख्या आर्थिक-सामाजिक परिस्थिती असणाऱ्या व्यक्तीचे काय घेऊन बसलात, असे वाटायला लावणारा हा पँडेमिकचा काळ. या काळात घडत असणाऱ्या मृत्यूंची संख्या पाहता या संकल्पनेला दोन्हीकडे महत्त्व प्राप्त होणे काहीसे स्वाभाविक आहे. ‘वैकुंठ’मधील विकास रोज इतके मृत्यू आणि इतके मृतदेह पाहतो की त्याच्या मनात मृत्यूबाबत एक परकेपणाची, उदासीनतेची भावना निर्माण झालेली आहे. ‘वॉर रुम’मधील संगीता देखील ‘इस्पितळात एखादी कॉट रिकामी आहे का?’ असे विचारण्यासाठी सतत खणखणत असणाऱ्या टेलिफोनचा समावेश असणाऱ्या तिच्या कामाबाबत तितकीच तटस्थ आहे.

 

नागराज आणि गीतांजली या दोघांचा हा तटस्थपणा अस्वस्थ करणारा आहे.

 

‘वुई आर इन धिस टुगेदर’ हे चावून चोथा झालेले वाक्य आणि त्यामागील भावना तशी ऐकायला चांगली आहे. मात्र, संगीता आणि विकास ज्या विश्वात कार्यरत आहेत, तिथे मात्र अजूनही वर्गवारी अस्तित्त्वात असल्याचे दिसते. ज्यामुळे या दोन्ही पात्रांच्या मनातील ही परकेपणाची भावना वाढीस लागली असणार. नागराज आणि गीतांजली या दोघांचा हा तटस्थपणा अस्वस्थ करणारा आहे. अशात इथल्या उदास आणि निरुत्साही वातावरणात अशा काही घटना घडतात की, त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि त्यांचे काम, कर्तव्य यांतील सीमारेषा धूसर होऊ लागतात. या दोघांच्या मनात अनायासे ठाण मांडून बसलेली तटस्थतेची भावना गळून पडते. आता दोन्ही पात्रांच्या बाबतीत हा प्रवास, हा बदल कसा घडतो, हे फारच चित्तवेधकरीत्या समोर मांडलेले आहे. दोन्ही लघुपटांमध्ये नाट्य असले तरी ते बटबटीत स्वरूपाचे नाही. इथल्या घटनांचे स्वरूप अधिक संयत आहे, सूक्ष्म निरीक्षणे नोंदवणारे आहे. त्यामुळे या लघुपटांच्या परिणामात भर पडते. 

‘वॉर रूम’ आणि ‘वैकुंठ’ या दोन्ही शॉर्ट्स ‘शो, डोन्ट टेल’ हे तत्त्व पाळतात. ‘वैकुंठ’चा बराचसा भाग हा संवादविरहित आहे. आणि उत्तम ध्वनी आरेखन हा दोन्ही लघुपटांमधील महत्त्वाचा घटक आहे. पार्श्वसंगीताचा वापरदेखील मोजका आणि अचूकरीत्या केलेला आहे. (‘वैकुंठ’मधील ए. व्ही. प्रफुल्लचंद्रचे संगीत या लघुपटाचा प्रभाव उंचावणारे आहे.) त्यामुळे दोन्ही शॉर्ट्समध्ये अशा बऱ्याच जागा आहेत ज्यांत सूक्ष्मपणे महत्त्वाची माहिती, आशयाशी सुसंगत मुद्दे समोर मांडले जातात. ज्यात चित्रपटकर्त्यांचे कौशल्य दिसून येते. शिवाय, सर्वकाही सरळसरळ सांगून टाकलेले नसल्याने प्रेक्षकाने अनेक संकल्पनांचा स्वतः विचार करण्यास बराच वाव राहतो. इथली तांत्रिक बाजू प्रभावी आहेच, पण आशयाच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास सामाजिक, राजकीय, वैचारिक अशा अनेक अंगांनी या दोन्ही शॉर्ट्स प्रचंड प्रभावी आणि उद्बोधक आहेत.