Quick Reads
अनकट जेम्स: नावाजलेल्या रांगेत बसणारा थरारपट
स्पॉटलाईट सदर
साफ्दी ब्रदर्सच्या ‘अनकट जेम्स’कडे केवळ आणखी एक क्राइम थ्रिलर म्हणून पाहणं त्यावर अन्यायकारक ठरणारं आहे. इथे क्राइम थ्रिलरमध्ये असणं अपेक्षित असलेले सगळे घटक आहेत. भावनिक आणि नैतिकदृष्ट्या अधःपतन झालेली पात्रं आहेत, गुन्हेगारी आणि हिंसा आहे. हिंसेच्या अस्तित्त्वात गडद छटा धारण करणारा विनोद आहे. थरार आहे, जवळपास संपूर्ण चित्रपटभर कायम असणारा तणावही आहे. मात्र, या वरवरच्या घटकांच्या पलीकडे जात ‘अनकट जेम्स’मध्ये संपूर्ण चित्रपटभर एका विशिष्ट प्रकारच्या, काहीशा सरीयल म्हणाव्याशा भावनेचं अस्तित्त्व पसरलेलं आहे. ही भावना आशय आणि मांडणी अशा दोन्ही स्तरांवर निर्माण होणारी आहे. समोर दिसणारी दृश्यं, दृश्यचौकटी आणि त्यांना जोडून येणारं पार्श्वसंगीत, किंवा काही वेळा यातील विशिष्टरीत्या लक्ष वेधून घेणाऱ्या पार्श्वसंगीताचा जाणवणारा अभाव - या सगळ्यांतील परस्परसंबंध या भावनेला कारणीभूत आहे.
हावर्ड रॅटनर (अॅडम सॅंडलर) हा न्यू यॉर्कमधील डायमंड डिस्ट्रीक्टवरील दागिन्यांच्या दुकानाचा मालक आहे. नानाविध लोकांकडून घेऊन ठेवलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असताना बास्केटबॉलच्या मॅचेसवर पैसे लावत जुगार खेळणाऱ्या हावर्डला स्वप्नाळू म्हणणं फारसं चुकीचं ठरणार नाही. यात सराईत असलेल्या हावर्डचं जुगार खेळणं हे साहजिकच नुसत्या अंदाजांच्या पलीकडे जाणारं आहे. मॅचमध्ये विशिष्ट खेळाडू विशिष्ट स्कोअर करेल, दरम्यान विशिष्ट अशी गोष्ट घडेल अशा अर्थाच्या अगदीच विशिष्ट तऱ्हेच्या घडामोडी अशी भाकितं करीत तो पैसे लावत असतो. यासाठी लागणारा पैसा त्याने अनेक लोकांकडून घेतलेला असल्याने त्याच्यावर बरंच कर्ज असतं. त्यातही पुन्हा अर्नोकडून (एरिक बॉगसिन) त्याने एक लाख डॉलर्स घेतलेले असतात. यातून सुटण्यासाठीचा त्याचा मार्ग म्हणजे इथियोपियामधून त्याने मागवलेला (त्याच्या मते) एक दशलक्ष किंमतीचा एक विशिष्ट खडा लिलावात विकणे.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्याच्या दुकानात कमिशनवर ग्राहक आणणारा डीमानी (लेकिथ स्टॅनफिल्ड) हा केविन गार्नेट या बास्केटबॉल खेळाडूला सोबत घेऊन दुकानात आलेला असतो. केविनला हावर्डने त्याला दाखवण्यासाठी म्हणून समोर घेऊन आणलेला हा खडा स्वतःकडे असावा असं वाटल्याने बऱ्याच आर्जवानंतर केविन तो खडा घेऊन जातो. खडा परत करत असताना मात्र त्याच्या मते हावर्ड म्हणाला त्याप्रमाणे त्या खड्यात काहीतरी विशिष्ट शक्ती आहे असं वाटू लागलेलं असतं. ज्यामुळे तो खडा त्याच्या मालकीचा असावा असं त्याला वाटतं. ज्यानंतर घडणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियांतून इथलं कथानक उभं राहतं. हावर्डच्या मनातील योजना, आणि अमूर्त भावनांचं प्रतिनिधित्व करणारी मूर्त गोष्ट स्वतःच्या मालकीची असावी ही भावना या दोन मुख्य बाबींपासून इथल्या कथानकाची सुरुवात होते. आणि त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात होत असलेली उलथापालथ यानंतर उत्तरोत्तर वाढत जाते.
जॉश आणि बेनी साफ्दी बंधूंनी रोनाल्ड ब्रॉनस्टाइन या त्यांच्या नेहमीच्या सहलेखक आणि संकलकासोबत लिहिलेली पटकथा ही हावर्डच्या सभोवताली घडणाऱ्या शाब्दिक-शारीरिक पातळीवर हिंसक घडामोडींची वाढती तीव्रता आणि त्याचं वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी यांना समान महत्त्व देते. त्याचं त्याच्याकडे काम करणाऱ्या ज्युलियासोबत (ज्युलिया फॉक्स) सुरु असलेलं प्रकरण त्याच्या पत्नीला, डिनाला (इडिना मेंझल) आधीच माहीत असल्याने त्यांचा घटस्फोट होणं ठरलेलं असतं. त्यामुळे डिनापासून विभक्त झालेला हावर्ड ज्युलियासोबत त्याच्या दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये राहत असतो. त्याच्या बदलत्या सभोवतालानुसार त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात कशा पद्धतीने बदल घडतात ते पाहणं इथे महत्त्वाचं ठरतं.
हावर्ड हे पात्र समोर ठेवत ‘अनकट जेम्स’ ज्या पद्धतीने उलगडत जातो, समोर मांडला जातो ते खूप आकर्षक आणि खिळवून ठेवणारं आहे. हावर्ड या पात्रामध्ये भरपूर आशावाद नि कल्पनारम्यता आहे. हावर्डची कृत्यं आणि त्यांचा त्याच्या आयुष्यावर पडत असलेला परिणाम दर्शवत असताना दिसतं की, त्याच्या मनात वास्तव आणि कल्पनारम्यता यांत कायम एक द्वंद्व सुरु असतं. त्याच्यावर बरंचसं कर्ज आहे हे झालं वास्तव, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग इथियोपियन खडा आणि जुगार यांतून जातो ही झाली त्याची कल्पनारम्यता. तो जेव्हा तणावात नसतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि उत्साह पहावा. इथियोपियन खडा पहिल्यांदा पाहिल्यावर त्याच्या डोळ्यात दिसणारी चमक पहावी.
आता हे पात्र आणि त्याच्या सभोवतालाला रेखाटताना साफ्दी बंधू आणि संगीतकार डॅनियल लोपटिन पार्श्वसंगीत आणि ध्वनी संरचना अशा दोन्ही पातळ्यांवर एक विलक्षणरीत्या वैशिष्ट्यपूर्ण असा अनुभव निर्माण करतात. हे करत असताना फ्ल्यूट, सॅक्सोफोन आणि सिंथेसायझरची रचना करताना त्याचं इलेक्ट्रॉनिक असणं अजिबातच लपवू न पाहणारं संगीत निर्माण केलं जातं. हे संगीत काहीसं सायन्स-फिक्शन प्रकारातील चित्रपटात शोभेल असं वाटतं, मात्र त्यात एक विशिष्ट अशी नैतिक, ऐहिक, शारीरिक गोष्टींपासून दूर नेत असल्याची भावना निर्माण करण्याचे गुणधर्म आहेत. सोबतच संगीताला त्यातील या गुणधर्मांत अधिक भर घालणाऱ्या व्होकल्सची जोड दिली जाते. ज्याचा परिणाम असा होतो की, हे संगीत त्या अर्थी हावर्डच्या कल्पनारम्यतेला पूरक ठरणारं बनतं. समोर भरपूर घडामोडी घडत असताना, सगळ्या गोंधळातही हे चांगल्या अर्थाने विचित्र ठरणारं संगीत काही वेळा तर अगदी संवादांहून अधिक लक्ष वेधून घेण्याइतपत स्तरावर ऐकू येत राहतं. ‘अनकट जेम्स’ला सरीयल अनुभव म्हणण्यामागे हे संगीत एक महत्त्वाचं कारण आहे.
लोपटिनच्या संगीताशिवाय जशी चित्रपटाची कल्पना करता येणं शक्य नाही तेच सॅंडलरच्या परफॉर्मन्सबाबतही आहे. बोलण्याची एक विशिष्ट शैली ते समोरील घडामोडींना प्रतिसाद देण्याची शैली, आणि हावर्ड या पात्राच्या अस्तित्त्वाचा महत्त्वाचा भाग असलेल्या वर उल्लेखलेल्या तसं पाहिल्यास अमूर्त भाववैशिष्ट्यांना तो व्यक्त करतो. भौतिक-ऐहिक गोष्टींसोबतच त्यापल्याडचं, अधिकचं काहीतरी मिळवण्याची आकांक्षा आणि त्यापायी होणारा सगळा गोंधळ टिपताना सॅंडलरची कामगिरी महत्त्वाची ठरते. सोबतच नुसत्या अधःपतनाच्या पलीकडे जाणारी मानसिक, कौटुंबिक, शारीरिक स्तरावरील हानी असा सविस्तर विचार इथे दिसून येतो.
‘अनकट जेम्स’च्या रुपात साफ्दी ब्रदर्स जोडीने गुन्हेगारी थरारनाट्यात तरबेज असणाऱ्या कोएन ब्रदर्स, मार्टिन स्कॉर्सेसी, क्वेंटिन टॅरेंटिनो अशा बऱ्याच मास्टर चित्रपटकर्त्यांच्या चित्रपटांच्या रांगेत शोभेल अशी कलाकृती तयार केलेली आहे. मांडणीच्या, चित्रपट निर्मितीच्या आणि आशयाच्या स्तरावरही ती बरंच काही देऊ पाहत असल्याने ती अधिकच महत्त्वाची ठरते.