Quick Reads

द आयरिशमन: मैत्री, विश्वासघात, हतबलता

स्पॉटलाईट सदर

Credit : नेटफ्लिक्स

‘द आयरिशमन’ हा रूढ अर्थांनी गँगस्टर फिल्म या प्रकारात मोडणारा चित्रपट नाही. त्याच्या केंद्रस्थानी गुन्हेगारी विश्व जरूर आहे, पण मार्टिन स्कॉर्सेसीचे इतर सिनेमे, मुख्यत्वे ‘मीन स्ट्रीट्स’ (१९७३), ‘गुडफेलाज’ (१९९०) किंवा ‘कसिनो’ (१९९५) यांत गुन्हेगारी विश्व ज्या पद्धतीने दिसते तशा चित्रणाचा इथे अभाव आहे. इथे गुन्हेगारी विश्वाकडे आश्चर्ययुक्त नजरेनं पाहिलं जात नाही. इथे चित्रपटभर एका विशिष्ट रीतीने खिन्नतेचं अस्तित्त्व आहे. ही खिन्नता इथल्या पात्रांवर सतत असणारी मृत्यूची टांगती तलवार, चित्रपटभर पसरलेलं मृत्यूचं सावट, इथल्या बहुतकरून पात्रांचं असलेलं एकाकी आयुष्य या घटकांतून निर्माण होणारी आहे. 

त्याच्या इतर चित्रपटांमध्ये, वर उल्लेखलेल्या तीनही चित्रपटांमध्ये गडद घटना, गडद व्यक्तिरेखा जरूर आहेत. या व्यक्तिरेखांच्या निमित्ताने या चित्रपटांमध्ये तो गुन्हेगारी विश्वावर, नैतिकतेवर भाष्यही करतो. पण त्यांत अशी चित्रपटभर कायम राहणारी खिन्नता नाही. ‘द आयरिशमन’मध्ये असणारी खिन्नता आणि तिचं स्वरूप हे अशा नैतिक भाष्याहून किंवा त्याच्या इतर काही चित्रपटांमध्ये गुन्हेगारी व्यक्तिरेखेतील पात्रांना होणाऱ्या शिक्षेहून अधिक वेगळं आहे.  कित्येक पात्रं समोर येताच समोरील दृश्यचौकट थिजली जाऊन त्या पात्राचं नाव आणि पुढे जाऊन त्या विशिष्ट पात्राचा मृत्यू कसा घडतो हे समोर मांडलं जातं. एखाद्या चित्रपटात अनैतिक कृत्यं करण्याचे, गुन्हेगारी विश्वाचा भाग असण्याचे परिणाम इतक्या ठळकपणे खचितच समोर येतात. इथे पात्रांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणारे बदल, त्यांचं कौटुंबिक जीवनातील आनंदाला मुकणं हे सगळं काही अगदी वैयक्तिक म्हणाव्याशा नजरेतून दिसतं. 

 

‘द आयरिशमन’ हा पूर्वाश्रमीचा डिफेन्स अॅटर्नी आणि इन्व्हेस्टिगेटर चार्ल्स ब्रँटच्या ‘आय हर्ड यू पेंट हाऊसेस’ नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. १९५० ते १९९० दरम्यानच्या अमेरिकन गुन्हेगारी-राजकीय जगतात सक्रिय असलेल्या असलेल्या बऱ्याचशा प्रभावी व्यक्ती ‘द आयरिशमन’च्या केंद्रस्थानी आहेत. ‘टू पेंट हाऊसेस’ या क्रियेला इथल्या विश्वात एक निराळाच अर्थ आहे. इथे ही संज्ञा एखाद्याचा खून करत त्याच्या रक्ताने शब्दशः घराच्या भिंती रंगवण्याच्या कृतीसाठी वापरली जाते. फ्रँक शीरान (रॉबर्ट डी निरो) हा इथल्या शीर्षक व्यक्तिरेखेत आहे. फ्रँक हा ‘द आयरिशमन’ असल्याने तो या विस्तृत कथानकातील विस्तृत कालखंडातील सर्वच घटनांच्या केंद्रस्थानी असतो. चित्रपटाची मांडणी केली जाते तीच मुळी त्याच्या कथनाच्या माध्यमातून. पार्श्वभूमीवर ‘इन द स्टिल ऑफ द नाईट’ वाजत असताना कॅमेरा एका नर्सिंग होममध्ये फिरत शेवटी फ्रँकपुढे जाऊन थांबतो. कथनाला सुरुवात होते तेव्हा नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धातील काळ असतो. फ्रँक त्याची कथा सांगायला सुरुवात करतो ती उलटसुलट क्रमाने समोर मांडली जाते. मुळातच कथन सुरु असल्याने फ्लॅशबॅक सुरु असताना त्यात आणखी एखादा फ्लॅशबॅक समोर येतो. १९५० मध्ये फिलाडेल्फियातील एका कंपनीत वाहन चालक म्हणून कार्यरत असलेला फ्रँक विल्यम ऊर्फ बिल बफलिनोच्या (रे रोमॅनो) संपर्कात येतो. बिल हा बफलिनो माफिया कुटुंबाचा सदस्य असल्याने लवकरच त्याच्या निमित्ताने फ्रँक आणि रसेल बफलिनो (जो पेशी) यांची अधिकृतरीत्या ओळख होते. 

पन्नासच्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत पेनसिल्व्हेनियातील जवळपास सर्वच अवैध धंद्यांवर रसेलचं वर्चस्व होतं. तो अनेकविध माफिया कुटुंबांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी ओळखला जातो. पन्नासच्या दशकाच्या पूर्वार्धात तो फ्रँकला पहिल्यांदा भेटतो तेव्हा रसेल एक प्रस्थापित गुन्हेगार असतो, मात्र त्याच्या कारकीर्दीच्या सर्वोच्च बिंदूवर पोचायला अजून बराच काळ असतो. रसेलच्या माध्यमातून फ्रँक हा अॅन्जेलो ब्रुनो (हार्वी कायटेल), जेम्स ऊर्फ जिमी हॉफा (अल पचिनो) अशा बऱ्याच गुन्हेगारांपासून ते राजकारण्यांच्या संपर्कात येतो. अमेरिकन सामाजिक-राजकीय परिस्थितीत घडत असलेल्या बदलांसोबत फ्रँक, रसेल आणि जिमी या त्रिकुटाबाबत जे काही घडतं त्याने ‘द आयरिशमन’चा विस्तृत असा साडेतीन तास लांबीचा पट व्यापला जातो. 

हॉफा हा तत्कालीन अमेरिकन कामगार संघटनेचा अध्यक्ष असतो. तो राष्ट्रीय राजकारणाचाही एक महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे अमेरिकेतील राजकारण आणि गुन्हेगारी विश्व यांच्यातील घनिष्ठ संबंधही यात येतात. रिचर्ड निक्सन ते रॉबर्ट केनेडी असा राष्ट्राध्यक्षाच्या खुर्चीत बसणाऱ्या व्यक्तींमध्ये बदल घडल्यानंतर त्यानुसार गुन्हेगारी जगतात घडणारे बदल दिसतात. केनेडीच्या कारकिर्दीच्या अनुषंगाने फिडेल कॅस्ट्रो आणि क्युबामधील घडामोडींशी अमेरिकन गुन्हेगारी जगताच्या असलेल्या संबंधांचा उल्लेख येतो. या साऱ्या गुन्हेगारांतील आपापसातील वाद आणि मतभेद, राजकीय हेवेदावे, प्रत्येक गोष्टीतील अनिश्चितता इथल्या अनेक घडामोडींना कारणीभूत असते. गुन्हेगारी जगताचे काही ठरावीक नियम आणि ते न पाळल्याचे परिणाम इथे दिसतात. 

 

मैत्री, विश्वासघात, हतबलता या इथल्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत. कुठल्या व्यक्तीची कुणाशी मैत्री आहे, ती कितपत गहिरी आहे याचा त्या व्यक्तीचं आयुष्य किती असेल याच्याशी थेट संबंध आहे. इथे फ्रँक, रसेल आणि जिमी या तिघांतील परस्परसंबंध अधिक महत्त्वाचे ठरणारे आहेत. इथली विषण्णता आणि कारुण्य मुख्यत्वे या तिघांशी निगडीत घडामोडींतूनच निर्माण होतं. या तिघांचे एकमेकांशी असलेले संबंध हे व्यावसायिक, गुन्हेगारी जगताच्या नियमांच्या पल्याडचे आहेत. त्यांच्या संबंधांना वैयक्तिक, कौटुंबिक छटा आहेत. रसेलसाठी फ्रँक म्हणजे सर्व काही आहे, तर फ्रँकसाठी रसेलनेच ज्याच्याशी ओळख करून दिली तो जिमी म्हणजे सर्व काही आहे. 

हिंसा, मृत्यू हे घटक इथे अस्तित्त्वात असले तरी ते स्कॉर्सेसीच्या इतर चित्रपटांप्रमाणे कथेचं प्राथमिक अंग नाहीत. ही तिन्ही पात्रं, त्यांच्या सभोवतालच्या व्यक्तिरेखा या त्यांच्या तारुण्यात नाहीत. साहजिकच इथली हिंसा, इथल्या घडामोडींमध्ये एक विशिष्ट संयतपणा आहे. जो पेशीचा रसेल त्याच्या एरवीच्या स्कॉर्सेसीच्या चित्रपटांतील भूमिकांहून वेगळा आणि आततायीपणाचा अभाव असलेला आहे. हेच डी निरोचा फ्रँक आणि पचिनोच्या हॉफाबद्दल, त्यांच्या व्यक्तिरेखा पेशीहून जरा अधिक आक्रमक असल्या तरी त्या आक्रस्ताळ्या किंवा मदमस्त नाहीत. सदर चित्रपटाबाबत बोलताना ‘द गॉडफादर’चा (१९७२) उल्लेख केला गेला तो काही प्रमाणात स्वाभाविक म्हणावासा आहे. फ्रँकच्या अगदी सुरुवातीच्या पन्नासच्या दशकातील कृती सोडल्यास इथल्या मुख्य पात्रांमध्ये ‘द गॉडफादर’मधील मार्लन ब्रँडोसारखा संयतपणा आहे. 

हीच बाब स्कॉर्सेसीच्या दिग्दर्शनालाही लागू पडते. त्यातील संगीताचा वापर, ध्वनी आरेखन, दृश्यमांडणीची एक विशिष्ट शैली असली तरी त्यात जलद हालचाली क्वचितच घडतात. आशयात असलेली खिन्नता इथल्या अलवार मांडणीत प्रतिबिंबित होते. ‘द आयरिशमन’ची एक विशिष्ट अशी एक गती आहे. ती संथ जरूर आहे, मात्र हा संथपणा इथल्या आशयाला आणि पात्रांना पूरक असणारा आहे. निरनिराळ्या व्यक्तींच्या मृत्यूचे निरनिराळ्या लोकांवर होणारे परिणाम दिसत राहतात. हे पडसाद कधी राजकीय, आर्थिक, सामाजिक फायद्या-तोट्याचे असतात, तर इतरवेळी वैयक्तिक हानीच्या पातळीवरील. चित्रपटाच्या शेवटचा पाऊणेक तासांचा भाग याच संकल्पनांना अनुसरून (चित्रपटाचा) एकप्रकारचा उपसंहार म्हणून काम करतो. या भागात इथली पात्रं मानसिक, भावनिक पातळीवर त्यांच्या सर्वाधिक असुरक्षित आणि कमकुवत म्हणाव्याशा रुपात समोर दिसतात. सुरुवातीच्या दृश्यांमध्ये एखादा गुन्हेगार, एखादी अवैध कृत्यं करणारी व्यक्ती समोर आल्यावर दृश्यचौकट थिजली जाऊन तिच्या मृत्यूचे तपशील इतक्या स्पष्टपणे समोर का आले असावेत हे दिसून येतं. स्कॉर्सेसी इथले मृत्यू सहानुभूती किंवा कारुण्याच्या भावनांच्या निर्मितीपेक्षा या व्यक्तिरेखांच्या कृष्णकृत्यांचे तितकेच गडद परिणाम म्हणून अधिक दाखवू इच्छितो. 

मार्टिन स्कॉर्सेसी या दिग्दर्शकाचा, एका अर्थी या माध्यमाच्या एका मास्टरचा हा चित्रपट त्याच्या दिग्दर्शकीय वैशिष्ट्यांनी आणि काहीवेळा अशा वैशिष्टांच्या अभावाने व्यापलेला आहे. त्याची संथ मांडणी आणि साडेतीन तासांची लांबी काहीशी संयम पाहणारी असली तरी ‘द आयरिशमन’ हा अनेक अर्थांनी यावर्षीच्या काही महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक असल्याने तो आवर्जून पहावासा आहे. चित्रपट समीक्षक रॉजर इबर्टचं एक वाक्य इथे उद्धृत करावंसं वाटतं, ते म्हणजे “नो गुड फिल्म इज टू लॉंग अँड नो बॅड मुव्ही इज शॉर्ट इनफ.”