Quick Reads

स्पॉटलाईट: अंधारात सत्य चाचपडणाऱ्या पत्रकारितेला साद घालणारा सिनेमा

स्पॉटलाईट सदराची वर्षपूर्ती

Credit : ऍमेझॉन प्राईम व्हिडियो

या आठवड्यात ‘स्पॉटलाईट’ सदराला एक वर्षं पूर्ण झालं. या सदरात लेख लिहिण्यामागे जो उद्देश होता त्या उद्देशाला, म्हणजे उत्तम देशी-विदेशी चित्रपटांवर प्रकाश टाकत त्यावर चर्चा घडवून आणण्याला साजेशा नावाचा शोध ‘स्पॉटलाईट’ या नावापाशी येऊन थांबला. ज्यामागे साहजिकच टॉम मॅकार्थीने दिग्दर्शित केलेल्या याच नावाच्या चित्रपटाचा संदर्भ होता. वर्षपूर्तीचं औचित्य साधून या चित्रपटावर लिहित आहे. 

 

पार्श्वभूमी 

बॉस्टन हे अमेरिकेच्या पूर्वकिनारपट्टीवरील एक छोटंसं शहर आहे. या शहरात कॅथलिक चर्चचं मोठं प्रस्थ आहे. शहराच्या एकूण लोकसंख्येमध्ये कॅथलिक लोकांचा असलेला टक्काही बराच मोठा आहे. त्यामुळे चर्चचं प्रस्थ अधिक लोकांची चर्चवर असलेली श्रद्धा आणि साहजिकच शहरातील विविध संस्थांमध्ये महत्त्वाच्या स्थानावर असलेले कॅथलिक लोक यांचा परिणाम म्हणजे चर्चबाबत अवाक्षरही काढणं अवघड होऊन बसतं. या साऱ्या पार्श्वभूमीवर चर्चमधील धर्मगुरूंनी केलेल्या बाललैंगिक शोषणाच्या घटना दाबून टाकण्यासारख्या घटना घडणं काहीसं स्वाभाविक होतं. 

२००२ मध्ये मात्र शहरातील ‘द बॉस्टन ग्लोब’ या वृत्तपत्राने चर्चमधील बाल लैंगिक शोषणाचं प्रकरण उघडकीस आणलं. या वृत्तपत्रातील ‘स्पॉटलाईट’ या फक्त आणि फक्त शोध पत्रकारिता करणाऱ्या विभागाने या बातमीचा पाठपुरावा केला होता. पुढे जाऊन पत्रकारितेसाठीचा पुलित्झर पुरस्कार मिळवणाऱ्या या वार्तांकनाची गोष्ट टॉम मॅकार्थी दिग्दर्शित ‘स्पॉटलाईट’ या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. 

 

बॉस्टन शहर आणि तिथली समाजव्यवस्था 

प्रत्येक भौगोलिक प्रदेशाची स्वतंत्र अशी एक समाजव्यवस्था असते. या व्यवस्थेचं स्वरूप तिथले लोक, त्यांच्यातील परस्परसंबंध, तसेच समाजव्यवस्थेचा भाग असलेल्या माध्यमव्यवस्था, न्यायव्यवस्था, धर्मव्यवस्था अशा (स्वायत्त असणं अपेक्षित असलेल्या) संस्था - अशा बऱ्याचशा घटकांनुसार ठरतं. निमशहरी भाग किंवा गावात तर ही समाजव्यवस्था शहरांहून अधिक गुंतागुंतीची असण्याच्या शक्यता असतात. कारण, नागरिकांचे आपापसात असलेले संबंध शहरांहून अधिक घनिष्ठ असतात. साहजिकच बहुतांशी लोक एकमेकांना ओळखत असल्याचे जितके फायदे असतात, तितकेच तोटेही असतात. एकेमकांना साहाय्य करणं, सामाजिक तंटे परस्परसंमतीने सोडवले जाणं, इत्यादी त्याचे फायदे. ज्यात ‘ग्रेटर गुड’करिता अर्थात त्या शहरातील/गावातील सर्वांच्या हिताकरिता निर्णय घेतले जातात. पण, याचा तोटा असा की, सामाजिकदृष्ट्या योग्य निर्णय घेत असताना व्यक्तीचं स्वतंत्र मत आणि हित बाजूला पडण्याची शक्यता असते. कुठल्याही व्यक्तीने केवळ स्वतःपुरता विचार करू नये, हे एका मर्यादेपर्यंत योग्य असलं तरी समाजाच्या हितापोटी एखादी चुकीची गोष्ट उघडकीस आणू नये, हे समर्थनीय ठरत नाही. याच ‘व्यक्ती की समाज’ द्वंद्वामुळे एखाद्या शहराची किंवा गावाची काही उघड गुपितं अस्तित्त्वात येतात. 

जेव्हा एक सबंध व्यवस्थाच काहीतरी लपवत असते, तेव्हा त्या व्यवस्थेतील दोष समोर आणण्यासाठी एखाद्या तिऱ्हाईत व्यक्तीचीच गरज भासते. इथेही नेमकं हेच घडतं. होतं असं की, १९९३ मध्ये ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने ‘द बॉस्टन ग्लोब’ विकत घेतला, आणि २००१ मध्ये त्याच्या संपादकपदावर मार्टी बॅरनची (लिव श्रायबर) नियुक्ती करण्यात आली. मुळातच एव्हाना मोठ्या वृत्तपत्रसमूहाने स्थानिक वृत्तपत्र विकत घेतल्यानंतर तिथे ज्या प्रकारचे बदल होऊ लागतात ते व्हायला सुरुवात झाली होती. ज्यू वंशीय बॅरनच्या नियुक्तीच्यावेळी एका धर्मगुरुने बाल लैंगिक शोषण केल्याची घटना घडली होती. बहुतांशी स्थानिक पत्रकारांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं होतं. चर्चच्या, तिथल्या नागरिकांच्या आणि पत्रकारांच्या दृष्टीने ही एक क्षुल्लक घटना असते. ‘इट्स जस्ट अ बॅड अॅपल’, असं म्हणत त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. बॅरन मात्र वृत्तपत्रातील ‘स्पॉटलाईट’ विभागाला या प्रकरणात लक्ष घालायला सांगतो. ज्यानंतर या पत्रकारांना या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येऊ लागतं. (इथे एके ठिकाणी उल्लेख येतो की, ‘ग्लोब’च्या वाचकांपैकी ५३ टक्के हे कॅथलिक्स आहेत. या एका वाक्यावरून इथल्या लोकसंख्येत असलेलं कॅथलिक्सचं प्रमाण आणि त्यांचा सुप्त दबाव लक्षात येऊ शकतो.) 

या प्रकरणाची चौकशी करत असताना ‘स्पॉटलाईट’ टीमच्या लक्षात येतं की, बॉस्टनमधील चर्चमध्ये घडत असलेल्या लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना या अशाच उघड गुपितांपैकी एक होत्या. अशा घटना घडत आहेत हे तर सर्वांना माहीत आहेच, पण सोबतच अनेक लोक हे प्रकरण गुप्त राहील यादृष्टीने कार्यरत आहेत. शोषणाचे बळी ठरलेल्या अनेक लोकांनी यापूर्वी इतर वृत्तपत्रांसोबतच खुद्द ‘द बॉस्टन ग्लोब’शी संपर्क साधूनही व्यवस्थापनाच्या आणि चर्चच्या दबावामुळे हे प्रकरण कधीच चर्चिलं गेलं नसल्याचं त्यांच्या लक्षात येतं. 

हे प्रकरण आणि अवघं शहर लपवू पाहत असलेली ही गुपितं उघडकीस आणण्यात बाललैंगिक शोषणाचे बळी ठरलेल्या अनेक व्यक्तींचं वकीलपत्र घेतलेला मिचेल गॅराबेडियन (स्टॅन्ली टुशी) महत्त्वाची भूमिका बजावतो. बॅरन प्रमाणेच बॉस्टन शहरात उपरा आणि तिऱ्हाईत असलेला गॅराबेडियन चित्रपटात एके ठिकाणी एक वाक्य म्हणतो, “इफ इट टेक्स अ व्हिलेज टू रेज अ चाइल्ड, इट टेक्स अ व्हिलेज टू अब्युज वन”. शहरातील नागरिक सामूहिकरीत्या लपवू पाहत असलेल्या या प्रकरणाचं गांभीर्य हे वाक्य अचूकपणे अधोरेखित करतं. 

 

 

चित्रपट, सत्याचा मागोवा आणि स्वायत्त माध्यमव्यवस्थेची गरज

शोध पत्रकारितेभोवती फिरणारे बरेचसे चित्रपट अमेरिकेत निर्माण झालेले आहेत. ज्यात ‘ऑल द प्रेसिडेंट्स मेन’पासून (१९७६) ते ‘किल द मेसेंजर’पर्यंत (२०१४) बऱ्याचशा चित्रपटांचा समावेश होतो. ‘स्पॉटलाईट’ पाहत असताना ‘ऑल द प्रेसिडेंट्स मेन’ची प्रकर्षाने आठवण होणं तर तसं स्वाभाविक आहे. हा चित्रपट ज्या प्रकरणामुळे निक्सनला त्याचं राष्ट्राध्यक्षपदावर पाणी सोडावं लागलं होतं अशा वॉटरगेट प्रकरणावर आधारित होता. या चित्रपटात वॉटरगेट प्रकरणाचा पाठपुरावा करत सत्य उघडकीस आणू पाहणारे पत्रकार दिसले होते. अर्थात त्या चित्रपटाला पत्रकारितेसोबतच राजकीय थरारपटाचंही स्वरूप होतं. 

जॉश सिंगर आणि दिग्दर्शक टॉम मॅकार्थीने लिहिलेल्या ‘स्पॉटलाईट’चा भर बाल लैंगिक शोषणाचं प्रकरण आणि चर्च यांचा संबंध उघडकीस आणत असताना घडलेल्या शोध पत्रकारितेचं दर्शन घडवून आणण्यावर अधिक आहे. त्यामुळे या प्रकरणानंतरच्या न्यायलयीन कामकाज आणि सामाजिक-राजकीय उलथापालथीपेक्षा प्रत्यक्ष पत्रकारितेला जास्त महत्त्व आहे. शिवाय, चित्रपट बॉस्टनमधील सामाजिक परिस्थिती आणि समाजावर धर्मसंस्थेचा असलेला पगडा यांनाही विचारात घेतो. माध्यम व्यवस्थेसारख्या स्वायत्त असणं अपेक्षित असलेल्या संस्थेपासून ते न्यायसंस्थेपर्यंत सर्वच नागरी संस्थांच्या कामकाजावर प्रभाव टाकणारी आणि करडी नजर ठेवणारी धर्मसंस्था इथे अस्तित्त्वात असल्याचं दिसतं. ज्यामुळे समाजाला आणि लोकांना असलेली धर्मसंस्थेची असलेली (तथाकथित) गरज आणि तिच्यातच लोकहित दडलेलं आहे हा समज निर्माण होतो. हा समज आणि पर्यायाने लोकहिताच्या दृष्टीने धर्मसंस्थेच्या (इथे अर्थ: कॅथलिक चर्च आणि व्हॅटिकन) व्यवस्थापनातील चुका सोयीस्कररीत्या दुर्लक्षित कराव्यात अशी अपेक्षा निर्माण होते. बॉस्टनमध्ये नेमक्या या अपेक्षेच्या पूर्ततेपोटी शहरातील बहुतांशी लोक आपापल्या परीने कॅथलिक चर्चला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. 

‘स्पॉटलाईट’ टीमचं नेतृत्त्व करणारा वॉल्टर रॉबिन्सन (मायकल कीटन) आणि ग्लोबच्या संपादकांपैकी एक असलेला बेन ब्रॅडली ज्युनियर (जॉन स्लॅटरी) यांच्या देखरेखीखाली हा तपास सुरु असतो. तर, मायकल रिझेन्डस (मार्क रफेलो), साशा फायफर (रेचल मॅकअॅडम्स) आणि मॅट कॅरल (ब्रायन डी’आर्सी जेम्स) हे या विभागातील इतर पत्रकार असतात. वॉल्टर आणि बेन हे बॉस्टनमध्येच वाढलेले आहेत. त्यामुळे या पात्रांच्या, विशेषतः वॉल्टरमुळे ‘बॉस्टनच्या भल्यासाठी’ आणि ‘अ फ्यू बॅड अॅपल्स’ असं म्हणत हे प्रकरण वेळोवेळी कसं दाबलं गेलं हे दिसून येतं. गेली कित्येक वर्षं ग्लोबमध्ये कार्यरत असलेल्या या दोघांना व्यवस्थापनातील अदृश्य दबावापोटी या प्रकरणाचा वेळीच तपास घडला नाही, ही गोष्ट छळते. त्या अर्थी (काहीसा आशादायक शेवट वगळता) संपूर्ण ‘स्पॉटलाईट’मध्ये एका विशिष्ट अशा खिन्नतेचं अस्तित्त्व आहे. ही खिन्नता - सगळं दिसत असूनही आपण काहीच करू शकत नाही आणि यापूर्वी आपल्या जागी असलेल्या इतरांनाही काहीच केलं नाही - या दुहेरी हतबलतेतून आलेली आहे. ही खिन्नता जितकी इथल्या अभिनेत्यांच्या कामगिरीतून दिसते, तितकीच हॉवर्ड शोअरच्या संगीतातून येते. 

उमेश कुलकणी दिग्दर्शित ‘देऊळ’मध्ये (२०११) स्वतःच्या आणि पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी भाऊ गलांडे (नाना पाटेकर) गावात देऊळ बांधण्याच्या प्रस्तावाचं समर्थन करताना एक इंटरेस्टिंग वाक्य म्हणतो - “विकासाचं राजकारण करताना अध्यात्माची बैठक पक्की पाहिजे”. बॉस्टनमध्ये चर्चमधील धर्मगुरूंनी केलेल्या बाल लैंगिक शोषणाचं प्रकरण गुप्त राहिलं पाहिजे यासाठी अविरतपणे कार्यरत असणाऱ्या लोकांचं मतही काहीसं याचं प्रकारचं आहे. एक जण वॉल्टरला सुनावतो, “पीपल नीड द चर्च मोअर दॅन एव्हर राईट नाऊ”. आधी उल्लेख केल्याप्रमाणे, चर्चला वाचवणं म्हणजे कॅथलिक धर्माचं रक्षण करणं आणि पर्यायाने लोकांच्या श्रद्धेचं आणि त्यांच्या हिताचं रक्षण करणं, असा सोयीस्कर प्रतिवाद केला जातो. 

 

 

‘स्पॉटलाईट’मध्ये वॉल्टर आणि मायकल हे दोघे दोनदा कुणा ना कुणाला तरी “यू वाना बी ऑन द राईट साईड ऑफ धिस” असं सांगतात. त्यांच्याकरिता परिणामांची चिंता न करता लहान मुलांचं लैंगिक शोषण करणाऱ्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या धर्मसंस्थेला जाब विचारणं ही योग्य बाजू असते. तर, त्यांच्यासमोरील व्यक्तींकरिता धर्मसंस्थेला वाचवणं ही योग्य बाजू असते. त्यामुळेच चित्रपट इथल्या पत्रकारांप्रमाणेच कुणा एका व्यक्तीवर लक्ष केंद्रित न करता एका सबंध व्यवस्थेच्या नैतिक पडझडीला विचारात घेताना दिसतो. ज्यामुळे इथल्या भाष्याचा आवाका विस्तारला जातो, आणि अतिरेकी नाट्य नसूनही कथानकाचं उत्कंठावर्धक असणं अबाधित राहतं. 

त्यामुळेच एका प्रसंगात ‘ग्लोब’ने भूतकाळात या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा उल्लेख केल्याचं सांगितल्यानंतर वॉल्टर आणि बेनमध्ये यात चूक कुणाची होती यावरून शाब्दिक द्वंद्व सुरु होतं. ज्यावर संपादक बॅरन म्हणतो, “समटाइम्स इट्स इझी टू फर्गेट दॅट वुई स्पेन्ड मोस्ट ऑफ द टाइम स्टम्बलिंग अराऊन्ड इन द डार्क. सडनली अ लाईट गेट्स टर्न्ड ऑन, अँड देअर्स अ फेअर शेअर ऑफ ब्लेम टू गो अराऊन्ड.” तोपर्यंत वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये या लैंगिक शोषणाच्या घटना उघड गुपित असण्याबाबत आणि असं असूनही कुणीच काही न केल्याबाबत अनेकदा बोललं गेलेलं असतं. अशावेळी बॅरनचं हे वाक्य महत्त्वाचं ठरतं. कारण, त्याआधीच्याच दृश्यात जिम सलिव्हन (जेमी शेरिडन) वॉल्टरला म्हणालेला असतो, “वुई ऑल न्यू दॅट समथिंग वॉज गोइन्ग ऑन. सो व्हेअर वेअर यू?” ज्यावर वॉल्टरकडे काहीच उत्तर नसतं. त्यामुळे कुणी काही केलं किंवा काय केलं नाही यापेक्षा आपण आता याघडीला काही करू शकतो का, हे अधिक महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जातं. 

चित्रपटाच्या सुरुवातीला कार्डिनल लॉ हा धर्मगुरु बॅरनला धर्मसंस्था आणि माध्यमव्यवस्था या दोन व्यवस्थांनी एकत्र येऊन काम केल्यास ते शहराच्या (नि समाजाच्या) हिताचं असल्याचं सांगतो. ज्यावर बॅरन म्हणतो, “पर्सनली आय अॅम ऑफ द ओपिनियन दॅट फॉर अ पेपर टू बेस्ट परफॉर्म इट्स फंक्शन, इट रिअली नीड्स टू स्टॅन्ड अलोन.” माध्यम व्यवस्थेनं स्वायत्तपणे काम करण्याची गरज का आहे, ते इथे अगदी अचूकपणे येतं. समकालीन (मुख्य प्रवाहातील) माध्यमव्यवस्था आणि न्यायव्यवस्था या धर्मसंस्था आणि शासनाशी असलेली बांधिलकी जपण्यात व्यस्त असताना बॅरनच्या या वाक्याचं महत्त्व अधिकच वाढलं आहे.