Quick Reads

‘लिव्हिंग’ ट्रिलजी: माणूस असण्याचा अर्थ शोधणारा रॉय अँडरसनचा सिनेमा

स्पॉटलाईट सदर

Credit : Studio 24 & Roy Andersson Production

रॉय अँडरसन हा सध्या युरोपातील सर्वाधिक महत्त्वाच्या दिग्दर्शकांपैकी एक समजला जातो. त्याला या रांगेत बसवण्यात त्याच्या ‘लिव्हिंग' चित्रत्रयीचा मोठा वाटा आहे. त्याचे चित्रपट अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म घटकांना विचारात घेत निर्माण केलेले असतात. त्याचे चित्रपट हे समकालीन दिग्दर्शकांहून सर्वस्वी भिन्न आणि अभिनव शैली असलेले आहेत. प्रेक्षकाच्या मनात वैचारिक मंथन घडवून आणणारे आहेत. 

‘सॉंग्ज फ्रॉम द सेकंड फ्लोअर’ (२००२), ‘यू, द लिव्हिंग’ (२००९) आणि ‘अ पिजन सॅट ऑन अ ब्रान्च रिफ्लेक्टिंग ऑन एक्झिस्टन्स’ (२०१४) हे रॉय अँडरसन या लेखक-दिग्दर्शकाच्या ‘लिव्हिंग' चित्रत्रयी मधील तीन चित्रपट आहेत. या तिन्ही चित्रपटांमध्ये निस्तेज, फिकट नि शुष्क रंगांच्या सेट पीसेसचा वापर केला जातो. अगदी रुक्ष अशा वातावरणात आणि विश्वात जगणारी त्याची पात्रं तितकीच शुष्क आणि नीरस भासतात. तो या चित्रत्रयीला ‘अ ट्रिलजी अबाऊट बीइंग अ ह्युमन बीइंग’ असं म्हणतो. आणि खरं सांगायचं झाल्यास, अँडरसनच्या चित्रपटांमधील माणसं म्हणजे मानवी आयुष्यातील शोकांतिकांचे सर्वस्वी प्रभावी नमुने असतात. 

या चित्रत्रयीतील चित्रपटांची रचना अशी की, त्यांमध्ये पात्रांच्या विशिष्ट संचाला समोर ठेवत पारंपारिक तऱ्हेची कथा सांगितली जात नाही. या तिन्ही चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या सेल्फ-कन्टेन्ड स्केचेसचा समावेश होतो. अगदी या चित्रत्रयीचा भाग नसलेल्या त्याच्या ‘अबाऊट एंडलेसनेस’ (२०१९) या चित्रपटाची रचनाही अशाच तऱ्हेची आहे. या चित्रपटांमध्ये क्वचित काहीएक पात्रं वारंवार समोर येतात, पण तितकंच. कारण, इतरवेळी प्रत्येक दृश्यात नवीन पात्रं समोर येतात नि त्यांचा एकमेकांशी संबंध असेलच असं नाही. असं असूनही कान, वेनिस अशा महत्त्वाच्या महोत्सवातील मानाचे पुरस्कार, ऑस्कर नामांकनं मिळवणारे त्याचे चित्रपट प्रभावी ठरतात ते त्यातील आशय आणि संकल्पनात्मक मांडणीमुळे. या तिन्ही चित्रपटांतील भिन्न अशा दृश्यांची मांडणी आशयाच्या पातळीवर इतक्या परिणामकारकरीत्या केली जाते की एकसंध कथानकाचा अभावच या चित्रपटांचं मोठं वैशिष्ट्य ठरतं. ज्याद्वारे एकमेकांना पूरक अशा तुकड्यांचा अप्रतिम कोलाज पहावयास मिळतो. 

 

सॉंग्ज फ्रॉम द सेकंड फ्लोअरमधील (२००२) एक दृश्य 

 

या चित्रत्रयीतील चित्रपटांमध्ये काही समान संकल्पना आहेत. भांडवलशाही समाज आणि त्यानिमित्ताने झालेला नीतीमूल्यांचा ऱ्हास, मानवी आयुष्यातील दुःख, तीव्र चिंता, नैराश्य, एकटेपणा आणि अस्वस्थता, हुकूमशाही सरकारं नि युद्धावर केलेली टीका हे मुद्दे त्याच्या चित्रपटांत वारंवार दिसून येतात. आधुनिक समाज आणि अर्थव्यवस्थेचा पाडाव होण्याच्या शक्यता आणि स्वीडनमधील सामाजिक, राजकीय परिस्थितीवरील भाष्यचाही समावेश यात होतो. मानवी समाज हा त्या त्या राष्ट्रांतील सरकारांसोबत धर्माच्या जोखडात अडकलेला असल्याचं दिसतं. ‘सॉंग्ज फ्रॉम द सेकंड फ्लोअर’मध्ये ख्रिश्चन धर्माकडे तिरकस दृष्टिकोनातून पाहिलं जातं. हे सारे प्रश्न त्याच्या चित्रपटांतील पात्रांना भेडसावत राहतात, अस्वस्थ करतात. त्यात अस्तित्त्ववादी प्रश्न आणि निराशावादी दृष्टिकोन कायमच सोबतीला असतो. आपल्या सभोवतालाला, सामाजिक, आर्थिक परिस्थितीला ती कंटाळलेली असतात. अनेकदा त्यांचा एकटेपणा त्यांना खायला उठतो. त्यामुळे ती कायम कुणा जोडीदाराच्या शोधात असतात किंवा मग काही वेळा आपण आपल्या जोडीदारापासून दूर जात आहोत/गेलो आहोत या जाणिवेने त्रस्त तरी असतात. 

एक पात्र म्हणते, “मला मी एकटं नि एकाकी आयुष्य जगतच मरेन अशी भीती वाटते.” एकविसाव्या शतकातील अनेकांना हा प्रश्न सतावत असतो. यातूनच ही पात्रं अनेकदा थेट कॅमेऱ्यात पाहत संवाद साधतात. एका अर्थी स्वगतामधून आयुष्याविषयीची, जगाविषयीची तक्रार मांडतात. ती अनेकदा अचानक अनोळखी व्यक्तींशी संवादाला सुरुवात करतात. बारमध्ये बसून मद्यप्राशन करत असताना बहुधा सगळेच लोक एकमेकांना जवळचे वाटत असावेत. मग पुन्हा हेही येतं की, शेवटी ही सारीच पात्रं दुःख आणि उद्विग्नतेची शिकार आहेत. याखेरीज स्वतःचा, आणि स्वतःसोबत जगाचा, जगातील इतरांचा धिक्कार करणारी पात्रंही या चित्रत्रयीत दिसतात. 

 

यू, द लिव्हिंगमधील (२००९) एक दृश्य 

 

अर्थात, इथल्या पात्रांच्या याच दृष्टिकोनातून आणि त्याद्वारे त्यांनी केलेल्या कृतींमधून विनोदाची निर्मिती होते. आता, आपले रुग्ण इलाज करण्याच्या नि आनंदी असण्याच्या लायक आहेत की नाहीत असा प्रश्न पडणाऱ्या मनोचिकित्सकाचं स्वगत ही संकल्पनाच किती विचित्र, तरी मनोरंजक वाटते हे पहावं. अशा अॅब्सर्ड संकल्पना आणि दृश्यंही अँडरसनच्या शैलीचा एक भाग आहेत. एका अर्थी फार्सिकल ठरणाऱ्या दृश्यांमधून त्याच्या चित्रपटातील विनोद निर्माण होतो. शिवाय, हे करताना तो फार्स, अॅब्सर्डिटी आणि कारुण्य, नैराश्य या अगदी भिन्न प्रकारच्या संकल्पनांचं एकत्रीकरण ज्या प्रकारे करतो तेही पाहावंसं ठरतं. या सगळ्या प्रकारात एक विलक्षण तटस्थपणा आणि निर्विकारपणा आहे. 

अँडरसनच्या सर्वच चित्रपटांची अगदी एकसारखी आणि विशिष्ट प्रकारची दृश्य शैली आहे. वेस अँडरसन या अमेरिकन चित्रपटकर्त्याच्या चित्रपटांतील सममिती आणि भडक रंगसंगतीचा वापर करणारे असतात. दृश्य आणि आशयाच्या पातळीवर रॉय अँडरसनचे चित्रपट याच्या अगदी उलट असतात. निस्तेज सेट पिसेससोबत पात्रांचे पोशाखही तितकेच फिकट रंगाचे असतात. प्रत्येक दृश्यात स्टॅटिक शॉट्सचा वापर केला जातो. कॅमेरा कसल्याही प्रकारची हालचाल करत नाही. बहुतांशी दृश्यं ही मिडीयम किंवा लॉंग शॉट्सचा वापर करून चित्रित केलेली असतात. या गोष्टींमुळे त्याच्या चित्रपटांना विशिष्ट स्थितप्रज्ञ बैठक प्राप्त होते. मुख्यतः लॉंग शॉट्सचा वापर केला गेल्याने एकाच दृश्यचौकटीत (फ्रेम) अनेक पात्रांचा समावेश केला जातो, नि प्रत्येक पात्र काहीतरी कृती करत असल्याने त्यात एक संयत जिवंतपणा जाणवतो. कुठलं पात्र कुठे उभं/बसलेलं असेल याची आखणीही त्याच्या दृश्यचौकटींकडे आवर्जून लक्ष पुरवावीशी बनवते. 

रॉय अँडरसनच्या चित्रपटांतील पात्रांचं एकटेपण, त्याच्या दृश्यचौकटींमध्ये प्रतिबिंबित होणारी खिन्नता, एकूणच मानवता आणि जगण्यातील हरपलेला आशावाद हे सगळं एडवर्ड हॉपर या चित्रकाराच्या कामाशी प्रचंड समानता दर्शवतं. एका खोलीत असूनही एकमेकांशी न बोलणारी माणसं, हरवलेला संवाद आणि त्यानिमित्ताने दर्शन होणारं नात्यांचं अवघडलेपण, अनेकदा पात्राच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारच्या भावनेचा लवलेश नसणं या गोष्टी हॉपरची चित्रं आणि अँडरसनचे चित्रपट अशा दोन्ही ठिकाणी समप्रमाणात आढळतात. किंवा पात्रंच कशाला, अगदी हॉपरच्या चित्रांतील सभोवताल आणि अँडरसनच्या चित्रपटांतील सेट पिसेस यांतही हे साम्य दिसून येतं. 

 

अ पिजन सॅट ऑन अ ब्रान्च रिफ्लेक्टिंग ऑन एक्झिस्टन्समधील एक दृश्य 

 

अभिनेत्यांचे क्लोज-अप्स कटाक्षाने टाळणारा रॉय अँडरसन त्याच्या चित्रपटांतील लॉंग टेक्सबाबत म्हणतो की, क्लोज-अप्समुळे अभिनेते आणि पात्रं दोन्हीही कृत्रिम वाटतात. चित्रपट हे खऱ्या आयुष्यासारखे भासायला हवेत. क्लोज-अप्स टाळणं आणि लॉंग टेक्सचा वापर करणं यामुळे मला चित्रपटांचं हे असं कृत्रिम भासणं टाळता येतं. शिवाय, त्यामुळे मी माझ्या चित्रपटांतील स्पेसेसचा आणि सेट्सचा पुरेपूर वापर करू शकतो. ज्यामुळे ‘आय अॅम ट्राइंग टू शो व्हॉट इट्स लाइक टू बी ह्युमन’ या त्याच्या म्हणण्यावर खरं उतरणं त्याला जमतं. 

रॉय अँडरसनचे चित्रपट हे आवडून घ्यायचा अट्टाहास न करता पहायला हवेत. कारण, आपल्याला आवडेल, पटेल नि रुचेल ते पाहण्याच्या, अनुभवण्याच्या अट्टाहासापायी एका कुशल चित्रपटकर्त्याचे चित्रपट चुकवण्यात अर्थ नाही.