Quick Reads

फिर भी दिल हैं हिंदुस्थानी’ आणि ‘पीपली लाइव्ह’: प्रसारमाध्यमांसंबंधित भाकितं आणि भाष्यं

स्पॉटलाईट सदर

Credit : Indie Journal

वर्तमानातील प्रसारमाध्यमांनी नीतीशास्त्राला दिलेला फाटा आणि त्यामुळे झालेला नैतिक मूल्यांचा ऱ्हास याबाबत बरीच चर्चा घडून आलेली आहे. वादविवादाच्या नावाखाली आरडाओरड आणि गोंधळ घातला जाणं, मीडिया ट्रायल, २४ तास चालणाऱ्या चॅनल्ससाठी सातत्याने बातम्यांचा शोध घेत राहणं, इत्यादी बऱ्याच मुद्द्यांच्या निमित्ताने हे चर्वितचर्वण घडू आलं आहे. इंटरेस्टिंग बाब अशी की, २००० साली आलेला अझीझ मिर्झा दिग्दर्शित ‘फिर भी दिल हैं हिंदुस्थानी’ आणि २०१० सालचा अनुषा रिझ्वी दिग्दर्शित ‘पीपली लाइव्ह’ या दोन चित्रपटांनी प्रसारमाध्यमांसंबंधित बरीचशी भाकितं आणि भाष्यं करून ठेवली आहेत. त्यामुळेच आता या दोन चित्रपटांकडे पुन्हा एकदा पाहणं आणि त्यांच्यात मांडल्या गेलेल्या कालातीत संकल्पनांचा विचार करणं गरजेचं बनलेलं आहे. 

 

‘फिर भी दिल हैं हिंदुस्थानी’, माध्यमांमधील स्पर्धा आणि नैतिक मूल्यांचा ऱ्हास: 

‘फिर भी दिल हैं हिंदुस्थानी’ची सुरुवातच होते ती मुळी दोन न्यूज चॅनल्समधील स्पर्धेने. अजय बक्षी (शाहरुख खान) हा एका प्रतिष्ठित न्यूज चॅनलमधील स्टार रिपोर्टर असतो. तो अतिशयोक्तीपूर्ण सादरीकरण, गोंधळ आणि आरडाओरड्यावर भर देणाऱ्या न्यूज अँकर्सचं (पत्रकार नव्हे!) प्रतिनिधित्व करतो. त्याला मिळालेलं यश, त्याच्याभोवती असलेलं प्रसिद्धीचं वलय या सगळ्याचा परिणाम असा होतो की, इतर न्यूज चॅनल्स सुद्धा त्याच्या ‘ब्रँड’च्या अँकरिंगची नक्कल करण्याचा प्रयत्न करू लागतात. याच स्पर्धेतून बक्षीच्या चॅनलचा मुख्य प्रतिस्पर्धी असलेला चॅनल रिया बॅनर्जीला (जुही चावला) नोकरीवर ठेवतो, आणि इथल्या स्पर्धेला सुरुवात होते. ‘टार्गेट रेटिंग पॉईंट’च्या (टीआरपी) स्पर्धेपायी बातम्या पेरणं, खोट्या बातम्या सांगणं किंवा सोयीस्कर कथन करत बातम्या सादर करणं, यासारख्या घटना घडू लागतात. पत्रकार आणि चॅनल्सचा चेहरा, ‘स्टार ठरणारे’ न्यूज अँकर या दोन वेगळ्या वेगळ्या संकल्पना कशा आहेत, याचं उदाहरण म्हणून याकडे पाहता येऊ शकतं. 

 

 

राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी प्रसारमाध्यमांचा सोयीस्कर वापर कशा प्रकारे करून घेतात, तेही इथे सविस्तरपणे येतं. दरम्यानच्या काळात मोहन जोशी (परेश रावल) या पात्रावर एका मंत्र्याच्या मेहुण्याच्या खुनाचा ठपका ठेवण्यात येतो. इतकंच नव्हे, तर सगळे न्यूज चॅनल्स मिळून या व्यक्तीला दहशतवादी ठरवून मोकळे झालेले असतात. त्या निमित्ताने मीडिया ट्रायल हा मुद्दा इथे येतो. ज्यात ‘इनोसंट अनटिल प्रुव्हन गिल्टी’ या गृहितकाला छेद देत खुद्द प्रसारमाध्यमंच आरोपीला गुन्हेगार ठरवून मोकळे होतात. आरोपीच्या घटनात्मक आणि मानवी हक्कांची पायमल्ली केली जाते. 

सगळ्या प्रकरणाला भावनिकरीत्या प्रतिसाद देत मोहन जोशीला जाहीररीत्या फाशी देण्याचा आणि न्यूज चॅनल्सवर त्याचं थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यानिमित्ताने कायदेशीर प्रकरणातील प्रसारमाध्यमांचा हस्तक्षेप आणि त्याच्या दुष्परिणामांचे चित्रण इथे होते. माध्यमांना चांगल्या रेटिंग्ज मिळवण्याच्या कल्पनेने इतकं पछाडलेलं असतं की, फाशीचं थेट प्रक्षेपण करण्याची योजना, मोहन जोशीला स्पॉन्सर कंपन्यांचे लोगोज असलेला कैद्याचा पोशाख घालायला लावणं अशा बऱ्याचशा आक्षेपार्ह गोष्टी घडतात. ‘फिर भी दिल हैं हिंदुस्थानी’ तसा रॉम-कॉम असला तरी इथे प्रसारमाध्यमं, त्यांचं टीआरपीपायी वेडंपिसं होणं, खाजगीकरण या गोष्टींवर टीका केली जाते. चित्रपट येऊन वीस वर्षं झाली असली तरी त्यात केलेलं भाष्य आणि भाकितं आता आपल्या वर्तमानात सत्यात उतरल्याचं दिसत आहे. 

 

‘पीपली लाइव्ह’ आणि ‘द ग्रेट इंडियन न्यूज सर्कस’

‘पीपली लाइव्ह’मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जागतिकीकरण, प्रसारमाध्यमांची ढासळलेली मूल्यं, देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि महागाईच्या समस्या, इत्यादी बरेचसे गंभीर मुद्दे येत असले तरी चित्रपट मुख्यत्वे वर्तमानावरील व्यंग म्हणून काम करतो. इथे घडणाऱ्या घटनांकडे उपहासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. ज्याला बिनडोक, हास्यास्पद संकल्पना सत्यात उतरण्याचं स्वरूप प्राप्त होतं. मुख्य प्रदेश या भारतातील काल्पनिक राज्यातील नाथा दास (ओमकार दास माणिकपुरी) आणि बुधिया माणिकपुरी (रघुबीर यादव) हे दोघे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले शेतकरी भाऊ गावातील बडे प्रस्थ असलेल्या राजकारण्याकडून मदत मागायला जातात. तेव्हा त्यांना आत्महत्या करून सरकारकडून पैसे मिळवा, असा सल्ला दिला जातो. ते दोघेही हा सल्ला गंभीरपणे घेत त्यांच्यातील नाथा आत्महत्या करेल असं ठरवतात. इथूनच चित्रपटाच्या विक्षिप्त विनोदाची सुरुवात होते. 

राज्यात येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे सगळीकडे निवडणुकांची तयारी सुरु असते. एकीकडे जल्लोष आणि पैश्याची वारेमाप उधळण सुरु असताना दुसरीकडे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले लोक असा विरोधाभास पाहायला मिळतो. दरम्यान राकेश (नवाजुद्दिन सिद्दिकी) हा स्थानिक पत्रकार नाथाच्या आत्महत्येच्या घोषणेवर एक बातमी करतो. जी वाचून तिथला जिल्हा दंडाधिकारी लाल बहादूर शास्त्रींचं नाव दिलेल्या योजनेअंतर्गत नाथाला एक हातपंप देऊन या प्रकरणावर पडदा टाकू पाहतो. मात्र, लवकरच ‘आयटीव्हीएन’ या राष्ट्रीय न्यूज चॅनलमधील एक अँकर, नंदिता मलिक (मलायका शेनॉय) ही बातमी तिच्या चॅनलवर चालवते. ज्यानंतर ही खळबळजनक बातमी राष्ट्रीय मुद्दा बनते आणि सगळे राष्ट्रीय न्यूज चॅनल्स नाथाच्या घरासमोर कॅमेरे लावून बसतात. त्याच्या घराशेजारी जत्रेला सुरुवात होते नि अगदी शौचास जात असलेल्या नाथाच्या मागेही कॅमेरामन आणि अँकर्स पळू लागतात. नाथा-बुधियाकडे दुर्लक्ष करणारे राजकारणीदेखील आता त्यांना महत्त्व प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या घरी हजेरी लावून जातात. नाथाला न्यूज चॅनल्सपासून वाचण्यासाठी म्हणून पोलिसांची सुरक्षा घेण्याची गरज भासते. भारतातील एका छोट्याशा गावातील एक कुटुंब सर्व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या चर्चांच्या केंद्रस्थानी येतं. 

 

 

‘टाइम्स’मध्ये ‘द ग्रेट इंडियन ट्रॅजेडी’ म्हणवल्या गेलेल्या या घटनेला प्रत्यक्ष देशात मात्र ‘द ग्रेट इंडियन न्यूज सर्कस’चं स्वरूप प्राप्त होतं. जिथून सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली ते मुद्दे बाजूला पडून इतर मुद्दे चर्चिले जातात. राजकारण आणि येऊ घातलेल्या निवडणुकांपायी एक न झालेली आत्महत्या सगळ्या कथनांच्या केंद्रस्थानी येते. ‘फिर भी दिल हैं हिंदुस्थानी’प्रमाणे इथेदेखील न्यूज चॅनल्समधील स्पर्धा हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. प्राइम-टाइमला बातम्यांच्या आणि वादविवादांच्या जागी सेलिब्रिटीजच्या खाजगी आयुष्यावरील चर्चासत्रं आयोजित केले जातात. चॅनलचे संपादक सेलिब्रिटीच्या जीवनासंबंधीच्या बातम्या लावून कसा प्रतिस्पर्धी चॅनलहून अधिक टीआरपी मिळवता येईल याच्या योजना आखत असतात. ‘नाथा आत्महत्या करेल की नाही?’ या संबंधित पोल्स घेतले जातात. त्याने आत्महत्या करायलाच हवी, अशी मतं मांडली जातात. एका प्रतिष्ठित चॅनलचा फिल्डवरील पत्रकार नाथाने केलेल्या विष्ठेच्या रंगावरून त्याचं मनोविश्लेषण करत असतो. अतर्क्य म्हणाव्याशा सगळ्या घटना घडत असतात. देशातील गंभीर प्रश्नांऐवजी वैयक्तिक समस्यांना अधिक महत्त्व प्राप्त होतं. सगळ्या प्रकाराला खऱ्या अर्थाने सर्कशीचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं. 

 

रील आणि रिअल लाइफमधील साम्य 

‘फिर भी दिल हैं हिंदुस्थानी’ आणि ‘पीपली लाइव्ह’ दोन्हींमधील तेव्हाच्या दृष्टीने अतिशयोक्तीपूर्ण वाटणाऱ्या घटना सत्यात उतरल्याचं आपण पाहिलं आहे. ‘पीपली लाइव्ह’मधील विष्ठेच्या रंगावरून मनोविश्लेषण करू पाहणारा पत्रकार (?) आणि श्रीदेवीच्या मृत्यूनंतर बाथटबमध्ये बसून रिपोर्टिंग करणारे राष्ट्रीय न्यूज चॅनलवरील अँकर्स यात काही फरक आहे, असं मला तरी वाटत नाही. किंवा ‘फिर भी दिल हैं हिंदुस्थानी’मध्ये फाशीचं थेट प्रक्षेपण करू पाहणारी प्रसारमाध्यमं आणि सुशांत सिंग राजपूतच्या मृतदेहाची छायाचित्रं दाखवणारी प्रसारमाध्यमं यातही फारसा फरक नाही. आपली प्रसारमाध्यमं अशा ठिकाणी येऊन पोचली आहेत की, प्रसारमाध्यमांचं उपहासात्मक, व्यंगात्मक नि अतिशयोक्तीपूर्ण चित्रण करणाऱ्या चित्रपटातील दृश्यं खऱ्या आयुष्यात पाहायला मिळत आहेत. आणि खेदाची बाब ही की, एकमेकांकडे बोट दाखवण्याच्या नादात आणि टीआरपीच्या स्पर्धेत रममाण असल्याने आत्मपरीक्षण करण्याइतका वेळ कुणाकडेच नाही.