Quick Reads

नसीर: हे एक समयोचित व्यक्तीचित्रण

स्पॉटलाईट सदर

Credit : Arun Karthick

कुणाचंही व्यक्तिमत्त्व आणि आयुष्य हे अगदी स्वायत्तपणे अस्तित्त्वात नसतं. सभोवताल आणि सभोवतालात घडणाऱ्या घटनांना दिलेला प्रतिसाद व्यक्तिमत्त्वाला आणि परिणामी आयुष्याला आकार प्राप्त करून देतो. कल्पित कलाकृतींमध्ये असलेला जीवनाचा, वास्तवाचा अंश हा अधिक नाट्यमय असण्याची शक्यता असते. प्रत्यक्ष जीवन मात्र तितकं नाट्यमय असतेच असं नाही. एखाद्याच्या जवळपास क्रियाशून्य आयुष्याकडे अतिशयोक्ती टाळून पाहिल्यास ते कसं दिसेल हे चित्रपटांमधून अनेकदा दिसत आलेलं आहे. (अलीकडेच ज्यावर लिहिलं होतं तो ‘भोंसले’देखील अशाच प्रकारचा चित्रपट आहे.) अरुण कार्तिक दिग्दर्शित ‘नसीर’मध्येही शीर्षक पात्राचं असंच काहीसं जीवन दिसतं. नसीरच्या आयुष्याकडे पाहत असताना असा एक दिवस निवडला जातो, जो त्याच्या आयुष्यातील इतर कुठल्याही दिवसाइतकाच सामान्य आहे. ज्यात त्याच्या दिनक्रमातील अगदी लहानसहान कृती अगदी तपशीलवार दिसतात. ज्यातून नसीरचं तपशीलवार व्यक्तीचित्र साकारलं जातं. 

सकाळी मशिदीतून येणाऱ्या आवाजाने नसीरच्या दिवसाची सुरुवात होते. हे आणि असेच इतर आवाज हे त्याच्या सभोवतालाचा एक अविभाज्य घटक बनलेले असल्याने तो त्यांना सरावलेला आहे. ते त्याच्यावर, त्याच्या जीवनावर काहीच प्रभाव टाकत नाहीत. तमिळनाडूतील कोइम्बतुरमध्ये असलेल्या मुस्लिमबहुल भागातील छोटेखानी घरात मशिदीतून येणारे आवाज येत राहतात, तर घराबाहेर पडल्यानंतर हिंदूबहुल भागात हिंदू संस्कृतीला साजेशा गोष्टींच्या चर्चा ऐकू येतात. कुठलातरी राजकीय नेता भारत आणि तमिळनाडूमधील हिंदू संस्कृतीचं पूर्वापार चालत आलेलं अस्तित्त्व, आणि आता गद्दार नि स्थलांतरितांनी या पवित्रभूमीवर केलेल्या आक्रमणाविषयी बोलत असल्याचं ऐकू येतं. तर, या साऱ्या सभोवतालातही नसीर आणि त्याची पत्नी ताज बाजारात असताना तो तिच्यासाठी मोगऱ्याचा गजरा विकत घेताना दिसतो. त्याच्या वावरात एक विलक्षण अशी स्थितप्रज्ञता आहे, सोबतच नाट्यमयतेचा अभाव आहे. ही स्थितप्रज्ञता त्याच्या स्वभावाचा एक भाग आहे. याची प्रचिती येण्यासाठी चहा आणि विड्या पीत असताना स्थिरपणे बसलेला किंवा उभा असलेला नसीर पाहावा. 

वयाच्या चाळीशीतील नसीर हा एका कपड्यांच्या दुकानातील सेल्समन आहे. धर्म, संस्कृती या बाबी त्याच्या सभोवतालात अगदीच ठळकपणे अस्तित्त्वात आहेत. त्यामुळेच दुकानातील मॅनेक्विन्सच्या माथ्यावरही टिकल्या आणि कुंकू लावलेलं दिसतं. तो शहरात फिरतो तेव्हा गणेश चतुर्थीची तयारी चालल्याचं दिसतं. शिवाय, गणपतीवर आपला हक्क सांगण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं दिसतं. एकुणात त्याच्या अवतीभोवती धार्मिक वाद आणि चर्चा घडत असताना तो मात्र त्यापासून अलिप्तपणा बाळगून असतो. बहुधा धर्म ही एक वैयक्तिक बाब आहे, यावर त्याचा विश्वास असावा. इतकी वैयक्तिक की, त्याच्या कार्यक्षेत्रात ती येऊ देणं त्याला उचित वाटत नाही. (आपल्याकडील - तथाकथित - सुशिक्षित लोकांना असं वाटत नाही, हा भाग अलाहिदा.) त्यामुळेच दुकानातील कृष्णाच्या मूर्तीचा जुना हार काढून नवीन हार घालण्यात त्याला काहीच गैर वाटत नाही. याउलट त्याचे सहकारी मात्र मुस्लिमांच्या घरावर कशी दगडफेक करायला हवी याची चर्चा करताना दिसतात. या चर्चा त्याच्यासमोर घडत असल्या तरी त्या जणू त्याच्यासाठी नाहीच, नि तो एक सन्माननीय अपवाद आहे, असं गृहीत धरलं जातं. कारण, दुकानाच्या मालकापासून ते त्याचे इतर सहकारी त्याला ‘भाई’ असंच म्हणतात. हे संबोधन त्याने वयासोबतच खाली मान घालून जगात वावरण्याच्या त्याच्या वृत्तीमुळे कमावलेलं आहे. परिणामी या पार्श्वभूमीवर नसीरच्या जेवणाआधी मशिदीत जाऊन येण्याच्या कृतीतही आक्रमकतेचा लवलेश न दिसता ते इतर कुठल्याही दैनंदिन कामासारखे काम असल्याची सहजता दिसते. 

 

 

नसीरच्या जीवनात धर्मापेक्षा सकाळी इल्लायराजाची गाणी ऐकणं, नंतर ठुमरी नि गझल ऐकणं या कृतींना अधिक महत्त्व असल्याचं दिसतं. सुरुवातीला किचनमध्ये आपल्या पत्नीच्या ओठांवर अलगदपणे आपले ओठ टेकवणाऱ्या नसीरच्या स्वभावातील काव्यात्मकता ही उत्तरोत्तर कळत जाते. जेवण करताना नि त्यानंतर वामकुक्षी घेत असताना तो बेगम अख्तरचं ‘किससे पूछे हमने कहाँ’ ऐकणं पसंत करतो. फोन नि व्हिडिओ कॉल्सच्या विश्वात तो आपल्या पत्नीला बेगम ताज असं संबोधत पत्रं लिहिताना दिसतो. ‘टू द वन वुईथ द सॉफ्टनेस ऑफ अ थाऊजन्ड रोजेस, अँड द रेडियन्स ऑफ अ थाऊजन्ड मून्स’ या आधीच तमिळ भाषेतून इंग्रजीत भाषांतर केलेल्या वाक्यांचं पुन्हा भाषांतर करून त्यातील सहजता घालवावी असं मला वाटत नाही. त्यानंतर पत्रात एकेकाळी तो तिच्यासाठी - ‘शी इज द स्प्रिंग ऑफ सीझन्स. शी इज द जास्मिन ऑफ द रोजेस.’ - अशा अर्थाचं गाणं गायल्याची आठवण करून देतो. नसीरचं कवीमनाचं संवेदनशील व्यक्तिमत्त्व दाखवण्याचं काम ही दृश्यं करतात. खासकरून या दृश्यांच्या आधी त्याच्या सहकाऱ्यांचा प्रेम, संभोग नि आयुष्याकडे पाहण्याचा काहीएक प्रमाणात आक्रमक दृष्टिकोन दिसलेला असताना या अलवार प्रतिमा अधिकच प्रभावी ठरतात. 

एके ठिकाणी नसीरचे सहकारी त्याला त्याची एखादी जुनी कविता म्हणायला लावतात. त्या कवितेच्या शेवटच्या ओळी असतात, ‘व्हॉट एल्स इज लाईफ इफ नॉट लोनलीनेस अँड सायलेन्स?’ या ओळी कमी अधिक फरकाने नसीरच्या आयुष्याला आणि चित्रपटाला अगदी अचूकपणे लागू पडतात. नसीरच्या जीवनातील मौन आणि स्थिरता ही इथली दृश्यं आणि त्यासोबत ऐकू येणाऱ्या आवाजांतून दर्शवली जाते. त्याच्या घरात नि तो काम करत असलेल्या दुकानात ऐकू येणारा घड्याळाचा आवाज असो वा दूर कुठेतरी सुरु असणारी, मात्र स्पष्ट ऐकू येणारी भाषणं असोत, समोरची दृश्यं आणि आवाज यांची केलेली मांडणी ही इथला प्रभाव द्विगुणीत करणारी आहे. त्याच्या चेहऱ्यावर, कपड्यांवर नि कळकट हातांवर, पायांवर रेंगाळणारा कॅमेरा त्याच्या या व्यक्तीचित्राला अधिक उत्कट बनवणारा आहे. भलेही एकाच दिवसांत घडणारा घटनाक्रम असला तरी त्याची मांडणी त्याच्या आयुष्याकडे इतक्या जवळून पाहणारी आहे की, ती खोलवर परिणाम करणारी ठरते. सबंध चित्रपटभर काहीतरी घडवून आणण्याचा प्रयत्न होताना दिसत नसल्याने शेवटाकडील प्रसंग जेव्हा घडतो तेव्हा त्यात एक विलक्षण तीव्रता आणि आक्रमकता जाणवते. आणि त्यानंतर येणारा सायलेन्सदेखील आधीच्या शैलीला साजेसा असाच ठरतो. त्या शेवटच्या चित्रचौकटीचं जाणीवपूर्वक ताणलेलं असणं त्या शेवटाला अधिक अस्वस्थ करणारं बनवतं. 

‘नसीर’ दिलीप कुमारच्या ‘अ क्लर्क्स स्टोरी’ या कथेवर आधारलेला असला तरी सध्याच्या सामाजिक, राजकीय भोवतालात त्याला अधिक महत्त्व प्राप्त होतं. धार्मिक वाद आणि हेवेदावे, धर्म, संस्कृती आणि देवादिकांवर हक्क सांगण्याच्या घटना, इत्यादी गोष्टींमुळे हे एक समयोचित व्यक्तीचित्रण बनतं. जे त्याच्या आशयासोबतच त्याच्या चित्रपटनिर्मितीमधील गुणांमुळेही पाहावंसं ठरतं. 

ता. क.: ‘नसीर’ हा ‘वुई आर वन’ चित्रपट महोत्सवाचा एक भाग असल्याने काहीएक कालावधीकरिता युट्यूबवर उपलब्ध होता. सध्यातरी तो कुठल्याही वैध मार्गांनी पाहता येणं अशक्य आहे. तो सापडो किंवा पाहायला मिळो यासाठी शुभेच्छा.