Quick Reads

मेगामाइंड’ : अस्तित्त्ववादाने ग्रासलेला खलनायक

स्पॉटलाईट सदर

Credit : Dreamworks Animation

स्पॉयलर्स अहेड 

सुपरहिरो चित्रपटांमध्ये नायक-खलनायकातील सततच्या लढाया अॅड्रेनलिन रश निर्माण करण्यासाठी उत्तम असतात. मात्र, अनेकदा पुढे काय असा प्रश्न पडतो. किंबहुना सुपरहिरो चित्रपटच कशाला, तर अगदी ‘टॉम अँड जेरी’, ‘लुनी टून्स’देखील विचारात घेतल्यास तिथेही त्यांच्यातील द्वंद्व संपता संपत नाही. न संपणाऱ्या लढायांचं एक अविरत चक्र सुरु राहतं. त्यामुळेच फॉर अ चेंज म्हणून खलप्रवृत्तीचा विजय दाखवणारा ‘अॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’ (२०१८) आश्चर्याचा धक्का देणारा चित्रपट ठरला होता. सांगायचा मुद्दा असा की, सत्प्रवृत्तीचा विजय आणि दुष्प्रवृतीचा पराजय या चित्रपटातील ठरलेल्या संकल्पना आहेत. अनेकदा ड्रीमवर्क्स अॅनिमेशन स्टुडिओने निर्माण केलेल्या अॅनिमेटेड चित्रपटांत काही इंटरेस्टिंग संकल्पना असतात. ‘मेगामाइंड’ आणि ‘कुंग फु पांडा’ चित्रपट मालिकेतील चित्रपटांत या ठराविक संघर्षाच्या पलीकडे जात सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती या संकल्पनांचा ऊहापोह केला जातो. 

नायक-खलनायकातील अविरत द्वंद्व हा सुपरहिरोपटांमधील तार्किकदृष्ट्या विचार करता खटकणारा मुद्दाच ‘मेगामाइंड’च्या मध्यवर्ती कल्पनेमागील प्रेरणा आहे. साहजिकच इथल्या पात्रांवर आधी बनलेल्या सुपरहिरोपटांचा प्रभाव आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला लढाई सुरु असताना आणि मेगामाइंड (विल फरेल) पराजित होण्याच्या मार्गावर असताना तो इथवर कसा येऊन पोचला याची कथा सांगू लागतो. इथे एक सीक्वेन्स आहे, ज्यात मेगामाइंड आणि त्याचा प्रतिस्पर्धी मेट्रोमॅन (ब्रॅड पिट) यांच्या जन्मापासूनचा त्यांचा प्रवास दाखवला जातो. कुठल्याशा एलिएन जगताचा अंत होत असताना त्यांच्या पालकांनी त्यांना पृथ्वीवर पाठवणं ही गोष्ट साहजिकच ‘सुपरमॅन’पासून येते. ‘सुपरमॅन’, ‘द इन्क्रेडिबल्स’ (२००४), ‘डेस्पिकेबल मी’ (२०१०) या सदर चित्रपटामागील काही स्वाभाविक प्रेरणा आहेत. किंबहुना या प्रेरणा असणं आणि सुपरहिरोपट अभ्यासलेले असल्यामुळे चित्रपटकर्त्यांना त्यांचं विडंबन करणं शक्य होतं. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला मेट्रोमॅन तितक्याच श्रीमंत घरात जाऊन पोचतो, तर मेगामाइंड तुरुंगात. साहजिकच व्यक्तीची जडणघडण आणि सभोवताल त्याच्या विचारांची दिशा ठरवतात. 

 

 

मेट्रोमॅन त्याच्या लहानपणापासूनच लोकांच्या आवडीचा बनतो. तर, मेगामाइंड त्याच्या बाह्यांगामुळे कायमच उपरा ठरतो. अशातच त्याचा चांगुलपणावरील विश्वास उडतो. त्याला प्रश्न पडतो की, दुष्ट बनणं हेच तर माझं विधीलिखित नाही ना? नक्कीच असं असेल, मी दुष्टपणासाठीच जन्मलो आहे! ‘आय वॉज डेस्टिन्ड टू बी अ सुपर व्हिलन’ हे त्याचे शब्द असतात. तो त्या शब्दांना जागतो, आणि मेट्रोसिटी आणि तिचा रक्षणकर्ता मेट्रोमॅन यांच्या नाकी नऊ आणतो. तेव्हापासून त्या दोघांमध्ये सुरु झालेलं युद्ध संपतं ते मेट्रोमॅनच्या मृत्यूनंतर, आणि त्याच्या मृत्यूचं कारण असतो मेगामाइंड. मेट्रोमॅनला हरवण्याचं स्वप्न पाहणारा मेगामाइंड एके दिवशी त्याला हरवतो, मात्र हा विजय सर्वस्वी अनपेक्षित असतो. इतका की, खुद्द मेगामाइंड आणि त्याचा विश्वासू साथीदार मिनियनलाही (डेव्हिड क्रॉस) हे घडलं यावर विश्वास बसत नाही. सगळं शहर दुःखात असताना हे दोघे मात्र आनंदात असतात. 

आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करण्याचा हा आनंद मात्र फार काळ टिकणारा नसतो. मेट्रोमॅनच्या मृत्यूनंतर मेगामाइंडला त्याचं अस्तित्त्वात नसणं खटकू लागतं. मेट्रोमॅननंतर त्याच्या जीवनात एक भयावह पोकळी निर्माण होते. त्याला अस्तित्त्ववादी प्रश्न छळू लागतात. त्याला कळून चुकतं की, मेट्रोमॅनशिवाय त्याच्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. ते दोघेही एकमेकांना पूरक होते. एकाच्या अस्तित्त्वाशिवाय दुसऱ्याला काहीच अर्थ नाही. प्रत्येक नायक-खलनायकाच्या जोडीमध्ये हा संबंध दिसून आलेला आहे. उदाहरणार्थ, ‘द डार्क नाईट’मधील (२००८) इंटरॉगेशन सीनमध्ये जोकर बॅटमॅनला म्हणतो ‘यू कम्प्लीट मी’. चित्रपटात एक दृश्य आहे, ज्यात मेगामाइंड आणि पत्रकार रॉक्झॅन रिची (टिना फे) हे दोघेही एकाच वेळी मेट्रोमॅन म्युझियममध्ये गेलेले असतात. मेट्रोमॅनच्या भव्य पुतळ्यासमोर विरुद्ध बाजूंना उभे असलेले हे दोघे एकमेकांच्या अस्तित्त्वाविषयी अनभिज्ञ असतात. मात्र, दोघांच्या मनातील भावना समान असते, ती म्हणजे त्यांना जाणवणारी मेट्रोमॅनची उणीव. मेगामाइंड म्हणतो, “व्हॉट्स द पॉइंट ऑफ बीइंग बॅड व्हेन देअर्स नो गुड टू ट्राय अँड स्टॉप यू?” सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती यांच्यातील हा परस्परसंबंधच या दोन्ही बाजूंना इंटरेस्टिंग बनवणारा आहे. हा परस्परसंबंध मेगामाइंडला अस्वस्थ करत राहतो. इतका की त्याला एक नामी कल्पना सुचते, ती म्हणजे स्वतःचा प्रतिस्पर्धी निर्माण करण्याची. मेट्रोमॅनचा डीएनए मिळवून त्याच्या शक्ती मिळवून त्या एखाद्या व्यक्तीमध्ये इन्फ्युज करायच्या. जेणेकरून तो ज्याच्याशी लढू शकेल असा तुल्यबळ प्रतिस्पर्धी त्याला मिळेल. ज्याची परिणती रॉक्झॅनचा सहाय्यक, हॅलमध्ये (जोना हिल) मेट्रोमॅनचे सगळे सद्गुण इन्फ्युज होण्यात होते. मेगामाइंड टायटन या त्याच्या प्रतिस्पर्ध्याला जन्माला घालतो.

हॅलला फक्त रॉक्झॅनला मिळवण्यात रस असतो. पण, दुसरीकडे मेगामाइंडदेखील तिच्या प्रेमात पडत असतो. एके ठिकाणी तो मिनियनला म्हणतो, “मेबी आय डोन्ट वाना बी द बॅड गाय एनीमोअर”. आणखी एके ठिकाणी तो म्हणतो, “आय अॅम द बॅड गाय. आय डोन्ट सेव्ह द डे. आय डोन्ट फ्लाय ऑफ इन्टू द सनसेट, अँड आय डोन्ट गेट द गर्ल”. आधी उल्लेख केल्याप्रमाणे, ‘मेगामाइंड’ सुपरहिरोपटांकडून प्रेरणा घेत असताना त्यांचं, त्यांतील क्लिशेजचं विडंबन करतो. चांगल्या नि वाईटातील परस्परसंबंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुरवत असताना ‘मेगामाइंड’ आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट करतो, ती अशी की, रॉक्झॅन आपल्याला मिळणं शक्य नाही हे लक्षात आल्यावर हॅल/टायटन खलप्रवृत्तीमध्ये रुपांतरीत होतो. तर, मेगामाइंड तिच्यावरील प्रेमापोटी एक चांगली व्यक्ती बनू पाहतो. 

लॉर्न बाफ आणि हान्स झिमर या दोघांचा स्कोअर मुळातच व्हिज्युअली इंटरेस्टिंग असलेल्या ‘मेगामाइंड’ला सांगीतिक अर्थानेही रंजक बनवतो. शिवाय, जंकी एक्सएल, मायकल लेविन आणि स्टीव्हन हिल्टनचा साऊंडट्रॅक मेगामाइंड या पात्राच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. इथे वापरलेल्या गाण्यांपैकी ‘एसी/डीसी’ आणि ‘गन्स एन रोजेस’ या बँड्सची गाणी ही त्याच्या स्वभावाला अनुसरून असलेली, मूलतः गडद छटा असलेली आहेत. अगदी गाण्यांतूनही इथे विनोदाची उत्पत्ती कशी होते ते पहावंसं आहे. उदाहरणार्थ, इलेक्ट्रिक लाइट ऑर्केस्ट्राचं ‘मि. ब्ल्यू स्काय’चा रोख मेगामाइंडच्या निळ्या रंगाकडे असतो. शेवटी वाजणारं मायकल जॅक्सनचं ‘बॅड’देखील त्याच्या स्वभावाला अनुसरून असलेलं आहे. 

 

 

बॅटमॅन आणि जोकरमध्ये असलेलं साम्य आणि त्यांचं एकाच नाण्याच्या दोन बाजू असणं हा सर्वश्रुत फिनॉमेनन आहे. मेगामाइंड आणि मेट्रोमॅन यांच्यातील परस्परसंबंध म्हणजे याच साम्याचं एक रूप. शिवाय, हे दोघे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हेही चित्रपटात अधोरेखित होतं. इथे मेगामाइंडचं झालेलं रुपांतर त्याला नायकत्व प्राप्त करून देतं. पुन्हा एकदा भोवताल आणि समोर घडत असलेल्या घटनांना दिलेल्या प्रतिसादातून ती कृती आणि ती करणारी व्यक्ती चांगली आहे की वाईट हे ठरतं. इतकं सगळं वैचारिक मंथन आणि अंडरकरट्स असून ‘मेगामाइंड’ सायमल्टीनिअसली मजेशीरदेखील आहे. त्याच्या प्रेरणा आणि विडंबनं इतकी ऑन पॉइंट आहेत की ‘किंग कॉंग’सारख्या चित्रपटांमध्ये दिसणारा खलनायकाने नायिकेला गगनचुंबी इमारतीवर बांधून ठेवण्याचा प्रसंग इथे आहे. नि गंमत म्हणजे याच्याच पुढच्या वर्षी आलेल्या ‘द अमेझिंग स्पायडर-मॅन’ (२०१२) या सुपरहिरोपटातही असा शेवट दिसतो. 

‘मेगामाइंड’ हा मला कायमच एक रंजक चित्रपट वाटत आलेला आहे. सोबतच त्यातल्या (खल)नायकाचं अस्तित्त्ववादाने ग्रासलं जाणंदेखील चित्रपटातील नायकांकडे पाहण्याचा एक इंटरेस्टिंग दृष्टिकोन आहे.