Quick Reads
द बिग सिक: प्रेम आणि प्रेमासमोरची आव्हानं
स्पॉटलाईट सदर
“To love is to suffer. To avoid suffering one must not love. But then one suffers from not loving. Therefore, to love is to suffer; not to love is to suffer; to suffer is to suffer. To be happy is to love. To be happy, then, is to suffer, but suffering makes one unhappy. Therefore, to be happy one must love or love to suffer or suffer from too much happiness.” वुडी अॅलनच्या ‘लव्ह अँड डेथ’मधील (१९७५) ही वाक्यं प्रेम या संकल्पनेच्या क्लिष्टतेला अचूकपणे शब्दबद्ध करतात. आता वरवर पाहता ‘द बिग सिक’ आणि वुडीच्या चित्रपटातील या वाक्यांचा काही संबंध नसला तरी चित्रपटात एका पॉइंटला पात्रांचं सोबत असणं त्यांच्यासाठी जितकं त्रासदायक बनतं, तितकंच त्यांनी सोबत नसणंदेखील. ‘द बिग सिक’मध्ये ही क्लिष्टता येते कुठून, तर वुडी म्हणतो त्या प्रेम आणि दुःख यांच्यातील परस्परसंबंधांतून.
‘द बिग सिक’ हा कुमैल नान्जियानी आणि एमिली गॉर्डन या दोघांच्या खऱ्याखुऱ्या प्रेमाच्या गोष्टीवर आधारलेला आहे. स्टॅन्ड अप कॉमेडीच्या विश्वात त्याचा स्ट्रगल सुरु असताना त्याची एमिलीशी भेट झाली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात असताना कुमैलच्या पाकिस्तानी पार्श्वभूमीमुळे एमिलीच्या नकळत समांतररीत्या काही गोष्टी घडत होत्या. होतं असं की, अमेरिकेत स्थित असलेल्या कुमैलच्या कुटुंबाने त्याच्याकरिता पाकिस्तानी स्थळांचा शोध घ्यायला सुरुवात केलेली असते. त्याला लग्न करायचं नसलं तरीही तो त्यांना स्पष्टपणे नकार देत नाही किंबहुना कुटुंबापासून दूर जाण्याच्या शक्यतांमुळे देऊ शकत नाही. साहजिकच गोष्ट तिला ही कळते नि त्याची परिणीती त्यांच्या नात्याचा अंत होण्यात होते. दरम्यान हे सगळं घडत असतानाच एमिली कुठल्याशा अस्पष्ट कारणाने आजारी पडली होती. ज्यात तिला वैद्यकीयदृष्ट्या प्रेरित कोमामध्ये टाकावं लागलं होतं. मग नात्याचा शेवट झालेला कुमैल, एमिली आणि त्यांच्या कुटुंबांतील परस्परसंबंध इथे समोर येतात.
त्यांच्या आयुष्यातील याच घटनांचे संदर्भ वापरत स्वतः कुमैल आणि एमिलीने सदर चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे. इथे कुमैल स्वतःचं पात्र रंगवतो, तर झोई कझान एमिलीच्या भूमिकेत दिसते. ‘द बिग सिक’मधील मध्यवर्ती समस्या आणि सेट अप हा भारतीय संदर्भांत चपखल बसेल असा आहे. एकत्र कुटुंब पद्धती आणि तिचा उत्सव साजरा करण्याच्या नादात अनेकदा कुटुंबातील सदस्यांच्या वैयक्तिक अवकाशाला आणि मतांना महत्त्व उरत नाही. कुमैल ज्या पद्धतीने त्याच्या कुटुंबापासून तुटल्या जाण्याच्या भीतीमुळे स्वतःचं मन मारून जगत असतो, तरुणांचं अगदी तसंच चित्र भारतीय समाजात सहजपणे दिसून येऊ शकतं.
यासंबंधी चित्रपटात एक फार असं समर्पक दृश्य आहे. कुमैलचा अल्लाहवर विश्वास नाही. त्यामुळे आई-वडिलांच्या घरी गेल्यावर त्याने नमाज पठण करण्याची वेळ येते तेव्हा तो तळघरात जाऊन पाच मिनिटांचा गजर लावत मोबाईलवर काहीतरी ऐकत, पाहत किंवा गेम खेळत बसतो. समोरच्या व्यक्तीची स्वतःची अशी काही मतं असू शकतात ही बाबच मुळी भारतीय आणि पाकिस्तानी दोन्हीही कौटुंबिक, सामाजिक परिघात मान्य नाही. त्यामुळेच आपल्याला अमेरिकी प्रेयसी आहे हे कळल्यास आपल्या कुटुंबाला किती मोठा धक्का बसेल याची जाणीव कुमैलला असते. पुढे जाऊन हे घडतंदेखील. मात्र, त्यादरम्यान जे घडतं ते त्यांच्या नात्याच्या दृष्टीने अधिक अपायकारक असतं.
तत्पूर्वी एके ठिकाणी एमिली कुमैलला विचारते, “कॅन यू थिंक ऑफ अ वर्ल्ड व्हेअर वुई एंड अप टुगेदर?” मात्र, त्याकडे यावर काहीच उत्तर नसतं. तो म्हणतो, “आय डोन्ट नो”. वर उल्लेखलेलं पाकिस्तानी नि भारतीय, दोन्हीकडील कुटुंबव्यवस्थेतील सदस्यांचं, त्यांच्या इच्छा आणि मतांचं दडपलं जाणं ते हेच.
‘द बिग सिक’च्या पूर्वार्धात उपहासात्मक, इथले प्रियकर-प्रेयसी ज्यानिमित्ताने एकमेकांची छेड काढत आहेत असा विनोद आहे. हे जितकं कुमैलच्या स्टॅन्ड अप कॉमेडियन असण्यातून येतं, तितकंच एमिलीच्या थट्टेखोर स्वभावामुळे घडतं. त्यांची पहिली भेटच मुळी तिच्या स्वभावामुळे होते. उत्तरार्धात मात्र हे पात्र आजारी पडतं तेव्हा त्या पात्राच्या ठळकपणे जाणवणाऱ्या उणीवेमुळे इथे खिन्नता आणि दुःखाच्या भावनेचं अस्तित्त्व जाणवू लागतं. इथल्या विनोदालाही खिन्नतेची किनार प्राप्त होते.
शुजित सरकारचा ‘ऑक्टोबर’ (२०१८) आणि अॅलेक्स लेहमनचा ‘पॅडलटन’ (२०१९) हे दोन्ही चित्रपट पाहताना ‘द बिग सिक’ची प्रकर्षाने आठवण येण्यामागे या तिन्ही चित्रपटांत समांतर धागा असलेलं आजारपण आणि त्या आजारपणाच्या अस्तित्त्वामुळे संपूर्ण (किंवा अर्ध्याअधिक) चित्रपटात जाणवणारी खिन्नता ही दोन मुख्य कारणं आहेत.
एमिलीच्या आई-वडिलांच्या रुपात दोन परस्परविरोधी पात्रं समोर येतात. बेथ (हॉली हंटर) आणि टेरी गार्डनर (रे रोमानो) या दोघांच्या नात्यातील तणावही स्पष्टपणे जाणवू लागतो. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या नात्यातील तणाव आणि कुमैल-एमिली यांच्यातील तणाव एकाच गोष्टीमुळे तयार झालेला असतो. दोन्हीकडे कारणं नि कृती वेगळ्या असल्या तरीही दोन्हीही जोडप्यांच्या नात्यात खोटेपणामुळे तणाव निर्माण झालेला असतो.
‘द बिग सिक’मध्ये निरनिराळ्या पात्रांच्या जोड्या एकत्र येतात. एका विशिष्ट दृश्यात टेरी आणि बेथ यांच्यासोबत असलेला कुमैल पहावा. सदर चित्रपट हा पाहताक्षणी आवडून जातील अशा प्रेमळ लोकांच्या आयुष्याचं अधिक जिवंत आणि आखीवरेखीव चित्र समोर उभं करणारा आहे. त्यांचे विशिष्ट स्वभावविशेष आणि वेळ पडल्यास विक्षिप्तपणा चितारणारा आहे. तो प्रेम आणि कुटुंब या दोन्ही संकल्पनांचा नव्याने विचार करायला लावणारा आहे.
‘लस्ट स्टोरीज’मधील अनुराग कश्यपच्या लघुपटात एक सुरेख वाक्य आहे. “यू अल्वेज हर्ट पीपल दॅट यू लव्ह. यू कान्ट हर्ट समबडी दॅट यू डोन्ट लव्ह.” बेथ-टेरी, कुमैल-एमिली या दोन्ही जोड्यांमधील नात्याकडे पाहता या वाक्याच्या सत्यतेची प्रचिती येते.
द बिग सिक ऍमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे.