Quick Reads
इट्स अ ब्युटीफुल डे इन द नेबरहूड: नैराश्यपूर्ण काळात मनात सौंदर्य निर्माण करणारा सिनेमा
स्पॉटलाईट सदर
२०१६ मध्ये टॉम हँक्सने ‘सॅटर्डे नाईट लाइव्ह’चा (एसएनएल) एक भाग होस्ट करत असताना एक मोनोलॉग सादर केला होता. त्याला एक तत्कालीन संदर्भ होता, तो म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुका जवळ येण्याचा. नेहमीप्रमाणे देश रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही पक्षांच्या समर्थकांत विभागला गेला होता. देशातील नकारात्मक, निराशावादी आणि अस्वस्थ करणाऱ्या वातावरण निर्माण झालेलं होतं. आणि हँक्स या अभिनेत्याची जनमानसातील प्रतिमा ही अगदीच स्वच्छ, सकारात्मक अशी होती (तशी ती अजूनही आहे). ‘अमेरिका’ज डॅड मोनोलॉग’ नावाच्या हँक्सच्या या मोनोलॉगची संकल्पना अशी की, त्याच्या याच प्रतिमेचा वापर करीत तो देशाला त्यावेळच्या निराशावादी वातावरणात अमेरिकेशी सकारात्मक नि उत्साहपूर्ण संभाषण साधेल. ‘एसएनएल’ हा एक स्केच कॉमेडी शो असल्याने या संकल्पनेमागे विनोदाचा भाग असला तरी राखाडी रंगाचं स्वेटर घालून हँक्सने व्यक्त केलेल्या भावना तितक्याच कालसुसंगत होत्या.
हँक्सला हे बिरूद मिळवून देण्यात ‘एस्क्वायर’ मॅगझिनने २००६ मध्ये केलेल्या कव्हर स्टोरीचा मोठा हात होता. ज्याला त्याची पडद्यावर आणि खऱ्या आयुष्यात अशा दोन्ही पातळीवरील सदाचारी प्रकारची भूमिका कारणीभूत होती. हे सगळं उद्धृत करण्यामागील कारण हेच की, ‘इट्स अ ब्युटीफुल डे इन द नेबरहूड’मध्ये टॉम हँक्सने साकारलेली भूमिकादेखील अमेरिकेतील अशाच आणखी एका व्यक्तिमत्त्वाची आहे. फ्रेड रॉजर्स (हँक्स) हा अमेरिकन टेलिव्हिजनवरील ‘मिस्टर रॉजर्स’ नेबरहूड’ या लहान मुलांसाठीच्या कार्यक्रमाचा होस्ट आणि निर्माता होता. हा कार्यक्रम आणि त्यातील बाहुल्या (पपेट्स), मिनिएचर सेट्स या गोष्टी वरवर पाहता लहान मुलांसाठीच्या वाटत असल्या तरीही त्यात हाताळल्या जाणाऱ्या संकल्पना, विषय अनेकदा गंभीर स्वरूपाचे असायचे. पालकत्व, दुःख, मृत्यू असे विषयही अगदी सहजपणे समजावून सांगण्याची फ्रेड रॉजर्सचं कौशल्य वाखाणण्याजोगं होतं. शिवाय, या साऱ्या संकल्पना हाताळूनही हा कार्यक्रम निराशावादी ठरत नसायचा, हेही रॉजर्सचं एक वैशिष्ट्य. त्याच्या संथपणे बोलण्याच्या शैलीने, बोजड संकल्पनांचं सुलभीकरण करण्याने त्याने अनेकविध लोकांची आयुष्याला स्पर्श केला होता. त्यामुळेच १९६८ मध्ये सुरु होऊन पुढील तेहतीस वर्षं सुरु राहिलेल्या या कार्यक्रमाचा चाहतावर्ग लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत विभागला गेलेला होता.
योगायोगाचा भाग असा की, ‘एस्क्वायर’ मॅगझिनने १९९८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखावर हा चित्रपट बेतलेला आहे. एका अर्थी रॉजर्सच्या भूमिकेतील हँक्सची कास्टिंग याहून अधिक अचूक होऊ शकली नसती. १९९८ मध्ये देशातील प्रेरणादायक व्यक्तींवरील लेखांचा समावेश असलेला अंक प्रसिद्ध केला होता. टॉम जुनोद या शोध पत्रकारावर मिस्टर रॉजर्सवरील चरित्रात्मक लेख लिहिण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता चित्रपटात काहीएक भाग काल्पनिक असल्याने जुनोदवर बेतलेलं लॉयड व्होगल (मॅथ्यू ऱ्हीस) हे पात्र दिसतं. शिवाय, चित्रपटही चरित्रपट प्रकारातील नसून व्होगलच्या माध्यमातून फ्रेड रॉजर्स या व्यक्तीला समजावून घेणारं कथानक इथे दिसतं. आणि इथे दोघांनाही समान महत्त्व प्राप्त होतं.
चित्रपटाची सुरुवात आणि एकूणच चित्रपटाच्या मांडणीची शैली ‘मिस्टर रॉजर्स’ नेबरहूड’ या कार्यक्रमात वापरले जाणारे प्रॉप्स आणि मिनिएचर सेट्स यांचा कल्पक वापर करणारी आहे. सुरुवातीच्या सीक्वेन्समध्ये मिस्टर रॉजर्सच्या कार्यक्रमाच्या सुरूवातीचं हुबेहूब पुनर्निर्माण केलं जातं. रॉजर्सच्या भूमिकेतील हँक्स मूळ कार्यक्रमात जे काही घडतं ते रॉजर्सची शारीरिक हावभाव आणि संथपणे बोलण्याची शैली असं सगळं अंगीकृत करत लॉयडशी ओळख करून देतो. प्रेक्षक म्हणून आपण लॉयडच्या वैयक्तिक आयुष्यात प्रवेश करणार आहोत याची जाणीव करून देतो. हा ओपनिंग सीक्वेन्स, इथलं नेपथ्य आणि लॉयडचं खरं आयुष्य यांची सरमिसळ केली जाते.
दिग्दर्शिका मरिएल हेलरने कधीतरी म्हटल्याप्रमाणे तिला लोकांच्या कथा सांगण्यात रस आहे. हे लोक सभोवताली घडणाऱ्या घटनांचा आपल्यापुरता अर्थ लावत जगू पाहणारे असतात. त्यामुळेच इथला व्होगल असो की ‘कॅन यू एव्हर फर्गिव्ह मी?’, तिच्या चित्रपटांतील व्यक्तिरेखा असोत, या गोष्टी आयुष्यात असमाधानी असलेल्या व्यक्तींच्या आहेत. व्होगलची संपादिका त्याला सुनावते त्याप्रमाणे कुठलीही व्यक्ती त्याच्याशी संवाद साधू इच्छित नाही. त्याची प्रतिमाच लोकांचं खोटं उघड पाडण्यात प्रसिद्ध असलेल्या पत्रकाराची असल्याने बढाईखोर लोकांच्या या जगात हे घडणं जरा स्वाभाविक आहे. व्होगल भावनिक पातळीवर वैयक्तिक आयुष्यातील समस्यांनी त्रस्त असलेला, जगाबाबत अलिप्त आणि असंतुष्ट दृष्टिकोन बाळगून असलेला आहे. रॉजर्स मात्र याच्या अगदी उलट आहे. आत वेगळं नि बाहेर वेगळं अशी त्याची प्रवृत्ती नसल्याने त्याला व्होगलशी संवाद साधण्यात काहीच समस्या नसते. व्होगल मात्र रॉजर्स या नावाभोवती असलेलं वलय, त्याची पूर्णतः स्वच्छ नि सकारात्मक अशी प्रतिमा याबाबत साशंक असतो. या परस्परविरोधी पात्रांमुळे दिग्दर्शिका हेलरला व्होगल आणि रॉजर्स या दोघांचंही व्यक्तीचित्रण करणं शक्य होतं.
लॉयडला मिस्टर रॉजर्सच्या प्रतिमेबाबत स्वतःला असलेल्या संशयामुळे त्यामागील सत्य उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणार असतो. मात्र, होतं असं की, रॉजर्स ही व्यक्ती आणि तिची जनमानसातील प्रतिमा दोन्हीही सर्वस्वी प्रामाणिक स्वरूपाच्या असतात. लॉयड मात्र त्याचा पिता, जेरीने (क्रिस कूपर) ठेवलेले विवाहबाह्य संबंध, त्याच्या पित्याचं त्याच्या कुटुंबाला सोडून जाणं अशा घटनांमुळे कायमच सभोवताली घडणाऱ्या घटनांमध्ये दोषच शोधण्यात व्यस्त असतो. तो रॉजर्सची भेट घेतो तेव्हा रॉजर्सच त्याची उलटचौकशी करत राहतो. लॉयडच्या मनावर झालेल्या आघातांमुळे तो भावनिक, मानसिक पातळीवर अलिप्त बनला. ज्यामुळे वैयक्तिक आयुष्यातील समस्या आणि जगाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. पुढे जाऊन बिल आयलर (एन्रिको कोलांटनी) एके ठिकाणी लॉयडला म्हणतो त्याप्रमाणे त्याच्यासारखे मानवता, मानवी स्वभाव याबाबत निरुत्सुक असलेल्या लोकांचं रॉजर्सला विशेष आकर्षण आहे. लोकांचं दुःख समजावून घेत त्यांच्या मनावर हळुवार फुंकर घालणं त्याला त्याचं कर्तव्य वाटतं. ज्याचं मूळ त्याचा मानवतेवर नितांत विश्वास असण्यात आहे. मनात कुणाप्रती किंवा खरंतर सर्वांप्रती प्रेम आणि आपुलकीची, काळजीची भावना असणं आणि या भावनेचं अस्तित्त्व म्हणजे मानवतेचा पाया असणं हे सांगण्यात ही व्यक्ती आयुष्य खर्ची का घालत आहे, हे इथे दिसतं.
चित्रपटात एक दृश्य आहे, ज्यात मिस्टर रॉजर्स आणि लॉयड न्यू यॉर्क शहरातील सबवेमधून प्रवास करत असताना लहान मुलं रॉजर्सला ओळखतात आणि ‘इट्स अ ब्युटीफुल डे इन द नेबरहूड’ हे त्याच्या कार्यक्रमातील थीम सॉंग गाऊ लागतात. ज्यात हळूहळू इतर प्रौढ लोकही सामील होतात. रॉजर्सचा दृष्टिकोन आणि त्याला मिळालेलं यश यांची ही पावती असते. बऱ्यापैकी सरळसोट कथानक असलेल्या चित्रपटालाही प्रचंड हृदयद्रावक बनवण्यात दिग्दर्शिका हेलर आणि मिका फित्झमन-ब्लू आणि नोआ हार्पस्टर ही लेखकद्वयी यशस्वी होण्यामागे अशीच इतर दृश्यं महत्त्वाची ठरतात. ज्याद्वारे मानवी भावभावना आणि नातेसंबंधांची उकल करणं शक्य होतं. या सगळ्याचा परिणाम असा होतो की, सध्याच्या काळामध्ये निराशावाद, उपाहासवृत्तीचा उद्रेक झालेला असताना एक प्रचंड आशावादी आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगून असणारी कलाकृती समोर येते. जी तिच्या नावाला जागते. इतकं की, कधीही निरुत्साही वाटत असल्यास हा सुखदायक चित्रपट पाहून जरा बरं वाटून घेण्याइतपत विश्वास या चित्रपटावर ठेवता येऊ शको.