Quick Reads

‘वुई आर वन’ या ऑनलाईन चित्रपट महोत्सवातील महत्त्वाच्या सिनेमांची ओळख: ‘क्रेझी वर्ल्ड’

स्पॉटलाईट सदर

Credit : Indie Journal

जगभरातील नामांकित चित्रपट महोत्सवांनी एकत्र येत ‘वुई आर वन’ या नावाने एक ऑनलाईन चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात काही निवडक नवे आणि जुने चित्रपट युट्युबवरील ‘वुई आर वन’ याच नावाच्या चॅनलवर मर्यादित कालावधीकरिता मोफत स्ट्रीम होत आहेत. येत्या काळात या महोत्सवातील महत्त्वाच्या अशा काही चित्रपटांविषयीच्या, मुख्यत्वे त्यांची ओळख करून देणाऱ्या लिखाणाची सुरुवात ‘क्रेझी वर्ल्ड’ या चित्रपटापासून करतोय. 

 

नाब्वाना आयगीगी लिखित, दिग्दर्शित ‘क्रेझी वर्ल्ड’ हा चित्रपट पाहताना पाहत असताना ‘टॉकिंग अबाऊट ट्रीज’ (२०१९) या माहितीपटाची प्रकर्षाने आठवण आली. त्यांच्यात वरवर पाहता काही साम्य नाही. मात्र, दोन्हीकडे चित्रपट या माध्यमाकडे पाहण्याची एक उत्कट भावना आहे. गरजेची संसाधनं आणि आर्थिक पाठबळ यांचा अभाव असताना हे चित्रपटकर्ते अगदीच कमी बजेटमध्ये चित्रपटनिर्मितीचे (यशस्वी) प्रयत्न करताना दिसतात. आर्थिकदृष्ट्या संपन्नता नसूनही या माध्यमावरील प्रेम आणि त्या प्रेमापोटी चित्रपट निर्मितीला गरजेची अशी कौशल्यं संपादन करण्याची इच्छा दोन्हीकडे दिसते. ‘क्रेझी वर्ल्ड’ तर बोलणार आहेच, पण तत्पूर्वी ‘टॉकिंग अबाऊट ट्रीज’बाबत थोडंसं. 

 

टॉकिंग अबाऊट ट्रीज 

 

‘टॉकिंग अबाऊट ट्रीज’मध्ये सुदानमधील चार ज्येष्ठ चित्रपटकर्ते सुदानमधून हद्दपार झालेल्या चित्रपटगृहांना, चित्रपट पाहणं या संकल्पनेला पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न करत आहेत. चित्रपटगृहं ही संकल्पना अस्तित्त्वातच नसण्यामागे राजकीय आणि आर्थिक अशी दोन्ही कारणं आहे. त्यातल्या त्यात आर्थिक समस्यांवर मात करता येते. मात्र, राजकीय अडथळे पार करणं त्याहून अधिक क्लिष्ट काम असतं. अनेकदा राज्यकर्ते चित्रपटासारख्या माध्यमाला इतके घाबरून असतात की त्यावर निर्बंध लादण्याचे प्रयत्न होतात. या देशामध्ये इतकं राजकीय अस्थैर्य आहे की, तिथे ही परिस्थिती अधिकच बिकट आहे. 

चित्रपटात ज्या चार चित्रपटकर्त्यांच्या प्रयत्नांकडे पाहिलं जातं त्यातील एक जण म्हणतो, “आम्ही सगळ्यांनी ब्रिटिश वसाहतवाद, दुसरं महायुद्ध, आणि वसाहतवादापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीन लोकशाही सरकारं आणि तीन हुकूमशाही सरकारं पाहिली आहेत”. केवळ या एका वाक्याद्वारे तिथल्या सामाजिक आणि राजकीय अस्थैर्याची कल्पना करता येऊ शकते. चित्रपट संग्रहित करून ठेवण्याची सोयच नसल्याने या चारही चित्रपटकर्त्यांचे बहुतांशी चित्रपट गहाळ झालेले आहेत. पडझड झालेली चित्रपटगृहे, तिथे धूळ खात पडत असलेले चित्रपटांचे अर्धवट किंवा थेट तुकडे झालेले रीळ या गोष्टी कुठल्याही देशात चित्रपट संग्रहालयाची व्यवस्था असणं किती महत्त्वाचं आहे, हेच दर्शवतात. मधल्या काळातील परिस्थितीचं वर्णन या माहितीपटात ‘सुदानीज सिनेमा: द हिरो दॅट डाइड’ असं केलं जातं. 

हे सगळं करत असताना संपूर्ण चित्रपटभर तिथलं सरकार, निर्बंध यावरही टीका केली जाते. मात्र, इथे सगळं काही निराशाजनक नाही. जुन्या पिढीतील हे चार लोक आशावादी आणि प्रयत्नशील आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांचं चित्रपट या माध्यमावर प्रेम आहे. चित्रपट या माध्यमाची लोकप्रियता, त्याचं सौंदर्य, त्याचं आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असणं या सगळ्या गोष्टी इथे अगदीच अचूकपणे प्रतिबिंबित होतात. एकेकाळी हेच लोक आपल्या चित्रपटप्रेमापोटी आणि चित्रपटनिर्मितीच्या अभ्यासाकरिता परदेशी गेले होते. आता हेच लोक तरुण चित्रपटकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून आता ‘सुदान फिल्म क्लब’ स्थापन करून या माध्यमाचं जतन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे सगळं चित्रच प्रचंड आशावादी आणि रोमँटिक आहे. 

 

क्रेझी वर्ल्ड 

 

नाब्वाना आयगीगी या चित्रपटकर्त्याने युगांडाच्या राजधानीतील एका सबंध वस्तीचा वापर करून बजेटशिवाय चित्रपट निर्मिती करायला सुरुवात केलेली आहे असं तो स्वतःच ‘क्रेझी वर्ल्ड’च्या (सध्या पाहण्यास उपलब्ध असलेल्या आवृत्तीच्या) सुरुवातीला सांगतो. हा दिग्दर्शक आणि हा चित्रपट मुळातच स्वतःच्या अस्तित्त्वाबाबत जागरूक आहे. आपल्याकडे मुळात बजेटच नाही याचीही त्यांना जाणीव आहे. मुख्यत्वे अमेरिकन मारधाडपटांमध्ये चित्रपटकर्त्याच्या (परिणामी चित्रपटाच्या) प्रेरणा दडलेल्या आहेत. इथे या गोष्टींनाच आपल्या बलस्थानामध्ये रूपांतरित केलं. ज्यातून एका प्रचंड सेल्फ-अवेअर, अतार्किक, अतिशयोक्तीपूर्ण, तरीही विनोदी आणि कुशलतेने बनवलेल्या चित्रपटाची निर्मिती होते. 

‘क्रेझी वर्ल्ड’चं कथानक हे मुळातच अतिरेकी हिंसा असलेल्या चित्रपटांच्या प्रभावातून निर्माण झालेलं आहे. अशा चित्रपटांत असतात तसे उद्धृत करता येतील असे संवाद इथेसुद्धा अस्तित्त्वात आहेत. याखेरीज, हे सारं प्रकरणच चित्रपट या माध्यमाचं सेलिब्रेशन आहे. सध्या युट्युबवर उपलब्ध असलेली आवृत्ती चित्रपटकर्त्यांची चतुराई दर्शवणारी आहे. ‘रॅम्बो’ फ्रँचाइजपासून ते ‘प्रिजन ब्रेक’पर्यंत कित्येक कलाकृतींचे संदर्भ वापरत असलेली दृश्यं इथे दिसतात. मात्र, इथल्या विडंबनात मूळ कलाकृतींप्रती असलेलं प्रेमही अस्तित्त्वात आहे. मुळात हे माध्यमावरील प्रेम आणि त्या कलाकृतींचा अभ्यास असल्यानेच इतक्या विलक्षण अशा कलाकृतीची निर्मिती करणं शक्य होतं. या चित्रपटाकडे तांत्रिक दृष्टिकोनातून पाहणं मुळातच या चित्रपटावर अन्यायकारक ठरेल. इथली हेतूपुरस्सररीत्या मूर्खपणा करण्याची शैली आणि सगळ्या प्रकरणातील चतुराई अधिक वाखाणण्याजोगी आहे. इथलं उत्कट प्रेम आणि चतुर संकल्पना परस्परांना पूरक ठरणाऱ्या आहेत. 

चित्रपट या माध्यमावरील प्रेम, त्यातून निर्माण केलेला अस्सल वेडेपणा अशा बऱ्याच गोष्टींसाठी हा अफाट मनोरंजक चित्रपट आवर्जून पाहावासा आहे. तो आवडल्यास नंतर ‘ऑफिशियल वकालीवुड’ या चॅनलवर जाऊन वकालीवुडचे इतर चित्रपट पाहायला हरकत नाही. 

ता.क:

१. ‘टॉकिंग अबाऊट ट्रीज’ पाहायला मिळणं अवघड आहे. तूर्तास ट्रेलरवर समाधान मानावं लागेल. 

२. ‘क्रेझी वर्ल्ड’ हा ‘वुई आर वन’च्या अधिकृत चॅनलवर पुढच्या पाच दिवसांपर्यंत उपलब्ध असेल.