Quick Reads
'लूक हूज बॅक': हिटलरचा व्यंगात्मक पुनर्जन्म
स्पॉटलाईट सदर
२०१५ मधील ‘लूक हूज बॅक’च्या प्रदर्शनानंतर जागतिक राजकारणात बरेचसे बदल घडले आहेत. कट्टर उजवी विचारसरणी असलेली सरकारं असलेल्या राष्ट्रांच्या संख्येत बरीच वाढ झाली आहे. रशिया, टर्की, इस्राएल, भारत, इटली, हंगेरी, पोलंड, अमेरिका अशी ही यादी बरीच मोठी होत चालली आहे. नॉर्थ कोरियामध्ये तर किम जॉन्ग-उन त्यापूर्वीही सत्तेत होताच. सांगायचा मुद्दा असा की आक्रमक राष्ट्रवादाचा प्रसार करणारी, फॅसिस्ट विचारसरणी असलेली, धार्मिक राजकारण करणारी, विरोधकांना रातोरात गायब करणारी सरकारं अलीकडील कालखंडात जगभर सर्वत्र सत्तेत असल्याचं दिसतं. डेव्हिड विनन्ट दिग्दर्शित ‘लूक हूज बॅक’च्या केंद्रस्थानी याच साऱ्या बाबींशी समांतर असणारे काही मुद्दे आहेत.
सदर चित्रपट टिमुर वर्म्सच्या ‘लूक हूज बॅक’ याच नावाच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारलेला आहे. चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना अशी की काही अस्पष्ट, अतर्क्य कारणांमुळे अडॉल्फ हिटलर (ऑस्कर माझुकी) २०१४ येऊन पोचला आहे. दुसऱ्या महायुद्धात त्याचं बंकर ज्या ठिकाणी होतं, बर्लिनमधील त्याच ठिकाणी उठलेला हिटलर त्याचा बदललेला सभोवताल पाहतो. आणि मग सद्यपरिस्थितीत त्याचे आक्रमक आणि समस्यात्मक विचार घेऊन जगणाऱ्या हिटलरचा मागोवा चित्रपटात घेतला जातो.
‘लूक हूज बॅक’ जेव्हा आला तेव्हा तो काही मुख्य कारणांमुळे आकर्षणाचं केंद्र ठरला होतं. पहिलं म्हणजे इतर राष्ट्रांतील कलाजगताने हिटलरला गंभीर ते विनोदी अशा साऱ्याच चष्म्यांतून पाहिलं होतं, त्यावर टीका केली होती. जर्मनीतील कलाजगताने मात्र हिटलरकडे विनोदी दृष्टिकोनातून तसं कधीच पाहिलं नव्हतं. त्यामुळेच हे करणाऱ्या मूळ कादंबरीलाही अनपेक्षितरीत्या चांगला प्रतिसाद मिळाला होता. दुसरं म्हणजे ‘क्रिगरीन’च्या (इंग्रजी शीर्षक ‘कॉम्बॅट गर्ल्स’, २०११) निमित्ताने जर्मनीतील निओ-नाझी विचारधारेचं चित्र उभं करू पाहणारा डेव्हिड विनन्ट सदर चित्रपटाचं दिग्दर्शन करत असल्याने विषयाच्या राजकीय अंगाला अधिक प्राधान्य मिळेल अशी अपेक्षा होती. साहजिकच एका विशिष्ट प्रमाणाबाहेर असं काहीच घडत नाही. एक प्रकारे चित्रपट ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ अर्थात गैरसमजातून निर्माण झालेल्या विनोदापुरतं मर्यादित राहून इथल्या संकल्पनेत असलेली मजा हिरावून घेतो.
२०१४ मधील जर्मनीत येऊन पोचल्यानंतर हिटलर लागलीच फॅबियन सवात्झ्की (फॅबियन बुश) या एका टेलिव्हिजन चॅनलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येतो. त्याच्या निमित्ताने हिटलरचा संबंध मनोरंजन क्षेत्राशी येतो. आणि प्रत्येक जण कमेडियन समजत असलेल्या हिटलरचं टीव्हीवर झळकणं, त्याच्या आक्रमक विचारांवर लोकांनी हसणं यातून इथे विनोदनिर्मिती होते. एका उपकथानकाच्या मांडणीबाबत सदर चित्रपट साशा बेरॉन कोहेनच्या ‘बोरॅट’कडून (२००६) प्रेरणा घेतो असं मानता येईल. ज्यात चित्रपटात हिटलरच्या वेषातील माझुकीची ‘बोरॅट’प्रमाणे खऱ्याखुऱ्या लोकांशी घडलेली संभाषणं दिसतात. एका दृश्यात तो एका कुत्र्याला गोळी मारतो, आणखी कुठेतरी आपल्या पश्चात जर्मनीचे आणि त्याचे विचारांचे झालेले हाल पाहून हळहळतो नि राष्ट्राला पुन्हा नाझी पक्षाची विचारसरणीची गरज असल्याचं बोलून दाखवतो. आणखी एका दृश्यात ‘डाऊनफॉल’ (२००४) या प्रसिद्ध जर्मन चित्रपटाचं दृश्याचं पॅरडीवजा सादरीकरण दिसतं. ही सगळी दृश्यं काळा विनोद असलेली असली तरी हा विनोद तितक्याच स्पष्ट आणि तीव्र राजकीय उपहासामुळे अधिक प्रभावी होऊ शकला असता. कमी अधिक फरकाने सबंध चित्रपट सातत्याने विनोदी असला तरी चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेली संकल्पनाच मुळात प्रत्यक्ष चित्रपटाहून अधिक आकर्षक आहे. याचं कारण म्हणजे चित्रपट या संकल्पनेत असलेलं पोटेन्शियल तितक्या कल्पकतेनं हाताळत नाही. त्यामुळे एक राजकीय उपरोध म्हणून त्याकडून असलेली व्यंगाची अपेक्षा त्याच्या मर्यादित दृष्टिकोन असलेल्या कथानकामुळे पूर्ण होत नाही.
उदाहरणार्थ, इथल्या काही दृश्यांत हिटलर आताच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रयत्न करताना दिसतो. ज्यात तो एके ठिकाणी म्हणतो की हा स्मार्टफोन चांगला असला तरी यात थर्ड राइखने मंजुरी दिलेल्या रिंगटोनचा अभाव असल्याची मला खंत आहे. आता या साध्या दृश्यालाही थर्ड राइखच्या अंमलाखाली असलेल्या जर्मनीमध्ये असलेल्या अनेकविध निर्बंधांची किनार आहे असं मानता येईल. मात्र, एका जागेनंतर हे सारं मर्यादित दृष्टिकोनातून विचार केलेल्या दृश्यांच्या गर्दीत लुप्त होऊन जातं. याखेरीज कोहेनच्या आणखी एका चित्रपटाची, ‘द डिक्टेटर’ची (२०१२) आठवण येणंही काहीसं स्वाभाविक आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या पश्चात अमेरिका आणि रशियामधील राजकारणात अनेक परस्परविरोधी गोष्टी घडत असल्या तरी जर्मनीने काही एक प्रमाणात आपलं भूतकाळ मागे ठेवत भूमिकेत आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. जर्मनीत स्वस्तिक आणि नाझी विचारसरणीशी निगडीत इतर अनेक गोष्टींवर बंदी आहे. असं असलं तरी छुप्या पद्धतीने का होईना, पण निओ-नाझी गटांचं असलेलं अस्तित्त्व ही एक चिंताजनक बाब आहे. कट्टर राष्ट्रवादी भूमिका घेणारे हे गट नाझी विचारसरणीशी एकनिष्ठ आहेत. त्यांना चौथी राइख निर्माण करायची आहे. या गटांचं जगभर सर्वत्र अस्तित्त्व आहे. या मुद्द्याचा समावेश असलेलं एक दृश्य ‘लॉंग शॉट’मध्ये (२०१९) अगदी सुरुवातीलाच दिसतं.
डोनाल्ड ट्रम्प दर काही दिवसांनी वर्णद्वेषी वक्तव्यं आणि ट्विट्स करत असतो. त्याचे विचार आणि वर्णद्वेष, आक्रमक राष्ट्रवाद, होमोफोबिया हे निओ-नाझिज्ममधील विचार यांत फारसा फरक नाही. जगभरातील लेखक, विचारवंतांनी आक्रमक हिंदुत्ववाद आणि फॅसिस्ट नाझी विचारसरणी यांच्यातील साम्यस्थळं अधोरेखित केलेली आहेत. समकालीन भारत, अमेरिका, रशिया आणि एकूणच जगभरात उजव्या विचारसरणीचं असलेलं अस्तित्त्व आणि प्रभाव ही एक चिंताजनक बाब असल्याचंही वेळोवेळी म्हटलं गेलेलं आहे. अशा परिस्थितीत या विचारसरणींचा विचार करणाऱ्या कलाकृतींची गरज आहे. भलेही तो विनोदी, उपहासात्मक अंगाने का असेना. ‘द इंटरव्ह्यू’ (२०१४), ‘द डेथ ऑफ स्टॅलिन’ (२०१७) हे अलीकडील काळातील इतर काही चित्रपट याची उत्तम उदाहरणं आहेत. टाइका वैटिटिचा ‘जोजो रॅबिट’ही हेच करत असल्याचं त्याचं ट्रेलर आणि फेस्टिव्हल रनमध्ये मिळालेला प्रतिसाद पाहता दिसतं.
‘लूक हूज बॅक’ हा चित्रपटही त्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. सध्याच्या जगात हिटलर अस्तित्त्वात असण्याची कल्पनाच मुळी अस्वस्थ करणारी आहे. इंटरनेटचं अवकाश, या नव्याने गवसलेल्या माध्यमाची ताकद या गोष्टींचा विचार करता हा विचार अधिकच भयावह आहे. चित्रपटात हिटलरने इंटरनेटवर सर्च केलेली पहिली संकल्पना असते ‘वर्ल्ड डॉमिनेशन’ यातच सारं काही येतं. बाकी चित्रपट त्याच्या राजकीय अंगावर फारसा भर देत नाही हा भाग सोडता तो सातत्याने विनोदी आहे. एखादं राजकीय सटायर पहायचं असल्यास हा एक चांगला पर्याय आहे.
टीप : सदर चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.