Quick Reads

‘गेट आऊट’ आणि ‘अस’: दृश्य असूनही अदृश्य राहिलेल्या वंशाधारित शोषणाला उजागर करणारे सिनेमे

स्पॉटलाईट सदर

Credit : Indie Journal

मायनर स्पॉइलर्स अहेड. 

२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या जॉर्डन पील लिखित-दिग्दर्शित ‘गेट आऊट’ या चित्रपटामध्ये बऱ्याचशा रूपकांचा वापर करीत समकालीन अमेरिकेतील वर्णद्वेषावर भाष्य केलं गेलं होतं. त्यानंतर २०१९ मध्ये आलेल्या पीलच्याच ‘अस’मध्ये वर्णद्वेषासोबत वर्गाचं समीकरणही विचारात घेतलं गेलं होतं. सध्या सुरु असलेल्या ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ या जगव्यापी चळवळीच्या निमित्ताने अमेरिका, वर्णभेद आणि शोषण हे मुद्दे सर्व माध्यमांच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा पीलच्या या दोन्ही चित्रपटांकडे पाहणं आणि ते का कालातीत आहेत याचा विचार करणं गरजेचं ठरतं. 

‘गेट आऊट’च्या केंद्रस्थानी असलेला कृष्णवर्णीय तरुण क्रिस (डॅनिएल कलुया) हा एक छायाचित्रकार आहे. रोज (अॅलिसन विल्यम्स) ही श्वेतवर्णीय तरुणी त्याची प्रेयसी आहे. चित्रपटाला सुरुवात होते तेव्हा तो तिच्यासमवेत तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी निमशहरी भागातील त्यांच्या घरी जायला निघालेला असतो. प्रेयसीच्या कुटुंबाशी होत असलेली पहिली भेट ही घटना मुळातच चिंतेत पाडणारी गोष्ट असते. अशात त्याचं कृष्णवर्णीय असणं तिच्या कुटुंबाला खटकणार तर नाही ना, हादेखील प्रश्न त्याला पडलेला असतो. मात्र, रोजच्या म्हणण्यानुसार तिचं कुटुंब वंशद्वेषी नसल्याने चिंता करण्याची गरज नसते. श्वेतवर्णीयबहुल भौगोलिक प्रदेशात कृष्णवर्णीय व्यक्ती असणं म्हणजे काय, हा चित्रपटाचा मुद्दा असल्याचं त्यांच्यातील या पहिल्या संभाषणापासूनच अधोरेखित केलं जातं. नंतरही असाच एक प्रसंग घडतो, ज्यात क्रिस आणि रोज तिच्या घरी प्रवास करत असताना एक हरीण त्यांच्या गाडीला येऊन धडकतं. पोलिसांना बोलावल्यानंतर प्रत्यक्षात रोज गाडी चालवत असताना पोलिसांनी क्रिसच्या ओळखपत्राची मागणी करतात. हा प्रसंग साहजिकच व्यवस्थात्मक पातळीवर अस्तित्त्वात असलेला कृष्णवर्णीय नागरिकांप्रतीचा द्वेष दर्शवणारा आहे. 

वंशद्वेषाचा अमेरिकेतील इतिहास बराच जुना असला तरी त्याकडे दुर्लक्ष करीत आणि ओबामाला निवडून दिलं म्हणजे अमेरिका सार्वभौमिक, सर्वसमावेशक राष्ट्र बनलं असा सोयीस्कर (गैर)समज करून घेण्याची चूक बरेचसे लोक करत असतात. ‘आम्ही वंशद्वेषी नाहीत’ हे वाक्य आणि आपल्याकडील ‘आम्ही जातपात मानत नाहीत’ या वाक्यांत फारसा फरक तसा नाहीच. रोजने तिच्या कुटुंबाचं केलेलं वर्णन असंच काहीसं असतं. वडील डीन (ब्रॅडली व्हिटफर्ड) एक न्यूरोलॉजिस्ट, तर आई मिसी (कॅथरीन कीनर) ही मानसोपचारतज्ञ असते. भाऊ जेरेमीदेखील (कॅलेब लॅन्ड्री जोन्स) वैद्यकशास्त्राचा विद्यार्थी असतो. हे कुटुंब रूढ अर्थाने सुशिक्षित आणि उच्चभ्रू आहे. क्रिसने त्यांच्या घराच्या आवारात प्रवेश करताच त्याला हे सगळं चित्र नको तितकं परिपूर्ण आणि निर्दोष असल्याचं जाणवू लागतं. डीन तर म्हणतो की, त्याच्या हातात असतं तर त्याने तिसऱ्या वेळीदेखील ओबामालाच आपलं मत दिलं असतं. या गोष्टी म्हणजे त्यांच्या मनातील अपराधीपणाच्या भावनेतून आलेले विचार असल्याचं दिसतं. या सगळ्या चित्रात खटकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे आर्मिटेज कुटुंबाचे दोन कृष्णवर्णीय नोकर - जॉर्जिना (बेटी गॅब्रिएल) आणि वॉल्टर (मार्कस हेन्डरसन). 

‘गेट आऊट’मधील पीलच्या नायकाचं छायाचित्रकार असणं इथलं एक महत्त्वाचा घटक आहे. या पात्राच्या निमित्ताने श्वेतवर्णीय लोकांनी गजबजलेल्या सभोवतालाकडे एका कृष्णवर्णीय व्यक्तीच्या नजरेतून पाहिलं जातं. ही नजर आर्थिक, सामाजिक पातळीवर स्थिर आणि सुरक्षित अशा व्यक्तीची आहे. त्याला आसपासच्या उणीवा दिसत असल्या तरी त्याच्या प्रिव्हिलेज्ड असण्यामुळे त्याला या दोषांकडे काहीएक प्रमाणात दुर्लक्ष करता येतं. रोजच्या कुटुंबाच्या दोन्ही नोकरांचा त्याच्याप्रतीचा दूरस्थ दृष्टिकोन किंवा त्यांच्या काहीशा नियंत्रित वाटणाऱ्या कृती त्याला खटकत असल्या तरी तो त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतो. याउलट क्रिस ज्याच्याशी फोनवर संपर्कात असतो तो ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये कार्यरत असलेला मित्र, रॉड (लि’ल रेल हॉवरी) मात्र सगळ्या प्रकरणाकडे अधिक साशंक नजरेनं पाहत असतो. त्यामुळे जेव्हा आतापर्यंत वाढत्या तणावाचा विस्फोट होऊन पुढील चक्रावून टाकणारा घटनाक्रम घडू लागतो तेव्हा रॉडचं यंत्रणेचा एक भाग असणं सगळ्या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावतं. पोलिस यंत्रणेतील श्वेतवर्णीय अधिकारी आणि अगदी कृष्णवर्णीय अधिकारीदेखील कृष्णवर्णीय व्यक्तींच्या अपहरणाच्या संभाव्य घटनांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. अमेरिकेतील राजकीय, सामाजिक परिस्थिती आणि वंशद्वेषाचा असलेला घनिष्ठ संबंध दिसून येत राहतो. शिवाय, वंशद्वेषाच्या संभाव्य घटनांना व्यवस्थात्मक पातळीवर दिला जाणारा प्रतिसाद हा किती तोकडा आणि दुरावलेपणाच्या भूमिकेतून आलेला आहे, हे दिसतं. 

 

 

याखेरीज, मोबाईल आणि कॅमेरा या बाबीही इथे महत्त्वाची भूमिका बजावतात. आर्मिटेज कुटुंबाच्या घरी आल्यानंतर क्रिस निरनिराळ्या प्रसंगी त्याच्या कॅमेऱ्याद्वारे सभोवतालाकडे पाहताना दिसतो. जे आधी उल्लेख केल्याप्रमाणे सभोवतालाकडे पाहण्याची एका कृष्णवर्णीय व्यक्तीची नजर ही गोष्ट अधोरेखित करतं. या सगळ्या अति-श्वेत चित्रातील कृष्णवर्णीय व्यक्ती इतक्या सराईतपणे सामान्य कशा वागतात हा प्रश्न क्रिसला सतावत असतो. एका पार्टीमध्ये तो जेव्हा लोगन किंग (लेकीथ स्टॅनफिल्ड) या कृष्णवर्णीय व्यक्तीला भेटतो, तेव्हा त्याचं वागणंही त्याला विचित्र वाटतं. लोगनला कुठेतरी पाहिलं असल्याची भावना त्याच्या मनात निर्माण होते. तो जेव्हा खातरजमा करायची म्हणून त्याचा फोटो काढायला जातो, तेव्हा मोबाईल कॅमेऱ्याच्या फ्लॅश चमकल्याने लोगन मानसिक आणि शारीरिक पातळीवर अस्वस्थ होतो. मोबाईलचा कॅमेरा आणि त्याच्या फ्लॅशद्वारे एका तऱ्हेच्या संमोहित अवस्थेतून जागृत झालेला लोगन या गोष्टींतील संबंध दिसतो. हा संबंध अमेरिकेत घडत असलेल्या कृष्णवर्णीय व्यक्तींच्या हत्या आणि शोषण, वंशद्वेषाच्या घटना मोबाईलवर चित्रित होण्यासाठीचं रूपक म्हणून येतो. 

आता अमेरिकेत घडलेली जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय नागरिकाची एका गोऱ्या पोलिस अधिकाऱ्याकडून घडलेली हत्यादेखील अनेकविध लोकांच्या मोबाईलवर चित्रित झाली आहे. भूतकाळातही अशा हत्येच्या घटना कॅमेऱ्यासमोर घडल्याने उघडकीस आलेल्या आहेत. आणि या हत्यांना प्रतिसाद म्हणून घडलेल्या घटनांमध्ये समकालीन अमेरिकेत घडत असलेल्या जाळपोळ आणि लुटीच्या सत्रासारख्या घटना याआधीही घडल्या आहेत. ‘गेट आऊट’मध्ये जॉर्डन पील राजकीय, सामाजिक संदर्भ वापरत या सगळ्या प्रकाराला एका रूपकाच्या चौकटीत बसवतो. त्यानिमित्ताने अमेरिकेतील वांशिक द्वेषाच्या भयावह इतिहासाकडे एका गडद, उपहासात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जातं. 

 

 

‘अस’मध्ये त्याच्या चित्रपटांतील मुद्द्यांच्या कक्षा अधिक विस्तारल्या जातात. वर्णद्वेषासोबत वर्गभेद आणि अमेरिकन सांस्कृतिक, सामाजिक परिस्थिती त्यात दिसते. ज्याचा परिणाम असा की, सामाजिक, राजकीयदृष्ट्या ‘गेट आऊट’हून अधिक तीव्र अशी कलाकृती समोर मांडली जाते. अॅडलेड (लुपिता न्योन्गो), तिचा पती गेब (विन्स्टन ड्युक) आणि त्यांची दोन मुलं, झोरा (शहादी राईट जोसेफ) आणि जेसन (इव्हान अॅलेक्स) हे कृष्णवर्णीय कुटुंब इथल्या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. विल्सन कुटुंब हे एक उच्चभ्रू कुटुंब आहे. त्यांचं छोटेखानी विश्व हे ‘गेट आऊट’मधील क्रिसइतकंच, किंबहुना त्याहून अधिक आर्थिक, सामाजिक स्थैर्य असलेलं आहे. एका अर्थी त्यांचं वास्तव हे इतर कुणाही कृष्णवंशीय अमेरिकी कुटुंबाहून सर्वस्वी भिन्न आहे. त्यांचा श्वेतवर्णीय लोकांवर आणि अमेरिकन पोलिस यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. उन्हाळ्याची सुट्टी व्यतीत करत असताना त्यांची साथ देणारं टायलर कुटुंबदेखील श्वेतवर्णीय आहे. त्यामुळे विल्सन कुटुंब हे सामान्य कृष्णवंशीय नागरिकांना अमेरिकेत सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या समस्यांपासून अनभिज्ञ आहे. मात्र, हे स्वप्नवत वास्तव फार काळ टिकणारं नाही. ज्यामुळे लवकरच अॅडलेडचा पिच्छा पुरवत असलेला भूतकाळ अखेर तिला गाठतो आणि या कुटुंबाच्या दुःस्वप्नाला सुरुवात होते. 

पील ‘गेट आऊट’मध्ये मानसशास्त्रीय थरारपट आणि भयपट हे दोन प्रकार अगदीच सूक्ष्म स्तरावर हाताळतो. तर, ‘अस’मध्ये तो सर्वस्वी पारंपारिक भयपटाचा ढाचा वापरत त्यातून आपलं विश्व उभारतो. इथली द्विधृवीयता दिसते ती विल्सन आणि टायलर कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या डॉपलगॅंगर्सच्या (एखाद्या व्यक्तीसारखेच दिसणाऱ्या, मात्र स्वभावाने दुष्टप्रवृत्ती असणाऱ्या व्यक्ती) माध्यमातून. पारंपारिक भयपटासारखे घटक वापरत रचलेलं कथानक आणि दृश्य मांडणीच्या पलीकडे जाणारी रुपकात्मता इथे दिसते. या साऱ्या प्रकरणाचा अमेरिकन संस्कृतीशी असलेला संबंध चित्रपटाच्या शीर्षकातही प्रतिबिंबित होतो. ‘अस’ हा शब्द ‘यू. एस.’ या अमेरीकेसाठीच्या संबोधनाकडे बोट करतो. वंशद्वेष आणि पोलिस यंत्रणा यांच्यातील घनिष्ठ संबंध अधोरेखित करण्याच्या पीलचा उद्देश साध्य करणारं ‘फक द पोलिस’ हे गाणंही एके ठिकाणी वापरलं जातं. 

 

 

 

‘अस’बद्दल बोलत असताना लेखक-दिग्दर्शक पील एके ठिकाणी म्हणाला होता की, या चित्रपटातील प्रत्येक संदर्भ हा हेतूपुरस्सर योजिलेला आहे. फक्त त्यातील एखादी गोष्ट तुम्हाला आवडली नसल्यास ती अकस्मात घडलेली आहे असं समजावं. ही वाक्यं या चित्रपटासोबत ‘गेट आऊट’लाही लागू पडतात. कारण, पील जागोजागी असे संदर्भ आणि रुपकं पेरत अमेरिकन समाजव्यवस्थेतील वर्ण, वर्गभेदाकडे प्रखरतेनं पाहणाऱ्या कलाकृती निर्माण करतो. समजा, हे संदर्भ समजले नाहीत किंवा ते बाजूला ठेवून नुसते चित्रपट म्हणून पाहिलं तर त्या विधेतील इतर कुठल्याही प्रभावी कलाकृतीइतकी उत्कृष्ट कामगिरी केलेली असल्याचं दिसतं. 

पील हा वर्तमानासोबतच अमेरिकेतील क्रूर आणि ओंगळवाण्या इतिहासाचं भान असलेला एक सजग दिग्दर्शक आहे, त्याच्या या दोन्ही चित्रपटांमध्ये मांडलेले मुद्दे तसे कायमच महत्त्वाचे राहिलेले आहेत. मात्र, सध्या अमेरिकेत घडत असलेला घटनाक्रम पाहता या दृकश्राव्य सामाजिक रूपककथांना अधिकच महत्त्व प्राप्त झालेलं आहे.