Quick Reads
डाऊनफॉल: एका साम्राज्याचा अस्त आणि पडझड
स्पॉटलाईट सदर
‘डाऊनफॉल’मध्ये अडॉल्फ हिटलर त्याच्या जागतिक राजकीय पटलावरील सर्वोच्च स्थानावर दिसत नाही. कारण या रूपातील हिटलर यापूर्वीही अनेक कलाकृतींमध्ये दिसलेला आहे. ‘डाऊनफॉल’ हिटलरला त्याच्या सर्वाधिक कमकुवत आणि असुरक्षित अशा रुपात समोर आणतो. हिटलरच्या आत्महत्येपूर्वीच्या, त्याच्या बंकरमधील शेवटच्या दीड आठवड्यात असलेली त्याची आणि थर्ड राइखमधील अधिकाऱ्यांची मनःस्थिती इथे दिसते. नाझी जर्मनीचा आणि त्यांच्या सत्तेचं केंद्रस्थान असलेल्या बर्लिनचा पाडाव होण्यापर्यंतच्या घडामोडी इथे दिसतात. अहंकार आणि त्यापायी आपण कमकुवत झालो आहोत हे मान्य करण्याचं धैर्य नसणं या दोन्ही गोष्टी इथे समांतरपणे अस्तित्त्वात असतात.
सत्तेचं राजकारण अनेकदा अहंकाराशी निगडित असतं. यापुढे जात अडॉल्फ हिटलर किंवा त्याच्यासारख्या इतर हुकूमशहांच्याबाबतीत ते पौरुषत्वाशी निगडित असतं. आपली चूक मान्य करणे, किंवा हार पत्करणे हे राष्ट्रप्रमुखपदावरील व्यक्तीच्या स्वभावाला अनुसरून नसतं. ‘डाऊनफॉल’मधील हिटलरच्या (ब्रुनो गान्झ) कृती नेमक्या याच प्रकारच्या असतात. मुळात तो एक हरलेलं युद्ध जिंकण्याचे प्रयत्न करत असतो. आपल्याकडे आवश्यक ते मनुष्यबळ नाही याची जाणीव त्याला नसते किंबहुना आपल्याकडे मनुष्यबळ नाही हे त्याला मान्यच नसतं. त्याच्या सभोवताली असलेल्या थर्ड राइखमधील इतर सर्व अधिकाऱ्यांनी ही वस्तुस्थिती मान्य केली असली तरी आर्य वंशाचे प्रभावशाली वंशज हारू शकतील किंवा खरंतर सरत्या प्रत्येक क्षणानिशी हारत आहेत हे हिटलरच्या गावीच नसतं. तो नकाशावरून हात फिरवत अस्तित्त्वात नसलेल्या जर्मन फौजेच्या पुढील चाली रचत असतो. हिटलरच्या पाठीमागे यातील काही अधिकारी म्हणतात त्या वाक्यात तथ्य असतं - त्याचं वस्तुस्थितीचं भान केव्हाच हरपलेलं असतं. जणू तो नाझी जर्मनी जिंकत आहे अशा एका वेगळ्याच समांतर वर्तमानात जगत असतो.
इथे हिटलरचं क्रौर्य अस्तित्त्वात जरूर आहे, मात्र ते एरवीसारखं अंगावर येणारं नाही. ते करुण आहे असं म्हणणंही काहीसं चुकीचं असेल. कारण ते हतबलता दर्शवणारं अधिक आहे. ही हतबलता चुकीची ध्येयं तितक्याच चुकीच्या मार्गांनी प्राप्त करण्याच्या कृतींमागील मूर्खपणा दर्शवणारी आहे. ही हतबलता सत्तेच्या आधीन झालेल्या हुकूमशहाच्या पराजय न स्वीकारण्याच्या प्रवृत्तीचं दर्शन घडवणारी आहे. एके ठिकाणी हिटलरला सांगितलं जातं की बर्लिनमध्ये ३ दशलक्ष नागरिक आहेत. तर त्याचं प्रत्युत्तर असतं की त्यांचा मृत्यूच आपल्या विजयाची किंमत असेल. तो अशा स्थानावर असतो की जर्मनी हारत आहे असं वाटणारी प्रत्येक व्यक्ती त्याच्या दृष्टीने राष्ट्राच्या दृष्टीने निंदास्पद असा काहीतरी विचार करत आहे. हिटलरची ही अवस्था जोसेफ स्टॅलिन या सोव्हिएत रशियाच्या प्रमुखाहून फारशी वेगळी नाही. स्टॅलिनही त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी प्रत्येक जण आपल्याविरुद्ध कारस्थान रचत आहे या संशयापायी अस्वस्थ झाल्याचं सर्वज्ञात आहे. अर्थात या अस्वस्थतेला या दोघांनी दिलेलं उत्तर सर्वस्वी वेगळं आहे. हिटलर या विचारांमुळे त्याच्या बंदिस्त बंकरमध्ये अधिकाधिक अस्वस्थ आणि हतबल होत जातो, तर स्टॅलिन त्याच्याविरुध्द्व कट करतील अशी शंका असलेल्यांना यमसदनी धाडण्याचं त्याचं काम अविरतपणे सुरु ठेवतो.
‘डाऊनफॉल’ काहीएक प्रमाणात हिटलरच्या तत्कालीन सेक्रेटरीने, ट्रॉड युम् (अलेक्झांड्रा मारिया लारा), लिहिलेल्या ‘अनटिल द फायनल अवर’ या चरित्रावर आधारित आहे. याखेरीज त्याच्या निर्मितीच्या दृष्टीनेही त्याला ऐतिहासिक पातळीवर एक अचूकता लाभलेली आहे. बहुतांशी चित्रपट बंकरमध्ये घडत असल्याने या कालखंडात बर्लिनला बसणारे हादरे दिसतात. उद्ध्वस्त होत असलेलं एक साम्राज्य, एक राष्ट्र दिसतं. कॅमेरा क्वचित बंकरच्या बाहेर पडला तरी तो केवळ उद्ध्वस्त होत असलेलं बर्लिन दाखवण्यासाठीच पडतो. युद्धाची आणि त्यातही पुन्हा हिटलरने जर्मनीला ज्या ठिकाणी आणून ठेवलं त्या कृत्यांची अंगावर येणारी, अस्वस्थ करणारी भयावहता दाखवण्यात चित्रपट कुठेच मागे हटत नाही.
हे सारं चित्र चित्रपटाच्या नावाला, ‘डाऊनफॉल’ या शब्दाला खरं उतरणारं आहे. इथे शब्दशः एका साम्राज्याचा अस्त आणि पडझड होताना दिसते. तीही केवळ भौतिक नव्हे, तर सामाजिक-मानसिक पातळीवरही घडते. जोसेफ आणि माग्डा गोबेल्सच्या रुपात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हिटलरवर नितांत श्रद्धा असलेल्या व्यक्ती दिसतात. सोबत हिटलरने स्वतःला त्याची प्रशंसा करणाऱ्या, त्याच्यावर विश्वास असणाऱ्या लोकांनी कसं वेढून ठेवलं होतं हेही दिसतं. गोबेल्स जोडप्याची त्यावर असलेला विश्वास इथे एका वेगळ्याच अस्वस्थ करणाऱ्या टोकाला जाताना दिसतो. हिटलरनंतर हे जग आपल्या राहण्यालायक नसेल असा त्यांचा विश्वास असल्याने त्याच्यासोबत ते दोघे तर आत्महत्या करायचं ठरवतातच. पण सोबतच हे जग त्यांच्या सहा लहान मुलांनीही जगावेसे नाही इतपत त्यांची खात्री असते. हिटलरने त्यांना किंवा त्यांच्यासारख्या इतर जर्मन नागरिकांना दाखवलेल्या स्वप्नांची, त्याची त्यांच्यावर असलेल्या प्रभावाची कल्पना यावरून करता येते.
हिटलर आणि त्याचे विचार अजूनही बऱ्याचशा लोकांना भुरळ घालत, आकर्षित करत असताना त्याची अतिमहत्त्वाकांक्षी प्रवृत्ती, आक्रमकता, वर्णद्वेषी विचार या साऱ्यांतून निपजलेल्या कृष्णकृत्यांनी जर्मनीला आणि एकूणच जगाला कशा रीतीने विनाशाच्या उंबरठ्यावर आणून सोडलं याच्या चित्रणासाठी ‘डाऊनफॉल’ महत्त्वाचा ठरतो. जगभरात निओ-नाझी गट सक्रिय असण्याच्या आणि जागतिक राजकारणात उजव्या विचारसरणीला महत्त्व आलेलं असताना तर हे चित्रण अधिकच महत्त्वाचे ठरते. मुख्य म्हणजे हे चित्रण ‘डार्केस्ट अवर’मधील (२०१७) चर्चिलसारखे उदात्तीकरण करणारे नाही. इथे हिटलर स्वतःला गोळी झाडून घेताना दिसतो. त्याला गाडत आणि जाळत असल्याचं दृश्य दिसतं. शौर्य, पराक्रम हे इथे अजिबातच नसलेले मुद्दे आहेत. भय आणि उद्ध्वस्तता इथलं वास्तव आहे. बंकरमधील लहान मुलांपासून ते हिटलरच्या आविर्भावात दिसणारी अस्वस्थता इथलं वास्तव आहे. आणि हे वास्तव नक्कीच भयकारक आहे.