Quick Reads

असुरन: हंट, चेझ, रिव्हेंज

स्पॉटलाईट सदर

Credit : V Creations

स्पॉइलर्स अहेड. 

नवदीप सिंगच्या ‘लाल कप्तान’मध्ये (२०१९) काही उत्तम संकल्पना होत्या. त्यापैकी एक म्हणजे कथानकाला मांडणीच्या पातळीवर तीन भागांमध्ये विभागणं. अगदी चित्रपटाचे ट्रेलर्सही याच तऱ्हेने, अनुक्रमे ‘द हंट’ (शिकार), ‘द चेस’ (पाठलाग) आणि ‘द रिव्हेंज’ (सूड) या तीन नावांनी समोर आणण्यात आले होते. वेट्रीमारनचा ‘असुरन’ आणि सदर चित्रपटात तसं काही साम्य नसलं तरी ‘असुरन’बाबत बोलताना मला त्याला याच नावाच्या तीन विभागांमध्ये विभागणं सोयीस्कर वाटतं. ही तिन्ही नावं सुचवतात त्याप्रमाणे मांडणीच्या पातळीवर सदर चित्रपटात काय घडतं ते तसं स्पष्ट आहे. संकल्पनात्मक आणि मांडणीच्या पातळीवर चित्रपटाकडे या तीन भागांच्या निमित्ताने पाहता येऊ शकेल. पैकी पहिले दोन भाग प्रत्येकी चित्रपटाच्या एकूण लांबीपैकी पाऊण तास व्यापतात. नि त्यापाठोपाठ येणाऱ्या भागात मुख्य प्रवाहातील बदल्याच्या प्रसंगांसारखा बडेजाव नसला तरी यातील प्रसंग म्हणजे सूडाचं एक छोटेखानी रूप आहे. तर, चेस आणि रिव्हेंज दरम्यान येणारा (आणखी एक) फ्लॅशबॅक म्हणजे या तिन्ही संकल्पनांचंच एक रूप आहे. 

‘असुरन’चं मध्यवर्ती कथानक तसं साधंसोपं आहे. गावातील एका बड्या प्रस्थाची, वडकुरन नरसिम्हनची (आडुकलम नरेन) हत्या झालेली आहे. या हत्येमागे शिवासामीचं (धनुष) कुटुंब असल्याचं लागलीच स्पष्ट केलं जातं. चित्रपटाला सुरुवात होते तेव्हा शिवासामीचं कुटुंब पोलीस आणि नरसिम्हनच्या संतप्त कुटुंबीयांपासून पळत असतं. शिवासामी आणि त्याचा मुलगा चिदंबरम जंगलात आहेत, तर त्याची पत्नी, मुलगी आणि मेहुणा वस्त्यांमध्ये आसरा घेत फिरत आहेत. त्यामुळे चित्रपटाला सुरुवात होते तेव्हा मुळातच या साऱ्यांचा पाठलाग सुरु असतो. साहजिकच कथनाच्या नि फ्लॅशबॅकच्या माध्यमातून आपल्याला आधीच्या घटना कळत जातात. इथल्या अगदी सुरुवातीच्याच दृश्यात नरसिम्हनचा मुलगा, राजेश (बाला हसन आर.) शिवासामीच्या कुटुंबाला लांडगे म्हणून संबोधतो. त्याच्यापुढे नतमस्तक असणाऱ्या पोलिसांमुळे नरसिम्हन कुटुंबाचं प्रस्थ दिसून येतं. मुख्य म्हणजे या कुटुंबाची मर्जी राखण्यासाठी स्थानिक पोलीस काय करू शकतात हे खुद्द त्यांच्याच तोंडून एकता येतं. पोलीस स्वतः शिवासामीच्या कुटुंबाचा काटा काढण्याची भाषा करतात यातच सारं येतं. 

 

१. द हंट (शिकार): 

सुरुवातीलाच गावाची रचना आपल्यासमोर मांडली जाते. जातीव्यवस्थेची उतरंड, तिचा समाजमनावर असलेला पगडा, जमीनदारांची वर्चस्ववादी, शोषक प्रवृत्ती आणि शोषित दलित, मागासवर्गीय कुटुंबं या साऱ्या गोष्टी समोर दिसत राहतात. ‘असुरन’मध्ये भक्षक आणि भक्ष्याच्या भूमिका वेळोवेळी बदलताना दिसतात. म्हणजे सामाजिकदृष्ट्या शिवासामीचं कुटुंब इथे कायम भक्ष्य असलं तरी कथेच्या पातळीवर ते अनेकदा भक्षकदेखील बनतं. भक्षक या अर्थी की ते पेटून उठून आपल्यावर घडणाऱ्या घटनांचा प्रतिकार करतं. त्यामुळे इथं शिकारीतही एका विशिष्ट अर्थाने सूड आहे, नि उत्तरार्धातील घटना म्हणजे पुन्हा एकदा सूडाचं आणखी एक मोठं रूप आहे. 

या पहिल्या फ्लॅशबॅकमध्ये मध्यवर्ती कथानक आणि सगळ्या घटना स्पष्ट होत जातात. नरसिम्हनचं कुटुंब पैसा आणि सामाजिक वर्चस्वाच्या माध्यमातून गावातील दलित कुटुंबांवर दबदबा निर्माण करू पाहतात. किंबहुना त्यांचा दबदबा आधीपासूनच असतो, मात्र तो दबदबा नजीकच्या भूतकाळात घडत असलेल्या घटनांमुळे कमी होतोय की काय ही भीती त्यांना सतावत असते. नरसिम्हनला शिवासामीच्या कुटुंबाच्या मालकीची जमीन विकत घेता येत नसल्याने तो त्याच्या हद्दीतील पादचारी रस्ते बंद करण्यासारखी कृत्यं करत असतो. याचंच पुढचं रूप म्हणजे स्वतःच्या मालकीच्या जागेभोवती वीजेचा प्रवाह असलेल्या तारांचं कुंपण लावणं. इथली रानडुक्करापासून आपल्या शेतातील पिकाचा बचाव करतानाची घटना म्हणजे अनेक अर्थी पुढे घडणाऱ्या घटनांचं उत्प्रेरक ठरते. विजेचा झटका बसून चिदंबरमच्या कुत्र्याचा झालेला मृत्यू म्हणजे ही ती घटना. ही घटना मारी सेल्वाराजच्या ‘परियेरूम पेरूमल’शी (२०१८) समांतर जाणारी मानता येईल. कुत्रा हा प्राणी दोन्ही ठिकाणी शोषितांवरील अत्याचाराचं रूपक बनतो हे इथलं स्वाभाविक साम्यस्थळ. 

जेव्हा सदर घटनेचा निषेध करत हा मुद्दा नरसिम्हनसमोर उपस्थित केला जातो तेव्हा तो सर्व आरोपांना उडवून लावतो. शिवासामीच्या मोठ्या मुलाने, वेलमुरुगनने (टीजे अरूणासलम) त्याच्यासमोर आवाज चढवून बोलणं त्याला, त्याच्या मुलाला नि त्याच्यापुढे दबून असणाऱ्या शिवासामीलादेखील खटकतं. नरसिम्हन कुटुंबाची वर्चस्ववादी प्रवृत्ती आणि या प्रवृत्तीपुढे दबकून असणारी, प्रतिकार न करणारी मंडळी या दोन्ही गोष्टी इथे वारंवार अधोरेखित केल्या जातात. साहजिकच ‘अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक मोठा गुहेगार असतो’ या तत्त्वावर वेलमुरुगन आणि चिदंबरमचा विश्वास असतो. परिणामी वेलमुरुगन रातोरात शेत आणि पायवाटेभोवतीचं कुंपण काढून टाकतो. नरसिम्हनच्या तथाकथित साम्राज्याला बसलेला हा पहिला धक्का असतो. याखेरीज विहिरीतील पाण्याच्या मुद्द्यावरून शिवासामीची पत्नी, पचैयम्मा (मंजू वॉरियर) आणि वेलमुरुगन यांची नरसिम्हनच्या मुलासोबत झालेली बाचाबाची आणि वेलमुरुगनने त्याला केलेली मारहाण म्हणजे याच प्रतिकार करण्याचं आणखी एक रूप म्हणता येईल. 

asuran

नरसिम्हनच्या अहंकाराला बसलेल्या या दुसऱ्या झटक्याचं रुपांतर वेलमुरुगनच्या बेकायदेशीर अटकेत होतं. नरसिम्हनचं पंचायतीसमोरही उडवाउडवीची उत्तरं देणं आणि मुरुगनच्या सुटकेसाठी शिवासामीने नरसिम्हनच्या कुटुंबातील प्रत्येकासमोर दंडवत घालत माफी मागण्याची अट ठेवणं पुन्हा एकदा समाजातील आर्थिक-सामाजिकदृष्ट्या समाजातील वर्चस्ववादी गटातील शोषक प्रवृत्तीचं दर्शन घडवून आणतं. तर, मधल्या काळात घडलेलं पचैयम्माच्या रुद्रावताराचं दर्शन, मुरुगनचा आक्रमक पवित्रा या गोष्टी पुढील घटनांची पायाभरणी करणाऱ्या मानता येतील. याउलट जवळपास कायमच दारूच्या नशेत असलेला शिवासामी इतका शांत असू शकतो असा स्वाभाविक प्रश्न पडतो. यापाठोपाठ घडणाऱ्या घटना म्हणजे शोषण आणि अपमान यांतून घडतात. इथे शोषण एका विशिष्ट कुटुंबाचं, विशिष्ट जातीय संदर्भांमुळे घडतं. तर, त्यांनी या सगळ्यास केलेला प्रतिकार म्हणजे आपला अपमान अशी समजूत उच्चवर्गीयांकडून बाळगून असतात. हे करत असताना या कुटुंबाच्या मानापमानाचा विचार ना नरसिम्हनसारखे लोक करतात, ना ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा ठेवावी अशी पंचायत करते. उलट या व्यवस्थेकडून झाल्या गोष्टींकडे कानाडोळा करण्याचं सुचवलं जातं. ज्याची परिणीती नरसिम्हनच्या माणसांकडून मुरुगनची हत्या होण्यात होते. या हत्येच्या घटनेत ‘आर्टिकल १५’ (२०१९) ज्या घटनेपासून प्रेरित होता ती घटना, किंवा महाराष्ट्रात घडलेल्या खून आणि अत्याचाराच्या घटनांचा अंश साहजिकपणे जाणवतो. मुरुगनच्या प्रेताचे केलेले हाल, नि त्यापुढे बसून पचैयम्माने फोडलेला हंबरडा खोलवर कुठेतरी चिरत जातो. 

इथे हत्या दोन लोकांच्या आणि दोन तऱ्हेच्या घडतात. एक हत्या मुळातच आपला दबदबा कायम राखण्यासाठी केली जाते. तर, दुसरी हत्या या हत्येचा एक प्रकारचा सूड म्हणून केली जाते. अर्थात इथे सूडापेक्षा आपल्यावर झालेल्या अत्याचाराला या ना त्या प्रकारे उत्तर देण्याची भावना अधिक असते. तर, इथे घडलेल्या हत्येपेक्षा ती आपल्या पतीने किंवा भावाने न करता धाकट्या मुलाने केली याचं पचैयम्माला असलेला तक्रार-वजा-दुःख म्हणजे वेट्रीमारनचा काळा विनोद मानता येईल. 

asuran २

 

२. द चेझ (पाठलाग): 

चित्रपटाला सुरुवात होते तेव्हा सदर कुटुंबाचा पाठलाग सुरु झालेला असतो. हा पाठलाग दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरु असतो. एकीकडे पोलीस त्यांना शोधत असतात, तर दुसरीकडे पोलिसांना न जुमानता शिवासामीच्या कुटुंबाला स्वतः उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने नरसिम्हनच्या मुलाने नेमलेली माणसं त्यांचा शोध घेत असतात. आपल्या वडिलांची हत्या करणाऱ्या कुटुंबातील एकही पुरुष जिवंत ठेवायचा नाही असा आदेश त्याने दिलेला असतो. त्याचं म्हणणं मान्य करणारे आणि त्याला खुश करण्यासाठी ‘तुम्ही कशाला त्रास करून घेता, आम्ही कायदेशीर मार्गाने त्यांचा काटा काढू’ म्हणणारे पोलीस दिसतात. हे सारं सुरु असताना दुसरीकडे बंधूभावाने शिवासामीला मदत करणारी इतर दलित कुटुंबं दिसतात. नि पुन्हा या कुटुंबांनी त्याला मदत केली म्हणून त्यांना मारहाण करणारी नरसिम्हनच्या मुलाची माणसं दिसतात. असाच विरोधाभास इथल्या दर दुसऱ्या दृश्यात दिसून येत राहतो. 

इतका वेळ शिवासामी हा केवळ दारू पिऊन नशेत असणारा, आपल्या मुलांवर प्रेम असलं तरी पारंपरिक दृष्टिकोनानुसार लादल्या जाणाऱ्या जात आणि वर्गाधारित विषमतेच्या, एक प्रकारच्या गुलामगिरीच्या संकल्पना मान्य करणारी व्यक्ती म्हणून दिसलेला असतो. या भागात मात्र जेव्हा आपल्या धाकट्या (नि आताच्या परिस्थितीनुसार एकुलत्या एका) मुलाच्या जीवावर उठलेले लोक समोर येतात, तेव्हा शिवासामी पेटून उठतो. इथल्या प्रसंगात पार्श्वभूमीवर सुरु असणारं जोशपूर्ण, एकप्रकारे विजयोत्सव साजरं करणारं संगीत त्याच्या या मानसिक स्थित्यंतराला अचूकपणे साथ देतं. तासाभरात पहिल्यांदाच धनुष त्याच्या खाली मान करून उभ्या असलेल्या अवतारातून बाहेर पडतो. 

या प्रसंगानंतर शिवासामीच्या पूर्वायुष्याची कथा सांगणारं सविस्तर प्रकरण उलगडतं. आधी उल्लेख केल्याप्रमाणे हा भागही एकूण चित्रपटाच्या मांडणीनुसार दलित कुटुंबावर घडणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या घटना, त्यांच्या हत्या आणि त्यानंतरचा सूडाचा भाग अशा प्रकारे समोर येतो. मूळ चित्रपटाच्या कथानकादरम्यान, पाठलाग नि शेवटच्या सूडाच्या दरम्यान येणारा हा भाग म्हणजे एकुणातच अशा जातीय भेदभाव आणि अत्याचाराच्या घटना वर्षानुवर्षे घडत आल्याचं अधोरेखित करतो. याआधी चित्रपटात घडणारी मुरुगनची हत्या, त्याचा मृतदेहाची छिन्नविछिन्न अवस्था आणि शिवासामीच्या पूर्वायुष्याच्या प्रकरणात घडणारी घटना यांच्यात तसा फारसा फरक नाही. कुठलीतरी व्यक्ती एका विशिष्ट वर्गातून, समूहातून आली आहे या कारणामुळे तिला मुलभूत मानवी, नागरी हक्क नाकारले जाणं नि तिचं शोषण केलं जाणं हा समान धागा इथे आहे. वेळ बदलते, जागा बदलते, शोषण करणारी आणि ज्यांचं शोषण झालं ती माणसं बदलतात, घटनांची तीव्रता बदलते मात्र घडलेल्या घटनांमागील कारणं तीच असतात. 

asuran ३

इथे पुढे येणाऱ्या गोष्टींच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला आणखी एक मुद्दा दिसतो, तो म्हणजे खुद्द शोषित व्यक्तीलाच स्वतःमध्ये बदल करावे लागतात. शिवासामीला त्याच्या भूतकाळातही वर्चस्ववादी प्रवृत्तींमुळे स्वतःच्या आयुष्यात बदल करावे लागतात, नि त्याच्या वर्तमानातही. पाठलाग कसाबसा संपतो, मात्र लागलीच या अपेक्षित बदलाची नांदी वाजते. आणि इतकं करूनही सध्या प्रस्थापित झालेली शांतता टिकेलच याची शाश्वती नसते. 

 

३. द रिव्हेंज (सूड): 

‘असुरन’मधील जवळपास सर्वच घटनांच्या केंद्रस्थानी सूड ही संकल्पना आहे. अन्याय, प्रतिकार, अपमान, सूड, पुन्हा अपमान, नि पुन्हा सूड अशा या चक्रात वारंवार कुणी ना कुणी सूडाच्या हट्टाने पेटलेलं असतं. आपल्या आईचा अपमान झाल्याने नि आपल्या शोषणाचा प्रतिकार म्हणून मुरुगन नरसिम्हनच्या मुलाशी वाद घालतो - अन्याय नि प्रतिकार. मुलाचा अपमान म्हणजे आपला अपमान असं नरसिम्हन मानतो नि तो मुरुगनला बेकायदेशीररीत्या अटक करतो - अपमान, सूड. मुरुगन सुटावा म्हणून शिवासामीला मानहानी सहन करावी लागते, ज्यामुळे मुरुगनची सुटका होते, पण त्याला वडिलांच्या अपमानाबद्दल कळलं की त्याला राग अनावर होतो नि तो नरसिम्हनला एकट्यात गाठून मारहाण करतो - अपमान, सूड नि पुन्हा अपमानाची घटना. घटना बदलतात, व्यक्ती बदलतात, घटनांची तीव्रता बदलते. मात्र, त्यांच्या मुळाशी असलेली कारणं कमीअधिक फरकाने तीच राहतात. शिवाय, या सगळ्या प्रकरणामध्ये जातीय भेदभाव, शोषण आणि अत्याचाराचाही दृष्टिकोन असतोच. 

शिवासामीच्या पूर्वायुष्यातील प्रकरणातही त्याला सूडाने पेटून उठत शस्त्रं उचलावी लागतात. त्यावेळी पार्श्वभूमीवर वाजणारं गाणं आपल्याला एकप्रकारे या सूडाची गरज समजावून देऊ पाहतात. सगळ्या तऱ्हेचे अत्याचार घडूनही पुन्हा शेवटी ‘असुरन’ अर्थात दैत्य ठरतो तो शिवासामी. वर्तमानातही फारसं वेगळं घडत नाही. त्याला शस्त्रं उचलावीशी वाटत नाहीत. तो कायद्याच्या शरण जाऊ पाहतो. पुन्हा एकदा त्याच्यावर झालेल्या अन्यायामुळे त्यालाच स्वतःचं नाही म्हटलं तरी काही प्रमाणात स्थैर्य असलेलं जीवन, आणि कुटुंब यांपासून दूर जावं लागतं. ‘असुरन’मध्ये वेट्रीमारनच्या शैलीच्या अगदी विरुद्ध जात एखाद्या मुख्य प्रवाहातील चित्रपटाला शोभेलशा पद्धतीने सगळा संदेश खुद्द पात्रांच्या तोंडून प्रेक्षकांना ऐकवला जातो. हे सगळं तसं पाहता रटाळ असलं तरी शेवटी हा मुख्य प्रवाहातील चित्रपट आहे हे लक्षात घ्यायला हवं. वेट्रीमारनकडून इतकी सोपी वाट चोखाळण्याची अपेक्षा नसली तरी ती निवडली असल्यास त्यात फारसं गैर काही वाटत नाही. साहजिकच शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा संदेश धनुषच्या तोंडून ऐकवला जातो. 

शेवटी सूड घेतला गेला तरी या साऱ्या पात्रांना काय मिळतं आणि ती काय गमावतात याचं गणित केल्यास इथला या स्वाभाविक संदेशाचा पलीकडील अधिक सूक्ष्म मुद्दा लक्षात येईल. इथे शोषण करणारे लोक त्यांचे प्राण गमावतात हे स्वाभाविक आहे. मात्र, काहीच चूक नसताना शोषित व्यक्तीदेखील त्यांचं आर्थिक, सामाजिक, मानसिक, कौटुंबिक स्थैर्य गमावतात. शिवासामीच्या कुटुंबाच्या हत्येचे प्रयत्न होत असताना पंचायतीचे सदस्य दुमजली इमारतीवरून सगळं काही अगदी अंगावर काटा आणणाऱ्या निर्विकार नजरेने पाहत असतात. शेवटी त्यांना न्यायासाठी झगडावं लागतं, स्वतः शस्त्रं हाती घ्यावी लागतात. इतकं करूनही त्यांच्या हाती काय लागतं, तर काहीच नाही. हीच परिस्थिती बदलायला हवी हे ‘असुरन’ सांगू पाहत असावा. भलेही चित्रपटाचा दृष्टिकोन साधासोपा असला तरीही. त्याच्या नावात असूर असलं तरी अशा असुरांची निर्मिती करणारी व्यवस्था बदलायला हवी, हे तो सांगत असावा. लहानपणापासून देवादिकांच्या कथा ऐकण्याची, पाहण्याची सवय असली तरी यावेळी फॉर अ चेंज म्हणून ही ‘असुरन’ची कथा पाहण्यास हरकत नाही.