Quick Reads

नायक जगलेल्या अभिनेत्यांच्या अस्तित्ववादाचा उहापोह

स्पॉटलाईट सदर

Credit : Indie Journal

आत्मपूजा आणि आत्मद्वेष या संकल्पना द्विध्रुवीय वाटत असल्या तरीही अनेकदा त्या एकाचवेळी अस्तित्त्वात असू शकतात. आत्मप्रौढी आणि अतिआत्मविश्वासामुळे निर्माण झालेल्या महत्त्वाकांक्षांची पूर्ती न झाल्याने त्यातून स्वानुकंपा (self-pity) किंवा मग आत्मद्वेषाची निर्मिती होऊ शकते.आणि बऱ्याचदा स्वानुकंपेचा मार्ग एक्झिन्स्टेशियल किंवा मग मिड-लाइफ क्रायसिसच्या माध्यमातून जातो. 

अलेहान्द्रो गोन्झालेझ इनारितु दिग्दर्शित ‘बर्डमॅन ऑर (द अनएक्स्पेक्टेड व्हर्च्यू ऑफ इग्नोरन्स)’ आणि राफेल बॉब-वाक्सबर्ग कृत ‘बोजॅक हॉर्समन’ या दोन्हींमध्ये असलेल्या अनेक साम्यांपैकी एक म्हणजे त्यांतील नायकांचा एक्झिन्स्टेशियल क्रायसिस. इथले दोन्ही नायक गेल्या अनेक दशकांपासून शो बिझनेसमध्ये कार्यरत आहेत. एकेकाळी व्यावसायिक कारकीर्दीच्या आणि यशाच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्या नायकांना व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवर शेवटचं यश मिळून कित्येक वर्षं उलटली आहेत. ‘बर्डमॅन’मधील रिगन (मायकल कीटन) हा एकेकाळी प्रसिद्ध अशा ‘बर्डमॅन’ नावाच्याच सुपरहिरो चित्रपट मालिकेतील शीर्ष भूमिकेत होता. मात्र, त्या भूमिकेला कंटाळून त्याने मालिकेतील चौथा चित्रपट करण्यास नकार दिला. त्यानंतरची त्याची व्यावसायिक कारकीर्द मात्र मर्यादित प्रमाणात यश लाभलेली राहिली. ‘बोजॅक हॉर्समन’मधील बोजॅकदेखील (विल आर्नेट) नव्वदच्या दशकात ‘हॉर्सिंग अराउंड’ नावाच्या एका यशस्वी सिटकॉममधील मुख्य भूमिकेत काम करत होता. ती मालिका संपल्यानंतर मात्र त्याचीही व्यावसायिक कारकीर्द फारशी समाधानकारक राहिलेली नाही. 

“And did you get what you wanted from this life, even so?

I did.

And what did you want? 

To call myself beloved, to feel myself beloved on the earth.” 

रेमंड कार्व्हरच्या ‘लेट फ्रॅग्मेण्ट’मधील ही वाक्यं ‘बर्डमॅन’ आणि ‘बोजॅक हॉर्समन’ या दोन्ही कलाकृतींमधील समान संकल्पना समर्पकपणे व्यक्त करतात. रिगन आणि बोजॅक दोघांनाही प्रतिष्ठा आणि यश हवं आहे. आपल्यावर प्रेम करणारं कुणीतरी हवं आहे. फक्त फरक असा आहे की, वरचं वाक्य म्हणणाऱ्या पात्राला हे मिळालं आहे, याउलट रिगन आणि बोजॅक हे दोघेही यापासून वंचित राहिलेले आहेत. 

 

 

सुरुवातीला आत्मपूजक व्यक्तिमत्त्वांचा उल्लेख करण्यामागील कारणही या दोघांच्या व्यक्तीविशेषांत दडलेलं आहे. मुळात दोघांमध्ये नार्सिसिस्टिक वैशिष्ट्यं असल्यानेच ‘मी कसा अयशस्वी असू शकतो?’ अशा अर्थाची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. दोघांच्याही आयुष्यात काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य असलं तरी मानसिक आणि भावनिक स्थैर्य नाही. रिगनचा घटस्फोट झालेला आहे, नि आता तो त्याची सहकलाकार असलेल्या लॉरासोबत (अँड्रिया राईजबरो) असलेल्या नात्यातही समस्या आहेत. ज्यांचं मूळ पुन्हा त्याचा महत्त्वाकांक्षी स्वभाव, त्याचं अपयश यांत आहे. यासोबत त्याच्या अवतीभवती असलेले सगळे लोक त्याच्याकडे कोणत्या नजरेनं पाहतात यातही त्याची विफलता दडलेली आहे. त्याच्या कारकीर्दीच्या नादात त्याचं त्याच्या मुलीकडे, सॅमकडे (एमा स्टोन) आणि एकुणातच वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष झालं. सॅम ड्रग्जच्या विळख्यात अडकली. बर्डमॅनचा चौथा भाग न आल्याने त्याच्या कारकिर्दीलाही उतरती कळा लागली. सॅमच्या मनात त्याच्याविषयी कदापिही आदर उरलेला नाही. त्यामुळेच त्याच्यासोबतच्या एका शाब्दिक चकमकीत त्याच्या नाटकाबाबत बोलताना ती म्हणते, “लेट्स फेस इट, डॅड, इट्स नॉट फॉर द सेक ऑफ आर्ट. इट्स बीकॉज यू वॉन्ट टू फील रेलेव्हन्ट अगेन… यू आर डुइंग धिस बीकॉज यू’आर स्केअर्ड टू डेथ, लाईक द रेस्त ऑफ अस, दॅट यू डोन्ट मॅटर. अँड यू नो व्हॉट? यू’आर राईट. यू डोन्ट. इट्स नॉट इम्पॉर्टन्ट. यू आर नॉट इम्पॉर्टन्ट. गेट युज्ड टू इट.” त्याचं अपयश त्याला मान्य नसलं तरी तिने आणि त्याच्याभोवती असलेल्या इतरांनी ते मान्य केलेलं आहे. 

बोजॅकला ‘हॉर्सिंग अराउंड’नंतर मोठं यश मिळालेलं नाही. तो कधीच एखाद्या दीर्घकाळ टिकून राहिलेल्या नात्यात राहिलेला नाही. त्यामुळे वयाच्या पन्नाशीतही त्याला वन नाईट स्टँडवर अवलंबून राहावं लागतं. त्याच्या मानसिक उद्विग्नतेचं मूळ त्याच्या लहानपणात दडलेलं आहे. त्याच्यावर कायम नाराज असणाऱ्या आणि अपमानास्पद वागणूक देणाऱ्या वडिलांमुळे त्याच्या मनावर झालेल्या घावांनी त्याच्या संपूर्ण आयुष्यावर न पुसता येणारा प्रभाव टाकलेला आहे. रिगन आणि बोजॅक या दोघांनाही त्यांचं हे व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही पातळ्यांवरील अपयश अस्वस्थ करतं. वरवर पाहता या भावना लपवण्यासाठी ते विनोदाचा, उपहास आणि निंदेचा आधार घेतात. प्रत्यक्षात मात्र त्यांचे विचार विषण्णतेनं ग्रस्त आहेत. त्यांना अस्तित्त्ववादी प्रश्न छळत आहेत. अर्धंअधिक आयुष्य उलटून गेलेलं असतानाही काही लक्षणीय कामगिरी केलेली नसणं, किंवा अगदी त्यांना मानसिक स्थैर्य प्राप्त करून देणारी कामगिरी केलेली नसण्याची भवना त्यांना छळते. अँग्झायटी आणि नैराश्य या भावना कायम त्यांच्यासोबत असतात. मात्र, हे दोघेही या प्रश्नांना आणि समस्यांना सामोरं जाण्यापेक्षा त्यांचं अस्तित्त्व अमान्य करण्यातच धन्यता मानतात. 

 

 

त्यामुळेच रिगन रेमंड कार्व्हरच्या ‘व्हॉट वुई टॉक अबाऊट व्हेन वुई टॉक अबाऊट लव्ह’ या लघुकथेचं नाटकात रुपांतर करतो आहे. या नाटकात आपला सगळा पैसा आणि प्रतिष्ठा पणाला लावतो. दुसरीकडे, ‘बोजॅक हॉर्समन’च्या पहिल्या सीझनमध्ये बोजॅकदेखील त्याच्या आत्मचरित्रावर काम करत असतो. त्याच्या मते हे आत्मचरित्र त्याला पुन्हा प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवेल. पुन्हा एकदा, दोघांमध्ये असलेलं साम्य दिसू शकेल. 

‘ब्रेकिंग बॅड’मधील वॉल्टर व्हाईट (ब्रायन क्रॅन्स्टन) एके ठिकाणी त्याने आयुष्यात जे काही केलं त्याचं समर्थन करताना म्हणतो, “आय डिड इट फॉर मी. आय लाइक्ड इट. आय वॉज गुड ट इट. अँड... आय वॉज रिअली… आय वॉज अलाइव्ह.” रिगन आणि बोजॅक मात्र असंही म्हणू शकत नाहीत. कारण, नाही म्हणायला त्यांनी त्यांच्या आत्मकेंद्री वृत्तीमुळे जे काही केलं ते स्वतःसाठी केलेलं असलं तरी वॉल्टरला किमान मानसिक समाधान तरी मिळालं होतं. या दोघांबाबत तेही घडलेलं नाही, आणि नेमकी हीच गोष्ट त्यांना छळत आहे. 

‘बर्डमॅन’ आणि ‘बोजॅक हॉर्समन’ दोन्हीही कलाकृती या शो बिझनेसवरील उपरोधिक भाष्य असले तरी त्यातील पात्रं आणि भावनिक गुंतवणूक त्यांना अधिक प्रभावी बनवते. त्यांच्या समस्यांचं केलेलं टिपण तितकंच समर्पक असल्याने अशी भावनिक गुंतवणूक होणं शक्य होतं. अहंकार आणि आत्मप्रौढीच्या त्यांच्या आयुष्यातील अस्तित्त्वाला सूक्ष्म निरीक्षणाच्या छटा आहेत. संकल्पनांच्या दृष्टीने विचार केल्यास अस्तित्त्ववाद, शून्यतावाद, निराशावाद आणि त्यातून आलेलं नैराश्य, खिन्नता अशा कित्येक गडद छटा इथे असल्या तरी या कलाकृती सायमल्टिनिअसली रंजक आणि विनोदी राहतात यातच त्यांचं विलक्षण प्रभावीपण आहे. या दोन्ही नायकांची वयं किंवा त्यांचा व्यवसाय जरी आपल्याला रिलेटेबल वाटणारा नसला तरी त्यांच्या भावना आपल्याला नातं सांगता येतील अशा आहेत. आणि त्यामुळेच अभिनेत्यांच्या एक्झिन्स्टेशियल क्रायसिसच्या या दोन्ही गोष्टी समकालीन चित्रपट आणि मालिकांमध्ये आपलं लक्ष वेधून घेतात.