Quick Reads

‘टेड लॅसो’: दिलासादायक पलायनवाद

स्पॉटलाईट सदर

Credit : ऍप्पल टीव्ही/इंडी जर्नल

गेल्या काही काळातील अनेक लोकप्रिय कलाकृतींमध्ये दोषैकवृत्ती आणि निराशावाद दिसून येतो. (उदा. रिकी जर्वेसची ‘आफ्टर लाइफ’ किंवा डेमियन लिन्डलॉफची ‘वॉचमेन’ या मालिका.) चित्रपट, मालिका आणि अगदी बातम्यांमधून सातत्याने दिसणारा गडद आशय आणि नकारात्मकता एका ठरावीक टप्प्यानंतर उबग आणणारी बनू शकते. मग, अशा आशयाचा उबग आल्यानंतर काय पाहायचे, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्याचं उत्तर म्हणून ‘टेड लॅसो’ सारख्या मालिका समोर येतात. 

 

 

मालिकेतील शीर्षक पात्र, म्हणजेच टेड लॅसो (जेसन सुडेकिस) हा एक अमेरिकन फुटबॉल प्रशिक्षक आहे. अमेरिकेतील त्याच्या संघाने विजय मिळविल्यानंतर आनंदाने मनसोक्त नाचत असणाऱ्या टेड लॅसोचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होतो आणि त्याला थेट ब्रिटनमधील ‘ए.एफ.सी. रिचमंड’ नावाच्या एका क्लबचा प्रशिक्षक बनण्याची संधी मिळते. आता अमेरिकेतील फुटबॉल आणि जगभरात खेळला जाणारा फुटबॉल (अर्थात सॉकर) या दोन्हींमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. साहजिकच, लॅसोला सॉकरचा काहीच अनुभव नसल्याने रिचमंडमधील खेळाडू, तिथले पत्रकार आणि तिथले चाहते त्याच्या नियुक्तीबाबत रागावलेले आहेत. अशावेळी स्वतःला सिद्ध करण्याचं मोठं काम कोच लॅसोला करावं लागणार आहे. आणि त्याच्याकडे एक नामी ताकद आहे, ती म्हणजे त्याची सकारात्मकता. आणि सकारात्मकता हे ‘टेड लॅसो’चे (पात्र आणि मालिका, दोन्ही) बलस्थान आहे.

केवळ इंटरनेटवरील एका प्रसिद्ध व्हिडिओमुळे सॉकरचा काहीच अनुभव नसणाऱ्या टेडची नियुक्ती होते, हे काही पटण्यासारखे नसते. मात्र, मालिकेत यामागे एक कारण दिलं जातं. रिबेका वेल्टन (हॅना वॅडिंगहॅम) हिचा घटस्फोट झाल्यानंतर तिच्या पतीच्या मालकीचा क्लब तिला मिळतो आणी ती रिचमंड क्लबची नवीन मालकीण बनलेली असते. रुपर्ट मॅनियन (अँथनी हेड) या तिच्या खुशालचेंडू पतीने विवाहबाह्य संबंध ठेवून तिची फसवणूक केलेली असल्याने ती रागावलेली असते. रुपर्ट मॅनियनला त्याचा क्लब अतिप्रिय असल्याने या क्लबची प्रतिष्ठा उद्ध्वस्त करून सूड मिळवण्याचा तिचा उद्देश असतो. आणि रिबेकाच्या तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीवर कुरघोडी करण्याच्या या योजनेत टेड लासो हाकनाक अडकलेला असतो. मात्र, कुठलीच समस्या टेड लासो या भल्या माणसाला चांगली कामं करण्यापासून अडवू शकत नसते. सगळ्या समस्या सोडवून प्रत्येकाच्या दृष्टिकोनात, समोरच्या परिस्थितीत बदल घडवून आणण्याचे काम तो करू लागतो. 

 

सकारात्मकता हे ‘टेड लॅसो’चे (पात्र आणि मालिका, दोन्ही) बलस्थान आहे.

 

आता टेड लॅसोचे रिचमंडच्या संघात बदल करू पाहण्याचे प्रयत्न हे काहीसे क्लिशेड् असले तरी मालिकेच्या लिखाणात इतरत्र दिसणारे चातुर्य, उत्तमरीत्या लिहिलेली (आणि अभिनेत्यांनी प्रामाणिकपणे रंगवलेली) पात्रं आणि मालिकेतील आशयातून प्रसुत होणाऱ्या सकारात्मक भावना अपेक्षित तो परिणाम साधतात. परिणामी मालिकेतील अनेक गोष्टी आवडून जातात. 

 

‘टेड लॅसो’मधील सर्वसमावेशकता, एकता आणि मैत्री 

कोच बीअर्ड (ब्रेन्डन हन्ट) हा टेड लासोचा बऱ्याच वर्षांपासूनचा सहाय्यक आणि मित्र आहे. लॅसोच्या अतिबोलक्या आणि उत्साही व्यक्तिमत्त्वाच्या अगदी विरुद्ध म्हणावासा असा हा त्याचा मित्र. मितभाषी आणि काहीसा गूढ कोच बीअर्ड आणि लॅसोमधील मैत्री ही अगदी हेवा वाटावी अशी आहे. दोघे एकमेकांची वाक्यं पूर्ण करू शकतात किंवा काहीच न बोलताही एकमेकांच्या मनातील भावना ओळखू शकतात, अशी त्यांची मैत्री! मात्र, टेडची मैत्री ही काही बीअर्डपुरती मर्यादित नाही. लॅसोचा स्वभाव आणि त्याची काम करण्याची शैली ही अधिक सर्वसमावेशक स्वरुपाची आहे. त्यामुळेच इंग्लंडमध्ये आल्यानंतर रिचमंड क्लबमधील कनिष्ठ पदावर काम करणाऱ्या नेदन शेलीसोबत (निक मोहमद) त्याची मैत्री होते. जो कुणाच्या खिजगणतीमध्येही नव्हता आणि ज्याला कुणी त्याचं नावही विचारत नव्हतं असा नेदन, लॅसो आणि बीअर्ड यांचा उजवा हात बनण्यामागे कोच लॅसोच्या सर्वसमावेशकतेचा मोठा वाटा असतो. त्यामुळेच त्याचा संघातील खेळाडूंमध्ये सुसंवाद घडवून आणण्याचा मार्ग सुकर होतो. लेज्ली हिगिन्स (जेरेमी स्विफ्ट) या रिचमंडमधील आणखी एका दुर्लक्षित कर्मचाऱ्याला लॅसोने दिलेली वागणूकदेखील अशाच प्रकारची असते. 

 

 

स्त्रीवादी चळवळीच्या दुसऱ्या लाटेत ‘सिस्टरहूड’ (भगिनीत्व) ही महत्त्वाची संकल्पना समोर मांडली गेली. ज्यातून स्त्रियांमधील पारंपरिक नात्यांऐवजी किंवा पदानुक्रमाऐवजी आपापसातील मैत्रीपूर्ण संबंध आणि ऐक्य जोपासण्याचा विचार मांडण्यात आला होता. पुढे या संकल्पनेबाबत बरेच वाद-प्रतिवाद झाले असले, तरी स्त्रीवादात या संकल्पनेला आणि या संकल्पनेतून ध्वनित होणाऱ्या सकारात्मक आशयाला महत्त्व आहे, हे जरूर. इथे या संकल्पनेचा उल्लेख करण्याचे कारण हे की, ‘टेड लॅसो’मधील स्त्री पात्रांमध्ये अशाच प्रकारचे भगिनीत्व दिसून येते. मालिकेला सुरुवात होते तेव्हा कीली जोन्स (जुनो टेम्पल) ही रिचमंड क्लबमधील स्टार खेळाडू जेमी टार्टची (फिल डन्स्टर) प्रेयसी असते. सुरुवातीला कीली रिचमंडची मालकीण असणाऱ्या रिबेका वेल्टनचे वर्णन ‘उंच, धिप्पाड आणि भीतीदायक’ अशा शब्दांत करते. हॅना वॅडिंगहॅम या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम अभिनेत्रीने निभावलेल्या या पात्राची शरीरयष्टी तशीच असते! मात्र, लवकरच कीली तिच्या या प्रभावातून बाहेर येते आणि त्या दोघींमधील मैत्रीची सुरुवात होते. आता इथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, रेबेका ही नुकतीच घटस्फोट झालेली, वयाच्या चाळिशीतील स्त्री आहे. त्यात ती बऱ्याचदा उल्लेख करते त्यानुसार, तिच्या स्त्रीलंपट पतीने कितीही चुका केल्या, तरी हा समाज त्याच्या चुका पदरात घेतो.

ती म्हणते त्यानुसार, अशा प्रकरणांमध्ये पुरुषांना कुठल्याच प्रकारचे परिणाम भोगावे लागत नाहीत. या सगळ्या भोवतालात रेबेकाच्या मनात बऱ्याच प्रकारच्या अँक्झायटी निर्माण झालेल्या आहेत. समाज (आणि मीडियाने) स्त्रीची जी प्रतिमा उभी केली आहे त्या प्रतिमेवर खरं उतरण्याचे प्रयत्न करताना तिची दमछाक होते. अशावेळी कीलीशी तिची झालेली मैत्री रिबेकाच्या मनातील अँक्झायटी दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. वयाच्या चाळिशीत आपण अमुक एक प्रकारचा ड्रेस घालून वावरू शकू की नाही इथपासून ते बॉडी इमेजपर्यंत अनेक समस्या/प्रश्न तिच्या मनात उद्भवलेले असतात. कीलीने तिच्या सौंदर्याचे कौतुक केल्याने आणि ती आकर्षक असल्याचं वेळोवेळी म्हटल्याने रिबेकाच्या मनातील तिची स्वतःची प्रतिमा अधिक उजळून निघण्याचे काम होते. त्यामुळे बॉडी पॉजिटिविटी आणि भगिनीत्वाचे हे समाधानकारक रूप ‘टेड लॅसो’मध्ये पाहायला मिळते. 

याखेरीज, इथली मैत्री ही केवळ दोन पुरुष किंवा दोन स्त्रियांपुरती मर्यादित नक्कीच नाही. रेबेका आणि टेड लासो किंवा टेड आणि कीली यांमध्येही मैत्रीपूर्ण संबंध पाहायला मिळतात. लॅसो रोज सकाळी रेबेकासाठी घेऊन येत असलेली बिस्किटे ती बिनधास्तपणे खाऊ शकते, याकडेही डायट वगैरेच्या फिकिरीपासून मुक्त असणाऱ्या रेबेकाचा बॉडी पॉजिटिविटीशी येणारा संबंध म्हणून पाहता येऊ शकते. हेच कीली आणि लॅसो यांच्यातील नात्याबाबत म्हणता येईल. रिबेकाच्या रुपर्ट मॅनियनसोबतच्या नात्यातील वाईट अनुभवांमुळे तिच्या जगाकडे आणि अगदी स्वतःकडे पाहण्याच्य दृष्टिकोनात अनेक परिणाम झालेले असतात. या दृष्टिकोनात बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने तिची आणि इतरांची मैत्री महत्त्वाची भूमिका बजावते. (स्त्री-पुरुष नातेसंबंध आणि मैत्रीच्या चित्रणाच्या दृष्टीने मालिकेच्या पहिल्या सीजनमधील चौथा भाग ‘फॉर द चिल्ड्रेन’ माझ्या काही आवडत्या भागांपैकी एक बनला आहे.) 

 

सकारात्मकता आणि पुढे… 

ट्रेन्ट क्रिम या पत्रकाराला टेड लॅसो म्हणतो, “For me, success is not about the wins and losses.” मालिकेचा पहिला सीजन ज्या टप्प्याला येऊन थांबतो, तेव्हा त्याच्या या वाक्याची पुन्हा आठवण येते. कारण, मागे वळून पाहिल्यानंतर यशापयशापेक्षा टेड लासोने रिचमंडच्या संघातील खेळाडू, तिथले कर्मचारी आणि त्याचा ज्या कुणाशी संबंध आला त्या सर्वांचे आयुष्य ज्या प्रकारे समृद्ध केले, त्याला अधिक महत्त्व असल्याचे लक्षात येते. 

 

 

इंग्लंडमधील सगळे लोक टेडला सांगत असतात की, ‘इट्स द होप दॅट किल्स यू’. पण, लॅसो म्हणतो, ‘इट्स द लॅक ऑफ होप दॅट किल्स यू’. लॅसोच्या या वाक्याची आपण सर्वांना कधी नव्हे इतकी गरज आज आहे. तसंही लॅसो पूर्वी ‘द शॉशॅन्क रिडेम्प्शन’मध्ये आणखी एक ज्ञानी पुरुष म्हणून गेलेला आहेच, “होप  इज अ गुड थिंग, मेबी द बेस्ट ऑफ गुड थिंग्ज, अँड नो गुड थिंग एव्हर डाइज.” 

(२०२१ च्या एमी पुरस्कार सोहळ्यात बरेचसे महत्त्वाचे पुरस्कार पटकावणाऱ्या ‘टेड लासो’चा दुसरा सीजन कालच पूर्णत्वास आलेला आहे. ही मालिका ‘ॲपल टीव्ही;वर पाहता येऊ शकते.)