Quick Reads

मनुसंगडा: मरणोपरांत परात्मता

स्पॉटलाईट सदर

Credit : Shubham Patil

‘मरणांती वैराणी’ ही म्हण आपण कायम ऐकतो. पण, खरोखर मृत्यूनंतर वैर संपते का? की ही म्हण म्हणजे केवळ ‘आम्ही कसे मानवतावादी दृष्टिकोन बाळगून असतो’ असे म्हणत ओढलेले सोयीस्कर पांघरुण आहे? ‘मनुसंगडा’ (२०१८) या चित्रपटाकडे या म्हणीचा काहीसा उपरोधिक प्रतिवाद म्हणून पाहता येणे शक्य आहे.

‘मनुसंगडा’ या चित्रपटातील घटनाक्रम हा एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर सुरु होतो आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर घडणाऱ्या घटनांभोवती फिरत राहतो. चित्रपट सुरु होतो तेव्हा कोलाप्पणला (राजीव आनंद) कळते की त्याच्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे. या बातमीनंतर कोलाप्पण आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी चेन्नईतून गावात येतो. अंत्यविधीची सगळी तयारी होते, मात्र त्याच्या कुटुंबाने त्याच्या वडिलांची अंत्ययात्रा घरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावरून नेऊ नये, असे गावातील उच्चजातीय रहिवाश्यांकडून सांगण्यात येते. यामागील कारण म्हणजे ही एका दलित समाजातील व्यक्तीची अंत्ययात्रा आहे आणि ‘त्यां’ना गावातील रहदारीच्या रस्त्यावरून अंत्ययात्रा काढण्याची परवानगी नाही. तसे करणे गावातील सलोख्याच्या आड येणारे ठरेल. ‘मनुसंगडा’चे कथानक कोलाप्पणने आपल्या पित्याची अंत्ययात्रा त्याच रस्त्यावरून काढण्याचा हक्क मिळविण्याभोवती फिरते.

 

आपल्या वडिलांच्या मृत्यू पश्चातही त्यांना मानाची वागणूक मिळू शकत नाही, या जाणिवेने कोलाप्पण अस्वस्थ होतो.

 

जेव्हा कोलाप्पणच्या वडिलांची अंत्ययात्रा काटेरी रस्त्यावरून न्यावी, असे सांगण्यात येते तेव्हा त्यात काहीच अतिशयोक्ती किंवा कसलेही रूपक दडलेले नसते. कारण, इथला पर्यायी मार्ग असलेली पायवाट शब्दशः काटेरी आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यू पश्चातही त्यांना मानाची वागणूक मिळू शकत नाही, या जाणिवेने कोलाप्पण अस्वस्थ होतो. सगळ्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिस नि स्थानिक अधिकाऱ्यांकडे जाऊन काहीच उपयोग न झाल्याने गौतमणच्या (सेतू डार्विन) मदतीने कोलाप्पण त्याच्या (आणि त्याच्या कुटुंबियांच्या) हक्कांची पायमल्ली झाल्याचे सांगत कोर्टात याचिका दाखल करतो. शहरामधील छुपा जातीवाद आणि कोलाप्पणच्या गावात उघडपणे घडणाऱ्या जातीवादाच्या घटनांमध्ये बराच फरक असतो. न्यायाधीशाला गावात कशा प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते याचा अंदाज नसल्याने त्याच्या दृष्टीने या क्षुल्लक घटनेचे विपरीत परिणाम घडण्याची सुतराम शक्यता नसते. दरम्यान कोर्टाचा निकाल येईपर्यंत दोन-तीन दिवस निघून गेलेले असतात. म्हणजे गेले दोन-तीन दिवस वडिलांचे प्रेत त्यांच्या छोटेखानी घरातच ठेवण्यात आलेले असते! गावातील उच्च जातीतील लोकांकडून होत असणारा विरोध, पोलिसांना कोर्टाने दिलेल्या हुकूमाशी घेणंदेणं नसणं यातून इथल्या नाट्यात आणि कोलाप्पणच्या अडचणींमध्ये वाढ होत असते. कोर्टाने त्याच्या बाजूने निकाल देऊनही कोलाप्पणच्या मनात असलेली अंत्ययात्रा काढली जाऊन त्याच्या वडिलांवर सन्मानाने अंत्यविधी पार पडतील की नाही याची शाश्वती नसते.

 

 

या चित्रपटात घडत असलेल्या घटना या रूढ अर्थाने हिंसक नसल्या तरी त्यांना जातीभेद आणि शोषणाचे कंगोरे जरूर आहेत. या घटनांची तुलना ‘फँड्री’सारख्या (२०१३) चित्रपटातील जातीवादाशी करता येऊ शकते. ज्यात दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष शारीरिक हिंसा घडत नसली, तरी जातीच्या आधारावर मानसिक छळ आणि भेदभाव घडत असल्याचे नक्कीच दिसते.

‘मनुसंगडा’ची कथा एका खऱ्या घटनेवर आधारलेली आहे. चित्रपटात दिसणाऱ्या घटनाक्रमाच्या जवळ जाणारी एक बातमी दिग्दर्शक अम्शान कुमारच्या वाचनात आली होती. ती बातमी वाचल्यानंतर त्याने हा चित्रपट निर्माण केला. अम्शान कुमार हा त्याच्या माहितीपटांकरिता प्रसिद्ध असलेला (राष्ट्रीय पुरस्कार विजेता) दिग्दर्शक आहे. तर, ‘मनुसंगडा’ हा त्याचा दुसरा चित्रपट आहे. दिग्दर्शकाच्या माहितीपटांच्या आकृतीबंधाशी असलेल्या परिचयामुळे असेल, किंवा मग कथानकाच्या विषयामुळे असेल, पण ‘मनुसंगडा’ची मांडणी व हाताळणी माहितीपट सदृश्य आहे, ज्यात मुख्यत्वे हॅण्डहेल्ड कॅमेरा वर्क आणि प्रदीर्घ दृश्यांचा समावेश आहे. या इंडी चित्रपटाची वास्तववादी तऱ्हेची मांडणी इथल्या आशयाला पूरक असली तरी आर्थिक मर्यादांमुळे इथल्या चित्रपटीय प्रतिमा निर्मितीमध्ये काही स्वाभाविक मर्यादा येतात.

 

 

‘मनुसंगडा’ हा सर्वार्थाने परिपूर्ण असा चित्रपट नाही. मात्र, तो प्रामाणिक जरूर आहे. त्याची बांधिलकी ही प्रेक्षकाच्या मनात अस्वस्थता निर्माण करणे किंवा मुख्य पात्रं आणि घडणाऱ्या घटनांप्रती सहानुभूतीची भावना निर्माण करणे यापेक्षा चीड व्यक्त करण्याशी अधिक आहे. शिवाय आजवर मुख्य पात्राच्या मनात असलेल्या रागाची परिणती त्याने स्वतःच्या हक्कांसाठी लढण्यात होते. त्यामुळे अलीकडील काही वर्षांत शोषितांच्या दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करून मांडल्या जाणाऱ्या चित्रपटांच्या यादीत त्याचा समावेश होतो.

‘मनुसंगडा’चे कथानक आणि चित्रपटाचा दीर्घकाळ लक्षात राहणारा शेवट पाहता ‘मरणांती वैराणी’ या म्हणीचा पुनर्विचार करणे गरजेचे ठरते. ज्यात आपला मानवतावाद सुद्धा सोयीस्कर आणि निवडक आहे का, हे पडताळून पाहावं लागेल. कारण, जातीच्या आधारावर जिवंतपणी तर एकमेकांशी वैर बाळगले जातेच, मात्र इथे तर मृत्यूनंतरही हे वैर संपताना दिसत नाही!

(‘मनुसंगडा’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.)