Quick Reads

‘पॉंडीचेरी’: एक रंगीबेरंगी शहर आणि काही माणसे

स्पॉटलाईट सदर

Credit : Indie Journal

लेखक-दिग्दर्शक सचिन कुंडलकरचे चित्रपट हे कायमच व्यक्तिकेंद्री राहिले आहेत. चित्रपटातील मध्यवर्ती व्यक्तिरेखांची संख्या कमी-जास्त होईल, पण केंद्रस्थानी असलेला मुद्दा हा बऱ्याचदा व्यक्तीची स्वओळख (सेल्फ-आयडेन्टिटी) आणि कौटुंबिक, सामाजिक स्तरावरील ओळख, अपेक्षा यांतील संघर्षाच्या स्वरूपात अस्तित्त्वात असतो. ‘पॉंडीचेरी’देखील त्याला अपवाद नाही.

निकिता (सई ताम्हणकर) ही पॉंडीचेरीमध्ये एक होम-स्टे चालवते आणि ते चालवता चालवता टूर गाइड म्हणूनही काम करते. निकिताचा पती हा नौदलात असल्याने तिला ईशान (तेजस कुलकर्णी) या तिच्या मुलाच्या एकल पालकत्वाची जबाबदारी स्वीकारावी लागते. अशातच स्वतःभोवती गूढतेचे वलय बाळगून असणारा रोहन (वैभव तत्ववादी) हा तरुण चित्रपटाच्या सुरूवातीला तिच्या होम-स्टेमध्ये राहायला येतो. रोहनचा भडक नि दिखाऊ स्वरूपाचा आत्मविश्वास, निकिताचा शांत, उदासवाणा स्वभाव आणि तिच्या दहा वर्षीय मुलाला आलेले अकाली प्रौढपण – अशा परस्परविरोधी किंवा प्रथमदर्शनी काहीसे विक्षिप्त भासणारे स्वभावविशेष व भावनांचे सहअस्तित्त्व चित्रपटाच्या पूर्वार्धात दिसते. या पात्रांचे स्वभाव, त्यांची मानसिकता, त्यांचा भूतकाळ यांविषयीची माहिती हळूहळू उलगडते. त्यामुळे आधी ईशानचे वागणे व देहबोली काहीशी कृत्रिम वाटत असताना ती तशी का आहे, याचे कारण लक्षात आल्याने खटकत नाही. लहान वयात आईला मदत करण्यातून व तिला अजिबातच त्रास द्यायचा नाही, या जाणिवेतून आलेले अकाली प्रौढत्व त्याला कारणीभूत असते. ही (आणि अशी इतरही) माहिती कुठल्याही पद्धतीचे अतिसुलभीकरण न करता समोर येते.

 

 

निकिताचा पती घरी नसल्याने तिच्या वाट्याला येणारे (लैंगिक व भावनिक, दोन्ही तऱ्हेचे) एकटेपण तसेच वैयक्तिक, आर्थिक जबाबदाऱ्या; वडील घरी नसल्याने ईशानच्या आयुष्यात असणारी वडिलांसमान व्यक्तीची कमतरता हे मुद्दे इथल्या अनेक मध्यवर्ती संकल्पनांपैकी काही होत. या संकल्पना रोहनच्या आयुष्याशी जोडल्या जाणे काहीसे स्वाभाविक असते. मात्र, असे करीत असताना या तिन्ही पात्रांमधील परस्परसंवादामध्ये स्कँडलस आविर्भाव येऊ न देणे लेखक तेजस मोडक आणि दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी साध्य केले आहे. अपारंपरिक नातेसंबंधांतील सहजता हा सचिन कुंडलकरच्या चित्रपटांमधील उपजत गुण इथेही अस्तित्त्वात आहे.

‘पॉंडीचेरी’ या चित्रपटाच्या केंद्रस्थानी तीन पात्रे आहेत. ईशान हा मध्यवर्ती पात्रांपैकी एक असला तरी या पात्राला तुलनेने कमी महत्त्व आहे. त्यापैकी निकिता आणि रोहन ही दोन पात्रे, तर तिसरे पात्र म्हणजे मानसीचे (अमृता खानविलकर). मानसी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत पॉंडीचेरीमध्ये आलेली आहे. मानसी निकिताच्या होम-स्टेमध्ये राहायला आल्यानंतर चित्रपटातील घटनाक्रम व पात्रांच्या आयुष्यात घडू लागलेली उलथापालथ अधिक तीव्र स्वरूपाची बनते. या पात्रांमधील परस्परसंबंध हा मैत्रीपूर्ण प्रकारचा आहे. निकिता आणि ईशानच्या संपर्कात आल्याने रोहनच्या पात्राभोवती असलेले गूढ व अगम्य, भक्कमपणाचे आवरण काही अंशी शिथिल होते. निकिता, ईशान, रोहन व मानसी या चारही पात्रांचे स्वभाव व भूतकाळाला कथानकात महत्त्व आहे. कारण ही पात्रं भूतकाळातील चुकांवर मात करणे व त्यातून स्वतःच्या जीवनात बदल घडवून आणणे यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते. ईशानने काही चुका केलेल्या नसल्या तरी इतर तीन पात्रांप्रमाणे त्यावर मानसिक, भावनिक आघात झालेला आहे. त्यामुळे त्यालादेखील स्वतःचे व्यक्तिमत्त्व, स्वओळख यांवर काम करणे भाग असते. एकल पालकत्व, प्रेम आणि विरक्ती, शांत शहरात कुणाच्यातरी वाट्याला आलेले एकाकीपण, स्त्री-पुरुष नातेसंबंध, वैवाहिक जीवन, अकाली प्रौढत्व अशा अनेक संकल्पना चित्रपटाच्या केंद्रस्थानी असूनही चित्रपट रूढ अर्थाच्या रटाळवाण्या क्षोभनाट्यापासून दूर राहतो, ही एक जमेची व महत्त्वाची बाब.

 

एकट्या माणसांना हवे - स्वातंत्र्य, साथ आणि घर 

‘पॉंडीचेरी’मध्ये पॉंडीचेरी हे रंगीबेरंगी शहर, शहरातील घरे, जागा, रस्ते, भिंतींवरील ग्राफिटी (लेखक तेजस मोडकने चित्रपटाकरिता ‘पॉंडीचेरी’मध्ये काही विशिष्ट ग्राफिटी नव्याने बनवल्या आहेत) अशा अनेक घटकांचा कल्पकरीत्या वापर केलेला आहे. पॉंडीचेरी या शहराला चित्रपटात स्वतःचे असे व्यक्तिमत्त्व आहे. रंगीबेरंगी, तरीही मूलतः शांत व स्थिर असे हे शहराचे अस्तित्त्व. चित्रपटातील मध्यवर्ती व्यक्तिरेखांच्या भावभावनांचे दोलायमान स्वरूप आणि शहरातील रंग यांचे म्हटले तर परस्परविरोधी, नि म्हटले तर परस्परपूरक असे सहअस्तित्त्व इथे दिसते.

 

“You know, you can love a city like a woman.”
Tughlaq, Girish Karnad

 

सदर चित्रपटातील पॉंडीचेरीचे चित्रण व इथल्या पात्रांना या शहराप्रती वाटणाऱ्या भावना पाहता गिरीश कर्नाड यांच्या ‘तुघलक’मधील या वाक्यामागील भावनेची प्रचिती येते. ‘तू जा ठहर’ हे गाणे चित्रपटात येते तेव्हा ते निकिताच्या पात्राच्या अनुषंगाने येते. निकिता तिच्या पतीपासून दूर असली तरी त्यांनी एकेकाळी या शहरात घालवलेले दिवस, त्यांच्या आठवणी यांमुळे हे शहर (आणि तिचा अनुपस्थित प्रियकर) निकिताला भावनिकरीत्या जखडून ठेवत आहे. त्यामुळेच निकिताची आई (नीना कुलकर्णी) तिला पुण्याला बोलावत असूनही तिला हे शहर सोडावेसे वाटत नाही. ‘सावली’ या गाण्याची चित्रपटातील जागा आणि त्यासोबत दिसणारी दृश्येदेखील असेच भावनिक कंगोरे घेऊन समोर येतात.

भूतकाळात अडकून पडल्याची भावना आणि त्यामुळे वर्तमानावर होणारे परिणाम हीदेखील चित्रपटातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. इथली बहुतांशी पात्रे या भावनेने ग्रासलेली आहेत. ‘पॉंडीचेरी’मधील व्यक्तिरेखा कुठल्या ना कुठल्या गोष्टीपासून पळ काढत आहेत, ज्यात पात्रांच्या मनात भूतकाळ व घर यांविषयीच्या परस्परविरोधी भावना अस्तित्वात आहेत. त्यांना एकाचवेळी भूतकाळाचे आकर्षणदेखील आहे आणि त्याचवेळी त्यांना भूतकाळापासून पळदेखील काढायचा आहे. त्यांना घर या संकल्पनेसोबत येणाऱ्या रूढ जाणिवा नकोशा आहेत, पण त्याचवेळी त्यांना स्वतःचे घर (इथे घर म्हणजे केवळ भौतिक स्वरूपाची जागा नव्हे, तर घर ही संकल्पना ज्या आपुलकीच्या भावनेचे प्रतिनिधित्व करते, त्या भावनेकडे रोख आहे) हवे आहे. या पात्रांना स्वातंत्र्य, साथ, घर अशा अनेक गोष्टी हव्या आहेत. ‘पॉंडीचेरी’ हा बऱ्याच अंशी आत्मशोधाचा प्रवास आहे. चित्रपटातील एक ग्राफिटी सुचवते त्याप्रमाणे: ‘एव्हरीबडी इज ॲट होम इन पॉंडी’ हे वाक्य चित्रपटातील पात्रांबाबत प्रत्यक्षात उतरताना दिसते.

 

 

सई ताम्हणकर, वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर या सर्वांचीच या चित्रपटातील कामगिरी ही त्यांच्या कारकीर्दीतील काही उत्कृष्ट कामांपैकी एक मानावी अशी आहे. चित्रचौकटींतील रंगांपुढे व तुलनेने कमी उंची असलेल्या अभिनेत्रींपुढे दिसणारी वैभवची उंचीपुरी, धिप्पाड देहयष्टी दिग्दर्शक सचिन कुंडलकर व छायाचित्रणकार मिलिंद जोग ज्या पद्धतीने वापरतात, ते फारच इंटरेस्टिंग आहे. त्याचा धिप्पाड देह आणि मनातील असुरक्षिततेची भावना, हळवेपणा, इत्यादी गोष्टींचे एकत्रीकरणदेखील या पात्राच्या प्रभावात व एकूण चित्रपटाच्या दृश्यमानतेमध्ये भर पाडणारे आहे.

‘हा चित्रपट आयफोनवर शूट केला आहे’, असे वारंवार सांगणे ही एक निरर्थक गिमिक वाटत असली तरी प्रत्यक्ष चित्रपट असा गिमिकी अजिबातच नाही. चित्रीकरण स्थळावरील सोयी व सहजता यांदृष्टीने हा निर्णय घेतला असल्याचेदेखील लक्षात येते. कारण, चित्रपटातील बहुतांशी दृश्यांमध्ये ज्या जागा दिसतात, त्या जागी चित्रीकरण करायचे झाल्यास मोठा लवाजमा बाळगणे शक्य नाही. मिलिंद जोगचे छायाचित्रण इतके सुंदर व निर्दोष आहे की, चित्रपट आयफोनवर चित्रित झाला आहे, हे निष्णात तंत्रज्ञ व प्रेक्षक सोडता कुणाच्या लक्षातही येणार नाही.

 

 

चित्रपटातील अनेकविध मध्यवर्ती संकल्पना, मानवी भावभावना व नातेसंबंधांचे अपारंपरिक चित्रण, कथानकात शहराला प्राप्त होणारे महत्त्व यामुळे वुडी ॲलनच्या चित्रपटांची आठवण येणे स्वाभाविक आहे. (विशेषतः ‘मिडनाइट इन पॅरिस’, ‘मॅनहॅटन’, ‘टू रोम इन लव्ह’, इ. सिनेमे.) याखेरीज इतरही देशी-विदेशी चित्रपटांची आठवण उजागर करणाऱ्या जागा चित्रपटात आहेत. असे असले तरी, चित्रपटातील अनेक संकल्पना या सांस्कृतिक-सामाजिक स्तरावर विशिष्टरीत्या मराठी व भारतीय आहेत. मुलांच्या आयुष्यात नको तितका हस्तक्षेप करणारे भारतीय पालक, सिरीयल पाहून गप्पा चघळत प्रत्यक्ष आयुष्यातही स्कँडल्स शोधणाऱ्या मराठी आया अशा अनेक गोष्टी यात येतात.

चित्रपट सर्वार्थाने परिपूर्ण आहे, असे अजिबात नाही. कारण, सुरूवातीला एका पात्राकडे बंदूक आहे, असे सुचविले जाते. मात्र, पुढे सबंध चित्रपटात त्या बंदुकीला काहीच महत्त्व प्राप्त न होणे त्या बंदुकीच्या चित्रपटातील समावेशाच्या उद्देशाभोवती प्रश्न उपस्थित करते. पात्राभोवती गूढतेचे वलय निर्माण करण्यासाठी वापरलेली ही निरर्थक गिमिक ‘चेकॉव्ज गन’ (एखाद्या कलाकृतीमध्ये सुरूवातीला बंदूक दिसली, तर नंतर ती बंदूक चालवली जाणे गरजेचे असते) या प्रसिद्ध सिद्धांताला अनुसरुन नाही. किंवा चित्रपटाचा शेवट हा संकल्पनात्मक पातळीवर परिपूर्ण असला तरी तो ज्या पद्धतीने (व ज्या घाईने) समोर येतो, ते खटकणारे आहे. तसेच सबंध चित्रपटभर अस्तित्त्वात असणाऱ्या उपजत सहजतेला छेद देणारे आहे.

काही दुर्लक्ष करता येतील अशा उणिवा सोडल्यास ‘पॉंडीचेरी’तील भावनिक चढ-उतार आवर्जून अनुभवावेत असे आहेत.