Quick Reads
झुंड: अस्वस्थ तरीही आशावादी
स्पॉटलाईट सदर
‘बॉम्बे टॉकीज’ (२०१३) या अँथॉलॉजी चित्रपटामध्ये अनुराग कश्यपने ‘मुरब्बा’ नावाचा एक लघुपट दिग्दर्शित केलेला आहे. त्याची मध्यवर्ती संकल्पना अगदी साधी सोपी आहे. हरिद्वारमधील विजयचे (विनीत कुमार) वडील मृत्यूशय्येवर आहेत. आपल्या मुलाने आपली शेवटची इच्छा पूर्ण करावी, असे त्यांना वाटत असते. विजयच्या वडिलांना अमिताभ बच्चनने अर्धवट खाल्लेली मुरांब्याची फोड खाण्याची इच्छा असते. मग मुलगाही वडिलांच्या प्रेमापोटी ती इच्छा पूर्ण करण्याचा चंग बांधतो. इथे ती इच्छा किंवा तिचं पूर्ण होणं न होणं यापेक्षा त्यातील चित्रपटांविषयीचे भारतीयांचे वेड ही बाब फार महत्त्वाची आहे. बॉलिवुड अनेक भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, आणि भारतीय चित्रपटांच्या इतिहासात अमिताभ बच्चनला असलेल्या स्थानाचा, त्याच्या सांस्कृतिक-सामाजिक स्तरावरील प्रभावाचा ‘मुरब्बा’मध्ये केलेला वापर फारच इंटरेस्टिंग आहे.
‘झुंड’मध्ये अमिताभ बच्चन लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळेने लिहिलेली, एका खऱ्या व्यक्तीवर बेतलेली भूमिका साकारतो. असे असले तरी अमिताभ बच्चनचे चित्रपटीय इतिहासात असलेले महत्त्व, त्याचे चित्रपट आणि त्याचा अँग्री यंग मॅन, त्याचा सांस्कृतिक स्तरावरील प्रभाव, अमिताभच्या (ऑन व ऑफ-स्क्रीन) आयकॉनिक व्यक्तिमत्त्वाशी सहसा जोडले जाणारे मुद्दे - अशा अनेक गोष्टींचा बारकाईने विचार करुन त्याचा वापर फारच चतुराईने केलेला आहे. त्याअर्थी ‘झुंड’ हा ‘मुरब्बा’मधील मध्यवर्ती संकल्पनेशी नाते सांगणारा, तसेच या संकल्पनेत अधिक भर घालून ती अतिशय सर्जनशील पद्धतीने समोर मांडणारा चित्रपट आहे. (आणि हे सारे असूनही अमिताभ वा त्याचे पात्र चित्रपटात स्वतःकडे लक्ष वेधून न घेता इतर पात्रांना साहाय्य करण्याचे काम करतात. ही व्यक्तिरेखा आणि तिचे सादरीकरण लार्जर दॅन लाइफ ठरत नाही.)
चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत काही रागीट आणि धीट, मात्र दिशाहीन मुले.
बच्चनच्या १९७०/८०च्या दशकातील चित्रपटांच्या धर्तीवरील मारधाड आणि त्यापाठोपाठ येणारा चेझ सीक्वेन्स ‘झुंड’च्या सुरुवातीला येतो. या दृश्यांच्या (तसेच चित्रपटाच्या) केंद्रस्थानी आहेत काही रागीट आणि धीट, मात्र दिशाहीन मुले. तग धरुन जिवंत राहण्यासाठी लागेल ते करणे, आपल्याकडे मान वर करुन पाहणाऱ्याला भिडणे आणि अद्दल घडवणे, राडा करणे हे सगळं आपण याआधीही पाहिलेलं आहे. चिंचोळ्या गल्ल्यांमधून, शहरातील रस्त्यांवरून धावणारा किंवा मुंबईतील गोदीवर “बख्तावर!” म्हणून आरोळी ठोकणारा तरुण बच्चन पाहिलेला आहे. मात्र, हिंदी सिनेमात हे सगळं क्वचितच वास्तवात असतं तितक्या अस्सल पद्धतीने समोर आलेलं आहे. ‘झुंड’मध्ये ऑथेंटिसिटी आणि स्टाइल यांचे दुर्मिळ व विलक्षणरीत्या प्रभावी एकत्रीकरण पाहायला मिळते.
अंकुश ऊर्फ डॉन मेसराम (अंकुश गेडाम), बाबू (प्रियांशू क्षत्रिय), इमरान शेख (सोमनाथ अवघडे) या त्यातल्या त्यात महत्त्वाच्या दोन/तीन पात्रांखेरीज इतरही अनेक दलित, बहुजन व अल्पसंख्यांक पात्रं सिनेमाच्या केंद्रस्थानी आहेत. फुटबॉल टीममधील खेळाडूंपैकी सोमनाथ अवघडे किंवा रिंकू राजगुरु असे अपवाद वगळता इतर सर्व मुला-मुलींनी या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले आहे. नागपूरमध्ये ही मुलं-मुली ज्या झोपडपट्टीत राहतात, त्या झोपडपट्टीला लागूनच उच्चभ्रू वस्ती आणि कॉलेज आहे. या दोन जगांमध्ये एक मोठी भिंत आहे. ही भिंत शाब्दिक व प्रत्यक्ष अशा दोन्ही स्वरूपाची आहे. सामाजिक स्थिती अशी आहे की, या दोन्ही जागांना जोडणारे छोटे फाटक उघडण्यासाठी आणि दोन्ही जागांमध्ये स्वैर संचार करण्यासाठी तुमच्याकडे विशेषाधिकार असावे लागतात. विजय बोराडे (अमिताभ बच्चन) या शिक्षकाकडे असे अधिकार आहेत. पुढे एकदा झोपडपट्टीतून रपेट मारत असताना काहीशा आकस्मिक पद्धतीने त्याला आपल्या विषेशाधिकारांची जाणीव होते आणि झोपडपट्टीतील मुलांमध्ये फुटबॉल खेळण्यासाठी लागणारे विशेष कौशल्य आहे, असे त्याच्या लक्षात येते. त्यातूनच वैयक्तिक आयुष्यातील समस्या व निर्णय, सामाजिक परिस्थितीशी सुरु असलेला संघर्ष अशा अनेकविध गोष्टींशी जुळवून घेत फुटबॉल खेळू लागण्याच्या दिशेने या मुलांची वाटचाल सुरु होते.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे अमिताभ बच्चनच्या ‘अँग्री यंग मॅन’ असण्याच्या काळातील भूमिका आणि इथल्या अंकुश, बाबू, इ. पात्रांच्या व्यक्तिरेखा या समांतर पद्धतीच्या आहेत. अशावेळी या चित्रपटात खुद्द अमिताभ साकारत असलेल्या भूमिकेला निरनिराळे कंगोरे प्राप्त होतात. अमिताभच्या व्यक्तिरेखेकडे वयोपरत्वे आलेले शहाणपण व संयतपणा दिसतो. याचा अर्थ विजयचे पात्र समाजाच्या विरुद्ध उभे राहत नाही किंवा संघर्ष करत नाही, असे नाही. मात्र, त्याच्या संघर्षाचा मार्ग हा आता हिंसेचा अभाव असलेला आहे. तो मुलांच्या हातात दगडांऐवजी त्यांना प्रगतीच्या वाटेवर नेऊ शकणारी साधने देऊ पाहतोय. ‘कालिया’मध्ये (१९८१) जेलमध्ये मारधाड करणारा अमिताभ, ‘हम’मधील (१९९१) टायगर, इत्यादी व्यक्तिरेखांप्रमाणे अन्यायाच्या विरोधात कृती करण्याची भूमिका इथेही असली तरी मार्ग भिन्न, असे हे चित्र आहे.
चित्रपटाच्या सुरूवातीचा चेझ सीक्वेन्स, अमिताभचे पात्र चित्रपटात पहिल्यांदा दिसते तो प्रसंग, कॉलेजमधील प्रदीर्घ मॅच, चित्रपटाच्या शेवटाकडील प्रदीर्घ प्रसंग हे फारच प्रभावी आहेत. चित्रपटाच्या सुरूवातीचा भाग तर अलीकडील काळातील सर्वाधिक प्रभावी व दृक्-श्राव्य पातळीवरील इंटरेस्टिंग प्रसंगांपैकी एक मानावा असा आहे. चित्रपटात ठळकपणे लक्षात राहतील अशा अनेक जागा आहेत.
सुधाकर रेड्डी यक्कंटीचे छायाचित्रण झोपडपट्टीतील गल्ल्या, छोटी रंगीबेरंगी घरं, भिंतीच्या पलीकडे असलेली उच्चभ्रू वस्ती व पॉश बंगले, कॉलेज, एअरपोर्ट अशा अनेक जागा उपजत सहजतेने व प्रभावीपणे चितारते. चित्रपटातील विश्वनिर्मितीत नागपूरमधील खऱ्या स्थळांवर केलेल्या छायाचित्रणासोबतच अविनाश सोनवणेच्या ध्वनी आरेखनाचा मोठा वाटा आहे. वस्तीशेजारून रेल्वे जात असल्याने येणारा सततचा आवाज असेल किंवा झोपडपट्टीतील, रस्त्यांवरील किंवा इतर अनेक ठिकाणी घडणाऱ्या दृश्यांमध्ये ऐकू येणारे आवाज असतील, हे आवाज चित्रपटात छोटेछोटे तपशील पुरवत राहतात. साकेत कानेटकरचा बॅकग्राऊंड स्कोअर मंजुळेचे दिग्दर्शन, सुधाकरचे छायाचित्रण, तसेच पडद्यावरील घटना व पात्रांच्या प्रभावात भर घालण्याचे काम करतो. विशिष्ट पद्धतीने चित्रित केलेल्या काही दृश्यांमध्ये अमिताभने वेस्टर्नचे भारतीयीकरण असलेल्या ‘शोले’सारख्या (१९७५) चित्रपटात केलेल्या कामाचा संदर्भ इथल्या पार्श्वसंगीतात सापडतो. असे अनेक सूक्ष्मातिसूक्ष्म संदर्भ या चित्रपटाच्या प्रभावात भर घालतात.
झोपडपट्टी आणि कॉलेजमधील भिंतीसारखी रुपकं बऱ्यापैकी साधीसोपी आणि सुस्पष्ट आहेत. शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या प्रतिमांचा वापरही ठळकपणे लक्षात येणारा, लक्षात राहणारा आहे. मैदानाच्या जागेवर भंगारवाल्याने केलेले अतिक्रमण आणि त्यात मधेच असलेला शेंदूर फासलेला देव यामागील विचारही सुस्पष्ट आहे. मात्र, एका फारच इंटरेस्टिंग व हेतूपुरस्सर निर्णयाविषयी बोलणे मला गरजेचे वाटते. तो म्हणजे काही महत्त्वाच्या दृश्यांमध्ये बोलीभाषेत संवाद साधणाऱ्या पात्रांच्या संवादाचे भाषांतर न करता, त्यासाठी एरवी दाखवली जातात तशी सबटायटल्स न दर्शविण्याचा निर्णय. हा निर्णय लेखक-दिग्दर्शक मंजुळेला अभिनेत्यांच्या कौशल्यावरील विश्वासासोबतच दृश्यभाषेवर असलेल्या विश्वासाची साक्ष देणारा आहे. शिवाय, हा निर्णय भाषिक मक्तेदारी, बोलीभाषांकडे तुच्छतेने पाहण्याची मानसिकता, त्याविषयीची गृहितके या सर्व गोष्टींना छेद देणारे एक महत्त्वाचे विधान सुद्धा आहे. (स्टीव्हन स्पीलबर्गच्या ‘वेस्ट साईड स्टोरी’ (२०२१) या नवीन चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळीही असा निर्णय घेण्यात आला होता.¹) प्रत्यक्ष भाषा कळत नसली किंवा पडद्यावरील व्यक्तिरेखांमध्ये घडत असलेल्या संभाषणातील बारकावे लक्षात येत नसले तरी सदर दृश्यांमधील पात्रांच्या हावभावांतून त्यांच्यातील संभाषणाचा पुरेसा अंदाज येतो. दिग्दर्शक मंजुळेने यापूर्वी वेगवेगळ्या व्यासपीठावर, निरनिराळ्या माध्यमांतून भाषा, भाषिक मक्तेदारी व अस्मिता, इ. मुद्द्यांबाबत बरेच काही मांडलेले असल्याने या दृक्-श्राव्य विधानाला अधिक महत्त्व प्राप्त होते. (अनेकदा लोकांना एखाद्या मुद्द्यावर काय वा कसे व्यक्त व्हावे ते कळत नसल्याने ते हसतात, या वाक्याचा परिचय हे दृश्य चित्रपटगृहात पाहत असताना आला.)
या चित्रपटातून मंजुळे मांडू पाहत असलेला मुद्दा ‘फॅन्ड्री’ किंवा ‘सैराट’पेक्षा काही प्रमाणात वेगळा आहे.
‘झुंड’मध्ये जात, धर्म, आर्थिक-सामजिक परिस्थिती यांवरून होणाऱ्या भेदाभेदाला स्थान असले तरी या चित्रपटातून मंजुळे मांडू पाहत असलेला मुद्दा ‘फॅन्ड्री’ किंवा ‘सैराट’पेक्षा काही प्रमाणात वेगळा आहे. आधीच्या दोन चित्रपटांत ‘वास्तव असे आहे’, हे प्रेक्षकांना सांगितले जाते. हे वास्तव अंगावर येणारे, अस्वस्थ करणारे व निराशाजनक आहे. ‘फॅन्ड्री’मध्ये जब्याने त्याच्या समोरील पात्रं, कॅमेरा तसेच प्रेक्षकांवर भिरकावलेल्या दगडामुळे जब्याचे आयुष्य सुकर झाले असेल, असे वाटत नाही. त्यातून त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या आयुष्यातील समस्यांमध्ये भरच पडली असणार. ‘सैराट’चा शेवट हा तर उघडपणे दुःखद होता. या दोन्ही चित्रपटांमध्ये दलित व्यक्तिरेखांचे, त्यांच्या जीवनानुभवाचे वास्तवाच्या जवळ जाणारे चित्रण व चित्रपटांतील प्रतिनिधित्व हा मुख्य मुद्दा होता. ‘झुंड’मध्ये केवळ प्रतिनिधित्व किंवा वास्तवाच्या जवळ जाणारे चित्रण हा मुद्दा नसून, पात्रांचे सबलीकरण व सर्वसमावेशकता हा खरा उद्देश आहे. या चित्रपटातील मध्यवर्ती पात्रं न्यूनगंडाने ग्रासलेली नाहीत, मात्र ती दिशाहीन जरूर आहेत. त्यांच्याही आयुष्यात अनेक संधी नाकारल्या जात असतात. मात्र, या मुलांनी त्यावर शोधलेला उपाय हा केवळ येनकेनप्रकारेण उदरनिर्वाह करीत जिवंत राहण्याचा असतो. आता व्यसनाधीनता आणि बेकायदेशीर कृत्यं करून ते मनाला वाटेल तसे जगू शकत असले, राडे करू शकत असले तरी त्यातून त्यांचा उत्कर्ष घडण्याची शक्यता तशी नसते. अशात विजय बोराडे ही व्यक्ती त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहत त्यांच्या आयुष्यातील संधी जात, धर्म, आर्थिक-सामाजिक परिस्थिती या कारणांमुळे नाकारल्या जाऊ नयेत, यासाठी मदत करू लागते. सबंध समाजाने या मुलांच्या मनात परकेपणाची भावना निर्माण केलेली असताना समाजाच्या विरुध्द भूमिका घेऊन त्यांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण करण्याचे, काम ही व्यक्तिरेखा करते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे ही व्यक्तिरेखा मसीहा नसून सहयोगी (ॲलाय) आहे.
‘झुंड’ हा सर्वार्थाने परिपूर्ण चित्रपट आहे, असे नाही. विजयच्या मनात अचानक झोपडपट्टीतील मुलांप्रती आपुलकीची भावना निर्माण का होते, हे अस्पष्ट राहते. बरीचशी पात्रं, त्यांचा भूतकाळ व पटकथेतील त्यांचे प्रयोजन अपरिपक्व किंवा मग कृत्रिम भासते. काही दृश्ये (मध्यांतराच्या आधीच्या दृश्याचे संकलन किंवा विजयचे न्यायालयातील स्वगत) ज्या पद्धतीने समोर मांडली जातात, त्यातील कृत्रिमता चित्रपटाच्या परिणामाला मारक ठरते. पटकथेच्या मांडणीच्या दृष्टीने चित्रपट सदोष आहे. मात्र, शेवटी चित्रपटाच्या एकूण परिणामाचा विचार करता या उणिवा तितक्याशा महत्त्वाच्या वाटत नाहीत. चित्रपटाची मंजुळेच्या आधीच्या कलाकृतींशी तुलना करण्याचा मोह टाळला आणि ‘झुंड’ हा दिग्दर्शकचा सर्वोत्तम चित्रपट नाही, हे मनोमन मान्य केले, तर या उणिवा फार खटकतील असे वाटत नाही.
‘झुंड’मध्ये एक पात्र विचारते, “भारत मतलब (क्या)?” त्यावर इतर पात्रं जरी हसत असली तरी हा प्रश्न खरोखरच महत्त्वाचा आहे. कारण, भारतात धार्मिक, जातीय ध्रुवीकरण पाहायला मिळते, तसेच अनेक क्लिष्ट सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संकल्पनांचे हेतूपुरस्सर अतिसुलभीकरण केले जात असल्याचे दिसते. ज्यामुळे ‘भारत’ ही संकल्पना इतकी संकुचित असते/असू शकते का, असा प्रश्न निर्माण होतो. दिग्दर्शक मंजुळेला अशा प्रकारच्या अतिसुलभीकरणात रस नाही. त्यामुळे ‘झुंड’मध्ये ध्रुवीकरण व भेदाभेदाला छेद देणारे, भारताचे वास्तववादी आणि अनेक स्तरावरील गुंतागुंत असलेले रूप पाहायला मिळते. मंजुळेच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणे हा चित्रपटही वेळोवेळी अस्वस्थ करतो. मात्र, ही अस्वस्थता चिरकाल टिकणारी नसल्याने ‘झुंड’ निराशावादी न होता सकारात्मक व आशावादी स्वरुपाचा बनतो. सध्याच्या काळात हा आशावाद फारच गरजेचा आहे. (शिवाय, चित्रपट खऱ्या आयुष्यातील घटनांवर बेतलेला असल्याने हा आशावाद स्वप्नवत वा पोकळ वाटत नाही.)
‘भारत’ ही संकल्पना इतकी संकुचित असते/असू शकते का, असा प्रश्न निर्माण होतो.
चित्रपटात एके ठिकाणी विजय अंकुशला म्हणतो, “हर बार जीतना जरुरी नहीं होता।” तर, ‘टेड लॅसो’ या मालिकेतील फुटबॉल कोच म्हणतो, “For me, success is not about the wins and losses. It’s about helping these young fellas be the best versions of themselves on and off the field.” तसे पाहिल्यास विजयदेखील याहून वेगळे असे काय करतो? विजयच्या साथीमुळे अंकुश आणि त्याच्यासारख्या अनेकांच्या आयुष्यात घडून आलेला बदल हा टेडच्या वाक्यातील आशयाचेच तर द्योतक आहे!
यासंदर्भात अधिक वाचण्यासाठी: ¹. Jurgensen, J. (2021). Steven Spielberg Made ‘West Side Story’ Without Subtitles, Says Translating Spanish Would Be ‘Disrespectful’ (The Wall Street Journal.)