Quick Reads

‘दिठी’: अमर्याद पाऊस आणि (अ)शाश्वत शोक

स्पॉटलाईट सदर

Credit : इंडी जर्नल

लेखात स्पॉयलर्स नाहीत. चित्रपट पाहण्याआधी लेख वाचता येऊ शकतो.

‘कुणा एका व्यक्तीचे जीवन संपुष्टात आले तरी इतरांच्या आयुष्याची वाटचाल चालू राहते’ किंवा ‘जन्म आणि मृत्यूचे चक्र अविरतपणे सुरु असते’ - अशा अर्थाची वाक्यं आपण नेहमी वाचतो, ऐकतो आणि वेळप्रसंगी कुणाला तरी म्हणतो सुद्धा. मात्र, जवळच्या माणसाच्या मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीवर होणारे गंभीर परिणाम नुसत्या एका सहानुभूतीपर वाक्याने निकालात काढता येतील असे असतात का? जन्म आणि मृत्यूचे चक्र समजून घेत आयुष्याचा अर्थ लावून आपलं दुःख नगण्य आहे, असं म्हणणं खरोखर इतकं सोपं असतं का? आपल्या घरात राहणाऱ्या नातलगाच्या मृत्यूनंतर मनात प्रचंड भावनिक, मानसिक कोलाहल सुरू झालेला असताना सगळं काही सुस्पष्ट दिसणं कितपत शक्य असतं? उलट अशा अनपेक्षितपणे घडलेल्या घटनेमुळे सगळं चित्र धूसर आणि काहीसं अस्पष्ट होण्याची शक्यता असते. ‘दिठी’ या सुमित्रा भावे दिग्दर्शित चित्रपटामधील मध्यवर्ती पात्राच्या आयुष्यात अशीच घटना घडलेली असते. आणि या घटनेच्या पडसादांमुळे चित्रपटात वर उल्लेखलेले प्रश्न उपस्थित होतात. 

एखादी व्यक्ती कितीही ज्ञानी, अनुभवी आणि चिंतनशील असली तरीही जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे त्या व्यक्तीच्या आयुष्याला हादरा बसणे साहजिक असते. रामजी लोहार (किशोर कदम) हा गावातील अशाच काही अनुभवी आणि चिंतनशील व्यक्तींपैकी एक आहे. रामजी गेली तीस वर्षे सातत्याने पंढरपूरच्या वारीला जाणारा वारकरी आहे. तो लोकांच्या हरतऱ्हेच्या समस्यांचे निराकरण करणारा, त्यांची समजूत घालणारा समंजस माणूस म्हणून गावात प्रसिद्ध आहे. तो कुणावर काही संकट आले, तर त्याचा अर्थ लावत असताना अभंगांची मदत घेत असतो.

मात्र, ‘न भुतो न भविष्यती’ अशा वर्णनास पात्र पावसामुळे गावातील नदीला पूर येतो आणि या पुरात खुद्द रामजीचा तरुण मुलगा, (ओंकार गोवर्धन) वाहून जातो. मुलाच्या मृत्यूनंतर रामजी ज्या मूल्यांवर आणि समजुतींवर विश्वास ठेवून आयुष्य जगत होता, त्या सर्व गोष्टींना खरोखर किती अर्थ होता, अशी परिस्थिती निर्माण होते. रामजी एकाएकी अश्रद्ध बनतो का, तर नाही. तो भगवंताचा द्वेष करू लागतो, असेही घडत नाही. मात्र, तो अबोल जरूर बनतो. कारण, घडलेल्या घटनेचे स्वरूपच असे असते की त्याच्या मनात आणि विचारांमध्ये द्वैतभावाची निर्मिती होते. कारण, आपण प्रत्येकाच्या भल्यासाठी प्रयत्न केले, देवावर श्रद्धा ठेवून वारी करत राहिलो आणि सरळमार्गी जीवन जगलो, तर आपल्यासोबत काहीच वाईट घडणार नाही, या त्याच्या समजाला छेद गेलेला असतो. जीवनाचा अर्थ समजून घ्यायचा झाल्यास या सगळ्या प्रकाराचा अन्वयार्थ लावणे गरजेचे होऊन बसते. नसता रामजीच्या मुलाला जसं नदीने वाहून नेलं, तसं त्याच्या मृत्यूचे तीव्र दुःखाने रामजीला गिळंकृत करण्याची शक्यता असते. 

 

जन्म, मृत्यू आणि आयुष्य यांचे स्वरूप व महत्त्व उलगडून सांगणारी ही कथा मांडत असताना गावाचं एक विस्तृत चित्र समोर उभं केलं जातं.

 

जन्म, मृत्यू आणि आयुष्य यांचे स्वरूप व महत्त्व उलगडून सांगणारी ही कथा समोर मांडत असताना रामजी ज्या गावात राहतो त्याचं एक विस्तृत चित्र समोर उभं केलं जातं. गेले काही दिवस आकाशाला सततची गळती लागलेली असल्याने दाट अंधाराने व्यापलेला आसमंत, तुडुंब भरून वाहणारी नदी, गावातील घरं, चहाच्या टपऱ्या आणि शिंपी व वाण्याची दुकानं, जिथे पोथीचं वाचन केलं जातं तो माळा — या सगळ्यांतून कथानकातील महत्त्वाच्या घटकांचे एक तपशीलवार चित्र समोर उभे केले जाते. या छोट्या खेड्यात रामजीचं दुःख हे अगदी सहजपणे इतर लोकांच्या नजरेत येईल असे असते. एरवी हसतखेळत जगणाऱ्या रामजीचे अबोल रूप गावातील इतरांवरही परिणाम करणारे असते. समोर उद्भवलेली परिस्थिती नक्की कशा प्रकारे हाताळावी, याबाबत केवळ रामजीचाच नव्हे, तर गावातील इतरांचाही गोंधळ उडालेला असतो. सतत कोसळत असणारा पाऊस त्यांच्या समस्यांमध्ये भर तर घालत असतोच, पण पावसाचा आवाज वातावरणात एक गूढ अनुभव निर्माण करण्यातही मदतीचा ठरतो. 

चित्रपटाची मांडणी करीत असताना एकीकडे रामजीचे कथानक उलगडत असते, तर दुसरीकडे गावातील माणसांच्या चर्चा निरनिराळ्या दृश्यांतून दिसतात. रामजीच्या सुनेची प्रसूती अपेक्षित वेळेच्या आधीच झालेली असते. असे असले तरी रामजीला अजूनही त्याच्या नवजात नातीकडे आपले दुःख आणि राग विसरून पाहता येणे शक्य झालेले नसते. देवावरील त्याचा राग त्याची सून, तुळसा (अंजली पाटील) आणि नवजात नातीवर निघत असतो. शिवाय, त्याचवेळी गावातील शिवाची (शशांक शेंडे) सगुणा नावाची गायदेखील बाळंत असते. त्यामुळे जन्म आणि मृत्यू अशा दोन्ही पारड्यात काही ना काही असते. यातील जीवनाच्या पारड्याचे महत्त्व रामजीच्या मनातील द्वंद्व संपुष्टात आणू शकेल की नाही, हा खरा प्रश्न असतो. ज्याचे उत्तर पुढे जाऊन मिळते. 

फ्लॅशबॅक हे सुमित्रा भावेंच्या काही आवडच्या तंत्रांपैकी एक. या तंत्राचा वापर याही चित्रपटात केलेला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीच्याच अशा एका पूर्वस्मृतीच्या दृश्यात रामजी म्हणतो, “दिठी साफ आसन तर आल्याडचं आन् पल्याडचं साफ दिसतंया. नायतर दोन्हीकडं अंधार.” लेकाच्या मृत्यूनंतर रामजीची दृष्टी मलीन झालेली असते. मानवी आयुष्यात अनेक विरोधाभासी संकल्पनांचे सह-अस्तित्त्व असल्याचे दिसून येते. मुलाच्या मृत्यूच्या आधीचा रामजी आणि नंतरचा रामजी यांच्या विचारप्रक्रियेत असाच विरोधाभास दिसून येतो. ज्यात द्वैत-अद्वैत, ज्ञात-अज्ञात, पाप-पुण्य, जन्म-मृत्यू आणि त्या दरम्यानचे आयुष्य या साऱ्या गोष्टींवर चिंतन करीत असताना निर्माण झालेल्या दोलायमान अवस्थेचा वाटा अधिक आहे. 

 

किशोर कदम यांच्या आजवरच्या सर्वाधिक प्रभावी भूमिकांची यादी करायची ठरल्यास या कामगिरीचा क्रमांक निश्चितपणे वरचा असेल.

 

किशोर कदम यांच्या आजवरच्या सर्वाधिक प्रभावी भूमिकांची यादी करायची ठरल्यास रामजीची दोलायमान अवस्था परिपूर्णपणे टिपणाऱ्या या कामगिरीचा क्रमांक निश्चितपणे वरचा असेल. आयुष्यात पोकळी निर्माण झाल्याने शून्यात नजर लावून पाहणाऱ्या रामजीसारख्या निर्मळ मनाच्या माणसाची हतबलता पाहणाऱ्याला अस्वस्थ करते. या अस्वस्थतेचे कारण किशोर कदम यांच्या प्रभावी कामात दडलेले आहे. अतीव दुःखाने वैराग्य आलेल्या आणि बऱ्याच रडलेल्या रामजीची भूमिका साकारत असताना त्यांनी आवाजात केलेला बदल चित्रपटाच्या परिणामात अधिक भर घालणारा आहे. याखेरीज डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, उत्तरा बावकर, शशांक शेंडे, अमृता सुभाष, ओंकार गोवर्धन असा उत्तम नटसंच देखील इथे आहे.

यापैकी बहुतांशी कलाकार हे सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शक द्वयीच्या नेहमीच्या सहकाऱ्यांपैकी आहेत. तर, छायाचित्रकार धनंजय कुलकर्णी यांनी देखील यापूर्वी सुमित्रा भावेंनी (सुनील सुकथनकर यांच्यासोबत) सहदिग्दर्शित केलेल्या चित्रपटांचे (‘कासव’, ‘वेलकम होम’) छायांकन केलेले आहे. याखेरीज संकलक मोहित टाकळकर, संगीतकार पार्थ उमराणी यांनी देखील भावेंसोबत वारंवार काम केलेलं आहे. हा तपशील यासाठी महत्त्वाचा ठरतो की, मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत असणाऱ्या काही महत्त्वाच्या कलाकार व तंत्रज्ञांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आणि त्यांच्यासोबत वारंवार काम करण्याचा सुमित्रा भावेंचा विचार इथे दिसतो. 

‘दिठी’ हा चित्रपट अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतो. पहिली गोष्ट म्हणजे, हा लेखिका-दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी एकटीने दिग्दर्शित केलेला पहिलाच प्रदीर्घ चित्रपट आहे. कारण, या चित्रपटापूर्वी सुमित्रा भावे यांनी त्यांच्या बहुतांशी दृक्-श्राव्य कलाकृती सुनील सुकथनकर यांच्यासह सह-दिग्दर्शित केल्या होत्या. दुसरं म्हणजे, ‘दिठी’ हा दि. बा. मोकाशी यांच्या ‘आता आमोद सुनासि आले’ या कथेवर आधारलेला आहे. सुमित्रा भावेंचे याआधीचे चित्रपट साहित्यावर आधारित नव्हते, त्यामुळे या रूपांतराला अधिक महत्त्व आहे. तर, १९ एप्रिल रोजी सुमित्रा भावे यांचे निधन झाले असल्याने हा चित्रपट त्यांची (प्रदर्शनाच्या तारखेच्या दृष्टीने) शेवटची कलाकृती म्हणूनही महत्त्वाचा ठरतो. शिवाय, चित्रपटातील मध्यवर्ती संकल्पनांचा विचार करता २०१९ मध्येच पूर्ण झालेल्या या चित्रपटाचे आता कोविड पॅन्डेमिकच्या काळात प्रदर्शित होणे, हे समयोचित आहे. 

‘दिठी’ हा विशेष परिणामकारक ठरतो तो त्यातील पारलौकिक अनुभव प्राप्ती करून देण्याच्या ताकदीमुळे. पार्थ उमराणी यांचं संगीत आणि साकेत कानेटकर यांचं पार्श्वसंगीत इथल्या गूढ आणि अनुभवातीत वातावरण निर्मितीमधील महत्त्वाचे घटक आहेत. तशीच संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाची रचना आणि मांडणीदेखील मनात गाढ तंद्रीची भावना निर्माण करणारी आहे. सुमित्रा भावेंच्या याआधीच्या चित्रपटांचा विचार केल्यास एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे त्यांचे चित्रपट कायम एका सकारात्मक आणि आशावादी बिंदूवर येऊन समाप्त होतात. भलेही चित्रपटात निराशावादी संकल्पनांचे अस्तित्त्व असले तरी त्या निराशेवर मात करणे, हे प्रयत्नांती शक्य असते, यावर भावेंचा विश्वास होता. ‘दिठी’ या चित्रपटाची संकल्पनाच मुळी सभोवतालाकडे, समोर उद्भवलेल्या परिस्थितीकडे पाहण्याच्या दृष्टीविषयी आहे. त्यामुळे इथेही काळाच्या ओघात मानवी दृष्टिकोनात घडणारे बदल समोर येतात. (इथला काळ काही फार नसला तरी अगदी काही तासांमध्ये एखाद्या गोष्टीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात कसा बदल घडू शकतो, हे दिसते.) ज्यातून केवळ रामजी या पात्रालाच नव्हे, तर प्रेक्षकाला देखील समोरच्या चित्राकडे अधिक विस्तृत संदर्भातून व त्रिमितीय दृष्टिकोनातून पाहणे शक्य होते. एकदा अशी नजर प्राप्त झाली की, भौतिक जगातील चिंतांकडे आणि मानवी अस्तित्त्वाकडे अधिक तटस्थपणे पाहणे शक्य होते. 

 

‘दिठी’ या चित्रपटाची संकल्पनाच मुळी सभोवतालाकडे, समोर उद्भवलेल्या परिस्थितीकडे पाहण्याच्या दृष्टीविषयी आहे.

 

चित्रपटात जोशीबुवा (डॉ. मोहन आगाशे) दुःखाच्या स्वरूपाबाबत बोलत असताना एके ठिकाणी म्हणतात, “...तरी बरंय देवाने माणसाला विसराळू केलं. नायतर जलमभर लहानपणच्या फाटलेल्या पतंगाचं दुःख विसरला असता काय?” ‘दिठी’मध्ये दुःख, आयुष्य यांसारख्या अनेक गोष्टींच्या स्वरूपाची चर्चा केलेली आहे. जोशीबुवांचे हे वाक्य दुःखाच्या अशाश्वत रूपाबाबत बोलके आहे. अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यांचा सुवर्णमध्य साधणारा हा चित्रपट बराच काळ मनात रेंगाळतो तो अशाच सूक्ष्मातिसूक्ष्म नि मर्मभेदी जागांमुळे. त्यामुळे अशा जागा अनुभवण्याच्या दृष्टीने सध्याच्या नैराश्यपूर्ण काळात एक समाधानकारक अनुभव देणारा आणि जन्म व मृत्यू यांमधील आंतरसंबंध उलगडून दाखवणारा ‘दिठी’ पाहणे क्रमप्राप्त ठरते. 

 

अक्षय शेलार हे ‘भावे आणि सुकथनकरांचा सिनेमा’ या आगामी पुस्तकाचे लेखन करीत आहेत.