Quick Reads

रुबी स्पार्क्स: प्रेम आणि लेखनकामात असलेलं साम्य

स्पॉटलाईट सदर

Credit : 20th Century Fox

एखाद्या व्यक्तीने अगदी कमी वयात अनपेक्षित आणि अविश्वसनीय काम करत यश संपादन करणं कौतुकास्पद असतंच. मात्र, कमी काळात नि कमी वयात अतियशस्वी झाल्यानंतर ती व्यक्ती ‘त्या’ यशाच्या पुढे जाईलसं काहीच काम करू शकली नाही तर? आपणच पूर्वी करून ठेवलेलं काम आपली मर्यादा ठरलं तर? ही अशी ओव्हरअचिव्हमेंट आणि तिचा संभाव्य परिणाम हा कायमच चिंतेचा विषय राहिलेला आहे. तसा हा धोका कमी अधिक फरकाने सर्वच क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींना लागू पडणारा आहे. लेखनकामाठी करून उदरनिर्वाह करू पाहणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यातही अशी परिस्थिती उद्भवत असते ती ‘रायटर्स ब्लॉक’च्या रुपात. 

 

बेस्टसेलर लेखक आणि रायटर्स ब्लॉक

‘रायटर्स ब्लॉक’ अर्थात लिहित्या लेखकाला काहीच न सुचणे, काहीच लिहून न होणे या संकल्पनेभोवती फिरणारे बरेचसे चित्रपट निर्माण झालेले आहे. उदाहरणार्थ, लेखक नि रायटर्स ब्लॉकवरील चित्रपटांमध्ये चार्ली कॉफमनच्या ‘अडॅप्टेशन’चं (२००२) स्थान कायम वरती राहिलेलं आहे. ‘अडॅप्टेशन’मध्ये चार्ली कॉफमन (निकोलस केज) याच नावाचं पटकथाकाराचं पात्र रायटर्स ब्लॉकने ग्रासलेलं असतं. टीनएजमधील वाचकांना प्रिय असलेल्या कादंबऱ्या लिहिणारी मेविस गॅरी ही गोस्ट रायटर जेसन राईटमन दिग्दर्शित ‘यंग अॅडल्ट’च्या (२०११) केंद्रस्थानी असते. या दोन्ही चित्रपटांतील पात्रं त्यांच्या एकसुरी आयुष्यामुळे त्रस्त असतात. मनासारखं लिखाण होत नसल्याने आपण आयुष्यात अयशस्वी आहोत ही भावना त्यांच्या मनात येत असते. अशावेळी भूतकाळातील यशापेक्षा वर्तमानातील असमाधानाची भावना अधिक वरचढ ठरणारी असते.

जोनाथन डेटन आणि व्हॅलेरी फेरिस (‘लिट्ल मिस सनशाइन’ फेम) दिग्दर्शित ‘रुबी स्पार्क्स’ (२०१२) या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असाच एक लेखक आहे. कॅल्विन वीयर-फिल्ड्सने (पॉल डॅनो) वयाच्या १९ व्या वर्षी लिहिलेली ‘हार्ट ब्रोकन ओल्ड टाइम्स’ ही पहिलीवहिली कादंबरी बेस्टसेलर ठरली. इतकंच नव्हे, तर त्याच्या कादंबरीमध्ये मॉडर्न अमेरिकन क्लासिक ठरण्याची ताकद असल्याचंही म्हटलं गेलं. या कादंबरीच्या कित्येक आवृत्त्या निघाल्या, लेखकाचा अगदी डाय-हार्ड चाहतावर्गदेखील निर्माण झाला. कादंबरी प्रकाशित होऊन दहा वर्षं झाली असली तरी तिच्या आणि वीयर-फिल्ड्सच्या लोकप्रियतेत घट झालेली नाही. कॅल्विन मात्र या जीवनशैलीला वैतागलेला आहे. त्या पहिल्या कादंबरीनंतर गेल्या दहा वर्षांत आपल्या हातून काहीच चांगलं लेखन झालं नसल्याची भावना त्याला सतावत आहे. त्यामुळे अतिलोकप्रियता आणि त्यानंतर काहीच चांगलं काम न घडल्यानं येणारा वैताग या विशिष्ट अशा मुद्द्यांमुळे त्रस्त असलेल्या पात्राला घेऊन चित्रपटाची सुरुवात होते.

 

 

स्पॉयलर्स अहेड!

म्यूझचा शोध, मॅनिक पिक्सी ड्रीम गर्ल आणि जादुई वास्तव: 

ग्रीक मिथकांमध्ये झ्यूस हा ग्रीक देवतांचा राजा आहे. तर, म्यूझ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झ्यूसच्या नऊ मुली या कलाकारांच्या स्फूर्तीच्या देवता म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे अनेकदा कलाकारांच्या स्फूर्तीस्थान असलेल्या व्यक्तीचा उल्लेख म्यूझ म्हणून केला जातो. त्यामुळे ज्याच्याकडून काहीच लिहून होत नाहीय असा लेखक अशाच प्रेरणेच्या म्हणजेच म्यूझच्या शोधात असल्याचं मानलं जातं. कॅल्विनदेखील अशाच म्यूझच्या शोधात आहे. त्याच्या मनोचिकित्सकाने दिलेल्या सल्ल्यानंतर तो लिहायला लागतो नि त्याचा हा शोध थांबतो. बऱ्याच दिवसांनी त्याच्या हातून लिखाण होऊ लागतं. लायला या मुलीसोबतचं नातं तुटल्यानंतर कुठल्याच नात्यात न अडकलेला कॅल्विन त्याच्या मनातील अपेक्षेनुसार एका मुलीचं पात्र उभं करून तिच्यावर लिहू लागतो. त्याला त्याची म्यूझ या काल्पनिक पात्राच्या रुपात मिळते खरी, मात्र सोबत एक वेगळीच समस्या समोर उभी राहते. कारण, लवकरच त्याच्या लक्षात येतं की, त्याच्या कल्पनेतून निर्माण झालेली रुबी स्पार्क्स (झोई कझान) नावाची सव्वीस वर्षांची तरुणी प्रत्यक्षात अस्तित्त्वात आली आहे. 

पुरुष पात्राच्या कल्पनेतील (त्याच्या दृष्टीने) आदर्श स्त्री जर प्रत्यक्षात अस्तित्त्वात असेल नि त्याच्या आयुष्याचा भाग बनत असेल तर त्या स्त्रीला ‘मॅनिक पिक्सी ड्रीम गर्ल’ म्हणून संबोधलं जातं. चार्ली कॉफमनने लिहिलेला ‘इटर्नल सनशाइन ऑफ द स्पॉटलेस माइंड’ (२००४) आणि मार्क वेब दिग्दर्शित ‘५०० डेज ऑफ समर’मधील (२००९) स्त्री पात्रं म्हणजे या प्रकारची लोकप्रिय उदाहरणं. कॅल्विनने कल्पिलेली रुबी कुठल्याही स्पष्टीकरणाशिवाय अस्तित्त्वात येते. लेखिका झोई कझान एके ठिकाणी म्हणाली त्यानुसार, इथल्या अतिरंजित, अशक्यप्राय वास्तवामागील कल्पना वुडी अॅलनचा ‘द पर्पल रोज ऑफ कायरो’ (१९८५) आणि हेरॉल्ड रामीसचा ‘ग्राउंडहॉग डे’ (१९९३) या दोन चित्रपटांच्या जवळ जाणारी आहे. हे दोन्ही चित्रपट किंवा अॅलनच्या ‘मिडनाईट इन पॅरिस’ (२०११) आणि ‘मॅजिक इन मूनलाईट’सारख्या (२०१४) चित्रपटांमध्ये जसं जादुई वास्तव दिसतं, तसंच काहीसं ‘रुबी स्पार्क्स’बाबत आहे. त्यातूनच कॅल्विनच्या कल्पनेतील स्वैर, कलंदर रुबी प्रत्यक्षात अवतरते. सुरुवातीला यावर विश्वास न बसणारा कॅल्विन लवकरच ही अशक्यप्राय घटना प्रत्यक्षात घडत असल्याचं सत्य स्वीकारतो. 

 

 

प्रेम आणि लेखनकामात असलेलं साम्य

कॅल्विनच्या लक्षात येतं की, रुबी केवळ अस्तित्त्वातच आलेली नाही, तर आपण तिच्याबाबत जे लिहू तेही सत्यात उतरत आहे. तो मुळात रुबी प्रत्यक्ष अस्तित्त्वात येण्यापूर्वीच तिच्या प्रेमात पडलेला असल्याने तिच्या अस्तित्त्वात येण्यानं त्याची समस्या एका अर्थी सुटते. कारण, पूर्वी आपण स्वतःच निर्माण केलेल्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडणं त्याला सतावत होती. आता मात्र ती व्यक्तिरेखा त्याच्यासमोर जिवंत रुपात समोर आल्याने त्याला आपण वेडे होत आहोत की काय, या प्रश्नापासून सुटका होते. परिणामी कॅल्विन आणि रुबीच्या नात्याला सुरुवात होते. 

आता इथल्या घटनाक्रमाकडे दोन प्रकारे पाहता येतं. पहिलं म्हणजे, समोर घडणारं प्रेमाचं नातं आणि त्यातील समस्या. तर, दुसरं म्हणजे लेखक आणि त्याचा त्याच्या निर्मितीशी असलेला संबंध. कॅल्विन हा आत्ममग्न लेखक आहे. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला स्तुती आवडत नसली तरी त्याला सततच्या स्तुतीची सवय झालेली आहे. फक्त मुद्दा असा की, आपल्याकडून चांगलं काम होत नसल्याने आपण कौतुकास पात्र नसल्याची भावना त्याचवेळी त्याच्या मनात निर्माण होत असते. अशात आपल्या कल्पनेतून एक व्यक्ती अस्तित्त्वात आली आहे, या जाणिवेमुळे आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेचा साक्षात्कार होणं स्वाभाविक असतं. ज्याचा परिणाम असा की, एखादा लेखक त्याने निर्मिलेल्या कलाकृतीबाबत जितका पजेसिव असतो, तितकाच कॅल्विन रुबीबाबत पजेसिव असतो.

त्यानिमित्ताने प्रेमात पडणं नि लेखन करणं या दोन्हींतील साम्य इथे दिसतं. आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे तिच्यावर मालकीहक्क बजावण्याची चूक अनेक लोक करत असतात. कॅल्विनबाबत हे घडत असताना तो रुबीला, तिच्या प्रत्येक कृतीला नि परिणामी तिच्या आयुष्याला नियंत्रित करू शकतो, या अधिकच्या शक्तीचा समावेश असतो. तिची निर्मितीच मुळात आपलं एकाकी आयुष्य सुखकर बनवण्यासाठी झाली आहे, असा (गैर)समज त्याने करून घेतलेला असल्याने त्याने येनेकेनप्रकारे रुबीवर नियंत्रण ठेवू पाहण्याच्या घटना घडतात. मात्र, असं करण्यात दोघांचंही हित नसल्याचं लवकरच त्याच्या लक्षात येतं. लेखन करत असताना पात्रं आपण निर्मिलेली असली तरीही त्यांचा स्वतःचा असा भूतकाळ असतो, भावना असतात नि ती त्यानुसार वागतात, हे लेखकानं लक्षात घेणं गरजेचं असतं. पुढे जाऊन हे मान्य करत असताना कॅल्विन म्हणतो त्यानुसार, ‘एनी रायटर कॅन अटेस्ट इन हॅपीएस्ट, लकीएस्ट स्टेट द वर्ड्स आर नॉट कमिंग फ्रॉम यू, बट थ्रू यू’. थोडक्यात, प्रेम असो वा लेखन, आपला अहंकार बाजूला ठेवणं गरजेचं असतं.

 

 

इफ यू लव्ह समबडी सेट देम फ्री

कॅल्विनची पूर्वाश्रमीची प्रेयसी लायला म्हणते त्यानुसार, खरी व्यक्ती आणि आपल्या मनातील त्या व्यक्तीची फोल प्रतिमा या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्या दोन्हींमध्ये गफलत झाल्यास, फोल प्रतिमेसोबत नात्याची अपेक्षा ठेवल्यास निराशा होऊ शकते. ज्याची परिणती ज्या नात्यात दोघेही असमाधानी आहेत, अशा नात्यात होते. साहजिकच असं नातं टिकवून ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. खासकरून इथल्या संदर्भात तर कॅल्विन रुबीला नियंत्रित करू शकत असल्याने सुरुवातीला तरी तिच्या भावनांना त्याच्यालेखी काहीच किंमत नसते. एवढं असूनही जोवर दोघेही समाधानी होते तोवर ठीक होतं. मात्र, तिचं आयुष्य फक्त आपल्याभोवतीच फिरायला हवं या अट्टाहासापायी ती आणि आपण स्वतः असे दोघेही असमाधानी आहोत, दोघांच्याही वावरात उदासीनता नि नैराश्य असल्याचा साक्षात्कार त्याला होतो. याचं मूळ आपल्या बुद्धिमत्तेच्या अहंकारात असल्याचंही त्याच्या लक्षात येतं. रुबी एके ठिकाणी म्हणते त्यानुसार प्रेमात असलं तरीही समोरच्या व्यक्तीचं स्वतंत्र आयुष्य नि अस्तित्त्व आहे, तिच्या स्वतःच्या अशा भावना आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं असतं. पुढे जाऊन कॅल्विनने हे मान्य केल्यानंतर जे घडतं ते स्टिंगच्या ‘इफ यू लव्ह समबडी सेट देम फ्री’ या गाण्याला साजेसं मानता येईल. कुणावर तरी नातं थोपवण्यापेक्षा त्या नात्यात न राहणं श्रेयस्कर असतं. आणि आपापल्या चुका मान्य करत, समोरच्या व्यक्तीवर नातं न लादल्यानंतरही ते प्रेम टिकलं तर त्याचा आनंद आहेच.