Quick Reads

‘ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंग’: भूतकाळाची भुतं आणि रहस्याचा मागोवा

स्पॉटलाईट सदर

Credit : इंडी जर्नल

आपण ज्या प्रकारचा कंटेंट पाहत, वाचत, ऐकत असतो, त्याचा प्रभाव आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पडत असतो. उदाहरणार्थ, सातत्याने रहस्यकथा नि हेरकथा वाचणाऱ्या व्यक्तीला आपणही एखाद्या रहस्यकथेचा भाग आहोत, असे वाटू शकते. किंवा ‘क्राईम पॅट्रोल’ किंवा ‘सावधान इंडिया’सारखे कार्यक्रम सातत्याने पाहिल्याने प्रेक्षकाच्या मनात सतत नकारात्मक घटना आणि विचारांचे चक्र सुरु होण्याची शक्यता असते. विविध माध्यमांतील आशयाच्या आपल्यावर होणाऱ्या परिणामाची अशी अनेक उदाहरणे देता येऊ शकतील (यावर बरेच संशोधनदेखील झालेले आहे). ज्यातून उपभोक्त्याच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल घडून येतात आणि अशा व्यक्तीकरिता वास्तव व कल्पितातील रेषा धूसर होऊ लागतात. ‘ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंग’ या मालिकेमधील मध्यवर्ती घटनाक्रमाची सुरुवात साधारणतः अशाच प्रकाराने झालेली आहे. 

पॉडकास्ट ऐकणे वा पाहणे ही संकल्पना आपल्याकडे अलीकडील काही वर्षांत लोकप्रिय होऊ लागली असली तरी पाश्चात्य देशांमध्ये पॉडकास्ट्सनी लोकप्रियता मिळवण्याच्या घटनेला बराच कालावधी उलटून गेला आहे. नेटफ्लिक्सवरील ट्रू क्राईम माहितीपटांना जशी खूप मागणी आहे, तशीच लोकप्रियता ट्रू क्राईम पॉडकास्ट्सना आहे. ‘सिरीयल’, ‘डर्टी जॉन’, ‘केसफाईल’ ‘माय फेवरेट मर्डर’, इ. पॉडकास्ट्सनी मोठा चाहतावर्ग मिळवलेला आहे. लोकांना ट्रू क्राईम पॉडकास्ट्सच्या असणाऱ्या आकर्षणामुळे अशा पॉडकास्ट्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. ‘ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंग’ची मध्यवर्ती संकल्पना अमेरिकी लोकांना पछाडून टाकणाऱ्या ट्रू क्राईम पॉडकास्ट्सभोवती फिरणारी आहे. 

चार्ल्स-हेडन सॅव्हेज (स्टीव्ह मार्टिन), ऑलिव्हर पुटनम (मार्टिन शॉर्ट) आणि मेबल मोरा (सेलेना गोमेझ) हे तिघे मॅनहॅटनमधील उच्चभ्रू भागातील अर्कोनिया नावाच्या इमारतीत राहतात. एरवी नुसते बिल्डिंगमध्ये दिसणारे परिचयाचे चेहरे म्हणून एकमेकांना ओळखणाऱ्या या तिघांची भेटच होते ती मुळी अर्कोनियामध्ये झालेल्या एका खुनाच्या दिवशी! आणि ट्रू क्राईम पॉडकास्ट्स हा या तिघांना जोडणारा समान दुवा असतो. चार्ल्स-हेडन, ऑलिव्हर आणि मेबल या तिघांना ट्रू क्राईम पॉडकास्ट्सविषयी असलेल्या आकर्षणामुळे ते स्वतःचे पॉडकास्ट सुरु करण्याचा निर्णय घेतात. प्रत्येक पॉडकास्टचं एखादं वैशिष्ट्य असावं लागतं (उदा. या तिघांच्या आवडत्या पॉडकास्टचं नाव असतं: ‘ऑल इज नॉट ओके इन ओक्लाहोमा’, ज्यात केवळ ओक्लाहोमामध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केलं जातं). तर, या तिघांच्या पॉडकास्टचे वैशिष्ट्य हे की, ते फक्त त्यांच्या बिल्डिंगमध्ये झालेल्या खुनाच्या घटनांभोवती फिरणारे पॉडकास्ट असेल. आणि तिथूनच मालिकेला तिचे शीर्षक प्राप्त होते. 

 

‘ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंग’चे स्वरूप गंभीर रहस्य आणि विनोदाचे मिश्रण असलेले आहे.

 

‘ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंग’चे स्वरूप गंभीर रहस्य आणि विनोदाचे मिश्रण असलेले आहे. चार्ल्स, ऑलिव्हर आणि मेबल यांना रहस्याची उकल करायची असली तरीही हे तिघे काही व्यावसायिक हेर नाहीत. रहस्याचा उलगडा करताना घ्यावयाच्या काळजीच्या त्यांच्या मनातील संकल्पना त्यांनी आजवर ऐकलेल्या ट्रू क्राईम पॉडकास्ट्सवर बेतलेल्या आहेत. शिवाय, या तिघांचा भूतकाळही त्यांच्या वर्तमानावर, त्यांच्या वागणुकीवर प्रभाव टाकतो. चार्ल्स-हेडन हा एकेकाळी लोकप्रिय असणारा अभिनेता आहे. तो अजूनही नव्वदच्या दशकातील मालिकेत त्याने साकारलेल्या ‘ब्रॅझोस’ नावाच्या एका पोलिसाच्या भूमिकेत अडकलेला आहे. अर्कोनियामध्ये झालेल्या टिम कोनोच्या खुनानंतर रहस्याचा शोध घेण्याच्या निमित्ताने चार्ल्सला ब्रॅझोस हे पात्र पुन्हा एकदा (आणि तेही खऱ्या आयुष्यात) साकारण्याची संधी मिळाली आहे. (पोलिसांनी जरी कोनोचा खून झालेला नसून त्याने आत्महत्या केली असल्याचा निष्कर्ष काढलेला असला तरी चार्ल्स, ऑलिव्हर आणि मेबल मात्र त्याचा खून झाला, या मतावर ठाम आहेत.) ऑलिव्हर हा नाट्य-दिग्दर्शक आहे. मात्र, त्याने आजवर दिग्दर्शित केलेली जवळपास सगळीच नाटकं फ्लॉप झालेली आहेत. वैयक्तिक आयुष्यातील समस्या आणि आर्थिक अडचणींतून बाहेर पडण्यासाठी तो कायम त्याच्या निर्मात्यांकडून पैसे मिळविण्याच्या संधीच्या शोधात असतो. बिल्डिंगमधील खुनाच्या शोधाच्या निमित्ताने ऑलिव्हरला ही संधी मिळाली आहे. तर, मेबलचा भूतकाळ हा इतर दोघांपेक्षा अस्पष्ट असलेला आणि गूढतेने भरलेला आहे. ती अर्कोनियामध्ये असलेल्या तिच्या एका नातेवाईकाच्या घरात राहते नि इथल्या उच्चभ्रू जीवनशैलीचे आकर्षण तिला आहे. त्यामुळे ती लहानपणापासून फावल्या वेळात अर्कोनियामध्ये राहत आलेली आहे. तिला लहानपणापासून असलेले ‘हार्डी बॉइज’चे आकर्षण अजूनही टिकून आहे आणि त्यामुळेच ती चार्ल्स आणि ऑलिव्हर सोबत रहस्याचा शोध घेण्यात गर्क आहे. एकुणात, या तिघांच्याही भूतकाळाला या कथानकात अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

 

 

चार्ल्स, ऑलिव्हर आणि मेबल या तिघांची स्वभाववैशिष्ट्ये आणि त्यांचे आपापसातील संबंध ‘ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंग’मधील रंजकतेत भर घालतात. चार्ल्स-हेडन हा सुरुवातीला मनुष्यद्वेष्टा म्हणून समोर आला तरी नंतर त्याला असलेली अँक्झायटी आणि अनोळखी माणसांशी संवाद साधण्याबाबतची भीती त्यामागील कारण असल्याचे कळते. चार्ल्सला अजूनही त्याच्या ब्रॅझोस या शोचे चाहते भेटत असतात. पण, ऑलिव्हर काही त्याला फार चांगला अभिनेता समजत नसतो. त्या दोघांमधील लुटुपुटुचे द्वंद्व असेल किंवा मग चार्ल्सची माणूसघाणी प्रवृत्ती असेल, त्यातून बरेचसे विनोदी प्रसंग उद्भवतात. मेबल या दोघांपेक्षा वयाने खूपच लहान असल्याने चार्ल्स आणि ऑलिव्हरने मिलेनियल पिढीच्या वृत्तीवर केलेल्या टिप्पण्या आणि मेबलने तिच्या आजोबाच्या वयाच्या या दोघांवर केलेले विनोद इथे कायम आढळतात. त्यांच्यातील जनरेशन गॅप हा अनेक विनोद तसेच सूक्ष्म निरीक्षणं नोंदविणाऱ्या दृष्टिकोनाचे उगम स्थान आहे. 

‘ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंग’मध्ये इथल्या तीन मध्यवर्ती पात्रांखेरीज इतर पात्रांनाही महत्त्व प्राप्त होते. सुरुवातीच्या दोन तीन एपिसोड्समध्ये मुख्य पात्रांवर भर दिल्यानंतर प्रत्येक एपिसोडमध्ये एखादे तुलनेने कमी महत्त्वाचे पात्र निवडून त्याच्या निवेदनापासून एपिसोडची सुरुवात होते. मालिकेतील अशा निवेदनांमधून त्या त्या पात्राच्या मनोवस्थेचे चित्रण केले जाते. त्या अर्थी ही मालिका सर्वसमावेशक आहे. एव्हाना पॉडकास्ट्सचे प्रहसन आणि त्यांच्या चाहत्यांची थट्टा उडवण्यापासून सुरु झालेल्या या मालिकेला खरोखर एखाद्या रहस्याचे स्वरूप प्राप्त झालेले असते. त्यामुळे बिनमहत्त्वाच्या वाटणाऱ्या पात्रांविषयीची माहिती किंवा मध्यवर्ती पात्रांनी एकमेकांपासून लपविलेली माहिती यांमधून प्रेक्षकाला सविस्तर चित्र दिसत असल्याने इथली नाट्यमयता वाढते. त्यात पुन्हा एकूण मालिका आणि प्रत्येक एपिसोडच्या आकृतिबंधाचा विचार करता हा सगळा प्रकार कुठल्याही चांगल्या ट्रू क्राईम पॉडकास्ट्सच्या आकृतिबंधाचे अनुकरण करणारा आहे. त्यामुळे इथली भन्नाट विनोदी मांडणी आणि तितकेच रंजक रहस्य असे दोन्ही पैलू आपल्याला एखाद्या उत्तम पॉडकास्टप्रमाणे खिळवून ठेवतात. 

 

इथली भन्नाट विनोदी मांडणी आणि तितकेच रंजक रहस्य असे दोन्ही पैलू आपल्याला एखाद्या उत्तम पॉडकास्टप्रमाणे खिळवून ठेवतात.

 

सिद्धार्थ खोसलाचे संगीत या मालिकेतील अनेक इंटरेस्टिंग अंगांपैकी एक आहे. खोसलाचे संगीत इथल्या दृश्यांना पूरक ठरते, अनेकदा त्यांचा प्रभाव द्विगुणित करते, आणि त्याचवेळी स्वतःचे वेगळेपण जपते. उत्तम दृश्यांना तितक्याच ताकदीच्या संगीताची जोड मिळाली, तर अशा दृश्यांच्या (आणि एकूणच कलाकृतीच्या) प्रभावात कशा पद्धतीची भर पडते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्याने तयार केलेली मालिकेची थीम आवर्जून ऐकावीशी आहे. 

‘ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंग’ ही मालिका चार्ल्स-हेडन सॅव्हेजची भूमिका साकारणाऱ्या स्टीव्ह मार्टिनने जॉन हॉफमनसह निर्माण केलेली आहे. स्टीव्ह मार्टिन, मार्टिन शॉर्ट आणि सेलेना गोमेझमधील केमिस्ट्री फारच इंटरेस्टिंग आणि मनोरंजक आहे. शिवाय, या तिघांखेरीज एमी रायन, नेदन लेन, टिना फे, इ. दिग्गजांनीही धुमाकूळ घातलेला आहे. हेच गायक स्टिंगच्या कॅमिओलाही लागू पडते. 

 

 

मालिकेत न्यू यॉर्क शहराला महत्त्वाचे स्थान आहे. इथली पात्रं या शहराकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतात, त्यातून इथले बरेचसे विनोदी संवाद नि प्रसंग उद्भवतात. मालिकेचा सेट अप आणि विनोदमिश्रित रहस्यउकल ही वुडी ॲलनच्या ‘मॅनहॅटन मर्डर मिस्ट्री’ (१९९३) या चित्रपटाची आठवून करून देते. 

अनेक पात्रं, त्या पात्रांमधील उत्तमरीत्या जमून आलेली केमिस्ट्री, प्रभावी संगीत, भन्नाट विनोद आणि खिळवून ठेवणारे रहस्य, इ. अनेक गोष्टी जुळून आल्याने ही मालिका आवर्जून पाहावीशी झालेली आहे. त्यामुळे मी जेव्हा ‘ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंग’ ही मालिका या वर्षातील काही उत्कृष्ट मालिकांपैकी एक आहे, असे म्हणतो आहे, तेव्हा त्यात अजिबातच अतिशयोक्ती नाही. 

यासंबंधातच अधिक वाचनासाठी: 

Smith, P. (2018, April 5). This Is Your Brain On True Crime Stories. HuffPost. 

Volpe, A. (2021). Your True Crime Obsession Could Be Hurting Your Mental Health. 

(‘ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंग’ ही मालिका डिस्नी+हॉटस्टारवर पाहता येऊ शकते.) 

 

(Only Murders in the building, Selena Gomez,Spotlight Series, Steve Martin, True Crime Podcast, True Crime Series, Marathi Review, Hulu, Netflix, Murder Mystery, TV Series Review, Only murders in the building review)