Quick Reads
‘मी वसंतराव’: चाकोरीबाहेरच्या कलोपासकाचा प्रभावी चरित्रपट
स्पॉटलाईट सदर
‘मी वसंतराव’ मध्ये वसंतराव देशपांडे यांच्या जन्मापासून ते ‘कट्यार काळजात घुसली’ या प्रसिद्ध नाटकाच्या यशापर्यंतचा काळ दिसतो. (त्यानंतरचा भागही आहे, पण तो एपिलॉगच्या स्वरूपाचा आहे.) साधारण सहा दशकांचा दीर्घ काळ उभारत असताना केलेली पटकथेची रचना (पटकथा - निपुण धर्माधिकारी आणि उपेंद्र सिधये) अशी आहे की, वसंतरावांचे जीवन काही टप्प्यांमध्ये समोर मांडले जाते. या टप्प्यांची विभागणी वसंतरावांच्या आयुष्यातील काही निवडक व्यक्तींच्या आधारे केली जाते. ज्यात त्यांचे काही गुरु, तसेच त्यांना संगीतावरील प्रेम जागृत ठेवण्याची प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींचा समावेश होतो. निवडक व्यक्ती आणि प्रसंगांमुळे फाफटपसारा न मांडता वसंतराव व त्यांच्या आयुष्यातील व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा अर्क चित्रित करणे सोपे होते. शिवाय, या व्यक्तींची (गुरु आणि इतरही लोक) निवड प्रातिनिधिक स्वरूपाची अधिक आहे. त्यामुळे अमुक व्यक्तीचा उल्लेख सिनेमात का नाही, असे प्रश्न उपस्थित करणे इथे योग्य ठरत नाही. शेवटी हे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि टीमचे वसंतरावांच्या आयुष्याचे एक इंटरप्रीटेशन आहे. साठ वर्षांचा कालावधी तीन तासांच्या चित्रपटात दाखवत असताना लेखक-दिग्दर्शकांना वेठीस न धरता तेवढी मुभा देणे गरजेचे आहे.
वसंतरावांचा जन्म विदर्भातील. १९२० मध्ये मुलाचा जन्म झाल्यानंतर लगेचच कौटुंबिक वादामुळे त्यांची आई ऊर्फ ताई (अनिता दाते) नागपूरला राहायला येते. पतीने साथ देण्यास असमर्थता दर्शविल्याने ताई एकल पालकत्वाची जबाबदारी स्वीकारते. नागपूरमध्ये वसंतरावांच्या लहानपणी त्यांचा ज्यांच्याशी संपर्क आला ते पहिले गुरु शंकर सप्रे (सारंग साठ्ये) आणि पौगंडावस्थेत दीनानाथ मंगेशकरांशी (अमेय वाघ) झालेला परिचय यातून संगीत अभ्यासाचा व कलाकाराच्या विचारप्रक्रियेचा पाया रचला जातो. त्यानंतर वसंतराव (पौगंडावस्थेतील भूमिका - गंधार जोशी) आपल्या मामासोबत (आलोक राजवाडे) लाहौरला गेल्यानंतर तेथील उस्तादकडून (कुमुद मिश्रा) ‘अभिजात’ मानल्या जाणाऱ्या संगीतापेक्षा वेगळ्या प्रकारचे संगीत शिकू लागतात. पुढे तरुणपणी पुण्यात आल्यानंतर पु. ल. देशपांडे (पुष्कराज चिरपुटकर) यांच्याशी ओळख होऊन समान आवडीनिवडी आणि पुलंची मनापासून दाद देण्याची रसिकवृत्ती यामुळे त्यांच्यातील स्नेह वाढत जातो. हे सारे टप्पे चित्रपटात वेगाने व उपजत सहजतेने घडताना दिसतात. वसंतरावांचा जीवनपट उभा करीत असताना आवश्यक ती माहिती पुरवणे आणि त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या (ठरावीक) व्यक्तींची ठळकपणे लक्षात राहणारी व्यक्तिचित्रे उभी करणे या स्तरांवर चित्रपट यशस्वी होतो.
कला आणि घर चालवण्यासाठी गरजेची नोकरी यांमध्ये त्यांची होणारी फरफट चित्रपटाच्या केंद्रस्थानी येते.
पुण्यात आल्यानंतर सरकारी नोकरी, लग्न व त्यापाठोपाठ येणाऱ्या सांसारिक जबाबदाऱ्या वसंतरावांचे (प्रौढ वयातील भूमिका - राहुल देशपांडे) आयुष्य व्यापतात. पुण्यात येईपर्यंत व आल्यानंतर सुरूवातीचा काही काळ वसंतरावांचा संघर्ष हा संगीतात प्रावीण्य मिळवण्यापुरता मर्यादित असतो. सांसारिक जीवनाला सुरूवात झाल्यानंतर मात्र कला आणि घर चालवण्यासाठी गरजेची नोकरी यांमध्ये त्यांची होणारी फरफट चित्रपटाच्या केंद्रस्थानी येते. पुढे ‘कट्यार काळजात घुसली’ने मिळवून दिलेल्या यशापर्यंत पोचेपर्यंत वसंतरावांना करावा लागलेला संघर्ष हा अस्वस्थ करणारा आहे. मात्र, ही अस्वस्थता बटबटीत नाट्याच्या स्वरूपात चित्रपटात येत नाही. इथले नाट्य संयत आणि मध्यवर्ती पात्राच्या स्वभावविशेषाशी, आंतरिक भावनेशी सुसंगत आहे.
वसंतरावांना जो संघर्ष करावा लागतो, तो संघर्ष तीन प्रकारचा आहे: १. संगीतामध्ये प्रयोग करीत आपले वेगळे स्थान निर्माण करणे व स्वतःचे वेगळेपण अबाधित राखणे, २. सर्जनशीलता व सांसारिक जबाबदाऱ्यांमुळे निर्माण होणारे आंतरिक द्वंद्व, ३. कुटुंबाकडे पाठ फिरविणाऱ्या स्वतःच्या वडिलांमध्ये परिवर्तित न होण्याचे स्वतःच्या मनातील दडपण. यापैकी पहिला मुद्दा हा मुळातच कलात्मक स्वरूपाचा आहे. मामा आणि मास्टर दीनानाथ यांच्यामुळे वसंतराव चाकोरीबाहेरील संगीताचा मार्ग निवडतात. या दोन व्यक्तिरेखा वसंतरावांना गरजेची अशी सर्जनशील वैचारिक बैठक प्राप्त होते. मात्र, वसंतरावांचे संगीत हे वेगवेगळ्या तऱ्हेची गायकी असणारे अनेक गुरु आणि स्वतः वसंतरावांची प्रयोगशील प्रवृत्ती यामुळे निर्माण झालेले असते. आणि हे संगीत शास्त्रीय संगीताच्या तत्कालीन श्रोत्यांच्या मते ‘अशुद्ध’ ठरते. वसंतराव हे पुण्यात राहणारे ब्राम्हण असले तरी शास्त्रीय संगीताच्या संदर्भात ते एका विशिष्ट काळापर्यंत उपेक्षित ठरतात. कारण, शास्त्रीय संगीताच्या स्वघोषित शिलेदारांनी त्यांचे संगीत ‘अभिजात’ नसून भेसळयुक्त (आणि अतिप्रयोगशील) असल्याने त्यांच्यावर बहिष्कार टाकलेला असतो. यादरम्यान त्यांना स्वतःला वारंवार सिद्ध करावे लागते.
तर, दोन व तीन क्रमांकाचे मुद्दे हे एकमेकांशी जोडलेले आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कुटुंबाकडे पाठ फिरवणे त्यांना मान्य नसल्याने त्यांना कौटुंबिक, आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी कलात्मक पातळीवर तडजोडी कराव्या लागतात. कलाकाराला अपेक्षित असलेले आदर्श जीवन आणि वास्तवातील परिस्थिती यामध्ये असलेली तफावत, कलाकाराच्या मनात निर्माण होणारी अस्थिरतेची भावना यामुळे हा प्रदीर्घ भाग सर्जनशील व्यक्तीला आपलासा वाटेल असा आहे.
व्यक्तिमत्त्वातील ही वैशिष्ट्ये वसंतरावांचे आयुष्य आणि या चित्रपटातील अनेक मध्यवर्ती घटनांना चालना देतात.
ताईचे व्यक्तिमत्त्व आणि वसंतरावांचे व्यक्तिमत्त्व यांमध्ये बऱ्याच समानता आहेत. फटकळ स्वभाव, देवावर विश्वास नसणे, पटत नसणाऱ्या गोष्टींना तडकाफडकी विरोध करणे, समोर आलेल्या परिस्थितीनुसार आवश्यक ती पावले उचलणे आणि आपल्या निर्णयांच्या परिणामांना सामोरे जात जबाबदाऱ्या स्वीकारणे, इत्यादी गोष्टींचा त्यात समावेश होतो. हा उल्लेख यासाठी महत्त्वाचा की, व्यक्तिमत्त्वातील ही वैशिष्ट्ये वसंतरावांचे आयुष्य आणि या चित्रपटातील अनेक मध्यवर्ती घटनांना चालना देतात. वसंतराव व ताई दोघांच्याही स्वाभिमानी स्वभाव व त्यांच्या वागण्याला लोक प्रेम, आश्चर्य, कौतुक, राग, तिरस्कार अशा अनेक प्रकारे प्रतिसाद देतात.
वसंतरावांच्या आयुष्यात एक मोठा काळ असा येतो की, त्यांना कलात्मक स्तरावरील समाधान मिळवून देणारे फारसे काही घडत नाही. चित्रपट मात्र अतिनिराशावादी नाही. कारण, कुठलीही भावना ही चिरंतर टिकणारी नसते, हे तत्त्व चित्रपटात दिसते. वसंतरावांच्या जीवनातील चढ-उतार दिसतात, त्यांच्या मनातील अनेकविध द्वंद्व दिसतात. त्यासोबतीने त्यांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणारी अनेक माणसेदेखील दिसतात. पु. ल. देशपांडे आणि ताई, वसंतरावांच्या ऑफिसमधील सहकारी, त्यांचे विशिष्ट चाहते, यांसोबत बेगम अख्तर आणि आक्का या दोन महत्त्वाच्या व्यक्तिरेखादेखील वसंतरावांच्या मनातील संगीतप्रेम व सर्जनशीलतेला जागृत ठेवत त्यांना प्रेरित करण्याचे काम करतात. चांगल्या कलाकाराच्या आयुष्यात त्याला साथ देणारी माणसे असणे किती गरजेचे असते, याचे उत्तम नमुने या चित्रपटात आढळतात.
चित्रपटात ठळकपणे लक्षात राहतील असे अनेक प्रसंग व गाणी आहेत. वसंतरावांचे दीनानाथ यांच्यासोबत होणारे माळरानावरील संभाषण, वसंतरावांनी ‘मारवा’चा रियाज करण्याचा सीक्वेन्स, बेगम अख्तर यांच्या घरातील प्रसंग, वसंतराव व ताईमधील टांग्यातील संभाषण असे काही प्रसंग त्यात येतात. मात्र, एका प्रसंगाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे आक्काची भेट व त्यानंतर येणारे गाणे. हा प्रसंग भावनिक पातळीवर प्रभावी तर आहेच, पण सोबत अभिनय व इतर तांत्रिक दृष्टीनेही सफाईदार आहे. तो ज्या ठिकाणी घडतो तिथली वातावरणनिर्मिती, दृश्यामध्ये केलेला प्रकाशयोजनेचा वापर, त्या दृश्यातील दोन मुख्य कलाकारांचा अभिनय, संगीत यामुळे हे दृश्य पाहताना मिळणारा जवळपास जादुई म्हणावासा अनुभव अतुलनीय आहे. हा प्रसंग चित्रपटात अगदीच अनपेक्षित ठिकाणी, अनपेक्षित वळणावर येतो आणि प्रेक्षक म्हणून तुम्हाला एका अद्वितीय तंद्रीत नेऊन सोडतो, तुम्हाला अधिक समृद्ध करून जातो. या विशिष्ट प्रसंगाचा अनुभव स्पॉइल करु इच्छित नसल्याने फार लिहीत नाही.
पंडित जितेंद्र अभिषेकी (कट्यार काळजात घुसली) आणि राहुल देशपांडे यांचे संगीत असलेल्या ‘मी वसंतराव’मध्ये बरीचशी वैविध्यपूर्ण गाणी आहेत. चित्रपटात नाट्यसंगीतातील पदे, पारंपरिक रचना तर आहेतच, पण चित्रपटासाठी नव्याने रचलेल्या काही गीतांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. ‘ललना’ हे मजेशीर गाणे, ‘पुनव रातीचा’ ही सुंदर बैठी लावणी आणि ‘तेरे दर से’ हे गीत (तिन्हींचा गीतकार - वैभव जोशी), तसेच ‘ले चली तकदीर’ ही गझल (मयुरेश वाघ) – या त्या रचना.
चित्रपटात अशा काही जागा आहेत ज्या अधिक प्रभावी होऊ शकल्या असत्या, असे वाटले. वसंतराव पुण्यात येतात त्याआधीच्या दृश्यात एक गंभीर घटना घडते. मात्र, त्या घटनेचा पात्राच्या आयुष्यावर, मनावर झालेला परिणाम पुरेसा जाणवू न देता लगेचच पु. ल. देशपांडेंच्या भेटीचे दृश्य आणि ‘ललना’ हे विनोदी, मजेशीर गाणे येते. यामुळे होते काय की, त्याआधी घडलेल्या घटनेच्या भावनिक परिणामाची नोंद प्रेक्षकाच्या मनात व्हायला पुरेसा वेळ मिळत नाही. शिवाय, ‘ललना’ या गाण्याच्या संकलनात काही शॉट्समध्ये अभिनेत्यांचे चेहरे, पडद्यावर दिसणारे वाद्य आणि ऐकू येणारा आवाज यामध्ये विसंगती दिसते. यातील पहिला मुद्दा जरा अधिक महत्त्वाचा आहे, कारण तो वसंतरावांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनेशी निगडीत आहे. या किंवा अशा काही मोजक्या गोष्टी सोडल्यास चित्रपट भावनिक व तांत्रिक दोन्ही दृष्ट्या प्रभावी आहे. (याहून अधिक बोलणे हे निटपिकिंग तर होईलच, पण ते रसभंग करणारेही असेल. शिवाय, असे करणे चित्रपट पाहताना आलेल्या नितांतसुंदर अनुभवाशी केलेली प्रतारणा ठरेल.)
निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बापजन्म’ (२०१७) आणि ‘धप्पा’ (२०१९) हे दोन्ही चित्रपट चांगले होते. ‘मी वसंतराव’ हा स्केलच्या दृष्टीने अधिक मोठा आणि महत्त्वाकांक्षी आहे. ज्यात चित्रपट चरित्रपट आणि ऐतिहासिकपट असल्यामुळे वेगवेगळे सेट्स आणि कला दिग्दर्शन यांपासून ते प्रेक्षकांना आधीच माहित असलेल्या लोकांच्या व्यक्तिरेखा उभ्या करणे अशी अनेक आव्हाने येतात. जे धर्माधिकारी आणि टीमने पुरेपूर पेलले आहे, असे चित्रपट पाहून वाटते. त्यामुळे केवळ वसंतराव देशपांडे यांचा जीवनपट म्हणूनच नव्हे, तर भावनिक, तांत्रिक स्तरावरील एक उत्तम कलाकृती म्हणूनही पाहावा.
[Tags: Mi Vasantrao, Marathi Film, Marathi Movie, Mi Vasantrao Review, Marathi review, Akshay Shelar, Mi Vasantrao Full Movie Review, Indie Journal, Spotlight, Nipun Dharmadhikari, Amey Wagh, Pu La Deshpande, Classical Music, Sarang Sathaye, BhaDiPa]