Quick Reads

एके वर्सेस एके: मिस्टर इंडिया: ऑर द अनएक्स्पेक्टेड वर्च्यू ऑफ इग्नरन्स

स्पॉटलाईट सदर

Credit : Netflix

सिनेजगताविषयीचा सिनेमा हा विषय काही आपल्यासाठी नवीन नाही. गुरु दत्तच्या ‘कागज के फूल’पासून (१९५९) ते फराह खानच्या ‘ओम शांती ओम’पर्यंतचे (२००७) या प्रकारात मोडणारे बरेचसे चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत निर्माण झालेले आहेत. विक्रमादित्य मोटवानेचा ‘एके वर्सेस एके’ हा चित्रपट ‘सिनेमाविषयीचा सिनेमा’ या विधेचा विचार नव्या आणि रंजक दृष्टिकोनातून करतो. मोटवाने हा निःसंशयपणे भारतीय चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या काही प्रयोगशील दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्यामुळे त्याला या प्रकारच्या चित्रपटाच्या संकल्पनेने आकर्षित करणं काहीसं साहजिक आहे. मोटवाने आणि अविनाश संपत यांनी लिहिलेल्या ‘एके वर्सेस एके’ची संकल्पना अशी की, त्यात चित्रपटजगतावरील चित्रपट आणि उपरोधिक माहितीपट या दोन विधांना एकत्र आणलं आहे. इथे एकमेकांविरुद्ध ठाकलेल्या ‘एकें’पैकी एक म्हणजे अनिल कपूर, तर दुसरी व्यक्ती म्हणजे अनुराग कश्यप. 

अनिल कपूर हा बॉलिवुडमध्ये असलेल्या कपूर घराण्याच्या प्रस्थाचं प्रतिनिधित्व करतो. त्याचे सगळे नातलग या ना त्या प्रकारे चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. त्याच्या मुलाने, हर्षवर्धन कपूरने तर खुद्द मोटवानेच्या चित्रपटात (भावेश जोशी सुपरहिरो, २०१८) काम केलेलं आहे. तर, अनुराग कश्यप हा स्वतंत्र आणि काही अंशी नवसमांतर चित्रपट चळवळीचं प्रतिनिधित्व करणारा चित्रपटकर्ता आहे. ही दोन शक्तीस्थानं एकत्र कशी येतात, तर (चित्रपटातील) कश्यपच्या कुरापती डोक्यातून उपजलेल्या एका कल्पनेमुळे. कपूर आणि कश्यप यांच्यामध्ये चित्रपटात जे युद्ध पेटलेलं आहे, त्यातून कश्यप अनिल कपूरच्या मुलीचं, म्हणजे सोनम कपूरचं अपहरण करतो. आपल्या मुलीला शोधण्यासाठी कपूरला दहा तासांचा कालावधी देऊन त्याचा माग काढणं आणि त्यातून एका “वास्तववादी” चित्रपटाची निर्मिती करणं, सोबत कपूरसोबत काम करण्याची इच्छा पूर्ण करणं, अशी कश्यपची कल्पना. 

 

 

वरवर पाहता-मुलीचं अपहरण झाल्यानंतर तिचा शोध घेणारा बाप - हे प्रकरण ‘टेकन’सारख्या (२००८) चित्रपटांसारखं असलं (ज्याचा थेट संदर्भ चित्रपटात येतो) तरी ही कल्पना काही नुसत्या ‘टेकन’ची मक्तेदारी नाही. याउलट जर मुलीचा मुद्दा बाजूला ठेवला आणि कलाजगतातील व्यक्तीचा केलेला पाठलाग आणि अपहरण हा मुद्दा लक्षात घेतला, तर ही संकल्पना मार्टिन स्कॉर्सेसीचा ‘किंग ऑफ कॉमेडी’ (१९८२) किंवा मनीष शर्माचा ‘फॅन’ (२०१६) या चित्रपटांमध्येही दिसून आलेली आहे. ‘एके वर्सेस एके’मध्ये मोटवानेचं दिग्दर्शन आणि कपूरच्या प्रभावी अभिनय यासोबत वर उल्लेखलेल्या विविध चित्रपटांतील महत्त्वाचे घटक एकत्र येतात. उदाहरणार्थ, स्कॉर्सेसीच्या चित्रपटांच्या धर्तीवरील डार्क ह्युमर, ‘टेकन’सारखं नाट्य आणि थरार इथे समप्रमाणात अस्तित्त्वात आहे. 

लेखक-दिग्दर्शक मोटवाने आणि सहलेखक संपत चित्रपटातील घटना आणि संवादातून समोर येणाऱ्या विनोदामध्ये सेल्फ-अवेअर आणि डार्क छटेसह कश्यप आणि कपूर, त्यांचा सभोवताल, त्यातील पात्रं यांना महत्त्व देतात. अनिल कपूरकडून आपल्या चित्रपटात नैसर्गिक वाटेल असं काम करवून घेण्यासाठी त्याच्या मुलीचं अपहरण करणं या घटनेत नुसता कश्यपच्या मनात कपूरबद्दल (चित्रपटाच्या विश्वात) असलेला आकसच नाही, तर कश्यपला असलेलं वास्तववादी चित्रपटांचं आकर्षणदेखील यात आहे. त्यामुळे सगळं प्रकरण वरवरचं वाटत असताना त्यात एक सातत्यपूर्ण चतुराई, सेल्फ-अवेअर दृष्टिकोन आणि गडद छटा कायम राखली जाते. परिणामी जेव्हा चित्रपटाच्या सुरुवातीला घमेंडखोर आणि आत्मविश्वास ठासून भरलेला नट म्हणून दिसणाऱ्या अनिल कपूरच्या पात्राचा प्रवास आपल्या मुलीची काळजी वाटणाऱ्या बापापर्यंत होतो, तेव्हा त्यात एक नैसर्गिक आणि तार्किक बदल पाहायला मिळतो. 

चित्रपटाच्या स्वरूपामुळे त्यात चित्रपटसृष्टीला महत्त्व आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीवरील टिप्पण्या आणि निरीक्षणं चित्रपटात मांडली जातात. ती काहीवेळा भारतीय चित्रपटसृष्टीशी थेट संबंध असलेली आहेत, तर कधी ही निरीक्षणं भारतीय उपखंडाच्या मर्यादांच्या पलीकडे जात एकूण चित्रपट व्यवसायाला लागू पडतात. उदाहरणार्थ, एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या चित्रपट अभिनेत्याने कारकीर्दीच्या उत्तरार्धात वाईट चित्रपटांमध्ये भूमिका करणं हे केवळ भारतीय चित्रपटसृष्टीपुरतं मर्यादित नाही. त्यामुळेच स्कॉर्सेसीच्या चित्रपटांमध्ये हक्काची भूमिका असणारा रॉबर्ट डी’निरो ‘डर्टी ग्रँडपा’सारखे (२०१६) चित्रपट करत असल्याची दृश्यं नवीन नाहीत. त्यामुळे ‘मिस्टर इंडिया’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनिल कपूरला ‘रेस ३’ (२०१८) आणि ‘पागलपंती’सारखे (२०१९) चित्रपट करावे लागणं, यात काही नवल नाही. तरी अनीस बाझमीचे चित्रपट आवडणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रसंगांसारखे संदर्भ भारतीय चित्रपटसृष्टीशी थेट संबंध असलेले आहेत. कश्यपच्या मनातील वास्तववाद, कलात्मक चित्रपट आणि कपूरशी थेट संबंध असलेल्या घराणेशाही, व्यावसायिक चित्रपट यांसारख्या टोकाच्या संकल्पनांतून इथल्या बऱ्याचशा विनोदांची उत्पत्ती होते. 

 

 

एकीकडे चित्रपटात हा डार्क ह्युमर दिसतो, तर दुसरीकडे अनिल कपूरच्या पात्राची हतबलता दिसते. त्याच्या हतबलतेला अनेक छटा आहेत. वयाच्या पासष्ठीत असलेला कपूर अस्तित्त्ववादी विचारांनी ग्रासलेला आहे. त्याच्या लोकप्रियतेमध्ये होत असलेली घट, कारकीर्दीच्या उत्तरार्धात महत्त्वपूर्ण भूमिका न मिळणं या समस्या त्याला सतावत आहेत. दुसरीकडे, कश्यपने त्याच्या मुलीचं केलेलं अपहरण खरोखर घडलं आहे, या जाणिवेमुळे पालकत्वाची अंतःप्रेरणा त्याच्या अस्वस्थतेमध्ये भर घालते आहे. त्यामुळे ‘एके वर्सेस एके’ हा एक मेटा-सिनेमा आणि एक थरारनाट्य अशा दोन्ही स्तरांवर काम करतो. 

अस्तित्त्ववादाने ग्रासलेला नायक या संकल्पनेसोबत सगळं कथानक खरोखर दहा तासांच्या कालावधीत, एकसलग घडत असल्याचा आभास निर्माण करणारं चित्रीकरण अलेहान्द्रो गोन्झालेझ इनारितुच्या ‘बर्डमॅन: ऑर द अनएक्स्पेक्टेड वर्च्यू ऑफ इग्नरन्स’ (२०१४) या चित्रपटाची आठवण करून देणारं आहे. दोन्हीकडे वयाच्या पासष्ठीमध्ये असलेले अभिनेते नायकाच्या भूमिकेत आहेत. दोघांनाही आपण आजवर फारसं महत्त्वाचं काम केलं नाही, या भावनेने ग्रासलं आहे. शिवाय, दोघांनाही एकेकाळी सुपरहिरोच्या भूमिका केल्या आहेत, हे विशेष! त्यामुळे दोन्ही चित्रपटांमध्ये एक अनेक समान दुवे आहेत. याखेरीज दोघांना सतावत असलेली त्यांच्या मुलींची चिंतादेखील (जरी दोन्हीकडे असलेले विशिष्ट संदर्भ वेगेळे असले तरी) दोन्हीकडे अस्तित्त्वात आहे. त्यामुळे एका अर्थी ‘एके वर्सेस एके’ हा ‘बर्डमॅन’प्रमाणेच अनिल कपूरकरिता गरजेचा असा एक विजयोत्सव म्हणून महत्त्वाचा आणि प्रभावी ठरतो. त्या अर्थी हा चित्रपट अनुराग कश्यपपेक्षा अनिल कपूरकडे अधिक झुकलेला आहे. 

मोटवानेच्या ‘भावेश जोशी सुपरहिरो’ या चित्रपटासारखा एक प्रदीर्घ चेज सीक्वेन्स या चित्रपटातदेखील आहे. मुंबईतील लोकलमध्ये घडणारं हे पाठलागाचं दृश्य आणि त्यानंतरचं अनिल कपूरचं स्वगत चित्रपटातील काही सर्वोत्कृष्ट दृश्यांमध्ये मोडतात. दिग्दर्शक मोटवाने आणि छायाचित्रकार स्वप्निल सोनवणे या दोघांनी प्रदीर्घ दृश्यं आणि त्यांची तितकीच चोख दृश्यरचना करत दृश्य स्तरावर एका प्रभावी कलाकृतीची निर्मिती केली आहे. ज्यात सगळ्या नट संचाने परिणामकारक भूमिका केल्या आहेत. त्यामुळे शेवटाकडील काहीसा फिल्मी प्रसंग वगळता ‘एके वर्सेस एके’ एक सर्वगुणसंपन्न चित्रपट ठरतो. महत्त्वाचं म्हणजे, हा चित्रपट अनिल कपूरप्रमाणेच मोटवानेच्या प्रयोगशील आणि सर्जनशील अभिव्यक्तीचा विजयोत्सव म्हणून त्याच्या फिल्मोग्राफीमध्ये शोभून दिसतो.