Quick Reads

आफ्टर लाईफ: नैराश्यपूर्ण, तरीही विनोदी

स्पॉटलाईट सदर

Credit : Netflix

रिकी जर्वेसची ‘आफ्टर लाईफ’ आणि फिबी वॉलर-ब्रिजची ‘फ्लीबॅग’ या दोन्ही मालिकांमध्ये काही ठळक साम्यं आहेत. हे साम्य मुख्यत्वे या दोन्ही मालिकांच्या ब्रिटिश असण्यातून येतं. अमेरिकन मालिका आणि ब्रिटिश मालिका यांच्यामध्ये असलेला फरक तसा सर्वश्रुत आहे. जे अमेरिकन कलाकृतींतील विनोद आणि ब्रिटिश कलाकृतींतील विनोद यातही दिसून येतं. अमेरिकन कलाकृती व्यक्तीपेक्षा घटनेला महत्त्व देतात, तर ब्रिटिश कलाकृती आपल्या पात्रांना अधिक महत्त्व बहाल करणाऱ्या असतात. त्यामुळे ब्रिटिश मालिकांमधील विनोदाच्या गडद छटा पात्रांच्या उपजत स्वभावातून निर्माण होणाऱ्या असतात. ही पात्रं अनेकदा आयुष्याकडे नीरस दृष्टिकोनातून पाहणारी, निराशावादी आणि तीक्ष्ण अशी विनोदबुद्धी असलेली असतात. ‘आफ्टर लाईफ’ आणि ‘फ्लीबॅग’ या दोन्हींमध्ये ब्रिटिश कलाकृतींची ही वैशिष्ट्यं दिसून येतात. 

याखेरीज, दोन्ही मालिकांमधील मुख्य पात्रांचं एखाद्या प्रचंड जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूच्या शोकात असणं, ही मृत पात्रं या ना त्या प्रकारे मालिकांमध्ये दिसत राहणंदेखील दोन्हीकडे घडतं. दोन्हींतील मुख्य पात्रांचं नास्तिक असणं, त्यांचा जगाकडे पाहण्याचा तिरकस दृष्टिकोन आणि कुटुंब किंवा समाजाकडून त्यांच्या वर्तणुकीवर केली जाणारी टीका हेदेखील समान आहे. अर्थात, यापलीकडे जात दोन्ही मालिकांचं स्वतःचं असं वेगळेपण नक्कीच आहे. शिवाय, कथनाच्या पातळीवर ‘आफ्टर लाईफ’ अधिक मोकळीक असलेली आहे. तर, ‘फ्लीबॅग’ ही मांडणी, दिग्दर्शन या पातळ्यांवर अधिक प्रयोग करणारी आहे. ‘आफ्टर लाईफ’ दोन्हींचा एकत्रित उल्लेख करण्याचं कारण हेच की, ‘आफ्टर लाईफ’ हा लेखाचा विषय असला तरी ‘फ्लीबॅग’ या तितक्याच वेगळ्या मालिकेची ओळख व्हावी. 

टोनी (रिकी जर्वेस) हा एका स्थानिक वृत्तपत्रात काम करणारा पत्रकार ‘आफ्टर लाईफ’च्या केंद्रस्थानी आहे. काही काळापूर्वी त्याची पत्नी, लिजाचा (कॅरी गोडलीमन) कॅन्सरने मृत्यू झालेला आहे. इंग्लंडमधील अगदी छोट्याशा काल्पनिक गावात आपलं सगळं आयुष्य व्यतीत केलेल्या टोनीच्या आयुष्याला अर्थ होता तो फक्त लिजाच्या अस्तित्त्वामुळे. त्यामुळे तिच्याभोवती फिरणाऱ्या त्याच्या छोटेखानी विश्वात तिच्या जाण्याने एक न भरून येणारी पोकळी निर्माण होते. त्याचं काम, त्याचं आयुष्य, त्याच्या सभोवतालातील लोक अशा कुठल्याच गोष्टीबाबत त्याच्या मनात आस्था उरलेली नाही. जगण्यात रस नसलेला टोनी आत्महत्या करता करता थांबला तो त्याच्या कुत्र्यामुळे. त्याच्या मते, आयुष्य ही अगदी उत्सव साजरा करण्यासारखी गोष्ट नसली तरी ती एकदाच मिळणारी गोष्ट आहे. आणि तसंही तो एकदा आत्महत्या करता करता थांबला आहे म्हणजे पुढे जाऊन कधीही आत्महत्या करण्याचा पर्याय त्याच्यासमोर आहे. नास्तिक असलेल्या आणि साहजिकच ख्रिश्चन धर्मातील मृत्यूनंतरचं जीवन या संकल्पनेवर विश्वास नसलेला टोनी कितीही असमाधानकारक आयुष्य जगण्यामागे हीच कारणं आहेत. 

 

 

टोनीचं सर्व गोष्टींबाबत नीरस असणं, नैराश्य आणि मृत्यूसारख्या गंभीर संकल्पना इथे अस्तित्त्वात आहेत. मात्र, त्यासोबतच टोनीच्या तिरकस दृष्टिकोनातून निर्माण होणारा विनोदही इथे आहे. हा विनोद खळखळून हसवणारा नाही, त्याचं तसं असणं अपेक्षितही नाही. हा विनोद त्याची अचूक निरीक्षणं, टिप्पण्या आणि त्यांच्या सत्यतेमुळे अधिक प्रभावी ठरणारा आहे. ही निरीक्षणं टोनीचा सहकारी छायाचित्रकार लेनी (टोनी वे), त्याचा मेव्हणा आणि वृत्तपत्राचा संपादक मॅट (टॉम बॅसडेन), कॅथ (डायान मॉर्गन) आणि नव्याने रुजू झालेली पत्रकार सँडी (मनदीप धिल्लोन) यांच्याकडे टोनी कशा प्रकारे पाहतो यातून येतात. स्थानिक वृत्तपत्रात आपली बातमी छापून येण्यासाठी धडपड करणाऱ्या नागरिकांच्या विचित्र कृतींमधूनही गंमतीशीर प्रसंग घडतात. विनोदाच्या विक्षिप्त जागा इथे रंजक ठरतात. 

‘आफ्टर लाईफ’चे जवळपास सगळेच भाग टोनीच्या आयुष्यातील दिनक्रम समोर मांडतात. टोनी नुकताच झोपेतून उठून लिजाचे व्हिडीओ पाहत बसलेला असतो, त्याचं कुत्रं ब्रँडी त्याच्या शेजारी बसलेलं असतं नि नंतर तो उठून ऑफिसला जायला निघतो. अशात या आधीच्या व्हिडीओंमधून लिजा हे पात्र कशा प्रकारे उभं केलं जातं, हे पाहावंसं आहे. 

 

 

टोनीसोबतच त्याच्या आयुष्यातील इतर व्यक्तींच्या - म्हणजेच त्याचे सहकारी, त्याचे स्मृतिभ्रंश झालेले वडील, वृद्धाश्रमात त्यांची देखभाल करणारी नर्स एमा (ॲशली जेन्सन), रॉक्सी ही सेक्स वर्कर - अशा बऱ्याचशा लोकांच्या जीवनाला इथे स्पर्श केला जातो. त्यामुळे वेगवेगळ्या धाटणीची, आयुष्याकडे अगदी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहणारी व्यक्तिमत्त्वं इथे दिसतात. ज्यामुळे मालिकेला आणि तिच्यातील विनोदाला अधिक सर्वसमावेशक बनणं शक्य होतं. ‘आफ्टर लाईफ’ आणि ‘फ्लीबॅग’मधील आणखी एक साम्य म्हणजे मुख्य पात्रं अडचणीत असताना सल्ला घेत असताना किंवा आयुष्याकडे त्रयस्थपणे पाहताना त्यांनी अनोळखी व्यक्तींचा सल्ला घेणं. ‘फ्लीबॅग’च्या दोन्ही सीझनमध्ये हजेरी लावणारा बँक मॅनेजर (ह्यू डेनिस) दिसतो. तर, ‘आफ्टर लाईफ’मध्ये रॉक्सी आणि स्मशानभूमीत भेट झालेली ॲन (पेनेलपी विल्टन) ही पात्रं आहेत. टोनी रोज आपल्या बायकोच्या कबरीजवळ जाऊन बसतो, तर ॲनदेखील तिच्या पतीच्या आठवणीत तिथे बसत असते. मात्र, समदुःखी असलेल्या या दोघांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती निराळा आहे हे त्यांच्या संभाषणातून दिसतं. ॲनशी होणारं बोलणं टोनीला अधिक सकारात्मक अवलोकन करण्यास भाग पाडतं. 

‘आफ्टर लाईफ’च्या दोन्ही सीझनची अगदी ठरावीक अशी गती आहे. ज्यात कथानक अगदी हळूहळू पुढे जातं, पात्रात घडणारे बदलही अगदी आकस्मिक किंवा मोठे नसून अगदीच सूक्ष्म आहेत. ही गती टोनी या मुख्य पात्राच्या मनोवस्थेला पूरक अशी आहे. त्याचं दुःख समजून घेणारी आहे. जवळपास प्रत्येक भागाच्या सुरुवातीला आणि शेवटी, असं दोन्ही ठिकाणी एक एक गाणं ऐकू येतं. ही गाणीही टोनीच्या मानसिक अवस्थेला पूरक ठरणारी आहेत. रिकी जव्हेसचं दिग्दर्शनही असंच आहे. इथल्या गंभीर, तरीही विनोदी अशा संमिश्र शैलीला साजेसं असलेलं. 

‘आफ्टर लाईफ’ ही तिच्या व्यक्तीकेंद्रित मांडणीच्या माध्यमातून अतीव दुःख, एकटेपणा, कुणा तरी जोडीदाराची गरज भासणं, सोबतच मानवी आयुष्य आणि त्यातील निरर्थकता नि त्या निरर्थकतेतही अर्थ शोधू पाहण्याची माणसांची धडपड अशा बऱ्याच संकल्पनांचा परामर्श घेणारी आहे. या संकल्पना क्लिष्ट असल्या तरी मालिकेत त्या तितक्या बोजड प्रकारे येत नाहीत. मालिकेचा दृष्टिकोनही नैराश्य आणि किंचित सकारात्मकता यांची सांगड घालणारा असल्याने मालिकेत आनंद आणि दुःख या दोन्ही भावना अस्तित्त्वात असल्याचं दिसून येतं. अर्थात यात दुःखाची तीव्रता अधिक आहेच. या सगळ्या संकल्पना मालिकेला वैशिष्ट्यपूर्ण बनवणाऱ्या आहेत. ज्यांच्या एकत्रित अस्तित्त्वामुळे मालिका नैराश्यपूर्ण, तरीही विनोदी बनते. आणि या प्रकारातील काहीतरी पहायचं झाल्यास चुकवू नये अशी ठरते.