Quick Reads

१९१७: अंगावर येणारा युद्धपट

स्पॉटलाईट सदर

Credit : Neal Street Productions

युद्धपट म्हटलं की प्रामुख्याने पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध ही दोन युद्धं आठवतात. ज्यातील दुसऱ्या महायुद्धाबाबत चित्रपट या माध्यमामध्ये बरंचसं काम झालेलं आहे. हे चित्रपट दोन प्रकारचे असतात. पहिले म्हणजे युद्धाला आणि युद्धातील शौर्याची स्तुती करणारे, आणि दुसरे म्हणजे युद्धातील क्रौर्य दाखवणारे युद्धविरोधी चित्रपट. अनेकदा आपल्याकडील युद्धपट हे पहिल्या प्रकारातील असतात, तर युद्धात पोळलेल्या पाश्चिमात्य देशांतले युद्धपट दुसऱ्या.  

युद्धविरोधी चित्रपट असतात. यामागे काही उघड कारणं असतात, ती म्हणजे हे चित्रपट युद्धांतील क्रौर्य, भीषण रक्तसंहार, त्यांचं अमानवी, अमानुष असणं ठळकपणे चितारतात. अर्थातच युद्ध, युद्धातील शौर्याचा उत्सव साजरा करणारे, लोकांना युद्धात सामील होण्यास प्रवृत्त करू पाहणारे चित्रपटही अस्तित्त्वात असले तरी अशा चित्रपटांची संख्या कालानुक्रमे घटत गेली असल्याचं दिसून येतं. सॅम मेंडेस दिग्दर्शित ‘१९१७’ हा युद्धपटांची कथात्म वैशिष्ट्यं हाताशी घेत एका अभिनव नाही, मात्र खिळवून ठेवणाऱ्या रुपात त्यांची मांडणी करतो. ‘१९१७’ हा संपूर्ण कथानक एकाच सलग प्रसंगात घडतं अशा रीतीने समोर मांडण्यात आलेला आहे. असं करताना साहजिकच मोठी लांबी असलेली दृश्यं एकत्र जोडत हा आभास निर्माण करण्यात आलेला आहे. 

 

 

‘१९१७’ मधील पहिला प्रसंग म्हणजे, दूरवर पसरलेल्या शांत भासणाऱ्या गवतावर स्थिरावलेला कॅमेरा हळूहळू मागे येतो तो झाडाला टेकून बसलेल्या विल्यम शॉफील्ड (जॉर्ज मॅके) या ब्रिटिश सैनिकावर. शॉफील्डच्या थोडासा पुढे टॉम ब्लेक (डीन-चार्ल्स चॅपमन) हा आणखी एक सैनिक बसलेला आहे. पहिल्या महायुद्धाचा काळ आहे. ६ एप्रिल १९१७ हा दिवस आहे. जमिनीपासून काहीएक इंचावर लावलेल्या शॉटमध्ये एखादा माणूस जमिनीवर बसल्याच्या स्थितीतून हे दृश्य टिपलं जातं. या दोघांच्या मधे आणखी एक सैनिक येऊन उभा राहतो, नि ब्लेकला एका व्यक्तीची निवड करत जनरलने बोलावलं असल्याचा निरोप देतो. ही व्यक्ती आपल्याला दिसत नाही. इथे ती महत्त्वाची नाही. ब्लेक शॉफील्डची निवड करतो, नि शॉफील्ड उठल्यावर त्याबरोबर इतका वेळ कॅमेरादेखील वर येतो नि त्यांना टिपत त्यांच्यापुढे चालू लागतो. जमिनीवरील ब्रिटीश छावणीपासून सुरु झालेला प्रसंग खंदकांपर्यंत जाऊन पोचतो नि त्यादरम्यान त्याच्या रंगसंगतीतही बदल घडतात. 

चित्रपटात अशा सलगदृश्यांत केवळ रंगसंगतीतच नव्हे, तर दृश्यांच्या चित्रीकरणाच्या पातळीवरही अनेक बदल घडतात. उदाहरणार्थ, जे प्रसंग जमिनीवर न घडता नदीत घडतात किंवा ज्या दृश्यांमध्ये गाड्यांना किंवा शॉफील्डला तो पळत असल्याच्या समांतर दिशेनं चित्रित केलं जातं अशा प्रसंगांत छायाचित्रकार रॉजर डीकिन्स काही हातात कॅमेरा घेऊन पळत नाही हे तसं स्पष्ट आहे. इथे दृश्यांचं चित्रीकरण आणि त्यांचं संकलन यांत काही क्लुप्त्या वापरलेल्या असणं स्वाभाविक आहे. मात्र इथे प्रश्न त्यांच्या विश्वासार्हतेचा नसून ही एकसंध दृश्याच्या आभासाची क्लुप्ती एकूण कथानकाला कशा पद्धतीने पूरक ठरते याचा अधिक आहे. 

इथलं कथानक चोवीस तासांच्या कालखंडात घडतं. ब्लेक आणि शॉफील्डवर एक कामगिरी सोपवण्यात आलेली आहे. त्यांच्या छावणीपासून काही अंतरावर असलेल्या इकूस्त गावाजवळील ब्रिटीश सैनिकांच्या दोन तुकड्यांनी जर्मन सैन्यावर हल्ला करणं अपेक्षित आहे. मात्र, चित्रपट सुरु होतो तेव्हा हाती आलेल्या बातमीनुसार जर्मनांनी सापळा रचला आहे, आणि जर दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत त्यांनी या तुकडीपर्यंत हा हल्ला थांबवण्याचा आदेश पोचवला नाही तर सोळा हजार सैनिकांना आपले प्राण गमवावे लागतील. हा संदेश पोचवण्याची जबाबदारी ब्लेक आणि शॉफील्ड यांची आहे. यातही पुन्हा स्टीव्हन स्पीलबर्गच्या ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’च्या (१९९८) धर्तीवर ब्लेकचा एक भाऊ त्या तुकडीत असल्याचा मुद्दा समाविष्ट केला जातो. त्यामुळे हा हल्ला थांबवण्यामागे एक वैयक्तिक कारण-वजा-प्रेरणाही येते. 

आधी उल्लेख केल्याप्रमाणे इथे युद्धपटांतील कथात्म वैशिष्ट्यं एका खिळवून ठेवणाऱ्या कथनशैलीत उपयोजित केली आहेत. ज्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे ब्लेक आणि शॉफील्ड यांचे स्वभाव, त्यांचे युद्धाबद्दलचे विचार हे परस्परविरोधी आहेत. ब्लेकच्या मनात युद्ध आणि युद्धात पराक्रम गाजवणारे सैनिक यांबद्दल एक आदरार्थी भावना आहे. ही भावना काहीएक प्रमाणात प्रत्यक्ष युद्धातील क्रौर्य न अनुभवलेल्या नागरिकांना असलेल्या आकर्षणासारखी आहे. अर्थात तो स्वतः सैनिक जरी असला तरी त्याने युद्ध त्याच्या भीषण रुपात पाहिलं असल्याचं सुरुवातीला दिसत नाही. याउलट शॉफील्डला युद्धाची प्रचंड चीड आहे. त्याने भूतकाळात काहीतरी शौर्य गाजवल्याचे आणि त्याबद्दल त्याचं कौतुक झाल्याचे संदर्भ येतात. पण, सोबतच ब्लेकने विचारलं असता त्याने आपलं मेडल एका व्हिस्कीच्या बॉटलसाठी एका फ्रेंच अधिकाऱ्याला दिलं असल्याचं सांगतो. त्याला युद्ध आणि युद्धभूमी नापसंत असली तरी त्यापासून दूर जाणं त्याला शक्य नसतं, घरी जाणं त्याला मान्य नसतं. घरी जाणं मान्य नसण्यामागे कुठेतरी आपण केलेल्या क्रौर्याबाबतची अपराधी भावना कारणीभूत असावी. त्यामुळे या परस्परविरोधी लोकांचं एकत्र येणं आणि दोघांच्या मोहिमेदरम्यान इथल्या अननुभवी व्यक्तीने क्रौर्य अनुभवणं हे स्वाभाविक घटना घडतात. या दोघांचे स्वभाव टोकाचे असले तरी दोघांमधील मित्रत्वाची भावना इथे ज्या पद्धतीने समोर येते ते महत्त्वाचं ठरतं. ज्यामुळे या पात्रांबाबत जिव्हाळा निर्माण होणं शक्य होतं. 

दोन प्रमुख पात्रांव्यतिरिक्त जनरल्स, कर्नल्स आणि लेफ्टनंट्सच्या रुपात कॉलिन फर्थ, बेनेडिक्ट कम्बरबॅच, मार्क स्ट्रॉंग, अँड्र्यू स्कॉट, रिचर्ड मॅडन असे काही प्रसिद्ध चेहरे दिसतात. यातील एक पात्र म्हणतं की, ‘सम मेन जस्ट वॉन्ट टू फाईट’. इथली बरीचशी पात्रं किंवा खऱ्या जगातील बरेचसे लोक आणि त्यांना प्रिय असलेली हिंसा याबाबत हे वाक्य अगदी चपखल लागू पडतं. युद्धाबद्दलचं आकर्षण, शौर्य गाजवण्याची भावना आणि ब्लेकच्या मनातील आदरार्थी भावना कशातून येते याबाबत मानसशास्त्राचं सहाय्य घेता येईल. फ्रॅंक मॅकअँड्र्यू हे मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणतात की, “...having killed someone in the war was often good for one's reputation, many societies developed ceremonies for recognizing such accomplishments. In modern societies, these take the form of prestigious awards such as the Congressional Medal of Honor in the United States, and many countries have national holidays to celebrate the heroism of those who have fought and/or died in wars.”(1) 

दिग्दर्शक मेंडेस आणि छायाचित्रकार डीकिन्स हे मोठ्या कौशल्यपूर्णरीत्या इथला पट रचतात. पात्रांच्या डोक्यावर असलेली वेळेची टांगती तलवार, मधे घडणाऱ्या अनपेक्षित घटनांसोबत इथल्या कृतींमध्ये गरजेची असलेली तत्परता आणि भावनिक आंदोलन यांचा आलेख चढत जातो. क्रिस्टोफर नोलनच्या ‘डंकर्क’मधील काळ ही संकल्पना आणि इथली संकल्पना या एका अर्थी समान मानता येतात. दोन्हीकडे युद्धातील भीषण नरसंहारातून वाचण्याची/वाचवण्याची धडपड सुरु असते. छावणीच्या दृश्यांमध्ये स्टॅन्ली कुब्रिकच्या ‘पाथ्स ऑफ ग्लोरी’ या आणखी एका महत्त्वाच्या युद्धविरोधी चित्रपटातील ट्रेंचेसमधील विस्तृत प्रसंग आठवतात. मेन्डीस आणि डीकिन्स इथे पात्रांनी जलद कृती करण्याची आवश्यकता अधोरेखित करतात, प्रेक्षकांना आणि प्रसंगी पात्रांनाही धक्के देत भय निर्माण करतात. शॉफील्ड आणि ब्लेक या दोन्ही पात्रांसोबत घडत असलेल्या घडामोडी अगदी जवळून दिसतात. सभोवताली अस्ताव्यस्त पडलेले सैनिकांचे अर्धवट जळलेले, कुजत असलेले मृतदेह दिसतात, त्यांतून फिरणारे उंदीर दिसतात. त्या त्या ठिकाणी घडून गेलेला रक्तपात आणि संहार दिसतो. 

 

 

‘१९१७’ याच बाबी मानवाच्या भूतकाळात घडून गेलेल्या महायुद्धासारख्या भयावह घटनांचा धिक्कार वाटेल अशा प्रकारे या युद्धातील क्रौर्य समोर आणतो. भलेही कथेच्या किंवा मांडणीच्या पातळीवर चित्रपट एका दिवसाच्या कालखंडात घडत असल्याने त्याला काही मर्यादा असल्या तरी त्यातून मिळणारी अनुभूती ही ‘पाथ्स ऑफ ग्लोरी’ (१९५७), ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’, ‘डंकर्क’ (२०१७), ‘फ्युरी’ (२०१४) आणि इतरही अनेक चित्रपटांच्या जवळ जाणारी आहे. ‘१९१७’मध्ये चित्रपटाच्या तांत्रिकतेवर भर देत त्याला सहाय्य करणारं काहीसं ढोबळ कथानक आहे असं म्हणणं योग्य असलं तरी या ढोबळ कथानकातील विशिष्ट जागाही महत्त्वाच्या ठरतात. उदाहरणार्थ, ‘आय अॅम जस्ट अ वेफ्रेइंग स्ट्रेन्जर’ या गाण्याची जागा पहावी. भरपूर तणावपूर्ण प्रसंगांनंतर साहजिकच पात्रं आणि प्रेक्षक दोघांनाही श्वास घ्यायला अवकाश दिला जातो. याखेरीज चित्रपटाच्या शेवटी इथल्या पात्राच्या प्रवासाचं एक वर्तुळ पूर्ण केलं जातं. मधल्या काळात त्यात घडलेला बदल इथल्या उपसंहार मानाव्याशा दृश्यात दिसतो. 

चित्रपटाच्या शेवटाकडील दोन लांबलचक दृश्यांत तर छायाचित्रकार डीकिन्स रंगांची उधळण करतो. इकूस्टमधील उद्ध्वस्त इमारतींमधून पात्राचं धावणं आणि उपसंहाराच्या आधीचा प्रसंग ही ती दोन दृश्यं. अर्थात ‘१९१७’मध्ये डीकिन्स आणि मेन्डीस यांच्या कामगिरीला जितकं महत्त्व आहे, तितकंच महत्त्व इथलं अदृश्य संकलन, व्हिज्युअल इफेक्ट्स, सगळ्याच कलाकारांचा अभिनय आणि थॉमस न्यूमनचं संगीत यांनाही आहे. कारण, जोवर हे सारे घटक चित्रपटनिर्मितीत तितक्याच प्रभावीपणे एकत्र येत काम करत नाहीत तोवर यासारखा दृकश्राव्य अनुभव निर्माण होणं शक्य होत नसतं. 

‘१९१७’ हा अंगावर येत राहतो. त्याची दृश्यपातळीवरील व्याप्ती इतकी आहे की तो एकदा पाहिला की आणखी काही वेळा पहावा यासाठी उद्युक्त करणारा आहे. आणि हल्ली अशी भावना निर्माण करणारे चित्रपट तसे क्वचितच पहायला मिळतात.