Quick Reads

भोंसले: विरोधाभासांचा समांतर प्रवास

स्पॉटलाईट सदर

Credit : Sony Liv

मायनर स्पॉयलर्स अहेड. 

स्थलांतरितांचा प्रश्न आणि तो नीट समजून घेऊन त्याचं निराकरण करण्यात व्यवस्थेला आलेलं अपयश ही ठिकठिकाणी जाणवणारी समस्या आहे. भारतीय संदर्भात पहायचं झाल्यास, अगदी काहीच दिवसांपूर्वी ‘वुई आर वन’ या ऑनलाइन चित्रपट महोत्सवाचा भाग असलेल्या ‘ईब आले ऊ’ या चित्रपटात दिल्लीतील स्थलांतरित मजूरांचा प्रश्न हाताळला गेल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र, तिथली समस्या आणि महाराष्ट्रातील स्थलांतरितांचा प्रश्न यात बराच फरक आहे. कारण, महाराष्ट्रात ही समस्या भाषिक तसेच प्रादेशिक वादाचे संदर्भ घेऊन येते. मराठी माणूस विरुद्ध अमराठी लोक, स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असा हा वाद आपण गेली अनेक दशकं अगदी जवळून पाहत आलेलो आहोत. मराठी अस्मितेचा मुद्दा लावून धरत विविध पक्ष आणि संघटनांनी या समस्येकडे कसं पाहिलं, हेही आपण अनुभवलेलं आहे. दर काही दिवसांनी त्याचं पुरुज्जीवन होताना दिसतं, ते वेगळंच. आताही कोरोनाच्या उद्रेकानंतर ही समस्या पुन्हा चर्चेत आला होता. 

या वादाच्या अनुषंगाने शिवसेनेचं आक्रमक दृष्टिकोन असलेलं राजकारण आणि लोकांना भावनिक आवाहन करणं हे मुद्दे भाऊ पाध्येंच्या ‘राडा’ या १९७५ मधील कादंबरीमध्येही दिसलेले आहेत. ती कादंबरी पहिल्यांदा प्रकाशित व्हायला आता पन्नास वर्षं होत आली तरीही हा मुद्दा अजून अस्तित्त्वातच आहे, आणि तो ज्या प्रकारे हाताळला जातोय तेही पूर्वीसारखंच आहे, यातच सगळं आलं. देवाशिष मखिजा दिग्दर्शित ‘भोंसले’मध्ये नेमका हाच मुद्दा येतो. चित्रपटाला सामाजिक, राजकीय परिस्थितीवर भाष्य करायचं असलं तरी त्याचं नाव सुचवतं त्याप्रमाणे त्याचं स्वरूप हे एखाद्या उत्कट व्यक्तीचित्राचं अधिक आहे. हे व्यक्तीचित्र इथल्या शीर्षक पात्राबरोबरच त्याच्या सभोवतालाला आणि इतर पात्रांनाही सामावून घेणारं आहे. 

‘भोंसले’मध्ये अगदी सुरुवातीपासूनच विरोधाभासी संकल्पना समांतरपणे समोर येत राहतात. विरोधाभास हा इथला स्थायीभाव आहे. तो जितका दृश्य पातळीवरील आहे, तितकाच संकल्पनांच्या पातळीवरील आहे. हा विरोधाभास जे दिसतं त्यातील परस्परसंबंध दाखवणारा आणि त्यातून एकसंध चित्र निर्माण करणारा आहे. काहीच न बोलता, सगळं काही दृश्यांतून, ध्वनीतून मांडणारा आहे. (अगदी इथलं शीर्षक पात्रही मोजक्याच ठिकाणी आणि मोजकंच बोलतं.) चित्रपटाला सुरुवात होते तेव्हा एकीकडे आपला गणवेश काढून ठेवत असणारा गणपत भोंसले (मनोज बाजपेयी) हा पोलिस हवालदार दिसतो, तर दुसरीकडे गणपतीची मूर्ती रंगवली नि विविध आभूषणांनी मढवली जाताना दिसते. साहजिकच शहरात गणेशोत्सवाची तयारी सुरु असते. मात्र, गणेशोत्सव केवळ लोकांना एकत्र आणण्यासाठी साजरा केला जातो, असं चित्रपटकर्त्यांना वाटत नाही. कारण, काहीवेळा लोकांना एकत्र आणत असल्याचा आभासही निर्माण करत प्रत्यक्षात त्यांचं ध्रुवीकरण केलं जातं. 

 

 

विलास ढवळे (संतोष जुवेकर) हा ‘मराठी मोर्चा’ या काल्पनिक संघटनेच्या काही कार्यकर्त्यांपैकी एक आहे. भोंसले घरी परतत असतो तेव्हा विलास चाळीत फक्त आणि फक्त मराठी लोकांचा स्वतंत्र गणपती बसवण्याबाबत बोलताना दिसतो. इथेच स्थानिक विरुद्ध परप्रांतीय हा मुद्दा समोर आणला जातो. पुढे जाऊन ‘भोंसले’मध्ये खचितच बोलणारा भोंसले आणि अविरतपणे बोलत राहणारा विलास या दोघांची आयुष्यं समांतररीत्या समोर मांडली जातात. शांत, संयत भासणारा वृद्ध भोंसले आणि महत्त्वाकांक्षी, आक्रमक पवित्रा बाळगून असणारा तरुण विलास ही व्यक्तिमत्त्वं आलटून पालटून समोर दिसत राहतात. भोंसलेला पोलिस दलात आणि चाळीत असलेला मान आपल्याला दिसतो. त्याचा दबदबा त्याचा भूतकाळ कसा असेल याकडे बोट दाखवतो.

मात्र, तो दोन पावलं पुढं गेल्यावर त्याच्याविषयी होणारी कुजबुजदेखील आपल्याला ऐकू येते. भोंसलेचा सभोवताल त्याच्या खिजगणतीतही नाही, तो एक मूक प्रेक्षक आहे. त्याचं वागणं, त्याचं सर्व गोष्टींबाबत नीरस असणं यात एक विशिष्ट प्रकारची विषण्णता, खिन्नता आहे. चित्रपटात सुरुवातीलाच येणारा, भोंसलेच्या दैनंदिन जीवनातील कृतींची पुनरावृत्ती दाखवणारा सीक्वेन्स पाहिला तर भोंसलेच्या एकाकी आयुष्याची कल्पना येऊ शकते. अशावेळी त्याची नोकरी त्याला सर्वकाही वाटणं साहजिक आहे. त्यामुळेच तर निवृत्त व्हावं लागणं त्याला मान्य नाही. त्याला नोकरी करत असताना ज्या रुटीनची सवय झाली आहे तो रुटीन त्याच्या आताच्या जीवनापेक्षा अधिक सोयीस्कर वाटत असावा. त्याचं एककल्ली आयुष्य, त्याचं कुणाच्या अध्यातमध्यात नसणं या सध्यासोप्या गोष्टी म्हणजेच आयुष्य अशी त्याची व्याख्या असल्याचं जाणवत राहतं. अर्थात यात वय आणि अनुभवाचा भाग आहेच. 

याउलट विलासला मोठं व्हायचं आहे. मोठं होण्याचा मार्ग म्हणजे राजकारण असं त्याचं समीकरण आहे. ‘ही मुंबई मराठी माणसांची आहे’ - ही आणि अशीच इतर वाक्यं ऐकत तो मोठा झालाय. त्यामुळेच तो टॅक्सी चालवता चालवता ‘मराठी मोर्चा’साठी काम करतो. किमान चर्चिल चाळीला मराठी अस्मितेचं महत्त्व समजावून तरी आपल्याला निवडणुकीत उभं राहण्यासाठी तिकीट मिळेल, या शक्यतेवर त्याची स्वप्नं विसंबून आहेत. डांगे भाऊ (सुनील जाधव) त्याचा वापर करून घेतोय हे मात्र त्याच्या लक्षात येत नाही. त्याअर्थी विलास विविध संघटना, पक्षांवर अवलंबून असणाऱ्या अशाच इतर कार्यकत्यांचं प्रतिनिधित्व करतो. भोंसले व्यवस्थेपुढे हतबल आहे, तर विलास त्याला न मिळणाऱ्या यशामुळे विफल आहे. या दोघांची आयुष्यं दाखवत असताना दिसणारी दृश्यं, आणि त्यांच्यात एकाचवेळी विरोधाभास आणि साम्य कशा प्रकारे दाखवलं जातं, हे पाहावंसं आहे. तशी तर, दोघांची आयुष्यं दयनीय आणि असमाधानकारक आहेत. मात्र, त्यांचा दृष्टिकोन किती भिन्न आहे, हे इथे दिसतं. 

याखेरीज चाळ संस्कृती, चाळीतील रहिवासी यांच्याबाबत जी निरीक्षणं मांडली जातात, तीदेखील इंटरेस्टिंग अशीच आहेत. मिश्राचा (चित्तरंजन गिरी) मुलगा राजेंदर (अभिषेक बॅनर्जी) आणि विलासमध्ये घडून येत असलेलं द्वंद्व दिसत राहतं. पण, सोबतच हा वाद घडू नये असं वाटणारा मिश्रा दिसतो. गेली कित्येक वर्षं मुंबईत राहणाऱ्या मिश्राला हा फूट पाडणारा वाद मुळात का घडतो हे उमगत नाही. यासारख्या तुलनेने संक्षिप्त पात्रांचं चित्रणदेखील एकूण चित्रपटात महत्त्वाचं ठरतं. कारण, त्यातून हा मराठी विरुद्ध अमराठी वादाला असलेले कंगोरे उलगडायला मदत होते. चाळीत भोसलेच्या शेजारी राहायला आलेली सीता (इप्शिता चक्रबर्ती सिंग) आणि तिचा लहान भाऊ लालू यांच्या येण्यानंतर घडणाऱ्या घडामोडी चित्रपटाला आणि भोंसलेला एक वेगळी दिशा मिळवून देतात. हे बदल अनपेक्षित न वाटता हळूहळू घडून येतात. विलास आणि भोंसलेदरम्यान धुमसत असणाऱ्या अस्वस्थ वादाचा कधी ना कधी विस्फोट होणार, हे तर निश्चित असतं. चित्रपटाचा वेग या संभाव्य विस्फोटाची प्रतीक्षा वाढवत नेतो. भलेही त्यानंतर (शेवटच्या अर्ध्या) घडणाऱ्या घडामोडी काहीशा अनपेक्षित आणि उथळ वाटल्या तरीही तोवर सिनेमात जे काही घडतं, नि ते ज्या प्रकारे समोर आणलं जातं त्यासाठी चित्रपट पाहावासा ठरतो. 

‘भोंसले’ची मांडणी अशी आहे की, समोर जे दिसतंय नि ऐकू येतंय त्याचा आपापल्या परीने अर्थ लावण्यास बराच वाव आहे. एकीकडे भोंसले जिथे राहतो ती चाळ, चाळीतील त्याचं छोटेखानी घर आणि घराचा उडालेला रंग दिसतो. दुसरीकडे, टॅक्सीमध्येच झोपणारा, सकाळी सार्वजनिक शौचालयात जाणारा विलास आपल्याला दिसतो. आणि तिसरीकडे डांगे भाऊच्या ऑफिसची रंगरंगोटी आणि सजावट होताना दिसते. चित्रपटात ठिकठिकाणी विरोधाभास दडलेला आहे. ‘भोंसले’मध्ये कथेपेक्षा तिची मांडणी अधिक महत्त्वाची ठरणारी आहे. तर, सामाजिक, राजकीय भाष्य त्याला अधिक समर्पक, कालसुसंगत बनवणारं आहे.

चित्रपटात प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा केलेला वापरही इथल्या अर्थात भर घालणारा आहे. चित्रपटाच्या मध्यभागात येणाऱ्या एका महत्त्वाच्या दृश्यात मांजर दिसतं. साधारणतः अनिश्चितता आणि पुनरुद्धाराचं रूपक मानली जाणारी मांजर येऊन गेल्यानंतर भोंसलेमध्ये (म्हणजे चित्रपट आणि पात्र, अशा दोन्हींमध्ये) घडणारे सूक्ष्म बदल या अगदीच संक्षिप्त दृश्याला अधिक महत्त्व प्राप्त करून देतात. हे प्राणी-पक्षी इथल्या आशयातील आणि मांडणीतील गडद दृष्टिकोन आणि रुपकात्मतेमध्ये भर घालतात. 

चित्रपटातील मंगेश धाकडेंचं मर्मभेदक संगीत इथल्या कारुण्याला पूरक ठरणारं आहे. इथले मोन्टाजेस आणि विसंगतीपूर्ण संकल्पना एकत्र आणताना त्यांना अधिक अर्थपूर्ण बनवण्यात धाकडेंचं संगीत महत्त्वाचं ठरतं. याखेरीज दिग्दर्शक मखिजा प्रेक्षकांना अस्वस्थ करण्यासाठी दृक्-श्राव्य माध्यमाचा वापर कशा प्रकारे करतो यासाठीही हा चित्रपट जरूर पाहावासा ठरतो. (त्याचा यापूर्वीचा चित्रपट, ‘आज्जी’देखील (२०१७) अशाच प्रकारचा आहे.) ज्याच्याकडून याहूनही अधिक चांगल्या कामाच्या अपेक्षा ठेवता येतील असा हा कौशल्यपूर्ण दिग्दर्शक आहे.