Quick Reads

पाताल लोक २ : दूरवरच्या प्रदेशाची ओळखीची गोष्ट

स्पॉटलाईट सदर

Credit : इंडी जर्नल

 

‘पाताल लोक’च्या पहिल्या पर्वात भारतीय समाजव्यवस्था, माध्यमव्यवस्था, पोलिस यंत्रणा या साऱ्याचे चित्र प्रेक्षकांसमोर चितारले होते. दुसऱ्या पर्वात सामजिक-राजकीय आणि भौगोलिक परिस्थितीचे विच्छेदन केले आहे. हे विच्छेदन दोन प्रकारे केले आहे. एकीकडे, मालिकेच्या पटलावर दिसणाऱ्या छोट्या छोट्या घटना, मुंगीएवढे कर्तृत्व आणि महत्त्व असणारी माणसं, त्यांच्या कृती यांचे क्लोज-अप्स दिसतात; तर दुसरीकडे, छोट्या छोट्या गोष्टी, माणसं आणि त्यांच्या कृत्यांचे व्यापक स्तरावर काय परिणाम होतात, याचे लाँग शॉट्स दाखवले जातात. म्हणजे, ही मालिका एकाचवेळी लहानसहान तपशील खुलवत कथानक सादर करते आणि त्याचवेळी व्यापक अर्थ उलगडेल असे जगण्याचे तत्त्वज्ञानही समोर मांडते. आजवर ज्या काही भारतीय मालिका निर्माण झाल्या आहेत, त्यांमध्ये कधीच या दोन्ही गोष्टी एकाचवेळी साध्य करण्याचा विचार झालेला नाही. त्यामुळे त्याची परिणामकारक अंमलबजावणी तर दूरच राहते!

मालिकेच्या पहिल्या पर्वातील घटनाक्रमानंतर काही गोष्टी घडल्या आहेत. हाथीराम चौधरीचा (जयदीप अहलावत) कनिष्ठ म्हणून रुजू झालेला इम्रान अन्सारी (ईश्वक सिंह) आता सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) बनला आहे. स्टेशन हेड विर्कचे सुद्धा प्रमोशन झाले आहे. हाथीराम मात्र आपला आहे तिथेच आहे. अशात मालिकेची सुरुवात दोन वेगवेगळ्या, असंबद्ध वाटणाऱ्या केसेसपासून होते. एकीकडे कनिष्ठ वर्गातील एक मजूर बेपत्ता झाला आहे. हाथीराम त्याचा शोध घेतोय. दुसरीकडे, दिल्लीमध्ये नागालँडमध्ये विकास घडवून आणण्यासाठी एक परिषद भरवण्यात आलेली असताना एका महत्त्वाच्या नागा नेत्याचा, जॉनाथन थोमचा, खून होतो. एसीपी अन्सारी त्या गुन्ह्याचा तपास करत आहे. ही दोन्ही प्रकरणं एकमेकांत गुंतत जातात आणि हाथीराम आणि अन्सारी यांचे रस्तेही ओव्हरलॅप होऊ लागतात. दिल्लीतून सुरु झालेला तपास त्यांना नागालँडमध्ये घेऊन जातो. मालिकेत पणाला लागलेल्या गोष्टींची तीव्रता वाढत जाते - त्यात वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि नातेसंबंधांसोबतच व्यापक स्तरावरील राजकारण, हेवेदावे, इत्यादी गोष्टीही समाविष्ट असतात.

 

 

गोष्टीचा मुलभूत पाया रचल्यावर मालिका - साहजिकच - अधिकाधिक गुंतागुंतीची होत जाते. मात्र, हा व्याप केवळ वाढत जाणारी पात्रं आणि रहस्यापुरता मर्यादित नाही. यावेळी मालिका केवळ दिल्लीपुरती मर्यादित नाही. त्यात एक वेगळं राज्य, वेगळी संस्कृती येते. तिथली भाषा बोलणारे लोक येतात, त्यांच्या परंपरा येतात. अशी जागा जिथे हाथीराम आणि अन्सारी तिथे तिऱ्हाईत ठरतात. स्वाभाविकपणे त्यांच्या क्षमतांवर मर्यादा जय मर्यादा येतात, त्यामुळे इथला घटनाक्रम आणि ही दोन पात्रं समोर आलेल्या गोष्टींना कशा रीतीने समोर जातात, हे पाहणं रोचक, रंजक बनतं.

आपल्या राज्यातील नेत्याचा खून झाल्यावर नागालँड पेटून उठतं. त्यामुळे अस्मितेचं राजकारण, आयडेन्टिटीला अर्थात ओळखीला (वैयक्तिक व सामूहिकही) असलेलं महत्त्व पदोपदी दिसू लागतं. नागालँडमध्ये गेल्यावर एका राजकीय कार्यकर्त्याने हाथीरामचे सरकारी ओळखपत्र घेतल्यानंतर पुढचे काही दिवस त्याच्याकडे ओळखपत्र नसते. ही बाब जितकी कथानकाला पुढे नेणारी, एका महत्त्वाच्या पात्राला कथानकात आणणारी आहे, तितकीच रुपकात्मक आहे. दुसऱ्या राज्यात गेल्यावर आपण नक्की कोण असतो? आपले अधिकार, आपले कार्यक्षेत्र काहीही असले तरी शेवटी आपण केवळ गर्दीचा एक भाग बनतो का? इतके चर्वितचर्वण करण्याचे कारण हेच की ओळख हा ‘पाताल लोक’च्या दुसऱ्या पर्वातील महत्त्वाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

 

 

ओळख ही केवळ वैयक्तिक नसते. ती सामाजिक, राजकीय कंगोरे घेऊन येते. कोण बेपत्ता होतं, कुणाचा खून होतं, तुम्ही कुणाला ओळखता आणि कोण तुम्हाला ओळखतं हे सारं काही अत्यंत महत्त्वाचं असतात. भारतासारख्या देशात तर अधिकच! उदाहणार्थ, मालिकेत अंमली पदार्थांची वाहतूक करण्यामुळे दुसऱ्या राज्यात गुन्हा दाखल झालेल्या मजुरांचा विचार करून पहा. काही तिथे अडकून पडतात, सुटण्यासाठी गयावया करतात. कोर्टात केस दाखल झाल्यानंतर दर काही महिन्यांनी पुन्हा इकडे यावं लागण्याला वैतागून तिथेच स्थायिक झालेल्या ड्रायव्हर बिट्टूचा (दीपक चौधरी) विचार करून पहा. नागालँडमध्ये स्थायिक झालेलं पासवान कुटुंब तरी याहून काय वेगळं आहे? पन्नास-साठ वर्षांनंतरही नागालँडमधील लोक त्यांना तिऱ्हाईत मानतात. ही छोटी-मोठी पात्रं, त्यांचं जगणं आणि मनातील कोलाहलांचे क्लोज-अप्स मालिकेत दिसतात. पण, त्या समीप दृश्यांतून व्यापक संकल्पना मांडल्या जातात.

ओळख किंवा त्यापाठोपाठ येणारा स्थलांतराचा मुद्दा सबंध मालिकेतील केवळ एक कडी झाली. मातृत्व आणि पालकत्व, स्त्री-पुरुष नातेसंबंध, त्या संबंधांतील लैंगिक राजकारण, कुटुंबातलं राजकारण, प्रत्येक कुटुंबाची गुपितं आणि त्यांचे पडसाद, राजकीय व वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, वासना आणि भौतिक गोष्टींचा हव्यास अशा एक अन् अनेक संकल्पना पुढे येतात. एकीकडे, हाथीराम आणि रेणू यांचा मुलगा कॉलेजमध्ये गेल्यामुळे रेणू त्याच्यापासून दुरावली गेली आहे. दुसरीकडे, बेपत्ता मजुराचा मुलगा एकाएकी अनाथ बनल्यानं हाथीराम त्याला तात्पुरतं आपल्या घरी आणतो. या साऱ्याच्या काय शक्यता आहेत ते माहीत असूनही त्यातल्या शक्यता जेव्हा प्रत्यक्षात मालिकेत घडतात, तेव्हा त्यांतली सहजता (किंवा निर्माणकर्त्यांनी तयार केलेला सहजतेचा आभास) पाहणाऱ्याला थक्क करते. बरं, ही मातृत्वाची आणि पालकत्वाची संकल्पना केवळ हाथीरामच्या घरात किंवा दिल्लीमध्ये संपून जात नाही. अगदी मालिकेच्या शेवटापर्यंत ती वेगवेगळ्या अनुषंगाने समोर येत राहते. अगदी मृत नागा नेत्याच्या कुटुंबापासून ते नागालँडमध्ये पकडल्या गेलेल्या मजुरांपर्यंत, रोज लिजो, तिचे आई-वडील यांपासून ते एसपी मेघना बरुआपर्यंत (तिलोत्तमा शोम) सर्वत्र ती दिसते.

 

 

हेच स्त्री-पुरुष संबंधांबाबत लागू होते. हाथीराम आणि रेणूमधील वाद आणि दोघांनी अजिबातच त्रागा न करता निव्वळ शांत बसून राहण्याचे अलवार क्षण जसे दिसतात, तसेच कथानकातील इतर पात्रांच्या आयुष्यातील टोकाचे हिंसक संबंधही दाखवले जातात. त्यामुळे सर्वच अर्थांनी हा सारा पट अधिक गुंतागुंतीचा (क्लिष्ट नव्हे!) बनतो. रेनेसाँ काळातील एखाद्या भव्य चित्राप्रमाणे प्रत्येक पात्र, प्रत्येक तपशील मुळातच इतक्या सूक्ष्म स्तरावर रेखाटला जातो की त्यामुळे शेवटी व्यापक चित्राला कमालीची सघनता आणि खोली प्राप्त होते.

डेव्हिड फिंचरचं काम आणि कोएन ब्रदर्सच्या कामाचा प्रभाव मालिकेवर दिसतो. नोआ हॉलीच्या ‘फार्गो’सारख्या मालिकेचा प्रभावही ठळकपणे जाणवतो. त्यातला विक्षिप्तपणा तेवढा इथे फारसा नाही. पण, गुन्ह्यांचे गुंतागुंतीचे स्वरुप, गूढ घटना आणि पात्रं, तळागाळापर्यंत पसरलेली हिंसा, लालसा या साऱ्या गोष्टी यापूर्वी पाहिलेल्या प्रभावी अमेरिकन मालिकांइतक्या उत्तमरीत्या जमवून आणल्या आहेत.

संपूर्ण मालिकेत प्रचंड कोलाहल, हिंसा, राजकीय-सामाजिक उलथापालथ पाहायला मिळते. पण, असे असूनही लेखक आणि निर्माणकर्ता सुदीप शर्मा आणि दिग्दर्शक अविनाश अरुण यांना आपल्या पात्रांविषयी, एकूणच माणसांविषयी असणारी करुणा आणि विश्वास ठळकपणे दिसत राहतो. उगाच ‘कूल’ वाटावे म्हणून आशय किंवा मांडणीच्या स्तरावरील गडदपणा येत नाही, उगवणारा दिवस आपल्यासोबत लख्ख प्रकाश घेऊन येताना दिसतो. कोलाहल आणि हिंसा पदोपदी अस्तित्त्वात असूनही शांत, संयत क्षण आवर्जून येतात.

महत्त्वाचे म्हणजे, ही मालिका बाहेरून आत डोकावत नाही. जी व्यवस्था समोर मांडायची आहे, त्यामध्ये पार खोलवर आत शिरून सगळं चित्र समोर आणते. आताच्या काळात निर्माण होणाऱ्या कलाकृतींचा विचार करता हा दृष्टिकोन मालिकेचा विशेष आहे. आतून बाहेर डोकावत असताना जो पट समोर मांडला आहे, तो प्रचंड प्रभावी आणि कौतुकास्पद आहे. त्यामुळेच मालिका पहिल्या पर्वाच्याही पुढे जाणाऱ्या या कलाकृतीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे!