Quick Reads

स्पॉटलाईट:शॉपलिफ्टर्स

‘कुटुंब’ या संज्ञेच्या खऱ्या अर्थाचा शोध घेणारी एक नितांतसुंदर कलाकृती

Credit : AOI Promotion

कुठलंही कुटुंब हे निरनिराळ्या तऱ्हेनं विचार करणाऱ्या, जगाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आयुष्यातील समस्यांची उकल आपापल्या परीने करू पाहणाऱ्या सदस्यांनी बनलेलं असतं. आपल्या वैयक्तिक जाणिवा-नेणिवा जपत, आपल्या स्वतःच्या आयुष्यातील समस्या सोडवत कुटुंबाशी असलेलं नातं टिकवून ठेवण्याची कसरत थोड्याफार फरकाने प्रत्येकच सदस्याला करावी लागत असते. जागतिक चित्रपट-मालिकांमध्ये अशाच एखाद्या डिसफंक्शनल (अकार्यक्षम) कुटुंबावर आधारित कलाकृती ही संकल्पना काही फारशी नवी नाही. अशा तऱ्हेच्या चित्रपटांमध्ये कथानकाच्या केंद्रस्थानी असलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या परस्परांतील नातेसंबंधांच्या आधारे कुटुंबव्यवस्थेचा, आणि कुटुंब या संज्ञेचा खोलवर आढावा घेतला जातो. जगप्रसिद्ध जापानी दिग्दर्शक हिरोकाझु कोरे-इडाचा कान चित्रपट महोत्सवातील मानाचा पुरस्कार, पाम’डि ऑर विजेता चित्रपट ‘शॉपलिफ्टर्स’ हा जपानमधील अशाच एका अकार्यक्षम कुटुंबावर आधारित आहे. मात्र, तो या मूलभूत संकल्पनेच्या पलीकडे जात मानवी स्वभाव आणि कुटुंबसंस्थेचा परामर्श घेणारा आहे. 

टोकियोमध्ये राहणारं शिबाता हे पंचकोनी कुटुंब रूढ अर्थांनी कुटुंब या व्याख्येत बसणारं नाही. कारण, जैविकदृष्ट्या विचार करता यातील सदस्य रक्ताच्या नात्यानं जोडलेले नाहीत. ओसामु (लिली फ्रँकी) हा रोजंदारीवर काम करणारा कामगार आहे. नोब्युयो (साकुरा आंदो) ही त्याची पत्नी एका लॉंड्री फॅक्टरीमध्ये काम करते. अकी (मायु मात्सुओका) ही मुलगी (ही या जोडप्याची मुलगी की नोब्युयोची बहीण याबाबत सुरुवातीचा बराच काळ संदिग्धता असते), शोता (काइरी जेओ) हा तरुण मुलगा, आणि हात्सू (किरीन किकी) ही वयस्कर महिला म्हणजे या कुटुंबाचे इतर दोन सदस्य. सततच्या गरिबीने या पाचही जणांचा कायम पिच्छा पुरवलेला आहे. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी अकीला वेश्याव्यवसायाचंच एक जापानी रूप म्हणाव्याशा होस्टेस क्लबमध्ये काम करावं लागतं. सोबतच या कुटुंबाला हात्सूच्या मृत पतीच्या पेन्शनवरही अवलंबून रहावं लागतं. अशावेळी उत्पन्नाचा किंवा उदरभरणाचा आणखी एक पर्याय म्हणून हे कुटुंब दुकानं किंवा मॉल्समधून हवी ती गोष्ट लंपास करण्यावर (शॉपलिफ्टिंग) भर देतं. आणि शिबाता कुटुंबाच्या या सवयीवरूनच चित्रपटाला ‘शॉपलिफ्टर्स’ हे त्याचं नाव प्राप्त झालेलं आहे. 

चित्रपटाला सुरुवात होते, तीच मुळी एका अपघातात पायाला इजा झाल्याने ओसामुला सक्तीने कामावरून काढून टाकण्यात येण्याच्या घटनेनं. ज्यामुळे सदर कुटुंबाच्या समस्यांमध्ये आणखी एका समस्येची भर पडते. त्यानंतर ओसामु आणि शोता अगदी राजरोसपणे दुकानांतून माल लंपास करताना दिसतात. ही कृती अनैतिक नाही हे शोताला पटवून देणारं ओसामुचं एक अजब तत्त्वज्ञान म्हणजे - अजून दुकानात असलेला माल मुळात कुणालाही विकला गेलेला नसल्याने तो चोरण्यात काहीच गैर नाही. अशाच एका दिवशी मॉलमधून घरी परतत असताना घराजवळच्या एका घराच्या बाल्कनीत युरी (मियु सासाकी) ही सहा सात वर्षांची मुलगी थंडीत कुडकुडत असताना दिसते. बहुधा त्यांनी तिला यापूर्वीही पाहिलेलं असावं. आज मात्र कडाक्याची थंडी पडलेली असल्याने, आणि तिच्या घरातून येत असलेला आई-वडिलांच्या भांडणाचा आवाज कमी व्हायचं नाव दिसत नसल्याने ओसामु तिला आपल्यासोबत घरी आणतो. सुरुवातीला तिला एका रात्रीपुरतंच आपल्या घरी ठेवायचा निर्णय घेतला जातो. मात्र, तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळल्यानंतर युरीला तिच्या खऱ्या पालकांकडे पाठवण्याचा निर्णय रद्द केला जाऊन तीदेखील त्यांच्याच कुटुंबाचा एक भाग बनते. 

हळूहळू कोरे-इडाच्या या कौटुंबिक नाट्यात एखाद्या रहस्य-थरारपटात शोभावेत असे ट्विस्ट्स येऊ लागतात. मात्र, हे ट्विस्ट्स प्रेक्षकाला आधी उभारलेल्या नाट्यापासून दूर नेत, विचलित न करता उलट या भावनिक नाट्यात भर घालतात. हे ट्विस्ट्स आधीच योग्य तितकी माहिती दिलेली असल्याने, संदिग्धता राहील हे पाहिलेलं असल्याने योग्य तो परिणाम साधतात. दृश्यांची संयत तरीही प्रभावी अशी मांडणी, हारुओमी होसोनोचं पूरक आणि तितकंच संयत, तरल असं संगीत यामुळे ‘शॉपलिफ्टर्स’चा भावनिक पातळीवरील परिणाम द्विगुणित होतो. 

यानुषंगाने चित्रपट जसजसा पुढे सरकतो, तसा नैतिकतेची व्याख्या काय हा प्रश्नही इथे उभा राहतो. म्हणजे शिबाता कुटुंब चोरी करतं हे मान्यच. पण त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकेल इतपत उपाययोजनाही करू न शकणारी, आणि जोवर परिस्थिती हाताच्या बाहेर जात नाही तोवर त्यांच्या नुसत्या अस्तित्त्वाविषयी अनभिज्ञ असणारी व्यवस्थादेखील एका तऱ्हेने दोषी नाही का? शिबाता कुटुंब अनैतिक कृत्यं करतं हे मान्यच. मात्र, युरीला मारहाण करणाऱ्या, आणि सोज्वळतेचं आवरण पांघरणाऱ्या जन्मदात्यांपुढे शिबाता कुटुंब काय ठरतं? - हे कुटुंब युरीच्या पालकांपुढे अधिक नैतिक ठरणार? की तिला आपल्या कुटुंबात सामावून घेत (तिचं तथाकथित अपहरण करण्याच्या) गुन्ह्यापायी अनैतिक ठरणार? मुख्य म्हणजे नोब्युयो म्हणते त्याप्रमाणे, केवळ कुणालातरी जन्म देणं त्या व्यक्तीला एक आदर्श आई बनवतं का? 

आणि खरंतर हीच ‘शॉपलिफ्टर्स’ची मध्यवर्ती संकल्पना आहे. कुटुंब म्हणजे काय? फक्त जैविकदृष्ट्या जोडले गेलेले लोक म्हणजे कुटुंब का? आणि असल्यास कसेही असले तरी फक्त ‘ते’ काही लोक म्हणजे आपलं कुटुंब समजावं का? भलेही मग आपल्यावर त्याहून अधिक प्रेम करणारे लोक या जगात असले तरीही? लेखक-दिग्दर्शक कोरे-इडा याआधीही त्याच्या कलाकृतींच्या माध्यमातून वारंवार हे प्रश्न आपल्यासमोर उभे करताना दिसलेला आहे. इथेही कौटुंबिक नाट्याच्या पार्श्वभूमीवर तो या वैश्विक मुद्द्यांना हात घालतो. त्यामुळेच या साऱ्या पात्रांचं एक परिपूर्ण आणि तरल असं भावविश्व रेखाटणारा ‘शॉपलिफ्टर्स’ वेळोवेळी अस्वस्थ करून सोडतो. ‘व्हॉट इज मोअर पर्सनल इज मोअर युनिव्हर्सल’ या वाक्यानुसार इथेही या आता षट्कोनी बनलेल्या कुटुंबाचं, त्यातील सदस्यांचं भावविश्व हाताळणारी कथा त्यातील अस्सल अशा भावनांमुळे अधिक वैश्विक बनल्याचं दिसून येतं. ज्यामुळे सदर चित्रपट म्हणजे भावनिक, मानसिक पातळीवर समृद्ध करणारा अनुभव ठरतो.