India
सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात शेतकरी संघटनेचं आत्मक्लेश आंदोलन
थकीत विज बिलाच्या वसुलीसाठी राज्य शासनानं वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर टाकलेल्या दबावामुळं कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांची वीज तोडत आहेत.

सक्तीच्या वीजबिल वसुलीच्या धोरणाच्या निषेधार्थ तसंच मृत पावलेल्या शेतकऱ्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी वीज तोडल्यानंतर विजेच्या खांबावर चढुन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या आत्म्याला शांती लाभावी, व सरकारला सुबुद्धी लाभावी, यासाठी वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर समोर बसुन २६ फेब्रुवारी रोजी आत्मक्लेश करणार असल्याचं शेतकरी संघटनेचे गणेश पाटील यांनी सांगितले आहे.
थकीत विज बिलाच्या वसुलीसाठी राज्य शासनानं वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर टाकलेल्या दबावामुळं कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांची वीज तोडत आहेत. शेतीमध्ये पिकं उभी असुन वीज तोडणीच्या सुलतानी संकटामुळं शेतकरी प्रचंड दबावाखाली आले आहेत. या दबावामुळं शेतकरी आत्मघाता सारखा गंभीर मार्ग अवलंबत आहेत.
शेतकरी संघटनेचे सुधीर बिंदू म्हणाले, "पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांना पाठींबा देणारं राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीत वीज बिल वसुलीचा खंजीर खुपसत आहे. या वसुलीसाठी वीज तोडल्यामुळं औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं विजेच्या खांबावर चढुन आपला जीव दिला. राज्यातील शेतकरी हे सक्तीच्या वसुलीमुळं प्रचंड नैराश्यात आहेत. राज्य सरकारच्या या सक्तीच्या वीजबिल वसुलीच्या धोरणाच्या निषेधार्थ तसेच मृत पावलेल्या शेतकऱ्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी व सरकारला सुबुद्धी मिळण्यासाठी शुक्रवारी वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर समोर बसुन आम्ही शेतकरी आत्मक्लेष आंदोलन करणार आहोत."