India

मुख्यमंत्रांच्या निधीनंतर पाथरी आणि शिर्डीमध्ये साई बाबांच्या जन्मभूमीचा वाद

धार्मिक स्थळ विकास निधीवरून निर्माण झालेल्या वादावर साक्षेप

Credit : Times of India

पाथरी येथील साई जन्मभूमी विकास आराखड्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०० कोटींच्या निधीची मंजुरी दिल्यानंतर साई जन्मभूमीचा वाद निर्माण झाला आहे. कोणतेच संत महापुरुष आपोआप प्रकट होत नाहीत. त्याला आईची कुसच लागते. हे सर्वज्ञात आहे. पाथरी हीच साई बाबा यांची जन्मभूमी आहे़, असा दावा पाथरीकरांनी केला आहे़ या संदर्भात पाथरीकरांकडून श्री साई बाबा यांच्या जन्मासंदर्भातील पुरावेही देण्यात येत आहेत. पण शिर्डीकरांकडून फक्त तर्क केले जात आहेत.

मोठा निधी मिळून साईबाबा जन्मस्थळ विकसित झाले तर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांमुळे लोकांच्या हातांना काम मिळेल. भाविकांकडून देणगी स्वरुपात मिळणाऱ्या पैशातून शाळा, दवाखाने, रस्ते, दळणावणाच्या सुविधा होतील. लोकांची मानसिकता अशी आहे की श्रध्देपोटी ते जगाच्या पाठीवर तिर्थाटनासाठी कुठेही जातील. पिचलेल्या लोकांचे प्रश्न काही प्रमाणात सुटत असतील तर देवाधर्माच्या नावावर होणाऱ्या या गोष्टी योग्य की अयोग्य हे तत्वज्ञान इथे वांझोटे ठरते.

साई बाबांच्या जन्माबद्दल पाथरी-शिर्डीकरांनी दावे केले आहेत. प्रथम आपण शिर्डीकरांनी केलेले दावे-पुरावे पाहुयात,

ब्रिटीशांना बाबा हे स्वातंत्र्य संग्रामाशी निगडीत असावेत, असे वाटले. त्यामुळे गुप्तहेर पाठवून त्यांची चौकशी करण्यात आली होती. १९७५ मध्ये विश्वास खेर यांनी तसा दावा केला. काहींनी बाबांचा जन्म तामिळनाडूत श्रीवैकुंठम् येथे झाला, त्यांच्या आईचे नाव वैष्णवी तर वडिलांचे नाव अब्दुल सत्तार असल्याचे सांगितले. एका तामीळ चरित्रात त्यांचे वडील साठे शास्त्री तर आई लक्ष्मीबाई असल्याचा उल्लेख आहे.

गुजराथी ‘साईसुधाम’ध्ये बाबा हे गुजराती ब्राह्मण कुटुंबात नंदलाल व जमनाबाई यांच्या पोटी जन्मल्याचे म्हटले आहे. मंगळवेढय़ात एक वेडसर बुवा होते. तेच साईबाबा असल्याची चर्चा होती. काहींना १८५७ च्या बंडानंतर परागंदा झालेले नानासाहेब पेशवे हे साईबाबा असल्याचा संशय होता. तसे लेखही छापून आले. मात्र हे सर्व दावे तर्कावर आधारीत आहेत.

साईबाबांनी १९१८ मध्ये समाधी घेतली. दाभोळकर, चांदोरकर, दीक्षित या परंपरागत त्यांच्या भक्तांनी नंतर शिर्डीत विश्वस्त मंडळ स्थापन केले. बाबांच्या समाधी सोहळ्याला पाथरी येथील भुसारी घराण्यातील अथवा गावातील कुणीही शिर्डीला आले नाही. बाबांच्या हयातीतील एकही भक्त पाथरीचा नव्हता. बाबांच्या हयातीतील भक्तांचा विश्वस्त मंडळात समावेश होता. त्यातही पाथरीकर सापडले नाहीत. यापूर्वीही अनेकदा बाबांच्या जन्मस्थळाबद्दल दावे झाले. खेर यांनी पुढाकार घेऊन पाथरीत मंदिर बांधले. विश्वस्त मंडळ स्थापन केले. मात्र त्याला साईभक्तांनी मान्यता दिली नाही. शिर्डी हेच साईबाबांचे सर्वकाही असल्याचे जगभरातील साईभक्त मानतात. त्यामुळे या दाव्यांना अर्थ राहिलेला नाही, असे शिर्डीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

 

पाथरीकरांचा दावा काय?

पाथरी येथे श्री साईंचा जन्म झाल्याचे संशोधन १९७५ मध्ये सर्वप्रथम समोर आले. मुंबई येथील साई भक्त विश्वास खेर यांनी हे संशोधन करण्यासाठी २५ वर्षे खर्ची घातली. १९७८ साली साई संस्थानच्या नावाने त्यांनी विश्वस्त मंडळाची स्थापना करून पाथरी ही श्री साईंची जन्मभूमी असल्याचे सांगितले़.  विश्वास खेर यांनी पाथरी येथील साईभक्त दिनकरराव चौधरी यांची १९७५ ते ७८ दरम्यान भेट घेतली़.  पाथरी येथील साई बाबांच्या सहवासात आलेल्या अनेक जणांच्या मुलाखती घेतल्या. त्यात साईबाबांचे वास्तव्य कुठे होते हे सांगण्यात आले़. साई बाबांचा प्रचार करणारे संत दासगणू महाराज यांची प्रत्यक्ष भेट घेऊन खेर यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळीही साई बाबांचे जन्मस्थळ पाथरीच असल्याची बाब समोर आली़ तसेच पाथरी येथील साई बाबांचे जन्म ठिकाण असलेल्या जागेत उत्खनन करताना अनेक वस्तू सापडल्या़ त्यामध्ये धान्य दळण्यासाठीचे जाते, दिवे लावण्यासाठीच्या खापराच्या पणत्या, पुजेची भांडी आणि इतर वस्तुंचा समावेश आहे़. खुद्द शिर्डी संस्थानने १९७४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या इंग्रजी साई सचरित्रामध्येच साई बाबांचा जन्म हा पाथरीत झाल्याचा उल्लेख आहे.

बी़. व्ही़. नृसिंह स्वामी यांनी लिहिलेल्या ‘डिवाईन लाईफ ऑफ साईबाबा भाग १’ या ग्रंथात साई बाबा यांच्या पाथरी येथील जन्माचा उल्लेख आहे़ प्रातिनिधीक  स्वरुपातील हे काही पुरावे असले तरी जवळपास २९ पौराणिक पुरावे पाथरीकरांकडे उपलब्ध असून, हे सर्व पुरावे जगजाहीर असल्याचे तसेच ३० वर्षांपूर्वी पाथरीतील १०० वर्षांच्या तत्कालीन साईभक्त मदार नाना यांनी पाथरी हीच साईबाबांची जन्मभूमी असल्याचे सांगितले होते़.

फोटो- शिर्डी संस्थानने १९७४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या इंग्रजी साई चरित्रामध्येच साई बाबांचा जन्म हा पाथरीत झाल्याचा उल्लेख

साई संस्थान पाथरीचे विश्वस्त आ़मदार बाबाजानी दुर्राणी यांनी हे याविषयी म्हणाले, "पाथरीतील साई जन्मभूमीचा विकास झाल्यास भक्तांचा पाथरीकडे ओढा वाढेल, अशी भीती शिर्डीकरांना वाटत आहे़ त्यातूनच त्यांनी पाथरी जन्मभूमीच्या विकासाला विरोध सुरू केला आहे. तसेच त्यांना साईंच्या भक्तीविषयी काहीही घेणेदेणे नाही. ते फक्त याच व्यावसायिक राजकारण करत आहेत. साईबाबांसोबत असणारे साथीदार त्यांचे वंशज आजही या स्थळाला भेट देतात, साईबाबांची जन्मभूमी ही पाथरी असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांनी पाथरीला भेट दिली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी विकास आराखडा मंजूर केला. साईबाबांच्या जन्मस्थळाचे पुरावे शिर्डीकरांनी उपलब्ध करुन द्यावेत."

सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी म्हणाले, "मी धार्मिक मनुष्य नाही, पण हा मुद्दा वेगळ्या दृष्टीकोनातून घेतला पाहिजे. साईबाबांचा जन्म निःसंशयपणे पाथरीचाच आहे. सेलूच्या डाॅ घनःशाम सांगतानी यांनी पुस्तक लिहून हे सप्रमाण सिद्ध केलं आहे. या विरोधात कोणतेही पुरावे शिर्डी संस्थानानं समोर आणलेले नाहीत. ते पुस्तक प्रकाशित होऊनही चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. पाथरीला साई बाबांचा जन्म झालेली खोली आहे. इतरत्र कुठे असेल तर पुरावे द्यावेत. साईबाबा हिंदू-मुस्लीम सलोख्याचं प्रतिक आहेत. हेही मराठवाडा लक्षण आहे. मराठवाड्याच्या लोकांना मार्केटिंग जमले नाही. आज पाथरीला तीर्थक्षेत्र विकास म्हणून निधी मिळणार म्हणून शिर्डी संस्थानाची मंडळी जागी झालेली दिसतात. साईबाबांचे गुरू केशवराज बाबासाहेब (सुभेदार) हे सेलूचे (जि. परभणी) होते. साईबाबा एवढ्या लांब गुरूंच्या शोधात आल्याचा पुरावा नाही. पण हा पैसा पाथरीच्या रस्ते-वीज-पाण्यासाठी खर्च व्हावा, साईबाबांच्या सिंहासनासाठी नाही."

शिर्डी आणि आजूबाजूचा परिसर पाथरीच्या तुलनेत सधन आहे. पाणी, रस्ते, साखर कारखाने, बागायती शेती, शिक्षण संस्था, साईबाबा आणि शनिमंदिरासारखी मोठी तीर्थक्षेत्रे, विमानतळ, दवाखाने तुलनेत पाथरी हे ठिकाण आणि आजूबाजूचा जिल्ह्यातील परिसर अशा सोयी सुविधांपासून कोसो दूर आहे. बारमाही पाणी नाही. यामुळे नक्कीच या परिसरातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल, तरुणांना रोजगार मिळेल.