Quick Reads
वन्स अ इयर : एका नात्याचा मागोवा
स्पॉटलाईट सदर
एरवी ज्यांची भेट होणं कधीही शक्य होणार नाही अशा दोन लोकांची भेट होण्याचे चित्रपटांतील आणि अगदी खऱ्या आयुष्यातीलही प्रसंग आपल्याला नवीन नाहीत. मात्र, अशा भेटीनंतर तितक्याच अशक्यप्रायरीत्या होणारी नात्याची सुरुवात, आणि त्यानंतरच्या घटनाक्रमामध्ये उपजत सहजता टिकवून ठेवणं सोपं नसतं. अगदी खऱ्या आयुष्यातही आणि चित्रपट/मालिकांतही. गौरव पत्की लिखित आणि मंदार कुरुंदकर दिग्दर्शित ‘वन्स अ इयर’ या छोटेखानी मालिकेला नेमकं हेच साध्य करणं जमलेलं आहे.
‘वन्स अ इयर’ ही मालिका साधारणतः ‘मंबलकोर’ प्रकारात मोडते. या प्रकारात मोजकीच पात्रं कथानकाच्या केंद्रस्थानी ठेवत, त्यांच्यामधील विस्तृत संभाषणं टिपत ते ढोबळ कथानक पुढे सरकत राहते. आता अशी मांडणी करता असतानाही पुन्हा इथले निर्माते आणखी एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतात. त्यानुसार मालिकेच्या नावला जागत, २०१३ ते २०१८ दरम्यान दरवर्षी फक्त एकाच दिवशी आपण मध्यवर्ती पात्रांना भेटतो. त्या त्या वर्षातील एका विशिष्ट दिवशी सदर पात्रांमध्ये काय घडलं किंवा काय घडलं नाही हे टिपलं जातं. ही मांडणी महत्त्वाकांक्षी यासाठी ठरते की लेखनाच्या पातळीवर नुकत्याच भेटलेल्या दोन पात्रांच्या आयुष्यात आपण थेट पुढच्या वर्षी परततो. त्यामुळे मधल्या काळात या पात्रांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटनांचे सगळेच संदर्भ आपल्याला न देताही समोर घडणाऱ्या प्रसंगांचे गांभीर्य टिकवून ठेवण्याची कसरत इथे करावी लागते. या सगळ्या प्रकरणात लिखाणाच्या आणि अगदी दिग्दर्शनाच्या स्तरावरही कुठेही ओढाताण न करता निर्माण झालेली एका उपजत नैसर्गिकता इथे दिसून येते.
अरिहंत (निपुण धर्माधिकारी) आणि रावी (मृण्मयी गोडबोले) या दोघांच्या २०१३ मधील भेटीच्या दिवसापासून मालिकेला सुरुवात होते. त्यांच्यात घडणारा विस्तृत संवाद, त्या संवादाला असलेली विनोदाची किनार, पण सोबतच असणारे गांभीर्य असं सगळं काही इथे अस्तित्त्वात आहे. या प्रसंगांतही समकालीन तरुणांमध्ये घडतील अशा पुस्तकांपासून ते चित्रपटांपर्यंतच्या चर्चा आणि त्यावरील विनोदांची रेलचेल आहे. पुस्तकं, सिनेमा, खाद्यसंस्कृती या गोष्टी निरनिराळ्या जाणिवा असलेल्या लोकांना कशा रीतीने जोडतात हेही इथे दिसतंच.
काळ ही इथली आणखी एक महत्त्वाची संकल्पना आहे. आता ही संकल्पना केवळ मांडणीच्या पातळीवर मालिका या दोघांच्या आयुष्याच्या चित्रणात वर्षभराच्या फरकाने घेत असलेल्या उड्या इतक्याच स्तरावर अस्तित्त्वात नाही, तर इथे या काळात त्यांच्यात, त्यांच्या नात्यात घडणारे बदल आणि त्यांच्यातील संवाद-विसंवादाच्या पातळीवरही काळ ही संकल्पना महत्त्वाची ठरणारी आहे. त्यांच्या संभाषणात अनेकदा - आपल्याला भूतकाळात मागे जाऊन आपण जसं जगलो त्यात काही बदल करता आले असते तर आपण काय बदले केले असते - अशा अर्थाचे विषय निघतात. त्यानिमित्ताने चुका सुधारण्याची किंवा किमान त्या चुका झाल्या होत्या हे सत्य स्वीकारत त्या बदलता येण्याच्या अशक्यप्राय शक्यतेचा मागोवा घेण्याच्या मानवी प्रवृत्तीचं इथे दर्शन घडतं. जर-तरच्या भाषेत विचार करत का होईना, पण कधीकाळी आपल्या आयुष्यात असलेल्या व्यक्तीचं, तिच्यासोबत घालवलेल्या क्षणांचं महत्त्व मान्य करत त्या किंवा त्याहून अधिक गोष्टी परत मिळवू पाहण्याची आकांक्षा इथे दिसते.
याखेरीज इथली पात्रं प्रेम, करियर या गोष्टींवर विस्तृतपणे बोलताना दिसतात. कुठल्याही तऱ्हेच्या नात्यामध्ये या संकल्पना किती महत्त्वाच्या ठरतात यावर इथं संभाषण घडतं. मालिकेतील इतर भागाप्रमाणेच इथेही दोन किंवा त्याहून अधिक लोकांमधील संवाद टिपण्याचा प्रयत्न दिसतो. या सगळ्यांतून कथा पुढे सरकते का, तर उत्तर असेल हो. पण, दरवेळी असं घडावेच असा अट्टाहास इथे नाही. अशा प्रकारच्या कलाकृतींमध्ये घडतं तसं पात्रांमधील परस्परसंबंध, संवाद-विसंवादाचं चित्रण करणं इथे महत्त्वाचं आहे. कथानक पुढे जायलाच हवं, आणि एकामागून एक दृश्यांची रांग लागायलाच हवी असं इथे घडत नाही. त्याऐवजी पात्रांना निवांत बोलू देणारे, त्या क्षणांत जगू देणारे, उसंत घेऊ देणारे प्रसंग इथे दिसत राहतात. काहीसा अॅब्सर्ड विनोद आणि तितक्याच प्रमाणात गांभीर्य इथे समप्रमाणात दिसून येतं.
एका ठिकाणी रावी म्हणते त्याप्रमाणे ‘यू डोन्ट अल्वेज हॅव्ह टू फिल अप द सायलन्स’ (You don’t always have to fill up the silence.) या वाक्यात सदर मालिकेचं मूळ सामावलेलं आहे. एखाद्या विशिष्ट नात्यात म्हणा, किंवा एकुणातच आयुष्यात म्हणा, आपल्या क्रिये-प्रतिक्रियेदरम्यान नैसर्गिकरीत्या निर्माण झालेल्या अशा पोकळ्या भरून काढण्याचा अट्टाहास धरणं गरजेचं नसतं. एखादं नातं जसं वाहवत, फुलत जातं, तसंच कधीतरी संपुष्टात येतं. त्यात चढ-उतार येतात. पण म्हणून ना ते टिकलं पाहिजे याचा अट्टाहास असावा, ना त्यातून तडकाफडकी बाहेर पडावं याचा. शेवटी आयुष्यातील, नात्यातील त्या त्या क्षणांशी प्रामाणिक राहून त्या क्षणांत जगणं महत्त्वाचं. बुद्ध उगाच म्हणून गेला नाही, ‘लिव्ह इन द मोमेंट!’