India
'सारथी' च्या कारभारावर नाराज होऊन मराठा संघटनांचं आंदोलन
राज्याचे नागरी विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दखल
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेवर शासनाने टाकलेले निर्बंध उठवावेत आणि सारथीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थकलेले विद्यावेतन सुरु करावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा व सारथीचा लाभ घेणारे विद्यार्थी यांच्या वतीने करण्यात आली आहे. त्याविरोधात शनिवारी (दि. ११) एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.
या उपोषणात खासदार संभाजीराजे छत्रपती, नरेंद्र पाटील, इंद्रजीत सावंत, सकल मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर, गोदाजी मुळीक, मंत्री एकनाथ शिंदे आदी तसेच राज्यातील सारथीचा लाभ घेणारे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी 'एक मराठा लाख मराठा', 'जे. पी. गुप्ता हटाव, सारथी बचाव', 'परिहार यांना परत बोलवा', अशा घोषणा दिल्या. या उपोषणाला महाराष्ट्र राज्याचे मंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भेट दिली.
नेमकं प्रकरण काय?
सारथी संस्थेतील कारभारावर आक्षेप घेत राज्य सरकारने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे संस्थेचा अर्थपुरवठा बंद झाला असून मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना पाठ्यवृत्ती देखील मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. वारंवार सरकार कडे पाठपुरावा करूनही सरकार कडून सकारात्मक हालचाली होत नाही. याबाबत काही दिवसांपूर्वीच खा. संभाजी छत्रपती यांनी सारथी संस्थेला भेटही दिली होती. त्यानंतर त्यांनी शनिवारी 11 तारखेला उपोषणाचा इशाराही दिला होता. आज महाराष्ट्रातुन मराठा समाजातील तरुणांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन उपस्थित राहिले.
सारथी काय काम करते?
महाराष्ट्र शासनाने छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत कलम ८ अन्वये नॉन-प्रॉफिट सरकारी कंपनी म्हणून स्थापन केली आहे. सारथीची स्थापना मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचा सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी तसेच संशोधन, सरकारची धोरणे, प्रशिक्षण इ. आणि ग्रामीण जनतेस मार्गदर्शन, विशेषत: जे शेतकरी शेतीवर अवलंबून असतात त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणे. असे या संस्थेचे उद्दिष्ट आहे.
याविषयी संभाजीराजे म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांनी अठरापगड जातींच्या तसेच प्रत्येक व्यक्तित्वाचा आदर केला. आरक्षण दिले म्हणजे प्रश्न सुटला असे नाही सारथीही तितकीच महत्वाची आहे. गेले अनेक दिवस मी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे, विशेष म्हणजे या संस्थेचे उदघाटन माझ्या अध्यक्षतेखालीच झाले होते. या संदर्भात काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तात्काळ मार्ग काढण्याचा शब्दही दिला होता. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरकार स्थिरस्थावर होईस्तोवर कुठलाच नवीन आदेश न काढण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु जे पी गुप्ता हे प्रधान सचिव दररोज नवीन आदेश काढून संस्थेला बदनाम करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांना अशी कोणती घाई झाली आहे, की दररोज आदेश काढत आहेत? यावर तातडीने तोडगा काढून तसेच परिहार यांच्या सारखा व्यक्तिमत्वाला परत रुज्जू करून सगळ्यांचे पगार करावेत तसेच लाभार्थी विद्यार्थ्यांना त्यांचा मोबदला देण्यात यावा."
याविषयी मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "सारथी ही स्वायत्त संस्था आहे आणि ती कायम राहणार, तिचे स्वतंत्र आम्ही अबाधितच ठेवणार असून यात काहीही बदल होणार नाही. यामध्ये कोण दिशा भुलवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. आकस किंवा सुडबुद्धीने कोणी काम करत असेल तर त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलून त्रयस्थ गुप्त समिती गठीत करून त्याचा छडा लावू. छत्रपती संभाजी आणि संपूर्ण मराठा समाजाच्या पाठीशी हे सरकार आहे. सारथीचे काम सुरू राहणार आहे."
सारथी विषयी बोलतांना विद्यार्थी रमेश गोपाळे मत व्यक्त करतात की, "स्पर्धा परीक्षेची तयारी पुण्यासारख्या शहरात करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो, सारथी सारख्या संस्थेमुळे आज आम्हा विद्यार्थ्यांना एक नवचैतन्य मिळले आहे. सारथी मुळे आमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर झाल्यत. आम्हाला नामांकित कोचिंग कलासेस मध्ये ऍडमिशन घेऊन दिले. आज सारथी द्वारे काही विद्यार्थी दिल्ली मध्ये तयारी करू शकतात. सारथी सारखी संस्था ही स्वायत्तच असली पाहिजे. सारथी चे डायरेक्टर श्री. परिहार सर खूप उत्तम काम करत आहेत त्यामुळे भविष्यातही त्यांनीच सारथी चे काम बघावे हीच आमची मागणी आहे."