India

कोरोना विषाणूच्या साथीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर

व्यापार, निर्यात, सामाजिक जीवनावर जागतिक अरिष्टाचा परिणाम

Credit : डेक्कन हेराल्ड

पुणे: कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. त्याचा परिणाम थेट देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे. सार्वजनिक बाजारपेठा बंद ठेवल्याने मार्केटमध्ये येणारा माल उचलला जात नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आठवडे बाजारातही शुकशुकाट असल्याने भाजीपाला रस्त्यावर फेकावा लागत आहे. जगभरात कोरोना विषाणूने पाय पसरले असून आता त्याने महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून आल्याने पुण्याच्या जीवनमानावर त्याचा परिणाम झाला आहे. परिणामी सर्वच व्यवसाय धोक्यात आले असून याचा मुख्य फटका शेतीमालाला बसला आहे. पुण्याच्या बाजारात सर्व मालाला अतिशय कमी दर मिळाला असून याचा फटका थेट शेतकयांना बसला आहे.

 

निमशहरी भागातील लाखोंचा व्यवहार ठप्प

महाराष्ट्रातील भरपुर गावे ही निमशहरात मोडत असली, तरी तेथील बाजारपेठा व व्यवसाय हे ग्रामीण दैनंदिनी वर चालतात. तेथील व्यवहार बंद पडल्यामुळे दिवसाला शहरांचे लाखोंचे नुकसान होत आहे. शेतातील भाजीपाला व शेतमाल यावर परिणाम होत शेतमालाल शेतात सडून जात आहेत. त्यामुळे शेतक-यांना आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण राज्य हादरले असून, प्रशासनाने सावधगिरी बाळगून छोट्या शहरातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोना आजाराच्या भीतीने नागरिक भयभीत झाले आहेत. दैनंदिन जीवनात कोरोनाचा परिणाम जाणवू लागला आहे. तालुका प्रशासन व नगरपंचायत प्रशासनाने कोरोनाची खबरदारी घेतली असून, प्रत्येक ठिकाणाचे आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये, इंग्रजी स्कूल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामदैवतांचे सण, सप्ताह, तसेच इतर सण, उत्सव साजरा करण्यात येत असतो. यासाठी  भाविक दर्शनासाठी येत असतात; पण यंदा हे सर्व उत्सव कोरोनाच्या सावटाखाली असून उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात कोरोनाच्या भीतीने नागरिक हैराण झाले असून यासाठी तालुका प्रशासनाने स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीच्या वतीने उपाययोजना करून जनजागृती करणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

 

चायनीजच्या गाडे आणि रेस्टॉरंट ओस

कोरोनाच्या भीतीने चायनीजच्या गाड्या आणि रेस्टॉरंट ओस पडली आहेत. त्यामुळे पालेभाज्यांचे दर कमालीचे घटले आहेत. भारतीयांमध्ये 'चायनीज' खाद्यपदार्थांची क्रेझ आहे. रस्त्याच्या कडेला लागणाया गाड्यांवरही चायनीज पदार्थ खायला गर्दी होत असते, परंतु गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये चायनीज गाडे व रेस्टॉरंट ओस पडलेले दिसून येत आहेत. चायनीज पदार्थात मोठ्या प्रमाणात सिमला मिरची, कोबी, कांदापात, कांदा, मशरूम, कोथिंबीर आदी पालेभाज्यांचा आणि मसाल्यांचा वापर केला जातो. या भाज्यांना चायनीज अन्नविक्रेत्यांकडून मोठी मागणी असते. परंतु, कोरोनामुळे चायनीज रेस्टॉरंट चालविणारी कडून या भाज्यांना मागणी घटल्याने अनेक भाज्यांचे दर उतरले आहेत.

 

कुक्कुटपालन व पशुपालन व्यवसायावर संकट

कोरोनामुळे कुक्कुटपालन व्यवसाय मोडकळीला आला आहे. पूर्ण वाढ झालेल्या हजारो कोंबड्या विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कुक्कुटपालन हा व्यवसाय सुरू करण्यासाठी शेत आणि राहती घरे राष्ट्रीयीकृत बँकांना तारण दिली आहेत. त्यामुळे येथील शेतकरी आणि नव-उद्योजक धास्तावले आहेत. साधारणपणे एका कोंबडीचे वजन अडीच ते चार किलोपर्यंत भरल्यानंतर संबंधित कंपनी कुक्कुटपालन व्यवसायाकडून ७० रुपये प्रति किलोप्रमाणे विकत घेतात. त्यानंतर बाजारामध्ये दीडशे रुपये प्रति किलो दराप्रमाणे त्याची विक्री करतात, मात्र चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरसची लागण होते, अशी अफवा सोशल मीडियाद्वारे पसरवली जात आहे.

परिणामी खवय्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे बाजारात चिकनचे दर घसरले असून ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दराने चिकनची व एका कोंबडीची विक्री होत आहे. कुक्कुटपालन व उद्योजकांना याचा फटका बसला. पक्ष्यांचे संगोपन, खाद्य, मजूर, वीज बिल, पाणीपट्टी या खचार्चा ताळमेळ बसत नसल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. दरम्यान, "कोरोना विषाणूचा संक्रमणातून कुक्कुट व पाळीव प्राण्यांना कोणताही धोका पोहोचत नाही. रोग प्रतिकारक शक्ती येण्यासाठी प्रत्येकाने चिकन आणि अंडी यांचा आहारात प्रामुख्याने समावेश करावा, त्यामध्ये प्रोटीन ही जास्त प्रमाणात आहे," असे पशुसंवर्धन अधिका-यांनी सांगितले.

 

कोरोना विषाणूचा संसर्ग होतो हे सिद्ध करा व ५१ हजार रुपये मिळवा

चिकन खाल्ल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग होतो हे सिद्ध करा व ५१ हजार रुपये मिळावा, अशा आशयाचे फलक लातूर जिल्हातील उदगीर शहरातील काही हॉटेल व्यावसायिकांनी लावले आहेत. चिकन खाल्ल्याने कोरोना होतो ही अफवा संबंध महाराष्ट्रात पसरली. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचा फटका हॉटेल व्यावसायिकांनाही बसला असून, ग्राहकांनी पाठ फिरवल्याने या व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

ग्राहकांनी कुठल्याही अफवेला बळी न पडता चिकन खाण्यासाठी यावे असा यामागचा उद्देश आहे. हळूहळू पाठ फिरवलेल्या ग्राहकांना परत हॉटेलमध्ये आणण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांची धडपड असून, बिघडलेली आर्थिक गणित सुधारण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. या आवाहनाला स्वीकारून ग्राहकांनी जर चिकन खाण्यात पसंती दिली तर हॉटेल व्यावसायिक याबरोबरच पोल्ट्री व्यावसायिक ही आर्थिक अडचणीतून सावरणार आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक करून खड्डे करून कोंबड्या पुरण्याची वेळ व्यावसायिकांना आल्याने अफवेचा बळी कसा असतो याचे हे पोल्ट्री व्यावसायिक मूर्तिमंत उदाहरण ठरू शकतात.

 

विमानसेवा बंद केल्यामुळे निर्यातीवरही बंदी

जगभरात कोरोना विषाणूमुळे काही देशांनी विमानसेवा बंद केलेली आहे. इटली व अन्य देशांमध्ये भारतातून होणारी शेतमाल निर्यात बंद झालेली आहे. तर विमान उड्डाणे कमी उपलब्ध होण्यामुळेही शेतमाल निर्यातीला झळ बसण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र, समुद्रमार्गे द्राक्षांची निर्यात सुरळीत सुरू असून कोरोना फारसा परिणाम झालेला नसल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

द्राक्षांची निर्यात प्रामुख्याने मुंबई येथील जेएनपीटी बंदरातून होत असते. चेन्नई येथूनही शेतमाल निर्यात सुरू आहे. युरोपियन देशांसह आखाती देशातही असते. त्यामध्ये प्रामुख्याने भेंडी, हिरवी मिरची, कांदा व अन्य भाजीपाल्याचा समावेश असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील निर्यात कक्षाचे प्रमुख व तंत्र अधिकारी गोविंद हांडे यांनी दिली.  

हांडे म्हणाले की, "इटली देशाने विमानसेवा बंद केली आहे, त्याठिकाणी भारतातून होणारी शेतमालाची निर्यात बंद झाली फ्रान्स, दुबई, इराण, इराक येथे ही निर्यात सुरू आहे; मात्र, विमानाची कमी उड्डाणे, शेतमालास जागा कमी मिळणे, अशा अडचणी आहेत. कोरोनामुळे काही देशांच्या शेतमाल  निर्यातीवर परिणाम झालेला असला तरी स्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे शेतमाल निर्यात पूर्णपणे कोरोनाच्या स्थितीवर अवलंबून राहील, त्याचा आढावा घेण्यासाठी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि फलोत्पादन संचालक शिरीष जमदाडे यांच्या उपस्थितीत सर्व निर्यातदार आणि संबंधित घटकांची महत्वपूर्ण बैठक येत्या आठवड्यात घेणार आहोत."

"समुद्रमागार्ने होणारी द्राक्षांची निर्यात सुरळीत सुरू आहे. त्यामुळे तूर्तास फार मोठा परिणाम शेतमाल  निर्यातीवर झालेला नाही. १५ मार्चपासून कांदा निर्यात सुरू झाली आहे. आखाती देश, मलेशिया, सिंगापूर, श्रीलंका या देशातून भारतीय कांद्यास मागणी आहे. पुढील महिन्यात हापूस व अन्य आंब्यांची निय्यातील सुरू होईल. त्यामुळे जागतिक स्तरावरील कोरोनाच्या स्थितीचे चित्र काय राहणार त्यावरच शेतमाल निर्यातीचे भवितव्य अवलंबून राहील," असेही हांडे यांनी सांगितले.