India

वादळी पावसानं शेतकऱ्याचं उसनं अवसानही गळालं, सोलापूर जिल्ह्याला सर्वात जास्त फटका

अचानक आलेल्या वादळाची पावसामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची दैना झाली आहे.

Credit : Indie Journal

सोलापूरचे शेतकरी शिवदास चटके उद्विग्न होऊन म्हणतायत, "आर्थिक नुकसान भयंकर आहे. पण हे एकट्या शेतकऱ्यांच नुकसान नाही या शेतकऱ्यांवर सोलापूर जिल्ह्याचे अर्थकारण चालते, साखर पट्टा आहे हा. सोलापूर च नाही महाराष्ट्राच्या अर्थकारणावर साखर डॉमीनंट आहे. ऊस हा राज्याचा आर्थिक कणा आहे. या शेतकऱ्यांचा पैसा मार्केट मध्ये टाटा पासून महिंद्रा पर्यंत फिरतो आणि तिथून डिझाईन इंजिनिअर च्या खिशात तिथून लग्झरी प्रोडक्ट आणि सर्व्हिस सेक्टर मध्ये फिरतो."

परतीचा मान्सून आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा तडाखा महाराष्ट्राला बसला. सलग पाचव्या दिवशी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. गार वारा आणि जोरदार पावसाचा जनजीवनावर परिणाम झाला. परतीच्या पावसाने सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने शेतकरी हैराण झाला आहे. दिवसभर पडणाऱ्या पावसाने मळणीची कामे थांबली असून हातातोंडाशी आलेली पीके वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थकारण उध्वस्त झाले असताना सुरुवातीपासूनच दमदार होणाऱ्या पावसाने पिके तरारून आली होती. जुलै महिन्याच्या मध्यावर पावसाने थोडी ओढ दिल्याने काळजी वाटत होती. मात्र, परतीच्या मान्सूनचा अवतार यावर्षी वेगळाच आहे. काही ठिकाणी एका रात्रीत शंभर मिलिमीटरच्यावर पाऊस झाल्याच्या नोंदी आहेत. पासष्ठ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला तर अतिवृष्टी मानली जाते. शंभरपेक्षा अधिक असेल तर ढगफुटी होते. महाराष्ट्रातील एकही जिल्हा यातून वाचलेला नाही. पाणीटंचाई होणार नाही, धरणे भरल्याने बारमाही सिंचनाचा अडसर येणार नाही, शहरांचा पाणीपुरवठा कमी पडणार नाही, आणि सर्वात महत्त्वाचे रब्बीचा हंगाम उत्तम येईल याबद्दल शंका नाही; पण खरीप हंगामाचा शेवट हातातोंडाचा घास गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.  

 

 

परतीच्या पावसाचा फटका सगळ्यात जास्त सोलापूर जिल्ह्याला बसला असून जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. सोलापूर जिल्ह्यातील १८३ गावांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. आटपाडी-पंढरपूर मार्गावरील पुलावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. उत्तर सोलापूरच्या दुष्काळी तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस पडल्याने शेतीचे नुकसान झाले. शेतात पाणी साचल्याने फळे आणि झाडांचे खोड कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. संततधार पावसामुळे द्राक्ष बागांच्या छाटणीचे काम खोळंबले आहे. सोयाबीन आणि भुईमूगाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत

 

धरणातून सोडलेले पाणी पिकांच्या मुळांवर, पुणे व सातारा जिल्ह्यातील पाऊस थांबल्यास पुराचा धोका कमी होणार 

उजनी, वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात महापुराची संकट उभे राहिले असून चंद्रभागेच्या सर्व पुलांवर पाणी आल्याने सोलापूर, नगर भागातील वाहतूक बंद झाली आहे. याच पाण्यामुळे गोपाळपुराच्या पुलावरही पाणी आल्याने विजापूरकडे जाणारी वाहतूकही बंद झाली आहे. दरम्यान, राज्यात चक्री वादळामुळे अतिवृष्टीचा इशारा दिला असतानाही उजनी धरणातून पाणी कमी न केल्याने एकाच दिवशी १० हजारावरून थेट अडीच लाख क्युसेक एवढा विसर्ग सोडण्याची वेळ आली आणि यामुळेच पंढरपूरसह अनेक गावावर पुराचे संकट आले आहे. यानंतर गुरुवारी दिवसभर धरण व्यवस्थापनाने आपली चूक दुरुस्त करीत अडीच लाखाचा विसर्ग पुन्हा १ लाख क्युसेक पर्यंत कमी केल्याने उद्या पंढरपुरावरील पुराचे संकट कमी होणार आहे.

परतीच्या पावसाचा दणका पंढरपूरसह सांगोला, मंगळवेढा, अकलूज परिसरही पावसाचा जोरदार दणका बसल्याने शेकडो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करीत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. आज सायंकाळी उजनी धरणातून १ लाख क्युसेक तर वीर धरणातून २३ हजार क्युसेक निसर्गाने पाणी सोडण्यात येत होते. पुणे व सातारा जिल्ह्यातील पाऊस थांबल्यास पुराचा धोका संपणार आहे. आज अकलूज येथेही ग्रामदैवत असलेल्या आकलाई देवीच्या मंदिरात नीरा नदीचे पाणी शिरले असून आता वरिष्ठ पातळीवरून उजनी व वीर धरणाचे पूरनियंत्रण करावे लागणार असल्याची नागरीकातून मागणी होत आहे.

प्रशासकीय यंत्रणा कोरोनाशी लढते आहे. सर्वांचे तिकडेच लक्ष आहे. शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. संख्याबळाने मजबूत असलेला विरोधी पक्ष मराठा आरक्षणावरून सरकार कसे अडचणीत येईल, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची कुजबुज कशी रंगेल, यातच मग्न आहे. अनेक मंत्री महोदय कोरोनाच्या भीतीने धास्तावले आहेत. कोणी शेताच्या बांधावर जाऊन पाहण्याची तसदी घेत नाही. कृषिमंत्री महोदयांनी गरज नव्हती तेव्हा महाराष्ट्रभर फिरून घेतले. आता ते बोलतानाही दिसत नाही. केंद्राने कांदा निर्यातबंदी केली तरी भाजपचे एक माजी कृषिराज्यमंत्री नाशकात जाऊन गळा काढत आहेत. वास्तविक जेथे जेथे नुकसान झाले आहे; तेथे तातडीने पंचनामे सुरू करण्याचे काम कृषिखात्याने करायला हवे आहे. अशा शेतक यांना मदतीचा हात द्यायला हवा आहे. अन्यथा कोरोनाच्या संसर्गातही थोडेबहुत शिल्लक राहिलेले ग्रामीण अर्थकारण संकटात आल्याशिवाय राहणार नाही.

शिवदास चटके पुढे म्हणतात, "बीड, जालना वगैरे भागाचे अर्थकारण याच साखर पट्ट्यावर आहे. मंगळवेढा ज्वारीचं कोठार आहे. या पावसाने संपूर्ण ज्वारी गेली. दाळी गेल्या. पोस्ट कोरोना इकॉनॉमी मध्ये पर्चेसिंग पॉवर फक्त या शेतकरी वर्गाकडे होती, कृषी क्षेत्रामुळे भारताचा थोडाफार जीडीपी आलेख वर होता. येणारा काळ या विध्वंसक असेल एवढंच सध्या सांगू शकतो. केळी, डाळिंब, भाजीपाला, फळभाज्या, कांदा, ज्वारी, गहू, मका, सोयाबीन, ऊस. अशा सर्व दुय्यम व प्रमुख पिकांना या पावसाने आणि पुराने संपवलं आहे. कोरोना मधून बाहेर पडण्यासाठी लोकांनी पैसे व्याजाने काढून खर्च केलेला आहे. खिशातील सगळं टाकून शहरातून मोठ्या प्रमाणात घरी परतलेला कंत्राटी कामगारही यात आहे. एकंदर राज्याला आणि देशाला न परवडणारं नुकसान आहे हे. जर शेतकरी जगला तरच अर्थकारणांची घडी बसेल. शेतकऱ्याला लॉकडाऊन मध्ये 'लोन मॉरिटोरीयम' मिळालं नाही किंवा 'वर्क फ्रॉम होम' किंवा घरी बसून पगार मिळाला नाही. भारताची अर्थक्रांती शेती वर अवलंबून आहे याची सरकार आणि प्रशासनाला जाणीव राहावी इतकीच इच्छा.

 

सीना नदीला महापूर आल्याने शिवणी गाव पाण्याखाली

उजनी व कोळेगाव धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सीना नदीला महापूर आल्याने शिवणी (ता.उत्तर सोलापूर) हे संपूर्ण गाव पाण्याखाली गेले आहे. नदीकाठच्या शेतातील वस्तीवरील शेळ्या, म्हशी, गाईसह अन्य सुमारे १०० जनावरांचा जीव धोक्यात आहे.

शिवणीचे स्थानिक रहिवासी आदिनाथ चटके यांनी सांगितले कि, "पाण्याच्या नदीवरील मोटारी, शेतातील संपूर्ण पिकासह शेतातील माती वाहून गेली आहे. गावातील सर्व कुटुंब गावात अडकले आहेत. गावाला पाण्याचा वेढा पडल्याने संपर्क तुटला आहे. गावातून बाहेर पडण्याच्या मार्गावर सहा ते सात फूटापेक्षा अधिक पाणी आहे. त्यामुळे गावातून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग पूर्णत: बंद झाले आहेत. सीना नदीची पाणीपातळी अतिशय झपाट्याने वाढत असून रात्रीनंतर संपूर्ण गाव पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. येथे बाहेरून कोणतीही मदत पोहोचणे दुरापास्त होत चालले आहे. जिल्हाधिकारी, तहसिलदार, व आपत्ती व्यवस्थापन यांच्याशी कसला ही संपर्क होत नाही. तातडीने मदत आवश्यक असताना प्रशासनाकडून हालचाली होतांना दिसत नाहीत."

 

 

काँग्रेसच्या व्हर्च्युअल शेतकरी बचाव रॅलीत पुरावर एकही ट्विट नाही

लोकशाही, संविधान व संसदेचे नियम पायदळी तुडवून केंद्रातील भाजप सरकारने तीन शेतकरी विरोधी काळे कायदे आणले आहेत. या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेस पक्ष संघर्ष करत असून या संघर्षाचा पहिला टप्पा गुरुवारी १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र काँग्रेसने भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्च्युअल सभेचे आयोजन करत राज्यातील सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून एकाच वेळी काँग्रेस शेतक-यांशी संवाद साधला, परंतु शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी वरवर कळवळा दाखवणाऱ्या महाराष्ट्र काँग्रेसने पूर परीस्थीतीवर किमान एक ट्विट करण्याचे औदार्य दाखवलं नाही.

 

तातडीने पंचनामे करण्याचे उपमुख्यमंत्री पवारांचे आदेश

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्‍यता लक्षात घेवून प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क रहाण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. तसेच सोलापूर, पंढरपूर आणि बारामती या चार ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरफ) तुकड्या तैनात केल्या असल्याचे पवार यांनी सांगितले. विधानभवन येथे परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यंत्री पवार यांनी अतिवृष्टी, वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. स्थलांतरीत नागरिकांना जेवण, निवाऱ्यासोबतच इत्यादी मुलभूत सुविधा प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करुन द्याव्यात. सोलापूर, पंढरपूर, बारामती तसेच विभागातील इतर नुकसानग्रस्त भागातील नागरिकांची जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या.