India

रायगड इमारत दुर्घटनेला नेमकं जबाबदार कोण?

दुर्घटना निकृष्ट बांधकामामुळे घडली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Credit : PTI edited

महाड: रायगड जिल्ह्यातील महाड शहरात तारीक पॅलेस ही पाच मजली निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. या इमारत दुर्घटनेतील मदत व बचावकार्य अखेर ४० तासांनी पूर्ण झाले आहे. या दुर्घटनेत एकूण १६ जणांचा मृत्यू झाला. यात ७ पुरुष आणि ९ महिलांचा समावेश आहे. तर इमारतीच्या ढिगाऱ्यातून नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. सुखरुप बाहेर काढण्यात आलेल्यांमध्ये पाच पुरुष, तीन महिला आणि एका बालकाचा समावेश आहे.

महाडमधील इमारत दुर्घटना निकृष्ट बांधकामामुळे घडली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. इमारतीच्या दर्जाकडे करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असल्याचं स्थानिकांचा सरळ सरळ आरोप आहे. याबाबत वारंवार बिल्डरकडे तक्रारी करूनही त्याने याकडे कानाडोळा केल्याने निष्पाप नागरिक मृत्यूला बळी पडले आहेत.

या दुर्घटना प्रकरणी तारीक गार्डन इमारतीचे विकासक फारुक महामुदमिया काझी (प्रोप्रा. कोहिनूर डेव्हलपर्स तळोजा नवी मुंबई), वास्तूविशारद गौरव शहा (व्हर्टीकल आर्किटेक्ट अॅन्ड कन्सल्टंसी नवी मुंबई), आर सी सी डिझायनर्स बाहुबली टी धावणे (श्रावणी कंन्सल्टन्सी मुंबई), मलाड न. प. चे तत्कालीन कनिष्ठ पर्यवेक्षक शशिकांत दिघे, आणि तत्कालीन न प मुख्याधिकारी दिपक झुंजाड यांच्यावर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

इमारतीला परवानगी

या इमारतींची बांधकाम परवानगी नगरपरिषदेने ११/५/२०११ रोजी दिलेली असून इमारत पुर्ण झाल्यानंतर इमारतींचा भोगवटा १९/१०/२०१३ रोजी देण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी दिली. भोगवटा प्रमाणपत्रावर तत्कालीन मुख्याधिकारी दिपक झिंजाड यांची स्वाक्षरी असल्याचे तर शशिकांत दिघे हे बांधकाम पर्यवेक्षक म्हणून नगर परिषद कार्यरत होते असेही मुख्याधिकारी पाटील यांनी स्पष्ठ केले आहे. 

 

निकृष्ट बांधकामाचा नमुना 

तारीक गार्डन इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी रहिवासी संबधीत बिल्डरकडे करीत होते, मात्र नगरपरिषदेत तक्रारी करु नका, मी दुरुस्ती करुन देतो अशी बोलवण या बिल्डरकडून केली जात होती. अशी माहिती या इमारतीमधील रहिवाशांनी दुर्घटनेनंतर दिली. दुर्घटना घडल्याच्या दिवशी सकाळी इमारतीच्या पार्कीगमधील एक पिलर ढासळल्याची तक्रार या इमारतीच्या रहिवाशांनी या बिल्डरच्या निदर्शनास आणून दिले, मात्र मी प्लास्टर करुन देतो, अशी रहिवाशांची समजूत काढून त्यांची पुन्हा बोळवण केली, आणि त्यानंतर केवळ सात आठ तासातच ही इमारत पुर्ण कोसळून ही दुर्घटना घडली. 

"पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीत ४० कुटुंबं राहात होते. त्यातील २५ कुटुंबं बाहेर पडली, पण १५ कुटुंब अडकल्याची शक्यता आहे. मदतीसाठी स्थानिकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काही तासापूर्वी इमारत हलत असल्याचे निदर्शनात आल्याने काही कुटुंबं बाहेर पडली होती," अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितानुसार २६ जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. या ठिकाणी मदत कार्याला श्वानपथक ही मदतीला होते. पुणे येथून NDRF दल तसेच 

स्थानिक दहा पोकलेन व जेसीपी २५ हून अधिक डंपर तसेच सामाजिक संस्था व कार्यकर्ते या ठिकाणी मदत कार्य करत होते. 

सदर बचाव कार्यात मदत करणारे कार्यकर्ते स्वप्नील महाड हे इंडीजर्नलशी बोलतांना सांगितले, काजळपुरा भागातील पाच इमारत संध्याकाळी ६.२५ वाजताच्या दरम्यान कोसळली . बेसमेंट च्या दोन पिलरची वाळू ६.१० च्या दरम्यान पडत असल्याचे रहीवाश्यांना लक्षात आलं.. त्यावर त्यांनी तात्काळ सर्वांना खाली यायला सांगितले. माणसे जमतील तसे खाली धावू लागली.. तरीही बिल्डिंग पडेल असे कुणालाही वाटत नव्हते. काही माणसे जिना उतरत होती. जवळपास ४०-५० माणसे उतरली, काही माणसे इमारत कोसळली. सदर इमारतीत सर्व कुटुंबे मुस्लिम होती एकच रूम मध्ये काही उत्तर भारतीय भाड्याने राहत होते. बरेच लोक लॉकडाऊन च्या काळात गावाला गेल्याने बंद होत्या, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. इमारतीच्या बांधकामा बद्दल आधीही तक्रारी होत्या. छोटे मोठे स्लॅब या आधीही कोसळले होते. महाड परिसरात अश्या अनेक धोकायदायक इमारती आहेत. पण प्रशासन दुर्लक्ष करते असे कित्येक स्थानिकांचे म्हणणे आहे. 

तब्बल १८ तासांच्या प्रयत्नानंतर मोहम्मद बांगी याला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात मदत पथकाला यश आले होते. परंतु, त्याची आई आणि भावंडांचा मात्र दुर्दैवी अंत झाला. तर, इमारत कोसळत असताना अहमद शेखनाग वेळीच बाहेर पडल्यामुळे बचावला असून त्याचे कुटुंबीय मात्र सुदैवी ठरले नाहीत. या दोन्ही लहानग्यांचे पालकत्व स्वीकारत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. दोन्ही मुलांच्या नावे बँक खात्यात प्रत्येकी १० लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येतील, तसेच त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने उचलण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

 

मृतांची नावे 

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये सय्यद अमित समीर (वय ४५), नविद झमाने (वय ३५), नौसिन नदीम बांगी (वय ३०), आयेशा नदीम बांग (वय ७), रुकैय्या नदीम बांगी (वय २), आदी हाशिम शेखनाग (वय १४), इसमत हाशिम शेखनाग (वय ३५), रोशनबीबी दाऊदखान देशमुख (वय ५६), फातिमा अन्सारी (वय ४३), अल्लतमस बल्लारी (वय २६), शौकत आदम अलसूलकर( वय ५०), मतीम मुकादम (वय १७), फातिमा शौकत असुलकर (वय ६०) यांचा समावेश आहे.