India

वस्ती शाळेतून मजुर महिला व मुलांना मिळतंय शिक्षण

विकास घडवून आणणाऱ्या मजुरांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची होणारी हेळसांड, याबाबत प्रशासनाची उदासीनतेची भूमिका असते

Credit : ज्ञानेश्वर भंडारे

पिंपरी- चिंचवड (पुणे) या औद्योगिक नगरीचा झपाट्याने विकास होत आहे. याच विकासाला हातभार लावणारे मजूर महाराष्ट्राच्या व इतर राज्यांच्या कानाकोपऱ्यातून येतात. त्यांच्या राहण्याची सोय तर होते परंतु त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची होणारी हेळसांड, याबाबत मात्र प्रशासनाची उदासीनतेची भूमिका असते. विविध प्रांतातुन येऊन इथे हे कामगार कष्टाने पोट भरतात. येथिल जास्तीत जास्त मुलांना कुठल्याही प्रकारचे शिक्षण दिले जात नाही. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी टोळीवर शाळा सुरू करण्यात आल्या पण या बिगारी मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काय? आज इथे तर उद्या तिथे अशी परिस्थिती, त्यांच्या वस्तीवर जाऊन शिकवायला शिक्षकही तयार नसतात. 

परंतु रावेत येथे सहगामी फाउंडेशनने या मुलांसाठी 'मस्ती की पाठशाळा' दोन वर्षांपूर्वी चालू केली. पहिल्यांदा एका पत्राच्या घरात ही शाळा सुरू झाली. समाजातील असंख्य दानशूरांकडून या शाळेला मदत मिळत गेली अन एका शेड मध्ये ही शाळा चालू झाली. आजही दररोज दोन तास, याप्रमाणे ज्यांना जसा वेळ असेल तसे स्वयंसेवक स्व-खुशीने येतात आणि मुलांना शिकवतात. 

 

अनिश्चित वास्तव्य

विविध प्रांतातुन आलेले हे कामगार इथे कष्टाने पोट भरतात.पण एका ठिकाणी किती दिवस वास्तव्य आहे हे माहीती नसल्यामुळे येथिल जास्तीत जास्त मुलांना कुठल्याही प्रकारचे शिक्षण दिले जात नाही.त्यांना शिक्षणाचे महत्व नसल्यामुळे ही मुलं वस्तीमधे किंवा रस्त्यावर खेळताना आढळतात. आई-वडिल कामावर गेल्यावर ही मुले बरेचदा एकटीच असतात व घर सांभाळण्यासाठी मुलांना शाळेत पाठवायची पालकांची इच्छा नसते. त्यामुळे त्यांच्याच वस्तीमधे जाऊन शिक्षणाचे पटवुन देत शिकवले जाते. बऱ्याचशा मुलांनी सकाळचा आहारही घेतलेला नसतो. त्यामुळे ह्या मुलांना दररोज काहीतरी खायला देण्यात येते. या विषयी सांगताना सहगामीच्या केतकी नायडू यांनी सांगितले कि, "रॉबिन हूड आर्मी मार्फत आम्ही पाहियल्यांदा वाड्या-वस्त्यांवर खाऊ व जेवण वाटप करायचो पण हळूहळू यांच्यातील शिक्षणाची कमतरता व उदासीनता आम्हाला जाणवली.पहिल्यांदा रस्त्यावरच दररोज आम्ही मुलांना शिकवायचो पण नंतर हळूहळू आमहाला मदत करणाऱ्यांचे सहकार्य लाभत गेले अन ३ वर्षांपूर्वी रस्त्यावर चालू केलेल्या पाठशाळेचे आज खोल्यांमध्ये रूपांतर होऊन विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देत आहोत याचे समाधान आहे."

 

शिकवणीबरोबरच स्वयं-सुरक्षेचे धडे

दररोज दोन तास चालणाऱ्या ह्या पाठशाळेमधे मुलांना अभ्यासासोबत विविध कलाही शिकविल्या जातात. तसेच सर्व सण, विविध दिवस साजरे केले जातात. देशासाठी लढणारया जवानांची माहीती देण्या पासुन ते शारीरिक व्यायामासाठी योगाचे महत्व पटवून देऊन आठवड्यातून एकदा योगाचे वर्ग घेतले जातात. संगणकाची गरज असलेल्या जमान्यात मुलांना संगणक हाताळायला दिला जातो, त्याच बरोबर मुलींना आत्मसुरक्षेचे धडे दिले जातात.

 

महिला बनल्या स्वावलंबी

येथे मुलांबरोबर महिलांनाही शिकविले जाते. त्यांना स्वावलंबनाचे धडे देताना विविध प्रकारचे व्यवसायाचे पर्याय उपलब्ध करुन दिले जात आहेत. पेपर बॅग्स, कापडी पिशव्यांसारख्या गोष्टी ह्या महिला करायला शिकल्या आहेत. ह्या वस्तीतील १२वी पास महिलेला शिक्षिका म्हणुन घेऊन बाकीच्या महिलांना शिक्षणाचे महत्व पटवुन देण्यात येत आहे. मागच्याच आठवड्यात येथील महिलांना स्वयं-रोजगार प्रशिक्षणासाठी सिंबायोसिस या शैक्षणिक संस्थेत शॉर्ट टर्म कोर्सेस साठी नोंदणीही केली आहे. 

"मला दिड वर्षांपूर्वी लिहता-वाचता येत नव्हते. आता मी माझी सही करु शकते.  माझ्या मुलांसमवेत शिकत असल्याने शिक्षणाची प्रेरणा मिळते. कधी शाळेचे तोंडही बघितले नव्हते त्यामुळे कुठेही सही करण्याची पाळी आल्यावर अंगठा पुढे करावा लागायचा पण आता शिकल्यामुळे सही करते. आता इंग्रजीचे धडे गिरवून तीही भास आत्मसात करायची आहे," असे सांगत होत्या इंदू चौहान. त्या मूळच्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज च्या रहिवाशी असून त्यांचे पती बांधकाम मजूर आहेत.

 

मुलांसाठी विनामुल्य बससेवा

पाठशाळेतील विद्यार्थ्यांची महापालिकेच्या शाळेत नोंदणी केली, पण त्यांच्या येण्याजाण्याचा प्रश्न कायम होता. पाठशाळेत शिकवायला येणाऱ्या महिलांपैकी प्राजक्ता रुद्रवार, रोशनी रॉय, केतकी नायडू य महिला मुलांची ने-आण करायच्या परंतु हे दररोज शक्य नव्हतं. सोबतीला डोअर स्टेप सारखी सामाजिक संस्था अशाप्रकारे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विनामुल्य ने-आण करत असे पण वीट भट्टी,कामगार वस्ती किंवा झोपडीपट्टीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच ही सुविधा देणार ही संस्थेची अट होती. त्यामुळे जे विद्यार्थी चाळीत रहातात व त्यांची आर्थिक परिस्थिती खुप चांगली नाहिये, अशा विद्यार्थ्यांना स्वत:ची सोय स्वत:च करावी लागत होती.

मग ह्यासाठी शाळेचे मुख्याध्यापिका,स्थानिक नगरसेवक,व सहंगामीच्या महिलांनी मिळून मस्ती की पाठशाळाचे शिक्षक व डोअर स्टेप संस्था ह्या सर्वांनी आपापल्या परीने ह्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडे पाठपुरावा केला व त्याचे फलित म्हणजे आज रावेत येथे सर्व विद्यार्थ्यांना विनामुल्य बससेवा उपलब्ध झाली आहे.

उज्वल भविष्यासाठी मुलांना शिक्षणाची गरज असतेच. मात्र, ज्यांना पोटाची खळगी भरण्याचीच भ्रांत आहे, अशाना त्यापेक्षाही अन्नाची गरज असते. नेमकी हीच गरज ओळखून चिंचवड येथील केटरिंग व्यावसायिक अनिल गादिया गेल्या दिड वर्षांपासून नियमित चालणाऱ्या या पाठशाळेत दररोज मोफत नाश्ता देतात. त्याचबरोबर एका बांधकाम व्यावसायिकाने पाठशाळेसाठी जागा व शेड कुठेही नाव न सांगण्याच्या अटीवर बनवून दिले. फोक्सवॅगन या कंपनीतील  कर्मचाऱ्यांनी स्व-खर्चातुन या पाठशाळेसाठी सौरऊर्जा उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील लोक आपापल्या परीने मदत करतात.

 पहिल्यांदा लाजत-बुजत येणारी लहान -लहान मुले नंतर यांच्यात कधी मिसळून गेली ते कळलंच नाही. आज या वस्तीवरील ४० ते ५० मुलांची महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश नोंदणी होऊन ही मुले आनंदाने शाळेत जात असून चित्रकला, मैदानी खेळात प्राविण्य मिळवत आहेत. सहगामी फाऊंडेशन व राँबिनहुड आर्मी ह्या संस्थेच्या पुढाकाराने मस्के वस्ती,रावेत येथे कामगाराच्या मुलांसाठी व महिलांसाठी विविध उपक्रम राबवतात.