India

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची सोडत अचानक रद्द केल्यानं गोंधळ

उपेक्षित, वंचित, कामगार, घरेलू महिलांसह सर्वसामान्यांच्या आशेवर पाणी.

Credit : इंडी जर्नल

प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांच्या सोडतीवरुन पिंपरी चिंचवड मध्ये आज बरेच नाट्य घडले. उपमुख्यमंत्र्यांना डावलून भाजपने राजशिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने आंदोलन केले. सोडतीच्या ठिकाणी महापौरांसह भाजप पदाधिकारी आले, तरी प्रशासनाचा एकही अधिकारी हजर नव्हता. आरोप होतोय की दरम्यानच्या काळात मंत्रालयातून सुत्रे हलली आणि सोडतच रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने महापौरांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपने आयुक्तदालनासमोर ठिय्या मांडला. अखेरीस, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जनता आणि लोकप्रतिनिधींची माफी मागितली. त्यानंतर भाजपने आंदोलन मागे घेतले. दरम्यान, आवास योजनेचा 'लकी ड्रॉ' सेट असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील उपेक्षित, वंचित, कामगार, घरेलू महिलांसह सर्वसामान्य कुटूंबाना हक्काचं घर देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना राबविली. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आज (सोमवारी) दुपारी तीन वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते साडेतीन हजार घरांची सोडत काढण्यात येणार होती. त्याकरिता दुपारपासून अर्ज दाखल केलेले नागरिकांनी गर्दी करायलाही सुरुवात केली होती. या कार्यक्रमास महापौर उषा ढोरे, आमदार महेश लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, एकनाथ पवार, स्थायी सभापती संतोष लोंढे यांच्यासह भाजप पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

परंतू, या कार्यक्रमास महापालिका आयुक्तासह प्रशासनाकडून कोणीही उपस्थित नव्हते. त्यांनी राजशिष्टाचारा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे ऐनवेळी सोडतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर महापालिकेत आयुक्ताच्या कार्यालयासमोर महापाैरासह भाजप पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडला.

 

राजशिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याने सोडत रद्द - आयुक्त हर्डीकर

राजशिष्टाचाराची काही तत्वे असतात. त्याचे पालन केले जाते. स्वनिधी, शासनाच्या अनुदानातून केलेले काम असेल तर सर्वांना राजशिष्टाचारानुसार आमंत्रित करणे अपेक्षित असते. केवळ पत्रिकेत नाव घातले म्हणजे निमंत्रण दिले असे होत नाही. वेळ घ्यावी लागते. आज वेळ घेतलेली नव्हती. त्यामुळे मी वरिष्ठांशी चर्चा केली. राजशिष्टाचाराचा भंग झाल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आले आहे. तरीही, सोडत होण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नशिल होतो. वेगवेगळे पर्याय शोधत होतो.

पण, काही कारणांनी सोडत होवू शकली नाही. त्यामुळे शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधींची मी माफी मागतो. नियोजनात प्रशासन दोषी आहे का हे शोधण्यात येईल, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

 

सर्वसामान्य कुटूंबावर अन्याय - महापौर उषा ढोरे

पिंपरी चिंचवड शहरातील उपेक्षित, वंचित, कामगार, घरेलू महिलांसह सर्वसामान्य कुटूंबाना हक्काचं घर देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना राबविली. त्यातील साडेतीन हजार घरांची सोडत आम्ही काढून त्या लोकांना पात्र करणार होतो. त्याकरिता पालकमंत्र्यांना निमंत्रण दिलं होते. मात्र, महापालिकेचे आयुक्त, प्रशासनाकडून कार्यक्रमास गैरहजर राहत राजशिष्टाचारांचा मुद्दा उपस्थित करुन कार्यक्रम रद्द केला. त्यामुळे घरांचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादीने सर्वसामान्य कुटूंबावर अन्याय केल्याने त्याचा मी निषेध करते, असे महापाैर ढोरे यांनी टिका केली.

 

राष्ट्रवादीने नव्हे तर सत्ताधाऱ्यांनी आपापसातील वादात जनतेचे नुकसान केले - राजू मिसाळ

भाजपाने आमच्या नावाने टाहो फोडण्यापेक्षा या सोडतीमध्ये अनेकांनी त्यांचा 'ड्रॉ सेट केला आहे. घर मिळवून देतो असे सांगून सत्ताधारी कष्ट्रक-यांना फसवत आहेत.'ड्रॉ काढताना केवळ भाजपचेच पदाधिकारी असणार म्हणजे काय?. ठराविक लोकांचे 'ड्रॉ' काढून इतरांना फसवणा यांना एका दृष्टीने आम्ही चाप लावला आहे. भाजपची 'डीजीटल' चोरी चालणार नाही हे त्यांनी ध्यानात घ्यावे. भाजप आमदारांच्या हस्ते 'ड्रॉ' करायचा तर आपल्या शहरातील दोन आमदार भाजपचे कर्तव्यनिष्ठ नाहीत का ? असाही प्रश्न आहे.

ज्यांनी पालकमंत्री असताना शहरास काही दिले नाही. त्यांनी आता काय मन उदात्त करावे ही पण शकां आहेच. कष्टकरी गोरगरीबांना घरे निश्चित मिळाली पाहिजेत. पण त्यांचा जीव टांगणीस कशाला ?. रावेत येथील गृहप्रकल्पाच्या जागेला न्यायालयाची स्थगिती आहे. तेथे एखाद्याचा ड्रॉचा नंबर लागला तर या गरीबांना घर कधी देणार याचा कालावधी सत्ताधारी देणार का ? असा सवाल विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केला.

 

महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने मनमानी - राहुल कलाटे

महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने मनमानी पद्धतीने कामे केली जात आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी राजशिष्टाचार असतो, त्याचे पालन भाजपची सत्ता आल्यापासून केले जात नाही. श्रेयवाद करण्यासाठी राजकारण केले जात आहे. वाकडमधील विकासकामे उदघाटन करण्यासाठी महापौर यांना पत्र दिले आहे. मात्र, महापौर राज्यसरकारमधील मंत्र्याना निमंत्रण पत्र देत नाहीत. राजशिष्टाचार पुण्याच्या महापौरांना कळतो. परंतु, आपल्या महापौरांना कळत नाही. राजशिष्टाचाराचे उल्लंघन करुन सत्ताधाऱ्यांनी स्वतः आंदोलन करने ही बाब हास्यास्पद आहे. यावरुन महापौर चिंचवड़ मधील स्थानिक नेत्याच्या दबावाखाली काम करीत आहेत. - राहुल कलाटे, गटनेते शिवसेना. 

नगरसेवक एकनाथ पवार म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेतून गोरगरीब नागरिकांना घरे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. महापालिकेतील राष्ट्रवादीच्या सत्तेत तत्कालीन पालकमंत्री गिरीष बापट यांच्यावेळी कधीही राष्ट्रशिष्टाचाराचे पालन केलं होतं का? अशी आठवण करुन दिली. तरीही आम्ही पालकमंत्री अजित पवारांना निमंत्रण देवून राजशिष्टाचाराचे पालन करुनच कार्यक्रम घेतला होता. मात्र, राष्ट्रवादीला शहरातील गोरगरीबांना घरे मिळू द्यायची नाहीत. त्याना वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. सोडतीचा कार्यक्रम झाला तर आम्हाला श्रेय मिळणार नाही. म्हणून पालकमंत्री, मुख्य सचिवानी आयुक्तांना फोन करुन पंतप्रधान आवास योजनेतील सोडतीचा कार्यक्रम रद्द करायला भाग पाडले. त्या सर्वांचा मी धिक्कार करतो, लवकरच विशेष महासभेचे आयोजन करुन सभागृहात सर्व भांडा फोड करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

पक्षनेते नामदेव ढाके यांनीही पंतप्रधान आवास योजनेतील सोडतीचा कार्यक्रम राजशिष्टाचाराचे निमित्त पुढे करुन रद्द केला. त्या राष्ट्रवादी काॅंग्रेस निषेध नोंदवून आयुक्तांना खडेबोल सुनावले.