India

'तान्हाजी'च्या यशापासून पारगड किल्ल्यावर पर्यटकांची वाढती हुल्लडबाजी, स्थानिकांची तक्रार

चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या किल्ल्याकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे.

Credit : पारगडावर हुल्लडबाजी करणारे पर्यटक

कोल्हापूर: 'तान्हाजी' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून पारगड (जि. कोल्हापूर) किल्ल्यावर वाढत चाललेली हुल्लडबाजी आणि पर्यटनाच्या नावाखाली होणारा तळीरामांचा हैदोस, यांचा त्रास किल्ल्यावरच्या स्थानिकांना व तानाजी मालुसरेंच्या व इतर मावळ्यांच्या वंशजांना होत आहे. पर्यटकांच्या मनमानी वर्तणुकीचा किल्ल्यात राहणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार पोलीस प्रशासन व वनविभाग खात्याला कळवूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे रहिवाश्यांचे म्हणणे आहे.

सध्या किल्ल्यावर नागरी वस्ती कमी प्रमाणात आहे. तसेच 'तान्हाजी: द अनसंग वारीअर' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या किल्ल्याकडे पर्यटकांचा ओढाही वाढला आहे. पण यात अतिउत्साही पर्यटक किल्ल्यावर धुमाकूळ घालत आहेत. दारू  पिणे,बाटल्या, प्लास्टिक गडावर तसेच तटावरून फेकून देणे, इ. गोष्टीचा त्रास वाढला आहे. स्थानिकांनी विरोध केला तर त्यांना दमबाजी केली जाते, असे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक धास्तावले आहेत. 

पारगडाच्या इतिहासावर नजर टाकल्यास गोव्याच्या पोर्तुगीजांवर वचक ठेवण्यासाठी शिवरायांनी इसवी सन १६७६ साली या गडाची निर्मिती केली असे आढळते. पारगडचा पहिला किल्लेदार म्हणून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायाजी मालुसरे यांची शिवरायांनी नेमणूक केली. काही दिवस स्वत: महाराज या गडावर मुक्कामास होते, असे गडकरी अभिमानाने सांगतात. किल्ले पारगड महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवरील कोल्हापूर जिल्ह्य़ाचा दक्षिण टोकावरील चंदगड तालुक्याच्या सरहद्दीवर आहे. समुद्रसपाटीपासून ७३८ मीटर उंचीवर तब्बल ४८ एकर क्षेत्रफळाच्यावर किल्ला वसलेला आहे. 

 

भक्कम नैसर्गिक संरक्षण रचनेमुळे व गडावरील इमानी मावळय़ांमुळे याच्या निर्मितीपासून पुढे तब्बल १८१ वर्षे पारगड अजिंक्य राहिला. शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुमारे ३४० वर्षे हा गड त्या शूर मावळ्यांच्या वारसांनी आजही जागता ठेवलाय. हा इतिहाससंपन्न किल्ले पारगड जुन्या अवशेषांनी व अजूनही नांदत्या गडकऱ्यांच्या घरांनी जागता असून, निसर्गानेही संपन्न आहे. पारगडाभोवतीचे जंगल नानाविध वृक्षराजींनी बहरलेले असून, आजही त्यात जंगली जनावरे आहेत. हिरव्यागार वनराईच्या कवेत, विविधतेने नटलेल्या घनदाट जंगलाच्या सान्निध्यात विसावलेला किल्ले पारगड इतिहासाचा साक्ष देत आजही दिमाखात उभा आहे. 

पारगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज मालुसरे, शेलार मामांचे वंशज शेलार, गडावर झेंडा लावण्याचे काम असणारे बळवंत झेंडे व खंडोजी झेंडे, शिवकालातले तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळव्यांचे वंशज कान्होबा माळवे, घोडदळाच्या पथक प्रमुखाचे वंशज विनायक नांगरे व गडकऱ्यांचे वंशज शांताराम शिंदे, मनोहर भालेकर अजूनही राहतात. पण गडावर उत्पन्नाचे कोणतेच साधन नसल्यामुळे गडावरील बरेच लोक सैन्यभरती, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने परगावी गेलेले आहेत. त्यामुले गडावर जास्त करून वृद्ध नागरिकच राहत आहेत. 

 

किल्ल्यावर रात्री येणारे मद्यपी, पर्यटक यांवर कोणतीही बंधने नाहीत. प्रत्यक्ष पाहणीनुसार सायंकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत किल्ल्यावर येणाऱ्या अतिहौशी पर्यटकांची संख्या जास्त आहे. किल्ल्यावर नियम अंमलात आणल्यास गैरप्रकारांवर निश्चित बंधने येतील. नियमावलीप्रमाणे उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. या हौशी पर्यटकांवर बंधने आणण्यासाठी किल्ले पारगड जनकल्याण संस्था वेळोवेळी प्रयत्न करते. पण लालफितीचे अपेक्षित असे सहकार्य मिळत नसल्याने या हौशी व हुल्लडबाज पर्यटकांना चाप बसत नाही. 

किल्ले पारगड जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष कान्होबा माळवे हे म्हणाले, "१८ जानेवारी रोजी रात्री काही पर्यटकांनी गडावर हुल्लडबाजी करत होते. त्यांना आम्ही हुसकले असता, त्यांनी आम्हाला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक चंदगड पोलीस ठाण्याला आम्ही कळवले असता, आमच्याकडे वाहनांची व  कर्मचाऱ्यांची कमतरता आहे असे सांगत गडावर येण्याची असमर्थता दर्शवली. तसेच हा किल्ला वनविभागाच्या हद्दीत येतो. वनविभागाच्या वतीने या गडावर गणवेशधारी सुरक्षारक्षक द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. पण त्यालाही वनविभागाकडून अपेक्षित असे सहकार्य मिळत नाही." 

किल्ले पारगडचे रहिवासी व गडाच्या किल्लेदाराचे वंशज मनोहर भालेकर म्हणाले, "आमच्या स्थानिकांच्या अडचणी व गडावरील बेशिस्त वर्तन याबद्दल आम्ही पंतप्रधान कार्यालयाकडे आम्ही तक्रार दिली होती. त्याला पीएमओ कार्यालयाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला आहे. त्यानुसार आम्ही कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक, उपपोलीस अधीक्षक गडहिंग्लज, वनविभाग व महसूल विभाग चंदगड यांना गडावर पोलीस चौकी तसेच कायस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करण्यासंबंधी मागणी केली आहे."