India

पिंपरी-चिंचवडमध्ये नदीकिनारी 'भाजप' योजनेतील वैध औषधांचा खच

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेअंतर्गत मिळणारी औषधं टाकून देण्यात आली आहेत

Credit : ज्ञानेश्वर भंडारे

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परिसरातून पवना व इंद्रायणी नदी या दोन मोठय़ा नद्या वाहतात. पिंपरी-चिंचवडमधील पवना, इंद्रायणी नद्यांची गणना देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्या म्हणून होऊ लागली आहे. पिंपरी-चिंचवडमधून वाहणारी पवना नदी. जलपर्णी, कचरा, प्लॅस्टिकने, दूषित पाण्याने तिचा श्वास कोंडत आहे. रोजचा कचरा, निर्माल्य, हॉटेलमधील उरलेले अन्न असे बरेच काही यामध्ये टाकले जाते. आता तर चक्क मुदत न संपलेली अनेक औषधे, इंजेक्शन इ. नदी पात्रात टाकली गेली आहेत. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

देशात गोरगरिबांना स्वस्तात औषध उपचार व्हावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजनेत अल्पदरात उपलब्ध करुन दिली. पण कोणीतरी ही मुदत न संपलेली अनेक औषधे, इंजेक्शन नदी पात्रात टाकली आहेत. जवळपास ३० इंजेक्शन आणि विविध प्रकारचे औषधे ह्या कचऱ्यात टाकण्यात आली होती. थेरगाव येथील केजुबाई घाटावर स्वछता करताना पर्यावरण प्रेमींच्या हा प्रकार निदर्शनास आला.

औषधांच्या बाटल्या, सिरींज व त्यांची खोकी इत्यादी जैविक वस्तू उघड्यावर टाकण्यात आल्याने या वस्तू पुन्हा बाजारात येण्याची, तसेच एखाद्या व्यक्तीने ती वापरल्यास त्यांच्या जिवाला धोका पोहचण्याची शक्यात आहे. औषधे खरेदी करण्यासाठी औषधाच्या दुकानात गेल्यानंतर नजरेस पडणारी अनेक औषधे सध्या नदी काठी पडलेली दिसून येत आहेत. सुट्ट्या गोळ्या, कॅप्सूल्सची पाकिटे, इंजेक्शन स्वरूपात देण्यासाठी लहान बाटल्यांमध्ये उपलब्ध असलेली द्रवरूप औषधे, उच्च दर्जाची प्रतिजैविके, वेदनाशामक गोळ्या, मलम, प्रोटीन आदी कचऱ्यामध्ये आहेत. यापैकी बरीचशी औषधे २०२० च्या दरम्यान मुदत संपणारी आहेत. मानवी आजारांवर दिल्या जाणाऱ्या औषधांचा या कचऱ्यामध्ये समावेश आहे.खोक्यांमध्ये किंवा पोत्यांमध्ये भरून हा कचरा नदीत टाकला जात असावा अशी शंका पर्यावरण प्रेमी व्यक्त करीत आहेत. अनेकदा ही औषधे जाळण्याचे कामही या परिसरात सुरू असते. त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे येथे  श्वास घेणे अवघड होते. केजुबाई बंधारा परिसर निसर्गरम्य असून मोकळी हवा हे या परिसराचे वैशिष्टय़ आहे. अशा भागात औषधांचा कचरा जाळून येथे पर्यावरणाचे आणि पर्यायाने हवेचे,नदीच्या पाण्याचे  प्रदूषण होत आहे.

 

भारतीय जनऔषधी परियोजनाची औषधे

नदी किनारी सापडलेल्या सुस्थितीत असणाऱ्या औषधांच्या पाकिटावर भारतीय जनऔषधी परियोजना असा उल्लेख असून ही औषधे प्रधानमंत्री भारतीय जन औषधीक योजने अंतर्गत जनसामान्यांना, गोरगरिबांना अल्पदरात विविध औषध उपलब्ध होवीत म्हणून या योजनेतून औषधे पुरवण्यासाठी योजना चालू केली गेली आहे. संबधीत आढळलेली औषधे अजून मुदत न संपलेली चालू असणारी आहेत. या औषधातील Diuretic या औषधांच्या ३० इंजेक्शनचा साठा आढळून आला आहे, हे इंजेक्शन हार्ट किडनी च्या रुग्णांना मूत्रविसर्ग होण्यासाठी मदत व्हावी म्हणून दिले जाते. या विषयी बोलतांना एका डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की अशा प्रकारची औषधे काही लोक जास्त जमा करून ठेवतात. हा प्रकार व्यसनातही मोडला जातो. ड्रग च्या आहार गेलेल्या व्यक्तीने केलेला हा प्रकार असावा.

जलचरावर होणार परिणाम

मागील काही दिवसांपूर्वी पवना नदीपात्रात फेसयुक्त पाणी मिसळून अनेक मासे आणि कासव मृत्यू मुखी पडले असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. आता नदी किनारी आढळून आलेल्या औषधामुळे नदीपात्रात किती प्रमाणात औषधे मिसळली गेली आहेत त्यावरून त्यांचा परिणाम नदीतील जलचारावर होण्याची भीती पर्यावरण प्रेमी गणेश बोरा यांनी व्यक्त केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी सांगितले की, याविषयी आता तरी काही सांगता येणार नाही. बॅच नंबर वरून आमचा शोध लावणे चालू आहे.  अशी गोष्ट फेकणाऱ्यांना आम्ही रंगेहाथ पकडण्याच्या प्रयत्नात आहोत. सापडल्यास त्यावर कारवाई करू.