India
पूर्व महाराष्ट्रात पाऊस-गारपिटीनं शेतकरी हवालदिल, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
पावसामुळे जनावरांचा चारा भिजला असून, काढणीस आलेला गहू, हरभरा, द्राक्षे, कलिंगड, पपई अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, जालना आणि बीड आदी भागांत, उत्तर चाळीसगाव तालुक्यात गारपिटीसह झालेल्या पावसाने शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही काही भागांत पावसाची नोंद झाली. पावसामुळे जनावरांचा चारा भिजला असून, काढणीस आलेला गहू, हरभरा, द्राक्षे, कलिंगड, पपई अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. राज्याच्या सर्वच भागात पुढील चार दिवस पूर्वमोसमी पावसाचे सावट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
कर्नाटक किनारपट्टी ते मराठवाड्यापर्यंतचा कमी दाबाचा पट्ट्याचा परिणाम
राज्यात सध्या वाऱ्यांची चक्रीय स्थिती असून, कमी दाबाचे पट्टे निर्माण होत आहेत. त्यामुळे पूर्वमोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. सद्यःस्थितीत दक्षिणपूर्व मध्य प्रदेश ते विदर्भाच्या परिसरापर्यंत सध्या चक्रीय चक्रवात कायम आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रातून जाणारा कर्नाटक किनारपट्टी ते मराठवाड्यापर्यंतचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भात पाऊस आणि गारपीट होत आहे. मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील चाळीसगाव तालुक्यात गारपीट झाली, तर जळगावात पाऊण तास पावसाची हजेरी होती.
मराठवाड्यात गारपिटीने पिकांचे नुकसान
मराठवाड्यातील अनेक भागात शुक्रवारी रात्री व शनिवारी सायंकाळच्या सुमारास झालेला पाऊस व गारपिटीने काढणीला आलेला गहू, ज्वारी, हरमरा या पिकांचे अतोनात नुकसान झाले. गारपिटीचा आंबा, मोसंबी, चिंच या फळ पिकांनाही मोठा फटका बसला असून उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. औरंगाबादजवळील आडगाव बुदुक, चिंचोली, परदरी, तोलनाईक तांडा, एकोड, पाचोड, निपाणी, टाकळी आदी पंचक्रोशीत अवकाळी पाऊस झाला. परभणी, बीड, जालना जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गारपीट झाली. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला असून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातही गारपीट झाल्याची माहिती आहे. या भागातील गहू, ज्वारी, आंबा आदी पिकांचे नुकसान झाले. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद परिसरासह अन्य काही गावांत शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडत आहे. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ होत असली तरी दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. शुक्रवारी दुपारनंतर अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात पावसाला सुरुवात झाल्याने पिकांचे चांगलेच नुकसान झाले. बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर तालुक्यातही हजेरी लावली. मोताळा (जि. बुलडाणा) तालुक्यात कुरहा परिसरात गारपीट झाली. जिल्ह्यात मेहकर, देऊळगांव राजा तालुक्यात जोरदार वारा व पाऊस झाला असून, परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील वडगाव, उखळी, निळा परिसरात गारपीट झाली.
बुलडाणा जिल्ह्यात २८११ हेक्टरवर नुकसान
शुक्रवारी झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे बुलडाणा जिल्ह्यात सुमारे २८०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. सुमारे ४५०० शेतकऱ्यांचे हे नुकसान झाले आहे. सर्वाधिक ११५९ हेक्टरचे नुकसान मेहकर तालुक्यात झाले आहे. याशिवाय देऊळगावराजामध्ये ७९२ हेक्टर, बुलडाण्यात ४२२ हेक्टर, सिंदखेडराजामध्ये १५८ हेक्टर, नांदुऱ्यात १०२ हेक्टरवर तर चिखलीमध्ये ५८, मोताळा ३८, मलकापूर ८२ हेक्टरचे नुकसान असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सुमारे १०० गावांत हे नुकसान झाले आहे.
कोकण विभागातही पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आणखीचार दिवस कस तरी पूर्वमोसमी पावसाचे सावट राज्यावर राहणार आहे. त्यावप्रमाणे२१ मार्चपासून कोकण विभागातही पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात २३ मार्चपर्यंत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात आणखी दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.